अंजीरावरील तांबेरा रोग

डिजिटल बळीराजा-2    03-Jan-2020
 

Anjir M_1  H x  
अंजीर हे कमी खर्चात येणारे आणि भरपूर पैसा मिळवून देणारे पीक असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. अंजीर फळ पिकावर रोगांचा प्रादुर्भावामुळे अंजीर उत्पादनात घट येते. अंजीर फळपिकावर येणार्‍या रोग आणि त्यांचे व्यवस्थापन याबाबत या लेखात सविस्तर ऊहापोह केला आहे.
 
अंजीर हे कमी खर्चात येणारे आणि भरपूर पैसा मिळवून देणारे पीक असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे.
 
Anjir Article 2_1 &n
 
महाराष्ट्र शासन अंगीकृत रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमाखाली या पिकाचा समावेश झाल्यापासून या पिकाखालील क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अंजीर फळ पिकावर इतर फळझाडांशी तुलना केल्यास कमी प्रमाणात कीडरोगाचा प्रादुर्भाव आढळतो, परंतु रोगांचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे अंजीर उत्पादनात घट येते. अंजीर फळपिकावर येणार्‍या प्रमुख रोग आणि त्यांचे व्यवस्थापन याबाबत या लेखात सविस्तर ऊहापोह केला आहे
 
तांबेरा 
 
Anjir Article_8 &nbs 
 
हा अत्यंत नुकसानकारक रोग असून, यांच्या प्रादुर्भामुळे उत्पादनात 50 टक्क्यांपेक्षा अधिक घट होऊ शकते. हा रोग सिरोटीलीय फिकी या बुरशीमुळे होतो. ही बुरशी फक्त अंजीराच्या सजीव वनस्पतीवरच वाढते. 
 
लक्षणे : या रोगात सुरवातीला पानाच्या खालच्या बाजूस तपकिरी रंगाचे लहान किंचीत लांबट उंचवटे असलेल्या पुटकुळ्यासद़ृष्य असंख्य फोड दिसतात. या फोडांमधूनच पिवळसर, तपकिरी रंगाची बुरशीची भुकटी बाहेर पडते. ही भुकटी म्हणजेच या बुरशीचे बीजाणू होय. ज्यामुळे या रोगाचा कित्येक किलोमीटरपर्यंत हवेमार्फत प्रसार होतो.
 
 Anjir Article_3 &nbs
 
रोगाचे प्रमाण जास्त राहिल्यास झाडाची पाने पिवळी पडून गळतात. अतिरोगग्रस्त बागेत तर फळे आणि फांद्या शिल्लक राहून पूर्ण पानगळ होते. अशा पानगळ झालेल्या बागेत फळांची योग्य वाढ होत नाही. उघड्या पडलेल्या फळांवर सूर्याच्या उष्णतेमुळे चट्टे पडतात. रोगाचा प्रादुर्भाव फळांवरही आढळून येतो. प्रादुर्भावित फळांवर लहान काळपट असंख्य डाग पडतात. अशी फळे चांगली पिकत नाहीत, कडक होतात किंवा पिकल्यानंतर ताबडतोब खराब होतात.
 
या रोगाची वाढ साधारणत: कमी तापमान आणि जास्त आर्द्रतेमध्ये होते. त्यामुळे पावसाळ्यापेक्षा थंडीच्या दिवसांत हा रोग मोठ्या प्रमाणावर येतो.
 
नियंत्रणाचे उपाय :
 
1. बागेची छाटणी :
 
बागेची दरवर्षी बहार धरण्यापूर्वी हलकी छाटणी करणे आवश्यक असते. त्यामुळे रोगग्रस्त फांद्यांची संख्या कमी होते. नवीन फूट जोमाने येते व त्यावर रोगाचा प्रादुर्भाव अत्यल्प असतो.
 
2. बागेची स्वच्छता :
 
जमिनीवर पडलेली रोगट, वाळलेली पाने, फळे तसेच छाटलेल्या रोगट फांद्या गोळा करून ती बागेबाहेर जाळून टाकावीत किंवा खड्ड्यात खोल पुरावित. त्यामुळे अशा रोगट अवशेषापासून होणारा रोगाचा पुढील प्रसार टाळता येतो.
 
फवारणी :
 
1. बागेची छाटणी झाल्यावर ताबडतोब व संपूर्ण झाडावर, झाडाखाली, जमिनीवर गंधक 300 मेश 20 किलो/हे. याप्रमाणे धुरळणी किंवा गंधक पाण्यात मिसळणारे 20 ग्रॅम/10 लि. पाणी प्रमाणे फवारणी करावी.
 
2. अंजीराला कोवळी पाने फुटल्यानंतर साधारणत: छाटणीनंतर 20 दिवसांपासून 15 दिवसांच्या अंतराने क्लोरोथॅलोनील 0.2 टक्के; 20 ग्रॅम+ कार्बेनडॅझीम; 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारावे. किंवा कार्बेनडॅझीम; 10 ग्रॅम+मॅन्कोझेब; 25 ग्रॅम किंवा कार्बेनडॅझीम; 10 ग्रॅम + कॅप्टन; 20 ग्रॅम 
 
वरीलपैकी कोणतीही एक फवारणी आलटून पालटून करावी. अंजीर काढणीच्या एक महिना अगोदर फवारणी बंद करावी. 
 
सुनील लोहाटे, वनस्पती रोगशास्त्रज्ञ,
अभाससंप्र कोरडवाहू फळपिके, (अंजीर व सीताफळ) संशोधन केंद्र,
जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे : 9422071028