नारळावरील प्रमुख किडी व रोगांचे व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    02-Jan-2020
Coconut Trees_1 &nbs
 
नारळ हे कोकणातील महत्त्वाचे बहुवर्षीय बागायती पीक आहे. त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो. म्हणूनच याला कल्पवृक्ष असे संबोधले जाते. नारळाच्या उत्पन्नावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. त्यामध्ये नारळावरील किडी हा एक महत्त्वाचा घटक आहे. नारळावर विविध किडींची नोंद झालेली असली तरी त्यापैकी गेंड्या भुंगा, सोंड्या भुंगा, काळ्या डोेक्याची अळी, उंदीर पांढरी माशी, तसेच कोंब कुजव्या रोग, डिंक्या रोग, करपा रोग इत्यादींचा प्रादुर्भाव सातत्याने आढळतो. त्यामुळे किडींचा जीवनक्रम, नुकसान करण्याच्या पद्धती आणि त्यावरील उपाययोजना, तसेच रोगांविषयीची माहिती शेेतकर्‍यांना असणे गरजेचे आहे.
 
नारळावरील प्रमुख किडीची ओळख व रोगांची लक्षणे आणि त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे यासंबंधीची सखोल माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे.
 
1) गेंड्या भुंगा :
 
Gendya Bhunga Ali_1 
 
हा भुंगा 4 ते 5 सेंमी. लांब व 1.5 सेंमी. रूंद असून रंगाने गडद तपकिरी किंवा काळा असतो. त्याच्या डोक्यावर पाठीमागच्या बाजूस गेंड्यासारखे एक शिंग असल्यामुळे त्याला ‘गेंड्या भुंगा‘ म्हणतात. पूर्ण वाढलेली अळी फिकट पांढर्‍या रंगाची असून, तिचे डोके रंगाने तपकिरी असते.
 
नुकसानीचा प्रकार :
 
पूर्ण वाढलेला भुंगाच नारळाच्या झाडाचे नुकसान करतो, तर अळ्या निरुपद्रर्वी असतात. सर्व वयोगटांतील नारळाच्या झाडांना गेंड्या भुंग्याचा उपद्रव होतो. हा भुंगा माडाच्या शेंड्यांंमध्ये नवीन येणारा कोंब किंवा सुई पोखरून खातो. कधीकधी नवीन वाढणारी सुई कुरतडली गेल्यामुळे लागण झालेल्या झाडाच्या झावळ्या त्रिकोणी आकारात कात्रीने कापल्यासारख्या दिसतात. त्यामुळे माडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो.
 
व्यवस्थापन :
 
1) नारळाच्या बागेत 2 ग 2 ग 2 फूट आकाराचे फसवे खड्डे खोदून त्यात शेणखत भरून ठेवावे. त्यावर मेटॉ-हाझियम 50 ग्रॅम खड्डयात टाकावे. त्यामुळे खड्ड्यातील गेंड्या भुंग्याच्या अळीला रोग होऊन त्या मरतील.
 
2) माडाच्या सुर्‍यातून ताजा भुसा बाहेर येताना दिसल्यास त्यामध्ये तारेचा हूक घालून भुंगे बाहेर काढून मारावेत.
 
Gendya Rog 1_1  
 
3) माडाच्या सुरामध्ये दोन डांबर गोळ्या प्रतिमहिन्याला ठेवाव्यात. त्यामुळे भुंगे माडाकडे येणार नाहीत. 
 
4) गेंड्या भुंग्याच्या नियंत्रणासाठी बॅक्युलो विषाणूग्रस्त भुंगे 12-15 प्रतिएकरी या प्रमाणात बागेत सोडावेत.
 
5) या किडीच्या व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याचा वापर करावा.
 
6) भुंगे माडाकडे येऊ नयेत म्हणून क्लोरॉन्ट्रानिलिपोल दाणेदार 6 ग्रॅम कापडी पिशवीत घेऊन सुईजवळ ठेवावे.
 
