यशोगाथा : मधमाशीपालन उद्योग

डिजिटल बळीराजा-2    06-Jan-2020
Beekeeper_1  H

डहाणू जिल्हा. पालघर येथील राजू मंडल यांचे नाव पंचक्रोशीत उत्तम मधमाशीपालक म्हणून घेतले जाते. वयाच्या पंधराव्या वर्षापासून आपल्या वडिलांसोबत त्यांनी सातेरी मधमाशीपालनाची आवड जोपासली. घोलवड येथील नोकरी सांभाळून ते हा व्यवसाय मोठ्या कुशलतेने सांभाळतात. पेट्यानिर्मिती करणे, त्यात मधमाश्यांच्या वसाहती भरून देणे, मधविक्री अशा विविध अंगांनी त्यांनी या व्यवसायाचा विस्तार साधला आहे.
 
पालघर जिल्हा आणि त्यातही डहाणूचा भाग, या सौंदर्यात भर म्हणून की काय, डहाणूला समुद्रकिनाराही लाभलेला. त्यामुळेच पर्यटकांची येथे कायम रेलचेल असते. चिकू, नारळाच्या बागांसोबत फणस, सफेद जांभू, लिची अशा विविध फळपिकानी इथला भाग समृद्ध झालेला आहे.
 
अनेक वर्षांपासून जपलेले मधमाशीपालन 
 
कोसबाडपासून काही किलोमीटरवरच चिकूसाठी प्रसिद्ध असलेल्या घोलवड गावात एका खासगी कंपनीत नोकरी करतात. दिवसभराची नोकरी सांभाळून दररोज संध्याकाळचा वेळ ते याच व्यवसायात घालवतात. मंडल कुटुंब मूळचे कोलकत्याचे.
 
राजू यांचे वडील इरसद सुमारे 70 वर्षांपूर्वी डहाणूत नोकरीनिमित्त आले. तेव्हापासून हे कुटुंब याच मातीत रमले आहे. इरसद यांनी अनेक वर्षे कोसबाड येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात माळी म्हणून नोकरी केली. सोबतच ते शेतकर्‍यांना मधमाशीपालनाचे प्रशिक्षणही द्यायचे आणि स्वतः घरीही मधपेटी ठेवून व्यवसाय करायचे. परिसरातील शेतकर्‍यांनी मधपेट्या ठेवल्या असतील, तर त्यांना मार्गदर्शन व सल्ला द्यायचे. राजू यांचे शिक्षण 10 वी.पर्यंत झाले आहे.
 
मधमाशीपालनासाठी पूरक वातावरण :
 
डहाणू परिसरात वनसंपदा असल्याने वर्षभर फुलोराही भरपूर प्रमाणात असतो. इथल्या शेतीमध्ये कीडनाशकांचा वापरही कमी प्रमाणात आहे. साहजिकच, या दोन्ही बाबी मधमाशीच्या संवर्धनासाठी लाभदायक अशा आहेत. त्यामुळे मधमाशीपालन करणारे शेतकरी या भागात पाहण्यास मिळतात. डहाणूजवळच्याच कोसबाड कृषी विज्ञान केंद्रापासून अर्धा किलोमीटर अंतरावर राहणार्‍या राजू मंडल नावाच्या 47 वर्षांच्या युवकाने मधमाशीपालनात आपली स्वतंत्र ओळख तयार केली आहे. 
 
वडिलांचा जपला वारसा :
 
मधमाशीपालनाचे बाळकडू राजू यांना वडिलांकडून वयाच्या 15 व्या वर्षीच मिळाले. त्या वयात त्यांना मधमाश्यांचा जो लळा लागला, तो आजही कायम आहे. सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. मात्र, त्यांचा वारसा राजू आजही निष्टेने व प्रेमाने चालवत आहेत. राजू त्यांची पत्नी सौ. मनोरा यांचीही पतीला साथ आहे. मुलगा अझर बारावीत शिकत असून, याचीही जमेल ती मदत होते. राजू यांची शेती नाही हे विशेष. घराजवळ 3 गुंठे जागा असून, त्यात छोटेसे आणि परिसरात फणस, आंबा, पेरू, सीताफळ, काजू अशी प्रत्येकी 2 ते 4 झाडे आहेत. घराला तारेचे कुंपण करून आतल्या जागेत मधपेट्या आहेत. सोबत 20 गावठी कोंबड्याही पाळल्या आहेत.
 
राजू झाले प्रशिक्षकही :
 
कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात प्रत्येक महिन्याला मधमाशीपालनाचे प्रशिक्षण होते. त्या वेळी राजू जातीने हजर राहतात. प्रशिक्षणामध्ये नवीन शेतकर्‍यांना माहिती देण्याचे काम करतात. 
 
