द्राक्ष उत्पादनासाठी सेंद्रिय पद्धत

डिजिटल बळीराजा-2    22-Jan-2020
 
 
सेंद्रिय पद्धतीने द्राक्ष उत्पादनात घेण्यात यश मिळण्यासाठी आवश्यक माहिती व प्राप्त (सद्य) परिस्थितीचा अभ्यास करून सेंद्रित पद्धत अवलंबितना कोण-कोणत्या बाबी साह्यभूत आहेत कोणकोणत्या बाबी प्रतिकूल अथवा अडचणीच्या आहेत आणि त्यातून मार्ग कसा काढता येईल या संबंधीची सखोल माहिती या लेखात दिली आहे. 
 
आजच्या द्राक्ष उत्पादनाची स्थिती : 
 
अ) उत्पादन : आजचे द्राक्ष उत्पादन सरासरीने एकरी 10 टन (हेक्टरी 25 टन) आहे. यात सवाईने वाढ आवश्यक आणि शक्य आहे. एकरी 16 टनांचे (हेक्टरी 40 टन) उत्पादन मिळायला हवे. 
ब) गुणवत्ता : गुणवत्तेसंबंधी, ग्राहकांची अपेक्षा काय याबद्दल फारसा विचार होत नाही. प्रत्येकजण अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत आहे. अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न आणि हेतू हा वावगा नसला तरी तो साधताना भरमसाठ खर्च करावा लागतो. तसेच अधिक उत्पादन म्हणजे दर्जा, गुणवत्ता घसरणे, या दोन बाबी द्राक्षबागाईतदार विचारात घेत नाहीत. याचबरोबर आपण पिकवीत असलेल्या द्राक्षाचे जे ग्राहक आहेत, त्यांचाही फारसा विचार केला जात नाही. यासंबंधी फार स्पष्टीकरण करण्याची गरज नाही. तथापि, आज पुढील बाबी गुणवत्तेच्या दृष्टीने हानिकारक आहेत. एवढेतरी भान ठेवावे. 
1) बिगरहंगामी उत्पादन घेणे. 
2) रासायनिक खतांचा, औषधांचा अतिरेकी वापर करणे. 
3) पीकसंजीवकांचा योग्य वापर न करणे. 
4) द्राक्षावर जे विषारी अंश साठतात, त्याबद्दल अज्ञान आणि बेफिकिरी वृत्ती असणे. 
क) उत्पादन खर्चात बचत शक्य : आज अनेक कामे अनावश्यक असली तरी ती केली जातात, यामध्ये हार आणि भय या दोन बाबी आहेत. तसेच ज्ञानापेक्षा अनुवभावर विसंबून राहण्याची वृत्ती वाढत आहे. याची काही ठळक उदाहरणे थोडक्यात अशी 
1) 16 एकरी टन उत्पादनासाठी ग्रॅम 32 जीए पुरेसा असतानाही एकरी 60 ग्रॅम जीए वापरला जातो. 
2) मातीपरीक्षण न करताच सेंद्रिय खते (इतरही) घातली जातात. नत्र, पालाश यांच्यात समन्वय न साधता खते व मायक्रोन्यूट्रीएंटस वापरली जातात. 
3) फवारणीतंत्र समजून न घेताच कीडनाशकांचा अतिरेकी वापर केला जातो. सर्वसाधाणपणे 16 टन उत्पादनासाठी हजार रुपये खर्च अपेक्षित असताना तो 95 हजारांपेक्षाही जास्त होतो. तयार होणार्‍या मालाचा दर्जा कमी असल्याने अपेक्षित दर मिळत नाहीत. एक एकराचे लाखभर रुपये झाले तरी, मार्केटिंगचा खर्च वजा जाता एकरी हजार रुपये उरतात आणि मग द्राक्षे परवडत नाहीत असे म्हणण्याची वेळ येते. 
द्राक्षबागेतील कामे शास्त्रीय निकषांवर केली तर उत्पादन खर्चात निश्चितपणे 10 टक्क्यांनी बचत होते; म्हणजे एकूण फायदा बर्‍यापैकी होतो. उत्पादनात 10 टक्के वाढ, गुणवत्तेत सुधारणा झाल्याने दर वाढवून मिळून 10 टक्के अधिक रक्कम मिळवली तर एकूण फायद्यात 20 टक्क्यांनी किमान पक्षी सवाईने तरी वाढ होणार हे निश्चित. 
4) यातील चौथी बाब जी आहे तो विक्रीसंबंधीची आहे. ही बाब बहुतांशी द्राक्ष उत्पादकांच्या हातात नसली तरी गट स्थापन आणि काही गोष्टींची अगोदर चाचपणी करून त्यातूनही मार्ग काढता येतो. 
 