2) सोंड्या भुंगा :
 
Sondya Bhunga_1 &nbs
 
सोंड्या भुंगा हा तांबूस तपकिरी रंगाचा असतो. भुंग्याच्या डोक्याच्या पुढील बाजूस ठळकपणे दिसेल असा लांब व सरळ वाढलेला एक सोंडेसारखा भाग असतो, म्हणूनच याला सोंड्या भुंगा असे म्हणतात. भुंग्याची लांबी 2 ते 3 सेंमी असते. सोंड्या भुंगा म्हणजे तांदळात सापडणारी टोके या किडीची तांबूस तपकिरी रंगाची मोठी आवृत्तीच असते.
 
नुकसानीचा प्रकार
 
बागेतील नारळ झाडांचे व्यवस्थित निरीक्षण केल्यास माडाच्या खोडावर छिद्रे पडलेली दिसतात. या किडीच्या अळ्या माडाच्या खोडाच्या आतील भागात राहून खोडातील तंतू कुरतडतात व मऊ भाग खातात. त्यांचे हे कार्य सतत सुरू असते. माडाच्या आतील भाग खाल्ल्यामुळे झावळ्या सुकायला लागतात आणि वारा आल्यावर माड कोलमडून पडतो. परंतु काही वेळेस प्रादुर्भाव शेंड्याकडील भागावर देखील होतो. शेंड्याकडील भागावर प्रादुर्भाव झाल्यास सुई किंवा कोंब निस्तेज दिसतो. कालांतराने तो सुकतो आणि सर्व झावळा सुकून माड दगावतो किंवा शेंड्याकडील भाग मोडून पडतो.
 
व्यवस्थापन
 
1. खोडावर झालेल्या जखमा किंवा किडीने केलेली छिद्रे यांना निंबोळी पेंड व वाळू यांच्या समप्रमाणात केलेल्या मिश्रणाने वेळोवेळी भरून घ्यावे.
 
2. खोडावर असणार्‍या छिद्रातून किडीच्या सर्व अवस्था धारदार कोयत्याने आणि तारेच्या हुकाने काढून माराव्यात व त्या ठिकाणी डांबर लावावे.
 
3. ईमिडॉक्लोप्रिड 17.8 एसएल 1.5 मिली प्रतिलीटर पाण्यात मिसळून ते द्रावण नरसाळ्याच्या साहाय्याने वरच्या भोकातून खोडात सोडावे.
 
4. किडीचा प्रादुर्भाव शेंड्यातून असेल तर द्रावण हळूहळू शेंड्याकडील भोकातून ओतावे.
 
5. सोंड्या भुंग्यामुळे मेलेल्या माडाची खोडे त्वरित जाळून नष्ट करावीत, म्हणजे भुंग्याच्या प्रसारास आळा बसेल.
 
6. सोंड्या भुंग्याला आकर्षित करून मारण्यासाठी गंध सापळ्याचा वापरही करता येतो.
 
3) काळ्या डोक्याची अळी :
 
किडीची अळी फिकट करड्या रंगाची असून, डोके नावाप्रमाणेच काळे असते. कोष तपकिरी असतात, तर पतंग मध्यम आकाराचे असतात.
 
नुकसानीचा प्रकार :
 
या किडीची फक्त अळी अवस्था माडाचे नुकसान करते. ती पानांच्या खालच्या बाजूस पानांचे तुकडे, विष्ठा आणि रेशमी धागे यांच्या साह्याने तांबूस तपकिरी रंगाची जाळी विणून आत राहते आणि पानातील हरितद्रव्य खरवडून खाते. त्यामुळे पाने करपल्यासारखी दिसतात. या किडीचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर झाल्यास नारळाच्या बागा करपल्यासारख्या दिसतात. त्यामुळे पानांमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. परिणामी उत्पन्नात घट येते. 
 
व्यवस्थापन :
 
1. खालची 2 ते 3 उपद्रवग्रस्त पाने कापून नष्ट करावीत.
 
