द्राक्ष उत्पादने पद्धती यशोगाथा : विक्रम सुनील पवार

डिजिटल बळीराजा-2    30-Jan-2020
|
Table Grapes_1  
 
 
 
दोन हजार चौदाच्या मार्च महिन्याची दुपार 3ची वेळ. वातावरणात प्रचंड उष्णता होती. अचानक मोठे काळे ढग आभाळात एकत्र येऊ लागले, वार्‍याचा जोर वाढू लागला. हे भयानक दृश्य पाहून कोठेतरी अघटित होणार, ही धास्ती वाटली. लगेचच पावसाच्या थेंबांसह गारा पडायला सुरुवात झाली. काही कळायच्या आत लहान-मोठ्या गारा धडाधड जमिनीवर वेगाने येऊन आदळू लागल्या. तो कानठळ्या बसवणारा गारांचा आवाज 20 मिनिटांत होत्याचे नव्हते करून गेला. वादळी वार्‍यासह गारपीट हा निसर्गाचा कोप मी पहिल्यांदाच उघड्या डोळ्यांनी पाहत होतो. कांद्या एवढ्या गारांनी झाडाला पानपण राहिले नाही. सर्व पिके जमीनदोस्त झाली. उसाचेही मोठे नुकसान झाले, झाडांची पाने केरसुणीसारखी झाली व फाटून तुटून जमिनीवर पडली.
 
आमची 10 एकर द्राक्षाची बाग. उद्यापासून द्राक्षकाढणीचा हंगाम सुरू होणार होता. आणि डोळ्यादेखत संपूर्ण माल गारांनी उद्ध्वस्त करून टाकला होता. गारांच्या मार्‍याने द्राक्षवेली सोलून निघाल्या होत्या. घड तुटून पानांसह जमिनीवर पसरले होते. प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते.
 
सिव्हिल इंजिनिअररिंगचे शिक्षण पूर्ण करून गेल्या वर्षीच मी वडिलांच्या व आजोबांच्या मार्गदर्शनाखाली द्राक्षबागांकडे व शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली होती. आपणही आधुनिकतेची भर घालून यशस्वितेच्या मार्गाने जाण्याचे व शेतीच्या क्षेत्रातच पाय रोवून खंबीरपणे उभे राहण्याचे स्वप्न पहिले होते, पण लगेचच गारपिटीने दिलेला हा दणका पाहून मी अत्यंत खिन्न झालेलो होतो. शेतीची ही आगळी वेगळी सुरुवात माझ्या आयुष्यात माझ्याच वाट्याला आलेली होती.
 
मात्र हरायचे नाही, लढायचे, या जिद्दीने व कुटुंबीयांच्या साथीने आहे, याच बागा कशा वाचवायच्या याचा विचार सुरू झाला. शेततळ्याची निर्मिती केली. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता आली. बागांच्या खरड छाटण्या करून घेतल्या. छाटलेल्या काड्या व द्राक्षाचे वाळलेले घड, मणी सर्व झाडून बोधात घातले. शेणखताच्या व रासायनिक खतांच्या डोसची मात्रा वाढवली. पाचटाचे मल्चिंग करून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी जिवाणू खतांचा वापर केला. पांढरी मुळी वाढवून सशक्त करण्यावर भर दिला. बोधावर झेंडूची लागवड केली. ओलांड्यांवर डोर्मेक्सचे पेस्टिंग काळजीपूर्वक केल्याने बागा चांगल्या फुटू लागल्या. काड्यांची योग्य वाढ करून घेतली. गोड्या छाटणीनंतर मालही चांगला निघाला. वर्षभर चांगली काळजी घेतल्याने गारपिटीनंतर पहिल्याच वर्षी बागा 100 टक्के उत्पादनक्षम बनल्या व कष्टाचे चीज झाले.
 
या काळामध्ये द्राक्ष संशोधन केंद्राचे डॉ सावंत, आघारकर संशोधन संस्थेच्या डॉ. सुजाता तेताली, एनआयएएसएमचे डॉ. मिन्हास, द्राक्ष संघाचे डॉ. खिलारी, कै. बापूसाहेब माने, अध्यक्ष सुभाष नाना आर्वे इ. मान्यवरांशी सतत चर्चा केली व त्या सर्वांच्या माझ्या बागेला वेळोवेळी भेटी घडवून आणल्या याचा मोठा फायदा झाला. एका संकटातून बाहेर पडू शकलो व चांगले निर्यातक्षम उत्पादनही घेऊ शकलो.
 
आता निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात सातत्य राखून मालाचा दर्जा वाढवण्यास सुरुवात केली. संजीवकांचा समतोल वापर करून अतिरेक होणार नाही, याची काळजी घेऊन जास्त काळ टिकणारी द्राक्षे तयार करण्यावर भर दिला व विद्राव्य खतांच्या वापरामुळे द्राक्षांसह उसाच्या उत्पादनातही वाढ झाली.
 
