भेंडी लागवड तंत्रज्ञान

डिजिटल बळीराजा-2    20-Oct-2020
|

Bhendi_1  H x W
 
बहुतेक सर्व राज्यांतून भेंडीची लागवड केली जाते आणि या भाजीला वर्षभर मागणी असते. कोवळ्या व गर्द हिरव्या भेंडीच्या फळात अ, ब आणि क जीवनसत्त्वे बऱ्याच प्रमाणात असतात. मॅग्नेशिअम, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह इत्यादी खनिजेही मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे या भाजीच्या निर्यातीला चांगला वाव असल्याने त्याची तंत्रशुद्ध मार्गाने लागवड करणे गरजेचे आहे.
 
भेंडी हे महत्त्वाचे नगदी पीक बनत असून, या पिकाचे प्रथम उगमस्थान हे उष्ण व समशीतोष्ण आफ्रिका देशातील, तर द्वितीय उगमस्थान हे भारत मानले जाते. खरीप व उन्हाळी हंगामात घेण्यात येणाऱ्या भाजीपाल्यात भेंडी हे एक लोकप्रिय पीक असून भारतातील बहुतेक सर्व राज्यांतून भेंडीची लागवड केली जाते. या भाजीला वर्षभर मागणी असते. कोवळ्या व गर्द हिरव्या भेंडीच्या फळात अ, ब आणि क जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. तसेच मॅग्नेशिअम, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह इत्यादी खनिजेपण भरपूर प्रमाणात असतात. आखाती देशांत आणि अरब राष्ट्रांत या भाजीला चांगली मागणी आहे. त्यामुळे या भाजीच्या निर्यातीला चांगला वाव आहे.
 
भारतामध्ये प्रामुख्याने प. बंगाल, बिहार, ओरिसा, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, हरियाना या राज्यांत भेंडीची लागवड प्रामुख्याने करतात. भेंडीला वर्षभर चांगला दर मिळत असल्यामुळे आज शेतकरी या पिकाकडे वळत आहेत. महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, धुळे, औरंगाबाद, परभणी, अकोला, नाशिक या जिल्ह्यात भेंडीची लागवड केली जाते. भेंडीला मोठ्या शहरांतच भरपूर मागणी असते. कोवळ्या भेंडीला बाजारभाव चांगला मिळतो.
 
सुधारित जाती 
 
अधिक उत्पादनासाठी व निर्यातीसाठी भेंडीच्या योग्य जातीची निवड करणे अतिशय महत्त्वाचे आहे. जातीची निवड करताना हळद्या (केवडा) रोगास प्रतिकार करण्याची क्षमता, अधिक उत्पादन आणि फळांना गर्द हिरवा रंग इत्यादी बाबींचा विचार करावा. महाराष्ट्रासाठी खालील जातींची शिफारस केली आहे.
 
 • फुले विमुक्ता : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत राष्ट्रीयकृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे येथून हा वाण विकसित करून लागवडीसाठी प्रसारित केला आहे.
   
 • फुले विमुक्ता हा वाण लवकर येणारा, अधिक उत्पादन देणारा (206.10 क्विंटल/हे ), फळाची प्रत चांगली असणारा आणि विषाणूजन्य रोगास बळी न पडणारा आहे. या जातीची फळे हिरवी, सरळ व आकर्षक असून चांगल्या प्रतीची आहेत.
   
 • फुले उत्कर्षा : ही सुधारित जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून सान 2003 मध्ये लागवडीसाठी शिारस करण्यात आली आहे. या वाणाची फळे हिरवी, सरळ, आकर्षक, 8 ते 10 सें. मी. लांब व निमुळती असतात. ही जात हळद्या रोगास कमी प्रमाणात बळी पडते व प्रतिहेक्टरी सरासरी 150 ते 200 क्विंटल उत्पादन मिळते. ही जात खरीप व उन्हाळी लागवडीसाठी योग्य आहे.
   
 • परभणी क्रांती : ही जात मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेली असून पुसा सावनीपेक्षा कणखर व केवडा या विषाणू रोगाला अधिक प्रतिकारक आहे. बी लावणीपासून 50 ते 55 दिवसांत फळे तोडणीला येतात. फळे कोवळी- हिरवी, निमुळती आणि 7 ते 10 सें. मी. लांब असून साठवणीत लवकर मऊ पडते. या जातीपासून प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादन 120 ते 140 क्विंटल मिळते.
   
