दुष्काळग्रस्त परिस्थितीत मोसंबी फळबागेचे नियोजन

डिजिटल बळीराजा-2    06-Jan-2020
Mosambi _1  H x
 
टंचाई सदृश्य स्थितीमध्ये मोसंबी फळबागेचे व्यवस्थापन कसे करावे या संबधीची माहिती या लेखात दिली आहे .
 
मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्रात सुरुवातीपासून मोसंबीची झाडे कमी पाण्यावर जगवण्यात आली. विशेषत: पहिल्या वर्षी म्हणजे 2007 साली टँकरद्वारे पाणी देऊन झाडे जगवण्यात आली. आज अशा दुष्काळसदृश्य स्थितीमध्ये आच्छादन करून ठिबकद्वारे दिले जाणारे रोजचे 10 लिटर पाणी देऊन झाडे जगवण्याचे प्रयत्न चालू आहेत. कारण आता जर मोसंबीच्या बागा नाही वाचवू शकलो तर पुढील दहा वर्ष मोसंबीच्या बागा उभारणीसाठी लागतील तरी कृपया शेतकर्‍यांनी बागा वाचवण्याचे कशोशीने प्रयत्न करावेत. त्यासाठी खालील उपाय योजना कराव्यात.
 
Mosamb Is_5 H
 
1.बाष्परोधकाचा वापर पोटॅशियम नायट्रेट 1 ते 1.5 टक्का किंवा केवोलीन 8 टक्के द्रावणाची फवारणी 15 दिवसांच्या अंतराने फळबागाच्या पानावर केल्यास बाष्पीभवनास अडथळा निर्माण होऊन बाष्पीभवनाचा वेग कमी होतो व फळपिके बचावू शकतात.
 
2.जमिनवर आच्छादन बाष्पीभवनाने सुमारे 70 टक्के पाणी नाश पावते. शेतातील काडी कचरा घसकटे, गवत, तूरकाड्या, भुसा इत्यादीचा 7 ते 8 सेंटीमीटर जाडीचा थर आच्छादनासाठी वापरावा. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग मंदावतो व झाडे जगू शकतात.
 
3.मडका सिंचन झाडाच्या आळ्यात 4 ते 5 मडके बसवावेत. मडक्यांच्या तळाशी लहान छिद्र पाडून त्यात कापडाची वात बसवून झाडांच्या मुळ्यांना पाणी द्यावे. सर्वसाधारण एका मडक्यात तीन ते चार लिटर पाणी ओतावे. मडक्यातील पाणी झिरपत राहून झाडांचा तंतूमय मुळास उपलब्ध होते व झाडे जिवंत राहतात.
 
4.ठिबक सिंचनाचा वापर दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये ठिबकसिंचन अतिशय फायदेशीर आहे. झाडांना मोजून पाणी दिल्यामुळे झाडे जिवंत राहतात. बाष्पीभवन टाळण्यासाठी इथेसुद्धा आच्छादनाचा वापर करावा.
 
5.मातीचा थर झाडाच्या खोडाभावती मातीचा थर दिल्यास बाष्पीभवनामुळे होणारे नुकसान टाळता येते. मातीचा थर आच्छादनाप्रमाणे कार्य करते.
 
6.बहार धरू नये. दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये फुले लागल्यास ती काढून टाकावी व कोणताही बहार धरू नये.
 
7.झाडाचा आकार मर्यादित ठेवणे. झाडाची छाटणी करून झाडाचा आकार मर्यादित ठेवाव. त्यामुळे पर्णभार कमी होऊन बाष्पीभवनाचा वेग मंदावतो.
 
8.झाडाच्या खोडास बोर्डोपेस्ट लावणे झाडाच्या खोडास बोर्डोपेस्ट लावल्यामुळे सूर्यकिरणे परावर्तीत होतात तसेच बुरशीजन्य रोगास प्रतिबंध होतो.
 
9.पाण्याची फवारणी दररोज सकाळ संध्याकाळ अल्प पाण्याची फवारणी केल्यास झाडे कमी पाण्यात तग धरू शकतात.
 
10.जलसंजीवनीचा वापर जलशक्ती या सेंद्रिय पदार्थांची 50 ते 60 ग्रॅम पूड प्रत्येक आळ्यात टाकून दोन पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढविता येते.
 
11.इंजेक्टरद्वारे पाणी देणे. इंजेक्टर हे फार सोपे उपकरण आहे हा नुसता अणुकूचीदार पाईप असून पुढच्या अणुकूचीदार तोंडास दोन छिद्रे ठेवतात. इंजेक्टरमध्ये 30 सेंटीमीटर लांब व 12.5 मीमी व्यासाचा जीआय पाईप फूट स्प्रेअरला जोडला जातो आणि त्यातून एकावेळी पाच लिटर पाणी दिले जाते याप्रमाणे जमिनीत सुमारे 20 सें.मी. खोलीवर प्रत्येक झाडाला चार वेळा पाणी देऊन एकंदर वीस लिटर पाण्यात 15 मार्च ते 20 मे काळात 18 वर्षे वयाची मोसंबीची झाडे मराठवाडा कृषि विद्यापीठात वाचवण्यात आली होती.
 
12.प्लास्टिक आच्छादनांचा वापर प्लॅस्टिकच्या आच्छादनाने मातीतील ओलावा वाफेचे रूपाने बाहेर पडू शकत नाही व ओलावा जतन करून ठेवण्यास मदत होते व कमी पाण्यात फळबागा जगविता येतात.
 
13.जानेवारीमध्ये लागवड केलेल्या कलमाभोवती कुशाने 20 ते 30 सें.मी. खोल खळगे करावे. या खळग्यात चार किंवा पाच दिवसाच्या अंतराने हाताने पाणी भरावे आणि खळगे तनीसाने झाकावे.
 
14.खड्डा पद्धतीचा वापर या पद्धतीत झाडाच्या बुंध्यापासून अंदाजे 1 फूट अंतरावर 1 फूट लांब, रुंद आणि 1 ते 1.5 फूट खोल खड्डा करून पाणी भरावे आणि खड्ड्याचा वरील भाग आच्छादनाने झाकून टाकावा. पाण्याचा संथगतीने निचरा होण्यासाठी थोडे शेण टाकावे. त्यामुळे झाडाच्या कार्यक्षम मुळांना पाण्याची उपलब्धता होतात व झाडे वाचतात.
 
15.झाडाचा आकार अगदी लहान असल्यास किंवा नवीन लागवड केली. असल्यास (जानेवारी) झाडावर शेडनेट किंवा गवताने सावली करावी. त्यामुळे झाडाचे तापमान वाढणार नाही व पाण्याचे बाष्पीभवन कमी होईल. 
 
16.मार्च ते मे या दरम्यान 6 टक्के केओलीनचे द्रावण दर पंधरा दिवसांनी झाडावर फवारावे. केओलीन हे बाष्परोधक असल्याने पानांच्या पर्णरंध्रामधून पाणी उडून जाण्याचे कार्य मंदावते.
 
17.जुन्या पाईपचे टुकडे करून तीस सें.मी. जमिनीत रोवावेत. पाइप 15 सें.मी अंतरावर लहान छिद्र पाडावी. यामुळे जमिनीच्या खालच्या थरास मुळाभोवती पाणी पोहोचते व बाष्पीभवनाद्वारे होणारा रास कमी होतो.
 
18.सलाईन बाटल्याचा वापर सलाईनच्या बाटल्या धुवून त्यामध्ये पाणी भरावे. झाडाच्या आळ्यामध्ये काठीच्या आधाराने बाटली टागांवी त्यांची नळी झाडाच्या मुळाजवळ जमिनीच्या एकदम जवळ ठेवावी. त्यातून ठिबक सिंचनाप्रमाणे थोडे थोडे पाणी पडत राहते. यामध्ये पाण्याचा वेग कमी-जास्त करता येतो व पाण्याचा कार्यक्षम उपयोग होतो.
 
19.अर्ध्या आळ्यास पाणी देणे प्रवाही पाणी देण्याच्या पद्धतीमध्ये पहिल्या वेळेस फक्त अर्ध्या आळ्यास पाणी द्यावे व दुसर्‍या पाण्याचे पाळीवेळेस राहिलेल्या अर्ध्या आळ्यास पाणी द्यावे.
 
20.शक्यतो बागांना सायंकाळच्या वेळेस पाणी द्यावे. 
 
पाण्याच्या दुष्काळावर मात करून मोसंबी बागा व इतर फळपिके वाचवावीत.
 