2. गरजेनुसार डायमिथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिलि. 10 लिटर पाण्यात घेऊन शक्य असल्यास झावळांवर फवारणी करावी. फवारणी करताना ती पानांच्या खालच्या बाजुस होईल याची दक्षता घ्यावी. 
 
3. या किडीचे नैसर्गिक शत्रू ब्रॅकॉन परोपजीवी कीटक 30 प्रतिमाड सोडावेत, तर गोनिओझस या परोपजीवी कीटकाचा वापर प्रतिमाडास 20 या प्रमाणात करावा.
 
4) नारळावरील इरिओफाइड कोळी : 

Eriophyid_1  H
 
ही एक अतिसूक्ष्मकीड असून, तिचा आकार 0.25 मिमि. इतका आहे. ही कोळी भुरकट पांढरी असून गांडुळ्याच्या आकारासारखी आहे. या किडीच्या पुढील भागात पायाच्या दोन जोड्या असतात व तोंड सुईसारखे असते. ही नारळ फळाच्या देठाखाली जे घट्ट आवरण असते त्याखाली मोठ्या संख्येने राहते. 
 
नुकसानीचा प्रकार :
 
Koli 2_1  H x W
 
कोळी तिच्या टोकदार सुईसारख्या तोंडामुळे नारळ फळातील रस शोषून घेते. परिणामी देठाच्या खालच्या भागात लांबट पांढरे चट्टे वाढत जाऊन त्यांचा आकार त्रिकोणी बनतो. जसजसे फळ आकाराने वाढते तसतसे अशा फळांवर काळपट उभ्या रेषा उमटू लागतात. या रेषा वाढत जाऊन हळूहळू फळाचे बाहेरील आवरण तडकते. त्यामुळे फळाची वाढ व्यवस्थित होत नाही. पर्यायाने नारळ लहान राहून खोबर्‍याचे उत्पन्न कमी होते, तसेच लहान फळांची मोठ्या प्रमाणात गळ होते.
 
व्यवस्थापनाचे उपाय :
 
Koli _1  H x W:
 
या किडीचा प्रसार वार्‍यामार्फत होत असल्याने सर्वप्रथम प्रादुर्भावित गळून पडलेली फळे जाळून नष्ट करावीत. प्रादुर्भावित फळांची एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहतूक करू नये. 
 
या किडीच्या व्यवस्थापनासाठी कडुनिंबयुक्त अ‍ॅझाडिरॅक्टीन 5 टक्के 7.5 मिली. समप्रमाणात पाण्यात मिसळून मुळावाटे देण्याची शिफारस केली आहे किंवा फेनपायरोक्झीमेट 5 टक्के प्रवाही 10 मिलि. अधिक 20 मिलि. पाण्यात मिसळून मुळावाटे मार्च महिन्यात द्यावे. 
 
5) उंदीर
 
उंदीर माडावरील कोवळे नारळ देठाकडच्या बाजूस पोखरतात व त्यातील कोवळे खोबरे खातात व पाणी पितात. उपद्रवग्रस्त नारळ फळांची कालांतराने गळ होते. ज्या बागेमध्ये उंदरांचा उपद्रव असेल अशा बागेमध्ये माडाखाली मोठ्या प्रमाणावर भोके असलेली कोवळी नारळ फळे गळून पडलेली दिसतात. यामुळे नारळ फळांचे अतोनात नुकसान होते. उंदरांचा उपद्रव नारळ रोपवाटिकेतही होतो. त्यामुळे रोपांची उगवण कमी होते. उगवलेली रोपे मरतात. 
 
एकात्मिक व्यवस्थापन
 
1) नवीन लागवड घट्ट न करता 25 ग 25 फूट या अंतरावर म्हणजे शिफारशीप्रमाणे करावी. म्हणजे उंदीर एका माडावरून दुसर्‍या माडावर उड्या मारून जाणार नाहीत आणि इतर माडांना उंदरांचा उपद्रव होणार नाही.
 