दरवर्षी वाढते उत्पादन घेत असताना बागा थकणार नाहीत, याची काळजी घेणं गरजेचे वाटू लागलं. खते, औषधे व संजीवके यांचा समतोल वापर करताना जेवढा निर्यातक्षम माल निर्माण होईल, त्याचे निर्यातीचे नियोजन करायचे व उर्वरित माल परराज्यांतील व स्थानिक बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पाठविण्याचे नियोजन केले. मात्र जागेवरच पैसे कसे मिळतील यावर भर द्यायला सुरुवात केली. बागेतच व्यापार्‍यांची सौदे कसे होतील व दर्जेदार माल देऊन ग्राहकांचे समाधान कसे होईल, हे पाहिल्यामुळे व्यापार्‍यांच्या मागे लागण्याचा विषय संपला. मागील काळात ज्या व्यापार्‍यांना बोलावून आणावे लागायचे ते स्वत:हून बागेत येऊन माल नेऊ लागले. दरवर्षी मागे राहिलेला माल व मण्यांची गळ यापासून बेदाणे करावयास सुरुवात केली. द्राक्षमाल निर्यातक्षम असल्याने रेसिड्यू फ्री असल्याने मण्यांची गळसुद्धा दर्जेदार होती. त्यामुळे बेदाणेही चांगले तयार होऊ लागले, त्याचे मार्केटिंग मी स्वत: करू लागलो. दौंड, पुणे, नगर येथील बेदाणे व्यापारी 50 ग्रॅम ते 1 किलोच्या पॅकिंगमध्ये बेदाण्यांचे मागणी करू लागले. तासगाव येथून पॅकिंग मटेरिअल आणून स्वत: पॅकिंग करून पुरवठा सुरू केला. आता माझे बेदाणे रेल्वे स्टेशन, बसस्टॉप तसेच किरकोळ दुकानदारांपर्यंतही पोहोचू लागले. दर्जेदार व रेसिड्यू फ्री बेदाण्याने पाहुणेरावळे, घरगुती कार्यक्रमांत बेदाण्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागली. लग्नसमारंभात पेढ्याऐवजी बेदाण्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागली. पेढ्याऐवजी बेदाण्याची छोटी पाकिटे पुरविण्यास सुरुवात केली व लिलावातील भावापेक्षा जादा दर मिळू लागला.
 
एकरी उत्पादनात वाढ होण्यासाठी शेणखत, गांडुळखत, मशरूम खत, विद्राव्य खत यामुळे दरवर्षी सातत्याने उत्पादन मिळू लागले. काडीला एकच घड ठेवल्यामुळे, घड सुदृढ होऊ लागले. रोग व किटकांच्या प्रभावी नियंत्रणासाठी परदेशातून आधुनिक तंत्रज्ञानाचे फवारणी युनिट आयात केले. त्याचा मोठा फायदा झाला. संजीवकांचा अचूक वापर करून घडच्या लांबीकडे लक्ष दिले, दोन पाकळ्यांतील अंतर वाढल्याने थीनिंग कमी होऊन द्राक्षांच्या घडाचे वजन वाढण्याची रणनीती यशस्वी होऊ लागली व सुमारे 700 ग्रॅम ते 1 किलो असे वजनदार घड मिळू लागले.
 
माझ्याकडे बँगलोर पर्पल ही वाइन व स्पिरीट बनविण्यासाठी द्राक्षबागेची लागवड आहे, ही गाळपाची द्राक्षे बारामती ग्रेप या कंपनीला आम्ही अनेक वर्षांपासून पाठवीत होतो. माजी कृषिमंत्री मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या संकल्पनेतून सहकारी तत्त्वावर या कंपनीची स्थापना झाली होती. यापुढे वाइन स्पिरीटच्या विक्रीच्या अडचणीमुळे युनायटेड स्पिरीट या कंपनीमध्ये त्याचे रूपांतर झाले. अनेकदा अवेळी पाऊस व नुकसानग्रस्त द्राक्षांचे गळप आम्ही या कंपनीमध्ये करत असतो. या जातीच्या द्राक्षामध्ये ज्यूसचे प्रमाण 70% असल्याने तसेच त्यातील ब्रिक्स व अ‍ॅसिड रेषो योग्य असल्याने दर्जेदार स्पिरीट मिळते, याचा विचार करून मी व माझी पदवीधर पत्नी सौ. गौरी हिने घरगुती स्वरूपामध्ये द्राक्षांचा ज्यूस बनवून पाहुण्यांना व घरगुती कार्यक्रमांत पुरवण्यास सुरुवात केली. त्याची चव सर्वांनाच आवडू लागली. आघारकार संशोधन संस्था व पुण्यातील स्पाईसर कॉलेज यांच्या सहकार्याने ज्यूसच्या उत्पादनामध्ये काही बदल केल्याने या ज्यूसच्या व्यवसायाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले व व्यावसायिक ज्यूस उत्पादनास सुरुवात केली. ज्यूसबरोबरच द्राक्षाचा जाम तयार केला व तोदेखील सर्वांच्या पसंतीस उतरला. आता नवीन द्राक्ष हंगाम कधी सुरू होतोय, याकडे ग्राहकांचे लक्ष लागलेले असते.                                                               
                                                                                                                                        - शब्दांकन : डॉ. सुजाता तेताली