शेळीपालन करताना...

डिजिटल बळीराजा-2    03-Jan-2020
Shelipalan_3  H
 
आपल्याला शेळीपालन का करायचे आहे व कोणत्या प्रकारच्या शेळीपालनातून अधिक उत्पन्न मिळेल आणि त्यानुसार शेड बांधणी, चारा व्यवस्थापन, शेळ्यांचे व्यवस्थापन व विक्री कशी करावी या संबंधीची माहिती या लेखात सादर केली आहे.
 
शेळीपालन करणार्‍या प्रत्येकाने आपण शेळीपालन कशासाठी करणार आहोत, याचा एक उद्देश निश्चित करायला हवा. उगाच यशोगाथा वाचून किंवा चारचौघांचे ऐकून या प्रकारच्या व्यवसायात खूप मोठा नफा आहे, असे समजून शेळीपालन करू नये. त्यासाठी आधी आपला एक उद्देश निश्चित करावा की आपल्याला शेळीपालन का करायचे आहे व कोणत्या प्रकारच्या शेळीपालनातून अधिक उत्पन्न मिळेल त्या प्रकारानुसार शेलीपालनाचा प्रकार निवडावा.
 
उद्देश : जसे की दूध उत्पादनासाठी शेळ्या पाळताना अधिक दूध उत्पादन क्षमता असणार्‍या शेळ्या निवडायला हव्यात, लोकर चामडीसाठी त्याप्रकारे अधिक उत्पन्न देणार्‍या जातींची निवड करावी. मांस उत्पादनासाठी मांस व दूध उभय गुण असलेल्या शेळ्या निवडाव्यात. कारण मांस उत्पादनासाठी फक्त वजनवाढीचे गुणधर्म असून उपयोग नाही. कारण मांसासाठी पाळलेल्या शेळ्यांच्या करडांना सुरवातीच्या काळात दूध भरपूर मिळायला हवे. तरच पुढील काळात सुदृढ, सशक्त व निरोगी करडे मटनासाठी तयार होतील. लहान वयात दूध न मिळाल्यास अनेमिया व कुपोषण होऊनच बरीचशी करडे दगावतात. मरतुकीचे प्रमाण वाढून नफा मिळत नाही. यासाठी मादी शेळी शेळीपालनासाठी निवडताना (मदर स्टॉक) मेंटेन ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, जसे कीउच्च पैदासक्षम असावी, भरपूर दूध देणारी असावी, जुळे व तिळे करडे देण्याचे प्रमाण जास्त असावे.
 
शेडबांधणी :
 
Shelipalan A_4   
 
इथेच बरेच लोक फसतात. शेळीपालनातील सर्वाधिक गुंतवणूक या कारणासाठी केली जाते व अधिक प्रमाणात भांडवल गुंतवले जाते. त्या प्रमाणात या व्यवसायातून वसूल न झाल्याने बरेच लोक व्यवसाय सुरू करतानाच बंदपण करतात. शेड बांधताना आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा विचार करावा. (उन, वारा, पाऊस) यानुसार शेडचे बांधकाम बदलते.
शेडबांधणीवर तुमच्या शेळीपालनाच्या उदेशाचाही परिणाम होतो. जसे की शून्यातून शेळीपालन सुरू करणार्‍यांनी शेडबांधणीवर जास्त खर्च करू नये. ज्यांना काही दिवसांपुरतेच मर्यादित शेळीपालन करायचे आहे त्यांनी परंपरागत पद्धतीने लहान जागेतच सुरवात करावी, ज्यांना फक्त ईद मार्केटिंग किंवा व्यवसाय करायचा आहे त्यांनी मोठी शेडबांधणी केल्यास काही हरकत नाही, कारण तुमचा माल कधीकधी व्यवस्थितपणा व व्यवस्थापन बघूनच विकला जातो. या व्यवसायाचा फक्त विस्तारच होत असतो. आजवर कुठल्याही ट्रेडरने ट्रेडिंग व्यवसाय बंद केल्याचे ऐकिवात नाही. या सर्व गोष्टी विचारात घेऊनच शेडबांधणी करावी.
 