2) उंदरांना माडावर चढून जाण्यास प्रतिबंध करण्यासाठी जमिनीपासून 2 मीटर उंचीवर खोडाभोवती 30 से.मी. रुंदीचा गॅल्व्हनाइजचा गुळगुळीत पत्रा लावावा. म्हणजे उंदीर माडावर चढणार नाहीत. ही उपाययोजना माडाची लागवडयोग्य अंतरावर केलेली असल्यासच करावी. 
 
3) झिंक फॉस्फाइड घालून तयार केलेल्या विषारी आमिषाचा वापर एक महिन्याच्या अंतराने करावा. यासाठी 960 ग्रॅम गव्हाच्या जाड्या भरड्यामध्ये 20 ग्रॅम झिंक फॉस्फाइड व 20 मिली खोबरेल तेल घालून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण थोडे-थोडे माडाच्या 
बेचक्यात किंवा माडाच्या बागेत ठेवावे. 
 
6) रूगोज चक्राकार पांढरी माशीचे व्यवस्थापन 
 
रूगोज चक्राकार पांढरी माशी ही रसशोषण करणारी कीड असून 2.5 मिमी. लांबीची असते. माशीच्या पंख्याच्या जोडीवर फिकट तपकिरी पट्टे, तर डोळे राखाडी दिसून येतात. नर आकाराने मादीपेक्षा लहान असतो. अंडी लंबवर्तुळाकार, पिवळसर रंगाची 0.3 मिमि. लांबीची असून ती चक्राकार घातलेली असतात आणि ती मेणचट पांढरट आवरणाने झाकलेली दिसून येतात. 
नुकसान करण्याची पद्धत 
 
या किडीची पिले आणि प्रौढ दोघेही पानाच्या खालील बाजूस रस शोषून घेतात. त्यामुळे पानांमध्ये तणाव निर्माण होऊन त्यातील पाणी व अन्नद्रव्य उत्सर्जित होतात. पानाच्या वरच्या बाजूवर गोड चिकट स्त्राव उमटलेला दिसून येतो. त्यावर काळ्या बुरशीची कालांतराने वाढ झाल्याचे आढळते. त्यामुळे प्रकाशसंश्लेशन क्रियेत अडथळा निर्माण होतो. 
 
व्यवस्थापन 
 
1) प्रादुर्भावित रोपे, फळे व शहाळे इत्यादींची वाहतूक एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी करू नये.
 
2) या किडीचे नैसर्गिक शत्रू उदा. क्रायसोपा, ढालकिडा, मॅलाडा, इनकार्सिया, जावराव्हीया भुंगा, कातिन, लेइओचिनस इत्यादींचे बागेत संवर्धन करावे. 
 
3) चक्राकार पांढर्‍या माशीच्या व्यवस्थापनासाठी नियमित पिकावर शक्य असल्यास पाण्याची फवारणी करत राहावी. त्यामुळे माशीचे व्यवस्थापन होऊन मित्र किटकाचे संवर्धन होईल. 
 
5) ज्या क्षेत्रामध्ये इनकार्सिया या परोपजीवी कीटक दिसून येतात अशा क्षेत्रातून ते गोळा करून प्रादुर्भावित बागेत सोडावे. म्हणजे किडीचे जैविक व्यवस्थापन होईल.
 
6) या किडीचा प्रादुर्भाव नर्सरीमध्ये जास्त प्रमाणात दिसल्यास त्या ठिकाणी ईमिडॉक्लोप्रिड 17.8 एसएल 0.005 टक्के 3 मिली/10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा निमतेल 0.5 टक्के फवारावे. 
 
7) चक्राकार पांढरी माशी आकर्षित करण्यासाठी पिवळे चिकट सापळे माडांच्या शेंड्याकडे लावावे. 
 
1) नारळावरील कोंब कुजणे रोग :

Komb 1_1  H x W 
 
रोपवाटिकेतील रोपापासून ते अगदी मोठ्या माडांनासुद्धा कोंब कुजणे हा रोग होतो, परंतु वयाने लहान असणारे माड या रोगास मोठ्या प्रमाणात बळी पडतात. 
 