आता हे जे चार मुद्दे मांडले आहेत, त्यातील पहिल्या 3 मुद्द्यांच्या बाबतीत सेंद्रिय पद्धतीचा वापर केला असता चांगलेच परिणाम मिळणार आणि हे तीन मुद्दे साधले की चौथा मुद्दाही फारसा अवघड जाणार नाही. थोडक्यात, असे म्हणता येईल की द्राक्षाचा किफायतशीरपणा वाढविण्यासाठी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करणे किती गरजेचे आहे हे सहज ध्यानात येईल. 
 
सेंद्रिय द्राक्षशेतीची मूलतत्त्वे : 
 
सेंद्रिय पद्धतीने द्राक्ष उत्पादन करताना काही मूलभूत बाबी समजून घ्यायला हव्यात, त्या अशा : 
1) द्राक्षबागेतील वातावरण 
2) जमिनीची मशागत आणि तणनियंत्रण 
3) पोषण आणि खतव्यवस्थापन 
4) पीकसंरक्षण अर्थात रोग, कीड इत्यादी नियंत्रण 
5) पीक संजीवकांचा वापर 
6) उत्पादनसंबंधीच्या विशेष बाबींचा वापर. 
 
सेंद्रिय पद्धतीने द्राक्षशेती करताना अगोदर कोणत्या बाबी, संबंधी काय आणि कधी, कसे काम करावयाचे आहे, तसेच आपला अंतिम हेतू काय आहे, हेसुद्धा निश्चितपणे ठरविले पाहिजे. किती कालावधीसाठी आपण ही संकल्पना राबवणार आहोत हे समजले पाहिजे. सेंद्रिय शेती ही काही एका हंगामापुरती अमलात आणावयाची बाब नाही. सेंद्रिय शेती केली की सर्व प्रश्न सुटले असाही अर्थ काढू नये. बरेच फायदे संभवत असले तरी काही तोटेही असू शकतात. याचे भाग ठेवले पाहिजे. ठराविक कालावधीत, हानिकारक बाबींवर मात कशी करता येईल, हेसुद्धा लक्षात घेऊन त्या दिशेने प्रयत्न करायला हवेत. सेंद्रिय शेती या पद्धतीत सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे ‘शाश्वतपणा’ हा होय. अनेक वर्षांसाठी ही पद्धत लाभदायक ठरू शकते. द्राक्षबागेसाठी ही पद्धत यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे. द्राक्षबाग एकदा लावली की निदान ती सोळा वर्षे तरी उत्पादनक्षम राहिली पाहिजे. लागवडीपासून दोन वर्षे उत्पादन मिळत नाही. तिसर्‍या वर्षापासून उत्पादन सुरू होते. म्हणजे एकूण 14 पिके उत्पादन मिळाली पाहिजेत. आपणास जर सेंद्रिय द्राक्ष उत्पादन निर्यात करावयाचे असेल आणि त्यास त्या त्या देशाची मान्यता हवी असेल तर त्यासाठी 5-7 वर्षे आपण उत्पादन पद्धतीत सातत्य ठेवले पाहिजे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सेंद्रिय द्राक्षबाग ही एकट्या दुकट्या बागाईतदाराने करावयाची बाब नाही. एखाद्या गावात, परिसरात निदान 10 जणांनी आणि 100 एकरापर्यंतच्या क्षेत्रावर हा उपक्रम राबविला पाहिजे, तरच पुढच्या विक्री निर्यातीसंबंधित लाभ उठविणे सुकर होईल. पर्यायी नियोजन म्हणून असलेल्या सर्वच क्षेत्रावर सेंद्रिय पद्धत राबविण्यापेक्षा ठराविक क्षेत्रावरच ती राबवावी. म्हणजे तौलनिक अभ्यास आणि अनुभव मिळून आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. एखाद्या गावात समजा दहाजण द्राक्षशेती करतात आणि प्रत्येकाकडे 2-4 एकर द्राक्षबाग आहे. या दहाजणांतील काहीजणांनी सर्वच क्षेत्रावर ही संकल्पना राबवण्याऐवजी प्रत्येकाने एक एकर क्षेत्रावर ही राबवावी. या दोन पर्यांयापैकी एक सोईचा पर्याय निवडावा. एखाद्या परिसरात एक पर्याय तर दुसर्‍या परिसरात दुसरा पर्याय अधिक सोईचा वाटत असेल, तर तशी निवड करावी. एखाद्या बाजारपेठेसाठी अथवा ठराविक देशातील निर्यातीसाठी उत्पादन करावयाचे असेल, तर तोही एक चांगला पर्याय असू शकतो. 
 
