यशोगाथा - रमेश इंगळे

डिजिटल बळीराजा-2    29-Jan-2020


greeps_1  H x W
 
माझ्या सर्व मित्रांना नमस्कार. मी पळशी (ता. खानापूर, जि. सांगली) या गावाचा रहिवासी आहे. माझे गाव हे सांगली जिल्ह्यातील सर्वांत उंच ठिकाण आहे. माझ्या गावाची जमीन डोंगरभाग आहे. जमीन सपाट नसल्यामुळे पाणी साठत नाही. तळे किंवा तलाव नाहीत. अशा ठिकाणी आमची जमीन आहे. मला माझे जीवन जगण्यासाठी नोकरी मिळाली नाही. माझे शिक्षण 12वी पर्यंत झाले. त्यानंतर मी दोन वर्षे आर्मीसाठी प्रयत्न केला. पण ते शक्य झाले नाही. मग मी शेती हा व्यवसाय निवडला. माझ्याकडे 0.60 आर एवढी शेती होती. त्यासाठी मी शेती आणि एक गट तयार केला. त्यामध्ये सात सदस्यांची निवड केली व आम्ही सर्वजण एक ठिकाणी आलो. सर्वांनी द्राक्षे या पिकाची निवड केली. सर्वांनी अर्धा ते तीन गुंठे एवढीच लागवड केली, कारण पाणी कमी होते. आम्ही सर्वजण रोज संध्याकाळी दोन तास वेळ काढून एकत्र येत असे आणि आपले सर्वांच्या अनुभवाची मांडणी करत असे. ज्यामुळे सर्वांना कळत असे की आपणास काय केले पाहिजे.
 
तरीही मी त्यामध्ये एक एकर शेती निवडली व त्यामध्ये द्राक्षे या पिकाची निवड केली. मी स्वत: रोपे तयार केली. पण सन 2002 मध्ये पाऊस पडला नाही. त्यामुळे पाणी कमी पडले. माझ्याकडे 150 फूट बोअर होती ती कामी आली; त्यामुळे मी एक एकरपैकी अर्धा एकर लागण केली. द्राक्षवेल चांगल्या पद्धतीने आली. पण परत 2003 मध़्ये पाऊस पडला नाही. त्यामुळे पाणीटंचाई आली. त्यानंतर मी एक बोअर पाडली. त्यामध्ये 210 फूट एवढी केशिंग घालावी लागली व मला 1 इंच एवढी पाणी मिळाले. या पाण्यामुळे मी व माझी रोपे जगवू शकलो. त्यामध्ये माझ्या वडिलांची व आईची खूप साथ मिळाली. आम्ही एकही मजूर न लावता अर्ध्या एकरचे चांगले पीक आणले. त्यानंतर पाऊस चांगला झाला. त्यामुळे 2007 मध्ये आम्ही एक एकर शेत घेतले व त्यामध्ये ‘बेंगलोर डोंगरे’ याची 7.5 या अंतरावर लागण केली. अंतर वाढविण्याचं कारण की वेलीची संख्या कमी झाल्यामुळे हवा खेळती राहते. उत्पन्नात वाढ होते. त्यासाठी मी इनलाइन ठिबक सिंचन केले. त्यामुळे पाण्याची बचत होते. मी अगदी कमी पाण्यामध्ये द्राक्षशेती पिकवतो. एका वेलीसाठी प्रत्येक दिवशी पाच लिटर पाण्याचा वापर करतो. त्यासाठी उसाची पाचट व हिरवळीची खते मल्चिंग वापरले जाते. त्यामध्ये चवळी व मका याची सरीमध्ये लागण करतो व नंतर ते कापून बांधा वरती टाकतो. त्यामुळे पाणी कमी लागते व जमिनीचा पोत सुधारतो व सेंद्रिय कर्ब वाढतो. एप्रिल छाटणीमध्ये संजीवकाचा वापर न करता काढीची पक्वता व अन्ननिभी चांगल्या प्रकारे करतो. माझ्या प्लांटमध्ये एनआरसीने लिहोसिनची चाचणी केली जाते व नंतर द्राक्ष पीक बाजारपेठेत जाते.
 
माझ्या सन 2013 मध्ये आमच्या बागेची एक्सपोर्ट क्वालिटी चांगली तयार झाली. द्राक्षे 90 रु. किलो अशी मागणी झाली. परंतु द्राक्षकाढणी एक दिवस अगोदर असताना गारपीट झाली. त्यामध्ये मी खचून न जाता राहिलेला माल स्वच्छ करून घेतला व नंतर व्यापार्‍याने 70 रु. किलो दराने माल विकला गेला. माझे नुकसान होऊनपण चांगले उत्पन्न मिळाले. एक वर्ष असा अनुभव आला. डिपिंगचे सीपीपी औषध खराब मिळाले व त्यामुळे द्राक्षमण्यांवर रिंग तयार झाले. हे माझ्या लक्षात येताच मी सर्व शेतकर्‍यांना वेळीच सावध केले. कष्टाचे फळ मिळते त्यासाठी आपण खचून न जाता त्यातून कसे सावरायचे हे पाहिले पाहिजे.