कुट्टूचे उत्पादन

डिजिटल बळीराजा-2    09-Jan-2020
K_1  H x W: 0 x
 
कुट्टूचे उत्पादन हे भारतामधील महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, तमिळनाडू या राज्यांमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये घेतले जाते. अनेक प्रकारच्या व्रत व उपवासामध्ये जसा भगरीचा विविधरीत्या वापर करतात तसाच याचाही वापर केला जातो. कारण कुट्टू हे अतिशय पौष्टिक, ऊर्जा देणारे, कमी-कॅलरीज व जास्त जीवनसत्त्व असणारे आणि इतर पोषक घटक असलेले महत्त्वाचे धान्य आहे.
 
भारतामध्ये अनेक प्रकारच्या कडधान्यांचे व तृणधान्यांचे उत्पादन घेतले जाते. मग त्यामध्ये प्रामुख्याने गहू, ज्वारी, बाजरी, मका, तूर, उडीद, मूग, मटकी, चवळी, भगर, वाटाणा हे आहेत. कारण आपल्याला या सर्वांचे आहारातील महत्त्व व वापर माहित आहे. याच तृनधान्यामधील एक असलेला की ज्यामध्ये आरोग्यासाठी लागणारे अनेक प्रकारचे पोषण घटक भरपूर प्रमाणात उपलब्ध असूनही दुलक्षित आहे व त्याचे उत्पादन हे अगदीच थोड्या प्रमाणात घेतले जाते ते धान्य म्हणजे कुट्टू होय.
 
कुट्टूचे उत्पादन भारतामधील महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, तमिळनाडू या राज्यांमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये घेतले जाते.
 
कुट्टूला वेगवेगळ्या राज्यांमध्ये बकव्हीट, टाऊ, फाफर अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.
 
कुट्टू हे एक प्रकारचे धान्य असून, त्याच्या बियांचा आकार हा त्रिकोणी असतो.

Kuttu Images_11 &nbs
 
हिंदू धर्मामध्ये कुट्टूला खूप महत्त्वाचे स्थान आहे. कारण अनेक प्रकारच्या व्रत व उपवासामध्ये जसा भगरीचा विविधरीत्या वापर करतात तसाच याचाही वापर केला जातो. कारण कुट्टू अतिशय पौष्टिक, ऊर्जा देणारे, कमी-कॅलरीज व जास्त जीवनसत्त्व असणारे आणि इतर पोषक घटक असलेले महत्त्वाचे धान्य आहे.
 
कुट्टूमध्ये असलेले पौष्टिक घटक व गुणधर्म
 
1) कुट्टूमध्ये सरासरी प्रथिने 13ते 15%, कर्बोदके 70%, चरबी 2 ते 2.5 %, फायबर 1 ते 1.5 %, खनिज 2 ते 2.5 % या प्रमाणात असतात.
 
2) कुट्टूमध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. ज्यांना गव्हाच्या प्रथिनांची अ‍ॅलर्जी असते किंवा गव्हाच्या प्रथिनांपासून ज्यांना सेलेक हा आजार झालेला आहे त्यांना फायदेशीर असते.
 
3) या खनिजांमध्ये आपल्याला शरीरास आवश्यक असलेल्या खनिजांपैकी अनेक खनिजे ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात जसे की लोह, कॅल्शियम, तांबे, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, आयोडीन, फ्लोरीन आणि मॅग्नेशियम.
 
4) त्याचप्रमाणे कुट्टूमध्ये बी, बी कोम्प्लेक्षव ई व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.
 
5) कुट्टूमध्ये असणारे लोह हे रक्ताचा प्रवाह सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तवाहिन्या अडकल्या जात नाहीत तसेच चयापचय राखते आणि शरीरास ऑक्सिजनसह पेशी प्रदान करते. लोह प्रमाण भरपूर असल्यामुळे हे त्वचेसाठी फायदेशीर असते व यामुळे अ‍ॅनेमियाचा धोका कमी होतो. यामधील असलेल्या मॅगनीजमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
 
6) यामध्ये फायबर्सचे प्रमाण खूप असल्यामुळे त्याचा वजन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
 
7) कुट्टूमधील व्हिटॅमिन ई हे उत्तम अ‍ॅन्टीऑक्सिङंट म्हणून काम करते. यामुळे कर्करोगाची जोखीम कमी होते. तसेच कुट्टूच्या
आहारातील समावेशामुळे मधुमेह व उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
 
8) कुट्टूमध्ये फाइटोन्यूट्रिएंट (रूटीन) हा उपलब्ध असतो जो कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करतो. ज्यामुळे हृदयरोगाची जोखीम कमी होते.
 