एकदा निर्णय झाला, पर्याय निवडला की मग सुरुवात करावी. सेंद्रिय द्राक्षशेतीचा पर्याय निवडल्यानंतर दोन पर्याय आहेत. एक म्हणजे नवीन द्राक्षबाग लावून तेथे सेंद्रिय द्राक्ष उत्पादन घ्यायचे आणि दुसरा पर्याय म्हणजे, सध्याची द्राक्षबाग सेंद्रिय पद्धतीत बदलायची. पहिला पर्याय सोपा आणि अधिक भरवशाचा आहे. पण त्यासाठी अधिक काळ खर्च करणे गरजेचे आहे. दुसरा पर्याय निवडल्यास लगेचच उत्पादनास सुरुवात करता येते. तथापि, हा पर्याय अवघड आणि अधिक खर्चाचा होऊ शकतो. म्हणून एक बाब आपण म्हणजे सेंद्रिय पद्धतीने द्राक्ष उत्पादन घेणार्‍यांनी लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे सेंद्रिय शेती म्हणजे, ‘आखुडशिंगी, लहान पोटाची, पण भरपूर दूध देणारी गरीब गाय नव्हे.’ 
 
मला अनुभव आहे आणि ज्ञानही आहे, असे कोणी समजत असेल तर तो अहंकार समजावा. बर्‍याचजणांना अनुभव असतो पण ज्ञान नसते. तेव्हा ज्ञानी माणसाकडून ज्ञान मिळवून आपल्या अनुभवास जोड द्यावी हे सर्वांत शहाणपणाचे होय. 
ज्ञानास अनुभवाची जोड कशी द्यावी, हे योग करून समजेल. यासाठी योग म्हणजे काय, राजयोग म्हणजे काय, हे समजून सहयोग आणि सहजयोगही जाणून त्याचा सराव करावा लागेल. 
 
टीप : यासंबंधीची अधिक माहिती सोबतच्या पुरवणी लेखात दिली आहे. जिज्ञासूंनी अधिक माहितीसाठी लेखकाकडे जरूर संपर्क साधावा. 
 
प्राप्त परिस्थितीचा अभ्यास करा : 
 
सेंद्रिय पद्धतीने द्राक्ष उत्पादनात घेण्यात यश मिळण्यासाठी आवश्यक आहे तो. प्राप्त (सद्य) परिस्थितीचा अभ्यास. हा अभ्यास करून आपणास समजून घ्यावयाचे आहे, की या परिस्थितीत सेंद्रित पद्धत अवलंबितना कोण-कोणत्या बाबी साह्यभूत आहेत, कोणकोणत्या बाबी प्रतिकूल अथवा अडचणीच्या आहेत आणि त्यातून मार्ग कसा काढता येईल. 
 
1) हवामान : हवामान हा ढोबळ शब्दप्रयोग केला जातो. हवामानातील घटक- तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, हवा या चार घटकांची माहिती हवी. प्रत्येक घटकाची तीव्रताही जाणून घ्यावी. कमाल, किमान, सरासरी, उपयुक्त पातळी, हानिकारक पातळी इत्यादी हवामानातील भेदही माहीत असावेत. 
1) मॅक्रो : म्हणजे त्या भागातील अथवा परिसरातील हवामान. 
2) मेसो : म्हणजे द्राक्षबागेच्या आसपासचे हवामान. 
3) साइट : म्हणजे द्राक्षबागेतील हवामान. 
4) मायक्रो : म्हणजे ठराविक वेलीच्या विस्ताराखालचे हवामान. 
 
खालील तक्ता पूर्ण केला तर ही बाब समजून घेता येईल. 
 
      हवामान (घटक)     हवामान (प्रकार)
            मॅक्रो                 मेसो साइट मायक्रो 
तापमान 
आर्द्रता
सूर्यप्रकाश 
हवा 
 
 
 
टीप : वर्तमानपत्रातील आकड्यांवरून खरा अंदाज येणार नाही. 
 