असा असतो व्यवसाय : 
 
राजू यांनी वडिलोपार्जित व्यवसायाचा विस्तार केला आहे. एक पाऊल पुढे जाऊन पेट्या बनवून देणे, सातेरी मधमाश्यांची नवी वसाहत त्यात भरून देणे, गरजू व नवीन शेतकर्‍यांसाठी मधपेट्यांची देखभाल अशी कामे ते करतात. तेही नोकरी सांभाळून. वडिलांनी या व्यवसायातील शिकवलेले बारकावे व निरीक्षण त्यांचे ज्ञान राजू यांना चांगले अवगत झाले आहे. शिवाय, जवळच असलेल्या कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ज्ञ उत्तम सहाणे यांचे त्यांना कायम मार्गदर्शन असते. 
 
नवीन वसाहतींचे संकलन :
 
डहाणू भागात निसर्गतः सातेरी जातीच्या मधमाश्या भरपूर प्रमाणात आहेत. या माश्या झाडाच्या ढोलीत, डोंगरांच्या कपारीत किंवा दगडी बांधांमध्ये आढळतात. येथील मधपाळांनी विशिष्ट प्रकारचे मडके ठेवून त्यात मधमाश्या पकडण्याचे तंत्र विकसित केले आहे. काही शेतकर्‍यांना फक्त मधमाश्यांच्या वसाहती हव्या असतात. त्यांना त्या वसाहती देण्याचे काम राजू करतात. डिसेंबर ते एप्रिलपर्यंत वसाहत जास्त मिळतात. पुढे पावसाळ्यात नवीन वसाहती तयार होत नाहीत. 
 
शाळेतच मधपेट्या बनविण्याची प्रेरणा :
 
राजू शाळेत असताना कार्यानुभव हा विषय शिकताना लाकडाची खेळणी बनवायला शिकले, त्यातूनच मधपेटी बनविण्याची कला हस्तगत केली. दहा वर्षांपूर्वी त्यांनी लाकडी फळ्या कापण्याचे यंत्र व या कामासाठी लागणारे साहित्य विकत घेतले. तेव्हापासूनच नवीन पेट्या बनविण्याचे काम सुरु झाले. 
 
मधपेट्या आणि मधमाश्यांचे व्यवस्थापन : 

Honeybee_1  H x 
 
पावसाळ्यात पेट्या पावसाने भिजू नयेत यासाठी पेटीवर पत्र्याचे झाकण किंवा प्लॅस्टिक कागद ठेवला जातो. पोळ्याला मेणकिडा लागून मधमाश्या उडून जाण्याची शक्यता असते, त्यामुळे पेटीची स्वच्छता 8 ते 10 दिवसांतून करावी लागते. पावसाळ्यात फुलोरा नसल्याने मधाचे उत्पादन मिळत नाही. मात्र, मधमाश्या सांभाळणे हे मुख्य काम असते. पावसाळा संपताच ऑगस्ट, सप्टेंबरपासून मध तयार व्हायला सुरवात होते. अन्य हंगामात लाल मुंगळे, मुंग्या, सरडे, पाली यांचा त्रास होऊ नये म्हणून पेटी स्टॅण्डवर ठेवली जाते. मधपेटी विक्री करताना यातील बारकावे राजू लोकांना समजावून सांगतात.
 
व्यवसायातील ठळक बाबी :
 
* राजू वर्षभरात सातेरी माश्यांच्या सुमारे 40 ते 60 मधपेट्या तयार करतात. त्यातील सुमारे 40 ते 50 पेट्यांची विक्री होते. सुमारे 7 ते 8 फ्रेमची पेटी असते. 
* जंगली लाकडापासून बनविलेल्या रिकाम्या पेटीची विक्री दोन हजार रुपयांप्रमाणे होते. 
* त्यात वसाहती भरून दिल्यास हाच दर साडेतीन हजार होतो. 
* राजू यांच्याकडे रिकाम्या, तसेच मधमाश्यांनी भरलेल्या पेट्या घेण्यासाठी पालघर, ठाणे, नाशिक या परिसरातून शेतकरी येतात. 
* प्रतिपेटीपासून वर्षभरात सरासरी 7 ते 10 किलो मध मिळते. त्याची स्थानिक पातळीवरच विक्री होते. त्यास 600 ते 800 प्रतिकिलो दर मिळतो. 
* राजू यांनी मधमाशीपालनालाच जणू मुख्य व्यवसायाचे स्वरूप दिले आहे. आपल्या 2 ते 3 गुंठे जागेत असलेल्या पेट्यांतील मधमाश्या आजूबाजूच्या परिसरातील झाडांवर जाऊन पराग आणि मध आणतात. यामुळे परागीभवन होऊन परिसरातील शेतकर्‍यांना त्याचा फायदा होतो. वर्षभरात या व्यवसायातून उल्लेखनीय आर्थिक प्राप्ती होत असल्याचे राजू यांनी सांगितले.
 
 
श्री. राजू मंडल, मो. 9923713678,
श्री. उत्तम सहाणे, मो. 70289002289