हा रोग लहान माडात जास्त आढळतो. कारण जर नारळाबरोबर रोपाचे खोड जमिनीत पुरले गेले असेल, तर रोपांच्या कोंबात पाण्याबरोबर मातीचे सूक्ष्म कण पानांच्या बगलेतून जातात. मातीच्या कणांबरोबर बुरशीचे कण असतात. वार्‍यामुळे सुईची हालचाल होते. त्यामुळे मातीचे कण रोपाच्या सुईवर घासले जातात. कोंबाला जखमा होतात. या जखमांतून बुरशीचे कण आत गेल्याने बुरशीची वाढ होते आणि कोंब कुजायला सुरवात होते.
 
Komb 2_1  H x W
 
मोठ्या माडांना हा रोग पावसाळयात जेव्हा सोसाट्याचा वारा सुटतो त्या वेळी माडाच्या सुईचा वरचा भाग वार्‍याबरोबर हलत असतो. सुईचा खालचा भाग तितकासा हलत नसतो. या दोन भागांमधील भाग अशावेळी बर्‍याचदा तडकतो. या तडकलेल्या भागातून पावसाचे पाणी आत जाते. फायटोपथोरा ही बुरशी नारळाच्या या भागात सुप्तावस्थेत असते. पावसाळ्यातील हवामान या बुरशीस पोषक असल्याने, बुरशीची वाढ झपाट्याने या तडकलेल्या भागात होऊन कुजण्याची क्रिया सुरू होते. हळूहळू बुरशीमुळे कुजण्याची क्रिया कोंबापर्यंत जाऊन कोंब कुजतो. त्यामुळे पानाच्या देठाला घाणेरडा वास येतो. 
 
उपाययोजना :
 
अ) लहान माडावरील उपाययोजना 
 
1) नारळाचे नवीन रोप लावताना फक्त नारळच जमिनीत पुरावा, रोप लावून झाल्यावर रोपाच्या नारळासभोवतालची माती पायाच्या टाचेने घट्ट दाबावी.
 
2) वार्‍यामुळे रोप हलू नये म्हणून रोपाच्या उंचीच्या दोन काठ्या दक्षिण व उत्तर बाजूला 45 सेंमी अंतरावर पुराव्यात आणि तिसरी काठी रोपाच्या पूर्वेला दोन्ही काठ्यांवर आडवी बांधावी. 
 
3) उघडीप मिळेल त्या वेळी 1 टक्का बोर्डोमिश्रणाची सर्व रोपांवर फवारणी करावी. फवारणी करताना हे बुरशीनाशक सुईच्या खालच्या भागापर्यंत पोेचेल असे फवारावे. दुसरी फवारणी 12 ते 15 दिवसांच्या अंतराने करावी.
 
ब) मोठ्या माडावरील उपाययोजना :
 
या रोगाची लक्षणे आढळल्यास सुईचा भाग कुजलेल्या देठाजवळ कापावा. कुजलेला संपूर्ण भाग काढून झाल्यावर त्यावर बोर्डोपेस्ट लावावी व ते पावसाने निघून जाणार नाही म्हणून प्लॅस्टिक कापडाने हा भाग गुंडाळून बांधून ठेवावा. ज्या बागेमध्ये कोंब कुजणे रोग नेहमीच आढळून येतो अशा बागांमध्ये रोग होऊ नये म्हणून पावसाऴ्याच्या सुरवातीसच उपाययोजना करावी. त्यासाठी 1 टक्का बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी. ठेंगू जातीसाठी पावसाच्या सुरवातीस मॅन्कोझेब हे बुरशीनाशक 5 ग्राम प्लॅस्टिक पिशवीत घेऊन त्याला टाचणीच्या साह्याने छिद्रे पाडावीत व अशा दोन पिशव्या नारळाच्या सर्‍याजवळ झावळीला बांधाव्यात.
 