 • अर्का अनामिका : ही जात भारतीय फलोद्यान संशोधन संस्था (बंगळूर) येथे विकसित करण्यात आलेली आहे. फळे गर्द हिरवी व लांब असल्याने फळे काढणीस सोयीस्कर जातात. विशेषत: म्हणजे फळांचा देठ लांब असल्याने फळे काढणीस सोयीस्कर जातात. या जातीपासून प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादन 90 ते 120 क्विंटल मिळते. अर्का अनामि का या जातीची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात करावी. चांगल्या प्रतीच्या फळांसाठी एक दिवसाआड तोड करावी.
   
भेंडीच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी कसदार, परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6 ते 7 च्यादरम्यान असणे आवश्यक आहे. भेंडी पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. साधारणत: तापमान 20-25 अंश सें.ग्रे पेक्षा कमी असल्यास भेंडीच्या उगवण क्षमतेवर विपरित परिणाम होतो. तापमान 400 सें.पेक्षा जास्त झाले तर फुलांची गळ होते. जास्त दमट हवामानात पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. मात्र दमट हवेत या पिकावर भुरी रोग पडून झाडाची वाढ खुंटते आणि वेळीच उपाय न केल्यास पीक संपूर्णपणे हातचे जाऊ शकते.
 
पूर्वमशागत आणि लागवड 
 
Bhendi_2  H x W
 
या पिकाच्या लागवडीसाठी प्रथम जमिनीची चांगली नांगरणी करून कुळवाच्या 2 ते 3 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या पाळीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत 20 ते 25 टन जमिनीत टाकावे. तण व जुन्या पिकांची धसकटे वेचून टाकावीत. लागवडीसाठी सरी-वरंबा पद्धत फायदेशीर ठरते. शेणखत खत घालणे शक्य नसेल तर प्रथम खरिपात हेक्टरी 100 किलो ताग पेरून फुलावर येताच तो गाडून घ्यावा. एक ते दीड महिन्याने ताग कुजल्यावर त्यावर भेंडीचे पीक घ्यावे.
 
भेंडीचे पीक किडी व रोगाला लवकर बळी पडणारे असल्याने जमिनीला भरपूर सेंद्रिय खते द्यावीत. हे पीक निव्वळ रासायनिक खतावर घेण्याचे टाळावे.
 
सर्वसाधारणपणे पावसाळी हंगामात लागवडीचे अंतर 30 X 30 सें. मी. व लागवड 15 जनू ते 15 जुलैदरम्यान करावी. परंतु निर्यातीसाठी कोवळी फळे नियमित काढावी लागत असल्याने एकूण उत्पन्नावर परिणाम होतो. ते टाळण्यासाठी भेंडीची लागवड 45 X 15 सें. मी. ठेवल्यास योग्य प्रतीची फळे मिळून उत्पन्नही चांगले मिळते. लागवडीच्या अंतरानुसार प्रतिहेक्टरी क्षेत्रावर एकूण 10 ते 12 किलो बियाणे लागते. लागवडीपूर्वी 3 ग्रॅम थायरम अथवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रतिकिलो बियाण्यांस चोळून घ्यावे. त्यामुळे भेंडीचे मर रोगापासून नियंत्रण होते. त्यानंतर अझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळणारे जिवाणूसंवर्धन 25 ग्रॅम/ किलो बियाण्यांस चोळावे.
 
खत व्यवस्थापन 
 
भेंडीच्या सुधारित जातीच्या पिकास हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश खत द्यावे. यातील अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणीच्यावेळी व त्यानंतर राहिलेले अर्धे नत्र 4 आठवड्यांनी द्यावे. खते व्यवस्थित दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे.
 

आंतरमशागत आणि पाणी व्यवस्थापन 
 
भेंडी लागवडीनंतर दोन आठवड्यांनी रोपांची विरळणी करावी. यावेळी एक ठिकाणी एकच जाेमदार रोप ठेवावे. पिकास दर 6 ते 8 दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे. तसेच पिकांमधील तणांची खुरपणी करावी. खुरपणीनंतर झाडांना मातीचा भर दिल्यास वाढीवर आणि उत्पादनावर चांगला परिणाम होतो. सरीमध्ये गवताचे किंवा भाताच्या पेंढ्याचे किंवा पालापाचोळ्याचे किंवा रंगीत प्लॅस्टिकचे आच्छादन घालावे. यामुळे जमिनीतील ओलावा जास्त दिवस टिकून राहतो व तणाचा त्रास कमी होतो.
 