नवीन लागवड करताना घ्यावयाची खबरदारी : 
 
1) नवीन लागवडीच्या नियोजित जमिनीचे परीक्षण आवश्यक आहे. जमिनीची जडणघडण, उतार, निचरा, चुनखडी, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, रंग, विविधता अशा अनेक बाबी तपासून घेतल्या पाहिजेत. 
2) नवीन लागवडीसाठी अंतर, मांडव, वळण देण्याची पद्धती काळजीपूर्वक निवडावी. लागवड दक्षिण-उत्तर दिशेने, दोन ओळींत 4 मीटर अंतरावर, चर पद्धतीने आणि एच पद्धतीच्या एक बाजू सलग असलेला आणि 1.5 मीटर उंचीचा मांडव उभारावा. एका एकरात 800 वेली (हेक्टरी 2000) असाव्यात आणि पुढे एकरी 8 टन निर्यातक्षम उत्पादन आणि आंतरदेशीय बाजारासाठी 12 टन प्रतिएकरी उत्पादनाचा पल्ला गाठणे सुकर व्हावे. जुनी लागवड सेंद्रिय बदलताना घ्यावयाची खबरदारी : 
अनेकदा असे दिसून येते, की अन्य ज्ञात-अज्ञात कारणांमुळे द्राक्षबाग डबघाईला आलेली असते. अशी बाग काढून टाकणेच योग्य असते. तथापि, संबंधित द्राक्ष-बागाईतदाराला असे वाटते की, सेंद्रिय पद्धतीने आपली बाग नक्कीच सुधारणार. पण असे होणे जवळजवळ असंभवनीय असते, पण ही वस्तुस्थिती लक्षात न घेता सेंद्रिय पद्धतीसच बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. सूज्ञ द्राक्षबागाईतरांनी वरील बाबींवर शांतपणे विचार करून निर्णय घ्यावा. 
1) मार्गदर्शन : सेंद्रिय द्राक्ष उत्पादन घेताना अजून एक महत्त्वाची बाब लक्षात घेणे गरजेचे आहे, ती म्हणजे मार्गदर्शनाची. आम्हाला याबाबत पुष्कळ ज्ञान आहे. तज्ज्ञांना तरी काय कळते, असा दुराग्रह नसावा. सूज्ञ द्राक्षबागाईतदारांनी ही दुसरी बाबही नीटपणे समजून घ्यायला हवी. 
2) जमीन : सेंद्रिय द्राक्ष उत्पादनात जमिनीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मुळात जमीन हा नैसर्गिक घटक असून, जमिनीची जडणघडण आणि तिची रचना जेवढी अद्भुत तेवढीच विविध प्रकारची आहेत. जमिनीची खरी ओळख ही प्रयोगशाळेत नमुन्याची तपासणी करून आणि जमिनीची प्रत्यक्ष पाहणी करूनच करता येते. वरवरचे परीक्षण आणि उघड्या डोळ्यांना होणारे दर्शन यावरून आपणास फारच कमी माहिती मिळते. 
जमिनीची आणि तिथल्या मातीची ओळख आणि माहिती मिळविण्यासाठी तिचा तीन प्रकारे अभ्यास करावा. 
अ) भौतिक गुणधर्म : रंग, खोली, उतार, पोत, प्रत इत्यादी. 
ब) रासायनिक गुणधर्म : सामू, क्षारता, मूलद्रव्यांचे प्रमाण इ. 
क) जैविक गुणधर्म : जिवाणू, किटाणू प्रकार व संख्या सेंद्रिय पद्धतीच्या अवलंब करताना जमिनीचे अंतरंग जाणून घेणे आणि त्यातल्या त्यात सेंद्रिय कर्ब, सीएन रेशो, सूक्ष्म जिवाणू सूक्ष्म वनस्पती (मायक्रोफ्लोरा आणि मायक्रोऑरगॅनीझमस) या घटकांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. 
सद्यपरिस्थितीत मातीपरीक्षणाच्या ज्या प्रयोगशाळा आहेत, मर्यादित आहेत. त्यामुळे अशा अहवालावर, सेंद्रिय शेती करणार्‍यांनी विसंबून राहणे अडचणीचे ठरू शकते. 
3) परिसर : सेंद्रिय पद्धतीने द्राक्ष उत्पादन घेताना बागेच्या लगतचा परिसरही जाणून घेणे उपयोगी पडेल. लगतच्या परिसरात कोणती पिके घेतली जातात, सभोतालचे पावसाचे पाणी द्राक्ष जमिनीत शिरते काय, जवळपास शहराची अथवा, कारखान्याची, सांडपाण्याची वाहिनी आहे काय, जवळपास धूर ओकणारा कारखाना आहे काय, बाजूने कच्चा रस्ता व उडणारी धूळ कितपत आहे. जवळचे उसाचे पीक असणे, साखर कारखाना असणे, औष्णिक केंद्र असणे, मळीची खाचरे असणे, सेंद्रिय शेतीपद्धतीस बाधक ठरू शकते. अर्थात यातूनही मार्ग काढता येतो. पण तहान लागल्यावर आड खोदण्यास अर्थ नसतो, हेही तेवढेच खरे आहे. 
 