2) डिंक्या रोग

Dinkya Rog_1  H
 
दक्षिण भारतामध्ये हा रोग विशेषकरून आढळतो. कोकणामध्ये काही बागांमध्ये विशेषत: दुर्लक्षित बागांमध्ये हा रोग आढळून येतो. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने किटकांद्वारे व पावसाच्या पाण्याद्वारे होतो.
 
नुकसान 
 
ही बुरशी माडाच्या बुंध्याजवळील जखमा किंवा खोडावरील भेगांमधून आत प्रवेश करते. खोडामध्ये पोकळ्या निर्माण होतात. प्रादुर्भावित झाड निस्तेज पडून उत्पन्नात लक्षणीय घट होते व दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत माड मरतो. कोवळ्या माडास लागण झाल्यास वर्षभरात माड मरतो. 
 
लक्षणे
 
रोगग्रस्त माडांच्या खोडावरील भेगांवाटे काळसर तपकिरी रंगाचा चिकट स्त्राव ओघळतो. हा द्रव तेथेच वाळून डिंकासारखा काळा पडतो. खोडाच्या रोगग्रस्त भागावरील साल काढून पाहिली असता भाग तपकिरी रंगाचा होऊन कुजतो. अशा रोगग्रस्त माडाच्या झावळा पिवळसर पडून वाळतात, तसेच वेळेआधी गळतात. रोगाचा वेळीच बंदोबस्त न केल्यास माड दगावण्याचा संभव असतो.
 
व्यवस्थापन :
 
माडावर इजा करू नयेत. या रोगाच्या नियंत्रणासाठी धारदार चाकूने रोगग्रस्त भाग खरबडून साफ करावा. या जखमेवर बोर्डोपेस्ट लावून त्यावर डांबराचा लेप द्यावा किंवा ट्रायकोडर्मा 50 ग्रॅम अधिक 5 किलो निंबोळी पेंड मलम करून लावावे. झाडाला सशक्त आणि निरोगी ठेवण्यासाठी शिफारस केल्याप्रमाणे खते व पाणी द्यावे, जेणेकरून खोडाला भेगा पडणार नाहीत. बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. पानावरील ठिपके किंवा करपा हा रोग उत्पन्नाच्या द़ृष्टीने विशेष नुकसानकारक नाही.
 
Merge Images_1  
 
रोगाची तीव्रता ही दुर्लक्षित बागांमध्ये, योग्य प्रमाणात खते न दिल्यास जास्त प्रमाणात आढळतो.
 
लक्षणे
 
रोगग्रस्त पानांवर कळपात पिंगट मध्यबिंदू असलेले पिवळसर तपकिरी रंगाचे असंख्य ठिपके पडून पाने पिवळसर दिसतात. ठिपक्यांचा मध्यभाग कालांतराने करड्या रंगाचा होतो. अशाप्रकारचे ठिपके खालच्या जून पानांवर आढळतात. असे असंख्य ठिपके एकत्र मिसळून त्यांचे रूपांतर मोठ्या चट्ट्यांमध्ये होते. रोगग्रस्त पाने संपूर्णत: करपतात, वाळतात, सुकतात व गळून पडतात. यामुळे माडाच्या वाढीवर परिणाम होतो. तसेच उत्पन्नात घट येऊ शकते.
 
व्यवस्थापन :
 
बागेतील पालापाचोळा, पिकाचे रोगट अवशेष जाळून नष्ट करून बागेची स्वच्छता राखावी. तसेच बागेस शेणखत, रासायनिक खते व पाणी यांच्या योग्य मात्रा द्याव्यात. बागेतील अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करावा. निरोगी माडांवर पावसाळ्यापूर्वी 1 टक्का तीव्रतेचे बोर्डोमिश्रण किंवा 0.25 टक्के मॅन्काझेब किंवा कॉपर ऑक्सोक्लोराइड या बुरशीनाशकाची फवारणी करावी. रोगाच्या तीव्रतेप्रमाणे परत फवारणी करावी.
 
डॉ. संतोष वानखेडे, डॉ. प्रकाश सानप, डॉ. सुनील घवाळे
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी