यशोगाथा : बाबूराव सांगळे

डिजिटल बळीराजा-2    31-Jan-2020
|
 
 
grape_1  H x W:
 
मी बाबूराव सांगळे. माझी बिरगुडी (ता. इंदापूर) येथे द्राक्षशेती आहे. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी सांगायची म्हणजे मी, आईवडिलांचा एक मुलगा. आई अशिक्षित, वडिलांचे तिसरीपर्यंत शिक्षण झालेले, वाटण्या होऊन वाट्यास आलेले शेतीस योग्य अशी फक्त 55 गुंठे जमीन व इतर चराऊ रानाचे माळरान. वरील 55 गुंठे जमीनदेखील चोपण व हलकी. यात ते ज्वारीसारखी कोरडवाहू पिके घेऊन उदरनिर्वाहापुरते धान्य पिकवायचे. त्यातही दुष्काळी वर्षात काही अडचणी ठरलेल्या होत्या. जोडधंदा म्हणून आम्ही दोन खंड्या मेंढरे पाळत होतो. अशा परिस्थितीत मला 10वी पर्यंत त्यांनी शिकवले. नंतर कुटुंबाला खर्चास हातभार लावण्यासाठी मी द्राक्ष बागायतदार व ऊसशेतीत सालकरी म्हणून काम करू लागलो. त्यात द्राक्षबागेत वांझ फुटी काढणे, औषधांची फवारणी करणे इ. कामे शिकून घेतली. एकीकडे काम करून पैसे मिळवून घरखर्चात हातभार लावू लागलो, तर दुसरीकडे द्राक्षशेतीतील अनौपचारिक शिक्षण चालूच होते. गोसावीवाडी इथे चोपण जमिनीतसुद्धा काही शेतकरी द्राक्षाच्या बागा चांगल्या तर्‍हेने वाढवत आहेत हे पाहिले. त्यातून माझ्या लक्षात आले की, आपल्या 55 गुंठे क्षेत्रात द्राक्षबाग होऊ शकेल व त्यातून आपले उत्पन्नही वाढवता येईल. मी काही लोकांना हा विचार बोलून दाखवला. दरम्यान, माझ्या चुलत्यांना मुलीच्या लग्नाचे कर्ज झाले होते व ते कसे फेडावे, या विवंचनेत ते होते. त्यांनी आमच्या वडिलांना यासाठी एकत्रित असलेले माळरान विकण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांची अडचण पाहून वडीलही त्यास तयार झाले. त्यातून आमच्या वाट्यास आलेले रु. 60,000/- मी तीन वर्षे बँकेत ठेव म्हणून ठेवले. तीन-चार वर्षांत व्याज मिळून 80-90 हजार झाले. हे पैसे व सोसायटीकडून रु. 48,000 घेऊन प्रथम 25 गुंठ्यात द्राक्षबाग उभी केली, विहीर खोदली व सर्व साहित्य खरेदी केले, तसेच अंग मेहनतीची सर्व कामे मुख्यत: घरातील लोकांनी केली. त्यामुळे पुष्कळ पैसा वाचला. काही वेळा मजुरांचीही मदत घेतली. पहिल्याच वर्षी द्राक्ष ागेतून रु. 33,000/- मिळाले. त्यातून काही खर्च भागवला. तसेच या काळात मी सतत वेळ मिळेल त्यावेळी द्राक्ष व ऊस बागायतदारांकडे काम करत असे.
बिरगुडी हे गाव अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये येते; त्यामुळे येथे पाण्याची कमतरता आहे. सुरुवातीपासूनच द्राक्षबागेसाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. उन्हाळ्यामध्ये फक्त 20 मिनिटे विद्युत पंप चालत असे, त्यावरच बाग जोपासली. हळूहळू कर्ज फिटून नव्या योजना आकार घेऊ लागल्या.
 
सुरुवातीच्या काळात महाबँक ग्रामीण विकास केंद्राचे ट्रस्टी डॉ. बापट, आघारकर संशोधन संस्थेचे कै. डॉ. एस. जी. पाटील, तसेच डॉ. काळे या कृषीतज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले, अन्यथा मी चोपण, क्षारपड जमिनीतून द्राक्षबागेचे चांगले उत्पादन घेऊ शकलो नसतो. शिवाय ग्रामीण विकास केंद्राचे एन. वाय. गायकवाड, कृषीतंत्र सहायक एस. जाधव व डी. पी. बंडगर यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
 
आता माझा मुलगाही शेतीचे शिक्षण घेत आहे. त्यानेही नोकरीच्या मागे न लागता शेती व्यवसायच करण्याचे ठरवले आहे. आधुनिक शेतीशास्त्राच्या साहाय्याने शेतीच्या व्यवस्थापनातील अद्ययावत बदल लक्षात घेऊन त्याप्रमाणे शेतीचे नियोजन आम्ही करतो.
दर्जेदार आणि निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेण्यासाठी मी केलेले नियोजन खालीलप्रमाणे माझ्याकडे सद्यस्थितीत 2.5 एकर द्राक्षबाग लागवड केलेली आहे. त्यापैकी 700 झाडे ही माणिक चमन, 1400 झाडे ही जम्बो सीडलेस आणि नवीन लागवड सुपर सोनाका नरोटे 1160 झाडे आहेत. या वर्षी माझा द्राक्ष निर्यात करण्याचा मानस आहे. त्यासाठी माझे खालीलप्रकारे नियोजन आहे.
 