Mosamb Is_3 H
 
मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्रात सुरुवातीपासून मोसंबीची झाडे कमी पाण्यावर जगवण्यात आली. विशेषत: पहिल्यावर्षी म्हणजे 2007 साली टँकरद्वारे पाणी देऊन झाडे जगवण्यात आली. आज अशा दुष्काळसदृश्य स्थितीमध्ये आच्छादन करून ठिबकद्वारे दिले जाणारे रोजचे 10 लिटर पाणी देऊन झाडे जगवण्याचे प्रयत्न चालू आहेत. कारण आता जर मोसंबीच्या बागा नाही वाचवू शकलो तर पुढील दहा वर्षं मोसंबीच्या बागा उभारणीसाठी लागतील तरी कृपया शेतकर्‍यांनी बागा वाचवण्याचे कशोशीने प्रयत्न करावेत. त्यासाठी खालील उपाय योजना कराव्यात. 
 
पुन्हा फळपिकासाठी टंचाईसदृश्य परिस्थिती
 
Mosamb Is_4  H
 
मराठवाड्यात पुन्हा पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी परिस्थिती ओळखून फळबागा वाचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठवाड्यात जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात मोसंबी, डाळिंब व आंबा या फळपिकांची लागवड जास्त आहे. त्यामध्येही मोसंबी फळपिकांची लागवड जास्त आहे.
 
मराठवाड्यात फळपिकाखालील क्षेत्रफळ 85 हजार हेक्टरपेक्षा जास्त असून मोसंबीची लागवड सर्वात जास्त 52500 हेक्टरवर आहे. त्याखालोखाल आंबा 19300 हेक्टर, डाळिंब 5000 हेक्टर हे या शिवाय चिकू, पेरू, केळी, सिताफळ आणि आवळा यांचे एकत्रित क्षेत्र 8500 हेक्टर आहे.
 
मोसंबीचे क्षेत्रफळ औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात एकवटले असून टंचाईग्रस्त परिस्थितीमुळे बहुतेक मोसंबी बागा पुन्हा संकटात सापडण्याची शक्यता आहे.
 
बागा वाचवण्यासाठी तांत्रिक सल्ला
 
Mosambi _1 H x
 
1)फळबागेस पूर्ण विश्रांती देणे
 
बर्‍याचशा फळबागेत मृग आणि अंबीया बहाराची फळे होती. पाणी टंचाई लक्षात घेता बागेस पूर्ण विश्रांतीची गरज आहे. शास्त्रीय अभ्यासक्रमातून असे दिसून आले आहे की, चार ते पाच वर्षं वयाच्या झाडावर अडीचशे ते तीनशे फळे जोपासण्यासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे हवेतील आर्द्रता आणि तापमानानुसार 65 ते 75 लि. प्रती दिन पाण्याची आवश्यकता असते.
 
कोणताही बहार न घेता झाडावरील सर्व फळे काढून आच्छादनाचा वापर केल्यास दहा ते पंधरा लिटर पाण्यात फळझाडे जगू शकतात ही बाब सन 2012 च्या टंचाईग्रस्त वर्षात मकृविच्या शास्त्रज्ञाने व कृषि विस्तार कर्मचार्‍यांनी लिंबूवर्गीय बागायतदारांच्या नजरेस आणून दिली आणि त्याचा सकारात्मक परिणाम टंचाईग्रस्त क्षेत्रात बागव्यवस्थापनात दिसून आला.
 
2)विविध प्रकारच्या आच्छादनांचा मोसंबी बागेत वापर.
 
जमिनीतून बाष्पीभवनाद्वारे होणार्‍या पाण्याच्या र्‍हासास प्रतिबंध करण्यासाठी विविध प्रकारच्या आच्छादनाची शिफारस करण्यात आलेली आहे. बाष्पीभवनाद्वारे होणार्‍या पाण्याचा र्‍हास टाळण्यासाठी आच्छादन अतिशय प्रभावी आहे. यामध्ये उसाचे पाचट, गव्हाचे काड, झाडाची पाने, लाकडी भूसा, गिरीपुष्पाची पाने, लहान फांद्या किंवा शेतामधील काडी कचरा इ.चा उपयोग शिफारशीनंतर बागायतदार करत आहेत. याशिवाय अभियान समितीने जेथे शक्य आहे तेथे 80 ते 100 मायक्रॉन जाडीच्या पॉलीफिल्मची शिफारस बाष्पीभवन टाळण्यासाठी केली आहे. सुदैवाने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि महाराष्ट्र सरकारने 40 मायक्रॉन पोलिफिल्मसाठी अनुदानास परवानगी दिली आहे. यामुळे उपलब्ध अनुदानात जास्तीचे फळबाग क्षेत्र आच्छादनाखाली येण्यास मदत झाली. सेंद्रिय आच्छादने फक्त जमिनीचा पाते सुधारत नसून जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा वाढवतात. त्यासाठी 4 ते 6 इंच जाडीचा सेंद्रिय आच्छादनाचा थर उपयुक्त आहे.
 