आवश्यक जमीन व लागवड पद्धत 
 
कुट्टू हे कोणत्याही प्रकारच्या (बागायत, माळरान) जमिनीमध्ये उत्तम प्रकारे येते. याच्या पेरणीसाठी एकरी 25 ते 30 किलो बी लागते. कुट्टूची पेरणी रब्बी हंगामामध्ये म्हणजेच जूनमध्ये केली जाते. कारण कुट्टूची फुले आणि बी विकसित होण्यासाठी मध्यम प्रमाणात थंडी व पाण्याची आवश्यकता असते. पेरणीयंत्राद्वारे (तिफन) ज्वारी पेरणी करण्याची जी पद्धत असते त्याचप्रमाणे कुट्टूची पेरणी केली जाते. पेरणी केल्यानंतर योग्य प्रमाणात ओलावा असल्यास 4-5 दिवसांनंतर बीज अंकुरले जाते. पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांमध्ये या पिकाची 10 सें.मी.पर्यंत वाढ होते. 40 ते 60 दिवसांमध्ये या पिकाला फुलधारणा चालू होते. या फुलधारणेच्या कालावधीमध्ये मधुमक्षिकापालन हा व्यवसाय उत्तमप्रकारे करता येतो. कारण या पिकास फुलधारणा जास्त प्रमाणात होते तसेच या मधुमक्षिकांमुळे परागीभवन होऊन पीक उत्पादन क्षमता वाढते.
 
Kuttu Images_3  
 
वापरावयाची खते
 
कोणतीही खते वापरण्यापूर्वी मातीपरीक्षण करून घ्यावे व त्यानुसारच कमी जास्त प्रमाणात खते वापरावीत. चांगले उत्पादन मिळवण्यासाठी या पिकाला प्रतिएकर 50 किलो नत्र, 20 किलो फॉस्फोरस व 40 किलो पोटॅश वापरावे. त्याचबरोबर शेणखताचा जर वापर केला तर उत्पादनात चांगला फायदा मिळतो. 
 
फळधारणा व काढणी पद्धत
 
Kuttu _1  H x W
 
फुलधारणेनंतर 60 ते 75 दिवसांमध्ये फळधारणा सुरू होऊन बी परिपक्व होण्यास सुरुवात होते. हे पीक 3 महिन्यांमधे काढणीसाठी तयार होते, परंतु तरीही कापणीची योग्य वेळ पिकाच्या दाणे परिपक्वतेवरूनच ठरवली जाते. कारण या पिकाचे सर्व दाणे हे सोबत परिपक्व होत नाहीत. म्हणून जेव्हा 80 टक्के बीज परिपक्व होतात तेव्हाच या पिकाची कापणी करावी आणि जर कापणी योग्य वेळेत केली नाही, तर परिपक्व झालेले बी गळून जाते. पीककापणी झाल्यानंतर 2 ते 4 दिवस वाळवून मगच मळणी करावी. या पिकाचे एकरी 7 ते 10 क्विंटल उत्पादन मिळते. 
 
कुट्टूचे पदार्थ 
 
कुट्टू हा आहारात समाविष्ट करताना तो अनेक वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो म्हणजेच त्याचा रवा करून त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. त्याचे पीठ तयार करून त्याच्यापासून पदार्थ बनवता येतात किंवा हे पीठ आपण दुसर्‍या पदार्थामध्ये काही प्रमाणात वापरु शकतो किंवा त्याचा भरडा करून त्यापासून विविध पदार्थ बनवून ते नाश्ता, जेवण किंवा फराळामध्ये वापरू शकतो.
 
कुट्टूच्या पिठापासून बनवले जाणारे पदार्थ 
 
1) भाकरी : आपण जसी ज्वारीच्या पिठाची भाकरी करतो त्याचप्रमाणे कुट्टूच्या पिठाची भाकरी तयार करता येते. अशी भाकरी करण्यासाठी सुरुवातीला पीठ बारीक दळून घ्या, त्यात योग्य प्रमाणात पाणी टाकून ते मळून घ्या व आवश्यक त्या जाडीनुसार लाटून घ्या. भाकर कडक होण्यासाठी शक्यतो ती पातळ लाटवी. अशी भाकर आपण ताजी असतानाही खाऊ शकतो. त्याचप्रमाणे ती कडकही खाता येते. 
 
2) चकली : यासाठी आपल्याला कुट्टूचे पीठ, हिंग, मीठ, बारीक केलेले आले या साहित्याची आवश्यकता आहे. हे सर्व साहित्य योग्य प्रमाणात घेऊन पाण्यात एकत्र घट्ट मळून घ्या. नंतर त्याच्या वाती करून वर्तुळे करावीत व त्यास वाफेवर चांगली शिजवून घ्यावीत. शिजल्यानंतर त्यास व्यवस्थित तळून घ्यावीत. अशी तळलेली चकली ही साधारणतः महिना ते दीड महिना टिकते. 
 
3) अनारसे : यासाठी कुट्टूचे पीठ, गूळ, तूप या साहित्याची आवशकता आहे. सुरूवातीला कुट्टूचे पीठ घेऊन त्यात थोडा गूळ, तूप व पाणी घालावे व त्यास चांगले मळावे. मळल्यानंतर त्याचे वडे करून एका बाजूने खसखस लावून तुपात तळावे.
 
4) कुट्टू पुरी :
Kuttu _1  H x W
 
यासाठी कुट्टूचे पीठ, कोथिंबीर, मीठ, तिखट हे साहित्य लागते. पुरी बनवण्यासाठी सुरुवातीला कुट्टूचे पीठ पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्यावे. पुरीला चांगली चव येण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये आपण उकडलेला बटाटा कुस्करून टाकू शकतो. नंतर यामध्ये योग्य प्रमाणात कोथिंबीर, मीठ, तिखट टाकून परत मळावे व त्यापासून पुर्‍या बनवाव्यात. या पुर्‍या दह्यासोबत खूप चव देतात. 
 
कुट्टूच्या रव्यापासून बनवले जाणारे पदार्थ 
 
1) करंजी : करंजी बनवण्यासाठी सुरुवातीला कुट्टूचा रवा तुपात चांगला भाजून घ्यावा, नंतर त्यामध्ये साखर, लवंग, नारळ, वेलची, मिरी मिसळून सारण तयार करावे व हे सारण लाटलेल्या लाट्यामध्ये टाकून तळून घ्यावेत. 
 
2) चिरोटे : चिरोटे करण्यासाठी कुट्टूच्या रव्याला थोडेसे तूप चोळावे, नंतर पाणी घालून रव्यास मळून घ्यावे. मळल्यानंतर गोळा कुटून मऊ करावा. त्याची लहान गोळी करून ती पातळ लाटावी. अशा तीन पोळ्या करून त्यांना तूप लाऊन एकावर एक ठेवाव्यात. नंतर यापासून लहान पट्टी तयार करून घ्यावी व तिचे लहान लहान तुकडे कापावेत. हे तुकडे परत लाटून पुन्हा दुमडून चौकोनी कापावेत व तुपात तळून साखरेबरोबर खावेत.
 
3) हलवा : सुरुवातीला कुट्टूचा रवा तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यावा. रवा भाजल्यानंतर त्यामध्ये आंब्याचा रस, पाणी, मीठ व साखर घालून शिजवून घ्यावे. शिजल्यानंतर त्यामध्ये वेलचीची पूड व बदामाचे तुकडे घालावे.
 
4) इतर पदार्थ :
 
Kuttu Images_10 &nbs
 
कुट्टूच्या रव्यापासून आपण अनेक पदार्थ बनवू शकतो. मग त्यामध्ये उपमा, शिरा, खीर, केक यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
 
कुट्टूच्या भरड्यापासून बनवले जाणारे पदार्थ 
 
कण्या : आपण कुट्टूच्या भरड्यापासून कण्या बनवू शकतो. यासाठी सुरुवातीला कण्या व्यवस्थित शिजवून घ्याव्यात. या कण्या शिजल्यानंतर किंवा शिजताना त्यामध्ये चवीनुसार गूळ, बदाम, काजू किंवा इतर ड्रायफ्रूट टाकावेत. 
 
कुट्टूप्रक्रिया उद्योगातील संधी
 
कुट्टूचे आहारातील एवढे महत्त्व लक्षात घेता ते उपवासासाठी का वापरले जाते हे लक्षात येते. मग याच संधीचा फायदा घेऊन आपण जर त्यावर प्रक्रिया करून विविध पदार्थ निर्माण केले तर ते पदार्थ आपण उपवासातही वापरू शकतो तसेच आरोग्याच्या दृष्टीने चांगले असल्याने ते इतर वेळीही वापरू शकतो. यासाठी आपण त्याचे आहारातील महत्त्व लोकांना पटवून दिले तर या पदार्थांना नक्कीच मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. 
 
प्रा. कडभने व्ही. एस., 
प्रा. शेळके जी. एन.,
9970225237
अन्नतंत्र महाविद्यालय आष्टी, बीड