 • माणिक चमन या जातीची जर वर्ष 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या महिन्यामध्ये गोडी छाटणी करणे.
 •  गोडी छाटणी करण्यापूर्वी जमिनी सुपीकता व सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी 15 पिशवी गांडूखखत वापरणे.
 • वांझ फूट काढून झाल्यानंतर ड्रीपच्या पाण्यातून फॉस्फॅरिक अ‍ॅसिड, 3 लिटर/ एकरी सोडणे. जेणेकरून फॉस्फारिक अ‍ॅसिड सोडल्यामुळे मुळ्यांची कार्यक्षमता चांगल्या प्रकारे होऊन सूक्ष्म सिंचन नळ्यामधील अडकलेले क्षार अलगदपणे बाहेर निघतात.
 • त्यानंतर युरिया 5 किलो/एकरी ड्रीपमधून सोडणे, युरिया सोडल्यामुळे काडीची वाढ झपाट्याने होईल.
 • पाण्यात विरघळणारे खत 12:61:00 हे 5 लिटर पाण्यामध्ये ड्रीपमधून सोडणार्‍या अन्नद्रव्य घटकांमुळे मुळ्यांची कार्यक्षमता चांगली होते.
 
 • गोडी छाटणीनंतर 6-7 दिवसांनी उडद्या या कीटकाच्या नियंत्रणासाठी निम तेल 1 मिलि+कराटे 0.5 मिली/लिटर पाणी वापरून फवारणी करणे.
 • पोंगा अवस्थेमधील केवडा या रोगाच्या नियंत्रणासाठी अ‍ॅक्रोबॅट 1 ग्रॅम+1 ग्रॅम एम 45 या बुरशीनाशकाची फवारणी करणे.
 • पोंगा अवस्थेमध्ये थोडा हलका किंवा मध्यम पाऊस झाला तर केवडा या रोगाचा धोका वाढतो. अशावेळेस कर्झेट या बुरशीनाशकाची फवारणी 3 मिली /लिटर पाणी या प्रमाणात करणे.
 • द्राक्षवेलीवर पानांच्या पाठीमागील बाजूस साखर दिसल्यानंतर नुवान या कीटकनाशकाची फवारणी 2 मिली/लिटर पाणी वापरून करणे. कारण जर पानांच्या पाठीमागील बाजूस साखर वेळीच नियंत्रण नाही केली, तर त्यामुळे पिठ्या ढेकूण मोठ्या प्रमाणात वाढतो.
 • घड जिरू नयेत तसेच घडाची गुणवत्ता चांगली येण्यासाठी सीपीपीयू या संजीवकाची फवारणी 1 मिली./लिटर पाणी वापरून करणे.
 • सीपीपीयू या संजीवकाच्या फवारणीनंतर दुसर्‍या दिवशी केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर+ एम 45 या बुरशीनाशकाची फवारणी 2 ग्रॅम/लिटर पाणी वापरून करणे.
 
 • जर बागेमध्ये पाऊस पडत असेल, तर त्या त्या वेळी स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा वापर करून रोग आटोक्यात करणे.
 • ढगाळ वातावरण असताना आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर करून रोगनियंत्रण करणे.
 • सर्वसाधारण द्राक्षबागेमध्ये कमी धोक्याची बुरशीनाशके वापरून रोगाचे नियंत्रण करणे.
 • गोडी छाटणीनंतर वांझ फुटी 10 दिवसांनंतर काढणे. वांझ फुटी काढल्यामुळे होणार्‍या जखमामधून रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मेलोडी ड्युओ 3 ग्रॅम/लिटर पाणी वापरून फवारणी करणे.
 • द्राक्ष मण्यांची लांबी व आकार वाढीसाठी जिबरेलिक अ‍ॅसिड या संजीवकाचा वापर द्राक्ष मणी 2 मिली व 8 मिली असताना करणे.
 • घडाची वाढ जोमदार होण्यासाठी अ‍ॅग्रोपॉवर + 00:52:34 खतची फवारणी करणे.
 • द्राक्षबाग फुलोर्‍यात असताना फुलकिडीचे योग्य वेळी नियंत्रण केले नाही तर नुकसान 30-60% पर्यंत होते. या वर्षी फुलकिडीचे नियंत्रण करण्यासाठी रासायनिक कीटकनाशकाऐवजी जैविक कीटकनाशक दशपर्णी अर्क वापरणे.
 • द्राक्ष मण्यांमध्ये पाणी भरत असताना भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी सल्फर या बुरशीनाशकाची धुरळणी 2-3 वेळा करणे.
 
 • एप्रिल छाटणीनंतर सबकेन 4-5 डोळ्यावर घेऊन 8-10 डोळ्यावर टॉपिंग करणे.
 • एप्रिल छाटणीनंतर ओलांड्यावरील फुटी कमी निघतात. अशावेळी डबल सबकेन पद्धतीचा वापर करणे.
या वर्षी खरे तर आणखी, 1.5 एकर द्राक्ष लागवड करायची होती. परंतु कमी पाऊस झाल्यामुळे हे नियोजन पुढील वर्षी गेले आहे. चवळी हे पीक घेतल्यामुळे पिठ्या ढेकून या किडीचे चांगल्या प्रकारे नियंत्रण होते, असे समजते म्हणून पुढील वर्षी द्राक्षबागेमध्ये चवळी हे आंतरपीक घेण्याचे ठरवले आहे.
एकदा एखादी गोष्ट ठरवली व त्यामागे सातत्याने प्रयत्न केले तर यश हमखास मिळतेच. जिद्द आणि चिकटी असल्यावर कोणतीही गोेष्ट अशक्य नाही, यावर माझा दृढ विश्वास आहे.
 
                                                                                                                 शब्दांकन : डॉ. सुजाता तेताली व
                                                                                                                             सतीश फाळके,