द्राक्षबागेतील सेंद्रिय माती 
 
द्राक्ष हे पीक बहुवर्षायू आहे. लागवडीनंतर त्याच जमिनीत 15 -20 वर्षे हे पीक उत्पादन देते. द्राक्षास खते देण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातल्या त्यात रासायनिक खते आणि सूक्ष्म द्रव्यखते यांचा वापर अधिक आहे. अलीकडे संजीवके वापरण्याचे प्रमाण वाढले, एकरी उत्पादनही वाढले आणि त्यासाठी अधिक रासायनिक खतांचा वापर वाढला. दुसर्‍या बाजूने या जमिनी अधिक कडक व चिकट बनल्या, त्यातील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण घटले निचरा कमी झाला आणि मातीची जैविकता फारच खालावली. सारांशरूपाने असे म्हणता येईल की द्राक्षबागेतील माती ही जिवंत माती राहिली नसून ती एकप्रकारची मृतवत चैतन्यहीन अशी बनली आहे. 
 
अशा मातीत द्राक्षवेली रोगट तर असतातच, पण त्यावर हवामानातील बदलाचे प्रतिकूल परिणामही लवकरच घडून येतात. सेंद्रिय पद्धतीने द्राक्षशेती करताना अगोदर जमिनीचा-मातीचा विचार करावा. द्राक्षबागेतील मातीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण 1.5 टक्का असलेच पाहिजे, त्याशिवाय त्या मातीत जिवाणूंची संख्याही भरपूर हवी. सेंद्रिय पदार्थ आणि जिवाणू यांचा निकटचा संबंध आहे. सेंद्रिय पदार्थविना जिवाणू जगू शकत नाहीत, वाढू शकत नाहीत आणि कार्यरतही राहू शकत नाहीत. 
 
द्राक्षबागेतील माती खराब झाली आहे, हे कसे ओळखावे? यासाठी मातीपरीक्षण आणि काही दृश्य लक्षणे यांचा उपयोग होतो. भौतिक आणि जैविक गुणधर्म तर आजही तपासले जात नाहीत. जैविक गुणधर्म तपासणे अत्यंत आवश्यक आहे. 
 
माती खराब झाल्याची बाह्य लक्षणे 
1) ओलांड्यावर मुळे येणे. 
2) घडांना वजन न येणे. 
3) घड एकसारखे न पिकणे. 
4) काडीशेंडा वाढ खुंटणे. 
5) पिंक बेरीचे प्रमाण वाढणे. 
 
ही ढोबळ आणि प्रमुख लक्षणे आहेत. अनेक वेळा ही सर्व किंवा यातील काही लक्षणे दिसली तरीही त्याची कारणमीमांसा नीट केली जात नाही. त्यावर उपचारही अगदी अयोग्य प्रकारे केले जातात. उदा. संजीवकांचा अनाठायी वापर, मायक्रोन्यूट्रीएंटचा अतिरेकी वापर, कारण नसताना रसायनांचा वापर, पाणी कमी करणे, अल्टरनेट (एक आड एक) ओळीतून पाणी देणे या उपायांमुळे परिस्थिती तर सुधारत नाहीच पण समस्या मात्र दरवर्षी वाढतच आहेत. प्रत्येक जण हवामानावर किंवा विद्यापीठावर दोष देऊन मोकळा होतो. 
 
कमीत कमी मशागत करावी. माती जर जिवंत ठेवायची असेल, तर कमीत कमी मशागत करावी. एका प्रसिद्ध शास्त्रज्ञाने सांगितले आहे, की “नो कल्टीवेशन इज द बेस्ट कल्टीवेशन इन व्हीनयार्डस्”याचा अर्थ असा की, मशागत न करणे हीच द्राक्षबागेतील चांगली मशागत होय. आपण ज्या पद्धतीने सध्या मशागत करतो, त्यामुळे फायदा कमी आणि नुकसान मात्र भरपूर होते. 
 