काढणी आणि उत्पन्न 
 
जातीपरत्वे भेंडी बियांच्या लागवडीपासून 40 ते 45 दिवसांत भेंडीच्या झाडास फुले येण्यास सुरुवात होते व त्यानंतर 6 ते 7 दिवसांत फळे काढण्यास सुरुवात होते. जातीनुसार फळे तोडणीस येताच मध्यम आकाराच्या हिरव्यागार, कोवळ्या व लुसलुशीत भेंड्या शहराच्या बाजारासाठी तोडाव्यात. काढणी सकाळी लवकर अथवा सायंकाळी करावी. काढणीनंतर फळे उन्हात राहणार नाही, याची काळजी घ्यावी. सर्वसाधारणपणे निर्यातीसाठी कोवळ्या व लहान (6 ते 8 सें. मी. लांबीच्या) फळांना चांगला भाव व भरपूर मागणी असल्याने फळांची काढणी दोन दिवसाआड करावी. काढणीनंतर फळांची प्रतवारी व पॅकिंग करून वाहतूक करावी. यामुळे फळांचा ताजेपणा टिकून राहतो.
 
सर्वसाधारणपणे 6 ते 8 सें. मी. लांब व वजनाने 15 ग्रॅमपेक्षा कमी असलेली फळे निर्यातीस योग्य समजली जातात. फळांची प्रतवारी करताना वाकडी, पिवळी व कीडग्रस्त फळे काढून टाकावीत. भेंडी लागवडीचे सुयोग्य नियोजन केल्यास खरीप हंगामात 150 ते 200 क्विं. उत्पादन मिळते.
 
भेंडीच्या निर्यातीसाठी आवश्यक बाबी 
 
· फळे नाजूक आणि हिरव्या रंगाची असावीत.
 
· हिरव्या भेंडी फळाची लांबी 7 ते 9 सेंमी असावी.
 
· फळे रोग व किडींच्या प्रादुर्भावापासून मुक्त असावी.
 
· खराब किंवा डाग पडलेली, पिवळी फळे निवडून वेगळी करावीत.
 
· फळांची प्रतवारी करूनच निर्यातीसाठी पाठवावीत.
 
· फळांच्या पॅकिंगसाठी ज्यूटच्या धाग्यापासून तयार केलेल्या 9 X 10 मेश प्रतिचाैरस इंच पिशव्यांचा वापर करावा. आणि हवा खेळती राहावी.
 
· टिश्यू पेपरचा वापर फळे गुंडाळण्यासाठी करावा. जेणेकरून बाष्पीभवन कमी करून टिकाऊ कालावधी वाढविण्यासाठी उपयोग होतो.
 
· फळे तोडणीवेळी शक्यतो थंड वातावरण असावे. तसेच तापमान 7-10 अंश सें. ग्रे. आणि आर्द्रता 90-95 टक्के असावी.
 
· पॅकिंगसाठी टिश्यू पेपरचा वापर करावा. त्यानंतर करोगेटेड फायबर बोर्ड बॉक्स वापरावेत.
 
· निर्यातीवेळी जास्तीत जास्त थंड हवा खेळती राहील याचा विचार करावा.
 
· निर्यातीसाठी फळे पाठविण्यासाठी फळांवर कीटकनाशकांचे किंवा बुरशीनाशकांचे अवशेष नसावेत.
 
· ज्या बुरशीनाशकांवर किंवा कीटकनाशकांवर भाजीपाला पिकामध्ये वापरण्यास बंदी घातली आहे, अशी औषधे फवारणीसाठी वापरू नयेत.
 
पीकसंरक्षण 
 
भेंडीवर हळद्या किंवा केवडा (यॅलो व्हेन मोझॅक) आणि भुरी (पावडरी मिल्ड्यू) हे दोन अत्यंत घातक रोग पडतात. तसेच तुडतुडे, शेंडे व फळे पोखरणारी अळी, मावा व पांढरी माशी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव आढळतो.
 
भेंडी पिकावरील रोग नियंत्रण  
 • केवडा : हा रोग विषाणूजन्य असून, रोगट झाडांच्या पानांच्या शिरा पिवळ्या पडतात. पानांचा इतर भाग हिरवा व पिवळा दिसतो. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते व भेंडी कमी प्रमाणात लागते. भेंडी लागली तरी ती पिवळी व रोगट दिसते.
   
 • उपाय : रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असतानाच रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने पांढऱ्या माशीर्माफत होत असल्यामुळे त्यांच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 100 मिली प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून भेंडी काढून झाल्यावर फवारणी करावी. फुले विमुक्ता, परभणी क्रांती, अर्का अनामिका या रोगप्रतिकारक जातींचा वापर करावा.
   
