रसासाठी उपयुक्त द्राक्षाची वाणे

डिजिटल बळीराजा-2    08-Jan-2020
Grapes Juice_1  

द्राक्षाच्या उत्तम रसासाठी योग्य वाणांची वैशिष्टे शेतकर्‍यांना माहिती असणे गरजेचे असून काही वाणांची माहिती या लेखात दिली आहे.
 
आजमितीस महाराष्ट्रात सुमारे 1.35 लाख हे. क्षेत्रावर द्राक्ष लागवड केली जात असून हे प्रमाण दर वर्षी वाढत आहे. अजूनही द्राक्ष लागवडीस पुष्कळ वाव आहे. अपुरे मनुष्यबळ, मजुरीत झालेली वाढ, संजीवके, कीटकनाशके व अन्य रसायने यामध्ये झालेली भरमसाठ वाढ यामुळे द्राक्ष उत्पादन खर्चात वाढ होत आहे. उपलब्ध जाती केवडा व भुरी यांसारख्या बुरशीजन्य रोगांना बळी पडतात. यांच्या नियंत्रणासाठी बागायतदारांचा पुष्कळ खर्च होतो. जागतिक हवामानबदलामुळे द्राक्ष उत्पादन उद्योगात अस्थिरता आली आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रात लागवडीसाठी वापरण्यात येणार्‍या जातींबाबत वेगळा विचार करण्याची गरज आहे, तसेच द्राक्षाच्या उपयोगात विविधता आणण्याची गरज आहे. 
 
जगात एकंदर 5,000 ते 6,000 द्राक्षाच्या जाती असून त्यापैकी काहीच जाती लागवडीसाठी वापरल्या जातात. प्रत्येक वाण वेगळ्या गुणधर्माचे असते. प्रत्येक जातीत घड लहान मोठ्या आकाराचे व वेगळ्या चवीचे असून त्यांच्या टिकाऊपणात फरक असतो. त्याच्या गुणधर्मानुसार त्यांचे वेगवेगळे अंतिम उपयोग केले जातात. जर जगामध्ये वेगवेगळे अंतिम उपयोग पहिले तर असे लक्षात येते, की 35.8% द्राक्ष खाण्यासाठी, 47.3% वाइनसाठी, 8% बेदाणे अथवा मनुक्यासाठी, 5.5% रसासाठी तर राहिलेले अन्य कारणांसाठी उदा. औषध, तेल, नैसर्गिक रंग, पशुखाद्य इ. उपयोगात आणली जातात.
 
भारतातील द्राक्ष उत्पादनाचा विचार करता, उपलब्ध आकडेवारीनुसार भारतातील द्राक्ष उत्पादनापैकी 27% द्राक्षांचे बेदाणे/मनुक्यामध्ये रूपांतरण केले जाते व सुमारे 2% द्राक्ष ही रसासाठी वापरली जातात. प्रत्येक जातीच्या गुणधर्मानुसार त्यांचा उपयोग वेगवेगळ्या अंतिम वापरासाठी केला जातो. ज्या जातीचे घड मोठे, आकर्षक, मणी कडक, टिकाऊ, गर चवदार, आंबट गोड असतो ती द्राक्ष खाण्यासाठी वापरतात. काही विशिष्ट जातीचे घड लहान आकाराचे, बिया असलेले मणी, थोड आंबट पण विशिष्ट चवीचे असतात. त्याचा उपयोग वाइनसाठी करतात. ज्या जातीची फळे रसदार, चवदार, रस रंगाला आकर्षक, बिया असलेले छोटे छोटे अनेक घड असून उत्पन्नाला अधिक असतात त्या वाणांचा उपयोग रसासाठी करतात.
 
उत्तम रसासाठी योग्य वाणांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे असावीत.
 
1. रसाचा चवदारपणा, 
 
2. रसाचा स्वाद,
 
3. आकर्षक रंग,
 
4. रसाचे प्रमाण : 60%
 
5. विद्राव्य घटक (टीएसएस) : सुमारे 21 ब्रिक्स
 
6. आम्लता 6-8 ग्रॅम/लिटर
 
7. पीएच : 3.4-3.6
 
भारतात रसासाठी वापरात येणार्‍या तसेच काही नव्या रसासाठी योग्य अशा जातींचा तौलनिक अभ्यास आधारकर संशोधन संस्थेत, भारतीय कृषी अनुसंधान केंद्राच्या अखिल भारतीय फळ अनुसंधान प्रकल्पाअंतर्गत देशात राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रासहित 7 ठिकाणी केला जात आहे. यासाठी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले आहे. प्रत्येक वाणाच्या 6-6 वेलींची 4 वेळा एकाच प्लॉटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पुनरावृत्तीने लागवड करण्यात आली आहे. प्रत्येक दोन रोपांमधील (5 फूट) व दोन ओळींतील (8 फूट) अंतर एकसारखे ठेवले आहे. ज्या योगे प्रयोगातील माती किंवा अन्य घटकांमुळे होणार्‍या त्रुटी टाळता येतील. प्रत्येक ठिकाणी कोणती निरीक्षणे करावयाचे आहेत हे ठरले आहे. सर्व वेलींची डॉगरिज या रूट स्टॉकवर कलम करून लागवड करण्यात आली आहे.
 
वरील प्रयोगातून कोणत्या ठिकाणी कोणते वाण चांगले उत्पन्न देते, तसेच रसासाठी कोणते वाण उत्कृष्ट आहे, कुठले वाण कीड रोग अथवा रोगाला कमी बळी पडते, कोणते वाण उत्पन्नाला स्थिर आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडू शकतील. त्यानुसार रसासाठी योग्य वाणांची शिफारस करण्यात मदत होईल.
 