द्राक्षबागेत दोन ओळींत 6 ते 8 फुटांचे अंतर राखले जाते व त्यामधून ट्रॅक्टर चालविला जातो. ट्रॅक्टरची चाके द्राक्षवेलीच्या खोडांना चिकटून चालतात. त्यामुळे वेलींच्या दोन्ही बाजूंनी मुळे दाबली जातात. जमीन (माती) टणक होते. मुळांना हवा मिळत नाही. विशेषकरून पावसाळ्यात माती ओली असताना अवजारे चालविली तर माती मोकळी होण्याऐवजी ती अधिक घट्ट व कडक बनते. पावसाळ्याच्या आरंभी वरंबे कुदळून (टाचून) घ्यावेत. अशीच दुसर्‍यांदा कुदळणी, बहार छाटणीनंतर घड मणीबांधणी अवस्थेत असताना करावी आणि तिसरी कुदळणी घड पिकण्यास आरंभ होताना करावी. अवजारांच्या साह्याने मशागत फक्त वर्षातून दोन वेळा करावी. खरड छाटणीचे वेळी आणि बहार छाटणीचे वेळी. यावेळी मुळांना काही प्रमाणात दुखापत होऊन ती तुटली जाणे अपेक्षित आहे. या मशागतीनंतर नवीन पांढरी मुळे येतात. या पांढर्‍या मुळांना दुखापत टाळण्यासाठी नंतरची मशागतही टाळावी. 
 
बागेतील तणांचा बंदोबस्त : 
 
बागेत तणे वाढू देण्याबद्दल दुमत आहे. सेंद्रिय पद्धतीने द्राक्षशेती करताना तणे वाढविणे हिताचे आहे, असे मानणारा दुसरा गट आहे. तणे काढून हिरवळीचे पीक घेणे चांगले, असे मानणारा दुसरा गट आहे. यातील कोण बरोबर आहे, हे जमिनीच्या प्रकारावर आणि तणांच्या प्रकारावर अवलंबून आहे. सर्वच तणे उपयोगी पडणारी नसतात. काही तणे उपद्रवी असतात. द्राक्षबागेत सर्वसाधारणपणे आढळणारी तणे म्हणजे लव्हाळा, हरळी ही वर्षायू किंवा बारमाही तणे होत. यापैकी लव्हाळा हा हानिकारक आहे. त्यामानाने हरळी कमी उपद्रवी आहे. पार्थेनियम घोळ, माठ ही हंगामी तणे असून यातील पार्थेनियम हे उपद्रवी तण असून माठ कमी उपद्रवी आहे. काही तणांची मुळे, द्राक्षवेलींच्या मुळाजवळ गर्दी करतात, मूलद्रव्ये आणि पाणी यांच्याशी स्पर्धा करतात. काही तणांच्या मुळावर सूत्रकृमी वाढतात, तर काही तणांच्या मुळावर पिठ्या ढेकूण, उड्या भुंगे या किडी अंडी घालतात, अशी तणे द्राक्षवेलीवर विपरित परिणाम घडवून आणतात. द्विदल वर्गातील तणे माती सुधारण्यास मदत करतात. उपद्रवी तणांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणती पद्धत वापरावी ही बाबही महत्त्वाची आहे. तणे काढण्यासाठी निंदण करणे अधिक योग्य होय. याचा अर्थ असा, की बागेत जी अनेक तणे आढळतात त्यापैकी पार्थेनियम निंदून काढावे, लव्हाळा नष्ट करण्यासाठी वेगळे तंत्र वापरावे. हे तंत्र म्हणजे दुसरे तण/गवत पीक घेणे हा होय. इतर तणेही कापून घ्यावीत. सेंद्रिय पद्धतीने द्राक्षशेती करताना तणांचा बंदोबस्त करण्यासाठी तणनाशकांचा वापर टाळावा. अपवादात्मकरीत्या म्हणजे क्वचितप्रसंगी लव्हाळा नष्ट करण्यासाठी सॉफ्ट अ‍ॅप्लिकेशन पद्धतीने तणनाशकांचा वापर करण्यात हरकत नाही. मात्र वारंवार तणनाशकांचा वापर करू नये. 
 
बागेत आच्छादन करण्याचे महत्त्व : 
 
सेंद्रिय पद्धतीने द्राक्ष उत्पादन करताना जमीन, माती, द्राक्षाची मूळ यांचा संबंध लक्षात घेणे गरजेचे आहे. मातीतील सूक्ष्म-जीवाणूंचे वर्धन होणे महत्त्वाचे आहे. द्राक्षमुळावर आच्छादन असणे आवश्यक आहे. आच्छादनाचे अनेक प्रकार असले तरी पॉलिथीन पेपर, वाळलेले पाचट/ गवत याऐवजी हिरवळीची पिके, ओलसर-हिरवे गवत यांचा वापर करावा. बागेच्या बाहेरील वस्तू अथवा मटेरियल वापरण्यापेक्षा बागेतच आच्छादनासाठी लागणारे पीक वाढवावे. म्हणजे दुहेरी फायदा होतो. चवळी, मूग, उडीद, मटकी या पिकांना प्राधान्य द्यावे. त्याखालोखाल ताग, माठ, राजगिरा, झेंडू यातून पिकांची निवड करावी. पीक फुलावर येताच ते कापून त्याचा आच्छादन म्हणून वापर करावा. दरवर्षी एकच एक पीक न घेता त्यातही आलट-पालट करावी. उदा. खरडछाटणीनंतर लगेच ताग पेरावा, पावसाळ्यात चवळी करावी तर बहर छाटणीनंतर हरभरा, मेथी, झेंडू अशी क्रमवारी ठेवावी. 
 