चारा व्यवस्थापन :
Shelipalan_2  H
 
शेळ्यांसाठी सकस आहार खूप महत्त्वाचा आहे. द्विदल चार्‍यातून मोठ्या प्रमाणात प्रथिनांची गरज भागवली जाते, जे दूध व मांस उत्पादनासाठी खूप महत्त्वाचे आहे, एकदल चार्‍यामधून कर्बोदके मिळतात व शरीरातील ऊर्जेची गरज भागवली जाते. यासोबतच हिरव्या चार्‍याशिवाय शेळ्या खातील तितका वाळलेला चारा द्यावा.
 
शेळ्यांचे व्यवस्थापन (करडू ते विक्री अथवा किडिंगपर्यंतचा प्रवास) : करडू जन्मल्यावर सर्वप्रथम कोरड्या खरखरीत व स्वच्छ कापडाने पुसून साफ करावे. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होईल. नाळ दीड ते दोन इंच अंतरावर नवीन ब्लेडने कट करून दोर्‍याने व्यवस्थित बांधा व टिंक्चर आयोडीन लावा किंवा सुपर-7 नावाचा स्प्रे मारा. जेणेकरून इतर जिवाणू किंवा विषाणू नाळेवाटे करडाच्या शरीरात प्रवेश करू शकणार नाहीत. त्यानंतर लगेच तापमापीच्या साह्याने करडाचे तापमान तपासावे. कारण तापमान कधीकधी खूप कमी झालेले असते आणि आपली लोकं करडू मुळातच अशक्त आहे, असे समजून त्याला जगवण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाहीत व करडू सबनॉर्मलला तापमान जाऊन मरतूक होते. अशावेळी तोंडावाटे कॅल्शियम लिक्विड पाजावे, कृत्रिम ऊब द्यावी जसे कीतीव्र उन्हात करडाला ठेवावे, शेकोटी पेटवावी व ऊब द्यावी. रात्रीची वेळ असेल तर हायव्होल्टेजचे बल्ब लावावेत. त्याने टेम्परेचर वाढून करडू नॉर्मल होण्यास मदत होईल. करडू थोडे सावध झाल्यावर लगेच त्याला शेळीचे दूध (चिक) पाजावे. स्वतःहून पित नसेल तर बाटलीने पाजावे.
Shelipalan A_1
 
चिकातून मोठ्या प्रमाणात औषधी गुणांचा पुरवठा होतो. त्यात प्रतिजैविके भरपूर प्रमाणात असतात, ज्याने सध्या किंवा नंतर होणार्‍या आजारांविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती करडाच्या शरीरात तयार होते. चिक पाजल्यानंतर 4 मिलि. गोट न्युट्री ड्रेंच पाजावे व शेळीला 10 मिलि. गोट न्युट्री ड्रेंच पाजावे त्यामुळे शरीरातील अशक्तपणा कमी होतो.
 
शेळीला दूध नसेल किंवा कमी असेल तर कृत्रिम चिक तयार करून पाजावा. त्यासाठी इतर शेळीचे दूध तापवून गरम करावे. त्यामध्ये 2-3 अंड्यांमधील पांढरा बलक मिसळावा (अल्ब्युमिन व ग्लोब्युमीन प्रथिनांचा पुरवठा होतो.) त्यामध्ये 25-30 ग्रॅम म्हणजेच साधारण 2 मोठे चमचे बाजारात मिळते ते कॉड्लीव्हर तेल घालावे. (त्यामुळे अ जीवनसत्त्व मिळते. 1 चमचा एरंड तेल मिसळावे (याचा सारक म्हणून उपयोग होतो. स्टेक्लीन औषध 1 लहान चमचा मिसळावे. खनिज द्रव्याची 15 ग्रॅम म्हणजे साधारणत: चमचाभर पूड मिसळावी. हे मिश्रण म्हणजेच कृत्रिम चिक होय. बनवल्यानंतर प्रत्येक वेळी पाजताना कोमट करून वजनाच्या 10% दिवसातून 3 वेळा विभागून पाजावा. साधारण 2 दिवसांनंतर करडांना चिकाची गरज नसते तेव्हा देऊ नये. मग शेळीचे किंवा इतर दूध पाजणे सुरू करावे.
 