रसासाठी वापरण्यात येणार्‍या काही वाणांची माहिती खालीलप्रमाणे
 
अर्का श्याम : हे वाण बंगळूर येथील अखिल भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेतून रसासाठी विकसित करण्यात आले असून ते बंगलोर ब्ल्यू व ब्लॅक चम्पा या वाणापासून संकरणाने तयार करण्यात आले आहे. हे वाण मध्यम जोमाने वाढणारे असून उत्पन्नालाही माध्यम आहे. मणी निळसर रंगाचे मध्यम आकाराचे असून घड लांबट आकाराचे असतात. हे वाण 2 वर्षांतून 5 वेळा उत्पन्न घेण्यासाठी योग्य असल्याचे आढळले आहे. मण्यातील साखरेचे प्रमाण 24 ब्रिक्स असते. रसाचा रंग लालसर असून 70% प्रमाणात आढळतो.
बंगलोर ब्ल्यू : या वाणाची लागवड बंगलोर व आजूबाजूच्या क्षेत्रात आढळते. मणी लहान आकाराचे असून गडद जांभळ्या रंगाचा, एक प्रकारचा स्वाद असतो. मण्यातील साखरेचे प्रमाण 16-18 ब्रिक्स असते. या घडाचा आकार गोलसर ते आखूड त्रिकोणी असतात. मणी लंब गोल आकाराचे असून घडाला घट्ट चिकटलेले असतात. घड एकसारखे पिकतात. मणी गडद जांभळ्या रंगाचे असतात. रसाची चव आंबट गोड असून रस पारदर्शक गडद जांभळ्या रंगाचा असतो. मण्यातील विद्राव्य घटकांचे प्रमाण 16-18% तर आम्लता 0.8 ते 1.0 असते. रसाचे प्रमाण साधारणत: 60% असते. 
कॉकॉर्ड : हे एक अमेरिकेतील प्रचलित वाण असून त्याचा रसासाठी तसेच खाण्यासाठी सर्वत्र वापर होतो. हे लॅब्रूस्का जातीपासून विकसित झाले आहे. वेल जोमदार वाढणारे असून घड गोलसर ते आखूड त्रिकोणी आकाराचे, पूर्ण किंवा थोडे विरळ मण्यांनी भरलेले असतात. मणी जांभळ्या रंगाचे, गोल व छोट्या आकाराचे असून घडाला घट्ट चिकटलेले असतात. मण्याची साल जाड असून सामान्यत: 1-3 बिया आढळतात. रस विशिष्ट चवीचा असून कमी पारदर्शक असतो. उत्तर भारतात डोंगराळ भागात उत्पन्नाला हे वाण चांगले असल्याचे आढळले आहे. त्याची अनेक भागात चाचणी घेऊन तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे. 
गुलाबी × बंगलोर पर्पल : हे वाणदेखील संकरणातून निर्माण करण्यात आले असून हे वाण रसासाठी तसेच एकंदर उत्पन्न, रसाची प्रत, रोगप्रतिकारक क्षमता इ.चा अभ्यास होणे गरजेचे आहे. 
मांजरी मेडिका : हे वाण भारतीय अनुसंधान केंद्राच्या मांजरी येथील द्राक्ष संशोधन केंद्राने पुसा नवरंग व फ्लेम सीड्लेस या वाणांच्या संकरातून विकसित केले आहे. या वाणात अन्थोसायनिनचे तसेच अँटी आक्सिडेंटचे प्रमाण अधिक असून अनेक औषधी गुणधर्म आढळतात. त्याचे एकरी उत्पन्न 10-12 टन एवढे आढळते. मण्याचा रंग निळसर काळा असून, घड लांबट व मणी माध्यम आकाराचे असतात. मण्यामध्ये बियांचे प्रमाण 1-3 इतके असून रसाचा रंग गडद जांभळा असतो. 135 दिवसांत घड पक्व होतात. 
एआरआय 516 : हे वाण कटावबा व ब्युटी सीड्लेस या अमेरिकेतील दोन द्राक्ष जातींच्या संकरातून विकसित करण्यात आले. हे वाण लवकर तयार होणारे असून, माध्यम जोमाने वाढते. 110-120 दिवसांत घड पक्व होतात. मण्याचा रंग निळसर काळा असून, घड लांबट तसेच मणी माध्यम आकाराचे असतात. मण्यांमध्ये बियांचे प्रमाण कमी असून साधारण एकच मऊ बी आढळते. द्राक्षे चांगली चवदार आहेत. मण्यातील साखरेचे प्रमाण 22-24 ब्रिक्स इतके असते. रसाचा रंग गडद लाल, उत्कृष्ट चव व स्वाद असलेला 65-70% प्रमाणात असतो. वाणाचे उत्पादन क्षमता चांगली 15-20 किलो प्रतिवेल आहे. या वाणाची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असल्याने उत्पादन खर्च कमी होतो. तसेच या वाणापासून चांगल्या प्रतीचा मनुका तयार होतो. 
महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदारांनी चालू द्राक्ष लागवडीबरोबर रसाच्या वाणांची लागवड केल्यास कमी खर्चात अधिक उत्पादन मिळाल्याने जास्त फायदा होईल. द्राक्ष रसांचे औषधी गुणधर्म पाहता रसाची विक्री आरोग्यावर्धक पेय म्हणून होऊ शकेल. योग्यप्रकारे व्यवस्थापन केल्यास मागणीनुसार वर्षभर बाजारात रस विक्रीस उपलब्ध होईल व द्राक्ष व्यवसायास नवी दिशा प्राप्त होईल. 

डॉ. सुजाता तेताली व सतीश फाळके,
प्रयोगिक क्षेत्र, आधारकर संशोधन संस्था, होळ, पुणे