सारांशरूपाने असे सांगता येईल, की बागेतील मशागत, तणनियंत्रण आणि आच्छादन या तीन बाबींचा असा समन्वय साधावा की जेणेकरून मातीतील जीवसृष्टी जास्तीत जास्त काळ जास्तीत-जास्त प्रमाणात कार्यन्वित राहील. 
 
वातावरण, व्यवस्थापन आणि सेंद्रिय पद्धत 
 
वातावरणात हवामान, तापमान, प्रकाश आणि आर्द्रता या बाबी अधिक महत्त्वाच्या मानल्या जातात. एखाद्या भागातील हवामान आणि प्रत्यक्ष बागेतील हवामान यात मोठा फरक असू शकतो. या तीन बाबींचा द्राक्षवेलवाढ आणि घडवाढ काळात जो परिणाम घडून येत असतो त्यातही फरक पडू शकतो. 
 
हवामानातील हे प्रमुख घटक एकत्रितपणे परिणाम घडवून आणतात. ते मोजण्याचे परिणामही समजून घेणे आवश्यक आहे. तापमान मोजण्याचे परिमाण म्हणजे डीडी- डिग्री डेज होय. एखाद्या दिवशी किती डीडी उपलब्ध झाल्या हे पुढील सूत्राने काढतात. 
 
त्या दिवसाचे कमाल तापमान, किमान तापमान यांची सरासरी काढायची व त्यातून 10 ही संख्या उणे करायची. उदा. एखाद्या ठराविक दिवसाचे कमाल तापमान 40 + 20 = 60 भागिले 2 = 30, 30 - 10 = 20 म्हणजे 20 डीडी हे उत्तर होय. उजेड अथवा सूर्यप्रकाश मोजण्याचे माप म्हणजे सनशाइन आवर्स हे होय. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत बागेत जितके तास सूर्यप्रकाश पडतो तितके तास मोजावेत. पावसाळ्यात दिवस मोठा असला तरी ढगाळ हवामानामुळे सूर्यप्रकाशाचे तास कमी होतात. याउलट हिवाळ्यात दिवस लहान असला तरी आकाश निरभ्र असल्याने प्रकाशतास अधिक मिळतात. दुसरे असे की सकाळच्या, दुपारच्या, संध्याकाळपर्यंतच्या प्रकाशाची गुणवत्ता वेगळी असते. लाल, निळा, पिवळा, हिरवा किंवा यामधला रंग वेगवेगळे परिणाम करतात. 
 
सूर्यप्रकाशाच्या बाबतीत आणखी एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे; ती म्हणजे थेट सूर्यप्रकाश आणि परावर्तित सूर्यप्रकाश हा होय. 
 