3)ठिबक सिंचन
 
दुष्काळग्रस्त फळबागांसाठी ठिबक सिंचन अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे मोसंबी फळाचे अधिक दर्जेदार उत्पादन मिळते. शिवाय प्रत व गुणवत्ता जोपासली जाते. आवश्यक तेवढीच पाण्याची मात्रा झाडाच्या थेट मुळाशी पुरवली जाते. तसेच पाण्यात विरघळणारी खते व सूक्ष्म अन्नद्रव्ये याद्वारे दिली जातात. या तंत्राने पाण्याचा प्रत्येक थेंब झाडांना मिळतो.
 
4)खोडास बोर्डोमलम लावणे व बाष्परोधकांचा वापर
 
खोडावर बोर्डोमलम लावल्यामुळे उन्हापासून होणारे नुकसान टाळता येते. याकरिता 1 किलो मोरचूद, 1 किलो चुना, 10 लिटर पाण्याचा वापर करून बोर्डोमलम तयार करण्यात येते. यामुळे डिंक्या रोगाचासुद्धा बंदोबस्त होतो. केव्होलीन 8 टक्के किंवा पोटॅशियम नायट्रेट 1 ते 1.5 टक्का या सारखा बाष्परोधकाच्या फवारण्यामुळे झाडाचे तापमान कमी होऊन पाण्याच्या उत्सर्जनास प्रतिबंध होतो. या रसायनाच्या फक्त दोनच फवारण्या पंधरा ते वीस दिवसांच्या अंतराने उन्हाळ्यात करण्याची शिफारस करण्यात आली.
 
5)इतर उपाययोजना
Mosamb Is_6 H
 
जेथे ठिबक सिंचन शक्य नाही तेथे परंपरागत मटका सिंचन पद्धतीचा उपयोग करण्यात यावा यासाठी झाडाच्या मुळांना हळुवार ओलावा मिळण्यासाठी मडक्यांना छिद्र पाडावे. ही पद्धत कमी क्षेत्र आणि जेथे मडके सहज उपलब्ध आहे तेथे उपयुक्त आहे. यासाठी लहान झाडाकरिता 2 ते 2.5 फूट अंतरावर मडके जमिनीत गाडावेत. प्रत्येक दिवशी मडके पाण्याने भरावेत. मडक्यातील पाण्याची बाष्पीभवन टाळण्यासाठी त्याचे तोंड उसाचे पाचट, गव्हाची काड, झाडाची पाने, गिरी पुष्पाची पाने, लहान फांद्या इत्यादी सेंद्रिय पदार्थाने किंवा मातीच्या थळीने झाकावे. अशा पद्धतीने झाडांना आवश्यक तेवढाच पाणीपुरवठा करता येतो. झाडाच्या मुळाजवळ इंजेक्टरने पाणी देण्याची शिफारस करण्यात आली आहे. झाडाचा पर्णभार कमी करणे, रोगग्रस्त फांद्या किंवा एकमेकांत अडकलेल्या फांद्या कमी करणे, पाणसोट काढणे यामुळे झाडावरील पर्णभार कमी होऊन पानातून उत्सर्जनाद्वारे होणार्‍या पाण्याचा र्‍हास टाळता येतो, असा तांत्रिक सल्ला बागायतदारांना देण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान मोसंबी उत्पादकांनी आत्मसात करून पाण्याचा र्‍हास टाळता येतो. याची जाणीव मोसंबी बागायतदारांना झाली असून या तंत्राचा अवलंब करून दुष्काळग्रस्त परिस्थितीत मोसंबी बागा वाचवण्यात यश मिळेल.
 
 
डॉ. एम.बी. पाटील