त्यानंतर 3-4 दिवस करडाच्या वजनाच्या 10% दूध त्यास पाजावे. बरेच शेळीपालक सांगतात की शेळीला दूध चांगले आहे, करडांनाही पाजतो पण म्हणावी तशी करडांची वाढ होत नाही, तर त्यासाठी पुढील दिवसांमध्ये सकाळी व सायंकाळी किमान 2-2 तास तरी करडू मातेजवळ पिण्यासाठी ठेवावे. काही लोक दूध पाजून झाल्यावर लगेच करडाला त्याच्या कप्प्यात सोडतात. असे न करता करडे जास्त वेळ शेळीजवळ दूध पिण्यासाठी ठेवावेत. याचे कारण असे की शेळीची कास तिच्या पूर्ण दूध उत्पादन क्षमतेपेक्षा लहान असते. ठराविक प्रमाणातच त्यामध्ये दूध साठून राहते, पण जर करडू दूध पिले तर कास रिकामी झाल्यानंतर पुन्हा कासेत व सडात दूध उतरते. करडू पुन्हा दूध पिऊन उड्या मारतात. पुन्हा काही वेळाने दूध प्यायला येतात. या क्रियेमध्ये तयार असलेल्या दुधाला कास मोकळी झाल्याकारणाने जागा मिळते व ते मातृत्वामुळे करडू जवळ आल्यावर पुन्हा कासेत उतरते. करडाला पोटभर दूध मिळते.

Shelipalan A_2  
 
पुढे 1 महिना वयाचे करडू झाल्यावर त्याला जंतनाशकाचा पहिला डोस (रश्रलशपवरूेश्रश 1ाश्र) तोंडावाटे द्यावा. दुधाशिवाय हिरवा, कोवळा व लुसलुशीत चारा त्यांना खाण्यासाठी द्यावा. चारा सुरू केल्याने करडाचे जाळीपोट विकसित व्हायला सुरवात होते. त्यामुळे रवंथ करण्याची क्रिया सुरू होऊन खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचले जाते.
 
साधारण 3 महिने वय झाल्यावर करडे नर व मादी अशा दोन भागांत विभागणी करावी व जंतनाशकाची दुसरी मात्रा द्यावी. जी मादी करडे प्रजननासाठी ठेवायची आहेत व जी नर करडे पैदाशीसाठी किंवा ईदसाठी ठेवायची आहेत अशी सर्व करडे वगळून उरलेली बाकीची किंवा मटणासाठी पाळलेली करडे साधारण 3 ते 4 महिन्यांतच विक्री करावी. कारण अशा वयोगटांतील प्रकारच्या मटणात स्नायूंचे प्रमाण जास्त व चरबी किंवा हाडांचे प्रमाण कमी असते. अशा मटणाला लीन मीट असे म्हणतात. असे मटण खाण्यास चविष्ट लागते म्हणून बाजारात या वयातील करडांना जास्त मागणी असते व खाटिक लोकंसुद्धा या वयातीलच करडे खरेदीसाठी प्राधान्य देतात. जी लोकं अजून काही दिवस सांभाळली तर जास्त पैसे येतील, असा विचार करतात. त्यांचा पुढील संगोपनावर अधिक खर्च होतो. दूध हे पूर्णान्न असते. 3 महिन्यांनंतर शेळ्यांचे दूध संपलेले असते किंवा खूपच कमी झालेले असते. त्यामुळे इथून पुढे चारा व खुराकावर भर देऊन म्हणजेच खर्च करून संगोपन करावे लागते. नफा होतो पण मग त्यातील बराचसा पुढील संगोपनातच निघून गेलेला असतो. जर 3-4 महिन्यांतच करडे विकली तर पैसेही चांगले येतात व पुढील संगोपन खर्च वाचून तो आपण शेळ्यांवरही खर्च करू शकतो.
 
आता उरलेल्या करडांसाठी आहार व्यवस्थापन : वजनवाढ झटपट होण्यासाठी किंवा आरोग्य उत्तम राखण्यासाठी अधिक प्रथिनयुक्त आहार द्यायला हवा, चार्‍यासोबत खुराक म्हणून विविध डाळींची चुनी व काही प्रमाणात शेंगदाणा पेंड द्यावी. जंतनाशक देऊन झाल्यावर साधारणत: आठवडाभराने आंत्रविषार नावाची लस पशुवैद्यकाकरवी टोचून घ्यावी व नंतर प्रत्येक आजाराची लस लसीकरण तक्त्यानुसार किंवा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने देऊन घ्यावी. 3-4 महिने वयानंतर लिवर टॉनिक पाजणे सुरू करावे व कंपनी निर्देशानुसार ठराविक अंतराने देत जावे. जेणेकरून करडांची लिवरची कार्यक्षमता वाढून पाचनक्रिया सुरळीत राहू शकेल. लिवरवर येणारा ताण कमी होऊन करडे आनंदी व तणावमुक्त राहू शकतील.
 
Shelipalan A_3   
 
लागवडीसाठी निवडलेले नर करडू वगळता बाकी सर्व नर करडे कास्ट्रॅटर नावाच्या यंत्राच्या साह्याने खच्ची करून घ्यावीत. खच्ची केल्याने करडांची लैंगिक शक्ती व उतेजना कमी होते. इतर कारडांच्या मागे लागत नाहीत. परिणामी, फक्त चारा खाण्यावरच लक्ष केंद्रित होते व पोषण चांगल्या पद्धतीने होऊन चांगल्या तर्‍हेने वाढ होते. सर्व करडे एकत्रित सांभाळणे सोपे होते. नर करडे खच्ची केल्याने मवाळ बनतात. मारत नाहीत व हाताळणे सोपे जाते. एक ते सव्वा वर्ष वयानंतर म्हणजे दोन दाती झाल्यानंतर सर्व खच्ची बोकड ईदसाठी किंवा ज्या उद्देशाने पाळली आहेत. त्यासाठी विक्री करावीत. पैदाशीसाठी ठेवलेला नर ही याच काळापासून लागवडीसाठी वापरणे चालू करावे किंवा पैदाशीसाठी विकावा. 
 
साधारण 8व्या महिन्यापासून मादी करडे (पाठी) वयात येतात. म्हणजे माज दाखविणे सुरू करतात. सुरवातीचे 2 ते 3 माज सोडून पुढील माजाला बोकड दाखवावा किंवा कृत्रिम रेतन करावे. लागवडीनंतर जंतनाशक देताना गर्भारपणात सुरक्षित राहील अशाप्रकारचे जंतनाशक पशुवैद्यकांच्या सल्ल्याने द्यावे. ठराविक अंतराने फीड स्प्लीमेंट (मिनरल मिक्श्चर, कॅल्शियम लिक्विड, लिवर टॉनिक इ.) द्यावे, जेणेकरून बाकी आहारातून जी पोषणमूल्ये मिळत नाही ती मिळतात, आरोग्य चांगले राहते व गर्भाची वाढ व्यवस्थित होते. गर्भारपणाचे दिवस पूर्ण होत आल्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, कळपामध्ये मारकी शेळी असेल तर ती बांधून ठेवावी किंवा इतरांपासून वेगळ्या कप्प्यात ठेवावी. गर्भपाताचा प्रकार आढळल्यास अशा शेळ्या त्वरित वेगळ्या करून पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत. यामुळे संसर्गजन्य गर्भपातासारखे आजार टाळता येतील.
शेळी विण्याचा काळ जवळ आल्यावर विण्याच्या तारखेच्या 5 दिवस आधीपासून बाजरी, गूळ, शेपा, ओवा, बाळंतशेपा यांचे मिश्रण शिजवून खिचडी बनवून व सोबत कॅल्शियम लिक्विड विल्यानंतर 5 दिवसांपर्यंत द्यावे. याने प्रसूतिपूर्व तयारी होते. प्रसूतीनंतर होणारी झीज भरून निघते आणि किडिंगनंतर होणारा आजार मिल्क फीवर होत नाही.
 
वरील सर्वप्रकारे शेळ्यांचे जन्मापासून ते प्रसूतीपर्यंत व्यवस्थापन करता येईल. वरील सर्व घटना क्रमवार करण्यासाठी सर्व घटनांची नोंद करून ठेवण्यासाठी नोंदवहीचा वापर करावा. त्यामुळे प्रत्येक प्राण्याचा इतिहास समजतो. पुढीलवेळी औषध देताना नोंदींचा वापर होतो. व्यवस्थापन करणे सोयीचे होते.
डॉ. प्रमोद गोडसे, सा. प्राध्यापक,
फोन नं. 9130801995
कु. प्रणिता सहाणे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय
गुंजाळवाडी पठार, माधवनगर, राजापूर रस्ता, ढोलेवाडी,
 ता. संगमनेर, जि. अ. नगर
पिन कोड : 422605
फोन न. 8600301329