आर्द्रतेसंबंधीही बदल आणि चढउतार लक्षात घ्यावे लागतात. आर्द्रता ही सापेक्ष आर्द्रता असते. आणि तिचे मोजमाप टक्केवारीत केले जाते. पावसाळ्यात सर्वांत जास्त आर्द्रता असते, तर उन्हाळ्यात ती किमान असते. या तीन बाबींचे एकत्रित परिमाण समजून घ्यावेत. 
परिमाणकारक हवामान घटक 
कमाल तापमान ः 32 ते 38 अं. सें. 
किमान तापमान ः 20 ते 24 अं. सें. 
कमाल सूर्यप्रकाश ः 11 ते 12 तास 
किमान सूर्यप्रकाश ः 9 ते 10 तास 
कमाल आर्द्रता ः 90 ते 96 टक्के 
किमान आर्द्रता ः 30 ते 35 टक्के 
लाभकारक आणि हानिकारक हवामान घटक 
तापमान 10 अं. से. 40 अं. से. 
प्रकाश 8 तास 13 तास 
आर्द्रता 25% 80% 
वरीलप्रकारचे हवामान आणि वर्षभरातील वेल-अवस्था यांचा संबंध वेगऴा असतो, त्यासाठी वर्षभरातील तेलवाढ अवस्था समजून घेणे गरजेचे असते. 
कालावधी वेलअवस्था 
1. एप्रिल-मे खरड छाटणीनंतर नवीन फूट येणे, 
फुटींची वाढ होणे सूक्ष्म घडनिर्मिती होणे. 
2. जून-जुलै काडीवाढ, काडी-पक्वता 
3. ऑगस्ट-सप्टेंबर डोळे पक्वता, काडी पक्वता, विश्रांती 
4. ऑक्टोबर-नोव्हेंबर बहर छाटणीनंतर फूट व घड येणे. 
5. डिसेंबर-जानेवारी मणीवाढ, घडवाढ, शेंडावाढ 
6. फेब्रुवारी-मार्च घडपक्वता, शेंडावाढ बंद, घडकाढणी
वेल व घडवाढीच्या या ढोबळमानाने 6 अवस्था आहेत. या 6 अवस्था काळात हवामान कसे असते अथवा 6 टप्प्यांत वेलअवस्था कशा असतात यांचा मेळ बसविणे महत्त्वाचे आहे. 
एप्रिल-मे महिन्यात शेंडा जलद वाढतो, बुरशीजन्य रोग वाढतात. 
ऑगस्ट-सप्टेंबर किडींचा प्रार्दुभाव वाढतो, काडी पक्व होणे आवश्यक असते. 
खरडछाटणी ते बहरछाटणी यादरम्यान वेलवाढीच्या अवस्था लक्षात घेऊन सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन कसे करावे, यासंबंधी पुढील माहिती उपयोगी पडेल. 
1) खरड छाटणीनंतर : उन्हाळ्याचा काळ असतो, कोवळी फूट असते. कडक ऊन, प्रखर सूर्यप्रकाश आणि कोरडी हवा या तीन घटकांचा चांगला परिणाम साधण्यासाठी बागेत हिरवळीच्या पिकाचे आच्छादन करावे. ठिबकाची नळी 1 मीटर उंचीवर बांधावी. यामुळे बागेतील तापमान कमी होईल, परावर्तित सूर्यप्रकाश मिळेल आणि सापेक्ष आर्द्रताही वाढेल. 
2) पावसाळ्याच्या पूर्व भागात : हिरवळीचे पीक कापून त्याचे आच्छादन करावे. शेंडावाढ थोपविण्यासाठी सबकेन करावी, दाटी टाळण्यासाठी काडी विरळणी करावी. 
3) पावसाळ्याच्या उत्तर भागात : बागेत खेळती हवा व भरपूर प्रकाश मिळेल असे काडी व्यवस्थापन करावे. जमिनीत पाणी साचून न राहता पाण्याचा निचरा साधेल अशी व्यवस्था करावी. 
यानंतर बहर छाटणी (ऑक्टोबर छाटणी) होते व पुढील अवस्था सुरू होते. यातही 3 टप्पे असून त्यावेळी पुढीलप्रमाणे निगा राखावी. 
1) ऑक्टोबर-नोव्हेंबर : थंडीचा हा पूर्व काळ असतो. नवीन-कोवळे घड वेलीवर असतात. बागेत निरोगी वातावरण आवश्यक असते. त्यासाठी बागेत रोगट काड्या, तणे ठेवू नयेत. 
2) डिसेंबर-जानेवारी : कालखंड लहान दिवसमानाचा असतो. घड वाढण्याचा काळ असून पानेही कार्यक्षम असावी लागतात. त्यासाठी मुळांचे कार्यही जोमाने होणे जरुरीचे असते. तेव्हा या काळात अधिकाधिक पानांना जास्तीत जास्ती वेळ प्रकाश मिळेल असे काडी व्यवस्थापन करावे. तसेच मुळांची कार्यक्षमता वाढण्यासाठी मातीतील जिवाणू भरपूर आणि सेंद्रिय पदार्थांंसह सुरक्षित असावेत. 
3) फेब्रुवारी-मार्च : याकाळात द्राक्ष पिकू लागतात, तापमानात वाढ होऊ लागते. पाण्याची गरज वाढते, नत्रपुरवठा कमी लागतो. त्या दृष्टीने माती व्यवस्थापन असावे. नत्र घटून स्फुरद- पालाश शोषण वाढण्यासाठी उपयुक्त जिवाणू मातीत सेंद्रिय माध्यमातून मिळावेत. पिकणार्‍या घडावर थेट ऊन आणि प्रकाश पडणार नाही अशी काळजी घ्यावी लागते. याकाळात मुळांना दुखापत होईल अशी मशागत टाळावी. ओळीआड ओळीत पाणी देण्याने जीवाणूंच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होतो, हेही लक्षात असू द्यावे. 
 
भीमराव भुजबळ