 • भुरी : हा बुरशीजन्य रोग असून त्याची सुरुवात खालच्या जुन्या पानांपासून होते. पानांवर पांढरे डाग दिसतात. ते पसरत जाऊन संपूर्ण पानांवर व झाडावर पावडर पसरल्यासारखीदिसते. दमट वातावरण असल्यास हा रोग झपाट्याने वाढतो. त्यामुळे सर्व पाने खराब होतात आणि गळून पडतात.
   
 • उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 300 मेश गंधकाची भुकटी प्रतिहेक्टरी 20 किलो याप्रमाणात धुरळावी किंवा पाण्यात मिसळणारे गंधक 80 % 20 ते 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा कॅराथेन किंवा कार्बेडॅझिम 10 मि. ली. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. 5 % निंबोळी अर्काची फवारणी करावी.
   
 • पानांवरील ठिपके : सरकोस्पोरा या बुरशीमुळे पानांवर तपकिरी रंगाचे वेडेवाकडे ठिपके येतात. जास्त प्रमाणात हा रोग पसरल्यास पाने गळून पडतात.
   
 • उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड (ब्लायटाॅक्स) 3 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात किंवा कॅप्टन 2 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे.
 
भेंडी पिकावरील कीड नियंत्रण  
 • तुडतुडे (Jassids) : हिरव्या रंगाचे बारीक तुडतुडे पानांवरील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने विटकरी व तांबडी झालेली दिसतात. तसेच ती वरच्या बाजूने द्रोणाच्या आकाराप्रमाणे वळलेली दिसतात. यालाच ’हॉपरबर्न’ असे संबोधले जाते. या किडीचे वेळेवर नियंत्रण झाले नाही तर फार नुकसान होते.
   
 • पांढरी माशी : या किडीची पिले आणि प्रौढ पानांतील रस शोषून घेतात. किडीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास पाने पिवळी पडतात. याशिवाय कीड विषाणू रोगाचा प्रसार करते.
   
 • उपाय : तुडतुडे व पांढरी माशी नियंत्रणासाठी फ्लाेनिकामीड 50 डब्ल्यूजी 2 ग्रॅम किंवा फ्ल्यूपायरीडीफ्यूरॉन 17.09 एसएल 20 मिली प्रति 10 लि. पाण्यातून गरजेनुसार फवारणी करावी.
   
 • मावा : हिरव्या व काळ्या रंगाचा मावा प्रामुख्याने पानांच्या खालच्या बाजूस कोवळ्या फांद्यांवर किंवा शेंड्यावर आढळतो. मावा मधासारखी विष्ठा पिकाच्या विविध भागांवर टाकत असल्याने तो भाग काळपट, चिकट झालेला दिसतो.
   
 • उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लाेप्रीड 17.8 एसएल 5 मिली किंवा डायमेथोएट 30 टक्के15 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पर्यायी उपाययोजनेत प्रारंभापासून निंबोळी अर्क 5% दर 10 दिवसांनी फवारल्यास भेंडीचे कीड व रोगांपासून संरक्षण होते.
   
 • शेंडे व फळे पोखरणारी अळी (Shoot and fruit borer) : या किडीचा प्रादुर्भाव उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर आढळतो. या किडीची मादी माशी पानांच्या बेचक्यात वाढणाऱ्या अंकुरावर, फुलकळीवर, फुलावर आणि फळावर अंडी घालतात. अंड्यातून जन्मलेली अळी कोवळ्या शेंड्यात छिद्र करून शिरते व फांद्या आणि खोडांना पोखरते. त्यामुळे मुळाकडून शेंड्याकडे होणारा अन्नद्रव्यांचा पुरवठा थांबतो. परिणामी, झाडांचे शेंडे सुकू लागतात आणि मरतात. पुढे हीच अळी भेंडी फळांमध्ये शिरून फळ पोखरते.
   
 • उपाय : किडलेल्या भेंड्या दिसताच तोडून नष्ट कराव्यात. प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास सायपरमेथ्रीन 25 टक्के 5 मिली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5 टक्के 6 मिली प्रति 10 लि. पाण्यातून साध्या हातपंपाने फवारावे.
-डॉ.मधुकर भालेकर, 
श्रीमती कीर्ती भांगरे अखिल भारतीय समन्वित भाजीपाला संशोधन प्रकल्प, 
मफुकृवि, राहुरी.