टेबल ग्रेप्स : पाणी व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    15-Jan-2020
Table Grapes_1  
 
टेबल ग्रेप्स उत्पादनांमध्ये पाण्याचे नियोजन महत्वाचे असून कौशल्यपूर्वक करावे लागते, नाहीतर टेबल ग्रेप्स उत्पादनावर त्याचा खूप विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. अर्थात सर्वप्रकारच्या द्राक्ष उत्पादनामध्ये पाणी नियोजन, द्राक्ष उत्पादनाचे उद्दिष्ट ध्यानात घेऊन त्यानुसार अचूक असणे गरजेचे आहे.
 
पाणी व्यवस्थापनाचा विचार केल्यास लागवडीखालील पिकाशिवाय जमीन, त्या परिसरातली वातावरणीय परिस्थिती उदाहरणार्थ तापमान, वारा वाहण्याचा वेग, आर्दता, प्रकाश कालावधी इत्यादी पिकांचे अंतिम उत्पन्नाचे उद्दिष्ट या सर्वांची माहिती असणे आवश्यक आहे. द्राक्षाचा विचार केल्यास द्राक्षाचे उत्पादन वाइनसाठी आहे, बेदाण्यासाठी आहे की ज्यूससाठी आहे किंवा खाण्यासाठीची द्राक्ष यासाठी आहे, ही माहिती पाण्याचे नियोजन ठरवताना आवश्यक आहे. हे माहीत असेल तरच पाण्याचे अचूक व्यवस्थापन करता येते. कारण वाइनची गुणवत्ता, बेदाण्याची उत्पादकता व गुणवत्ता तसेच खाण्याच्या द्राक्षाची उत्पादकता व गुणवत्ता मुख्यतः पाणी व्यवस्थापनाशी निगडित असते. त्यामुळे द्राक्षबागेत पाण्याचे व्यवस्थापन करताना स्वतःचे वातावरणीय घटकाची माहिती, द्राक्षाचे अंतिम उद्दिष्ट, द्राक्षबागेची वाढीची अवस्था, द्राक्षवेलीची शाखीय वाढ, फळांची वाढ यांची अचूक माहिती मिळणे आवश्यक असते.
 
बेदाण्याच्या द्राक्ष उत्पादनापेक्षा टेबल ग्रेप्स उत्पादनांमध्ये पाण्याच्या नियोजनामध्ये खूप फरक असून टेबल ग्रेप्स उत्पादनामध्ये पाण्याचे नियोजन खूप कौशल्यपूर्वक करावे लागते, नाहीतर टेबल ग्रेप्स उत्पादनावर त्याचा खूप विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. अर्थात सर्वप्रकारच्या द्राक्ष उत्पादनामध्ये पाणी नियोजन, द्राक्ष उत्पादनाचे उद्दिष्ट ध्यानात घेऊन त्यानुसार अचूक असणे गरजेचे आहे. आपण द्राक्ष उत्पादनामध्ये याचा फारसा विचार न करता अंदाजाने पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करतो. त्याचा परिणाम म्हणून द्राक्षाचे उत्पादन आणि त्याची गुणवत्ता यामध्ये आपले सातत्य दिसून येत नाही. उदाहरण म्हणून द्राक्षातील एका अवस्थेचा विचार करू. ऑक्टोबर कटिंगनंतर डोळे एकसमान फुटण्यासाठी स्पेस लावल्यानंतर पाणी देण्यात आपण सावधानता बाळगत नाही. एकतर खूप कमी पाणी किंवा मध्यम पाणी किंवा अपवादात्मक वेळी खूपच जास्त पाणी देतो. खूप कमी किंवा मध्यम मात्रेमध्ये पाणी दिल्यास डोळे एकसमान फुटत नाहीत किंवा बर्याचवेळा वांझ डोळे तेवढे फुटतात. फळधारक डोळे फुटतच नाही. कारण फळधारक डोळे फुटण्यास जास्त पाण्याची व विजेची गरज असते. परिणामतः फलदायक डोळे न फुटल्याने आपले खूप मोठे नुकसान होते. याशिवाय कटिंग सप्टेंबर मध्यानंतर किंवा ऑक्टोबर याकाळात तापमान जास्त असल्याने पाण्याची गरज जास्त असते. याचा विचार करून द्राक्षाच्या वाढीच्या अवस्थांमध्ये सर्व घटकांचा विचार करून पाण्याचे नियोजन करावे.
 
आपण वर विचारात घेतल्याप्रमाणे द्राक्षाच्या उत्पादनाचे उद्दिष्ट ध्यानात घेऊन पाण्याचे नियोजन करावे, म्हणजे बेेदाण्याची द्राक्ष किंवा टेबल ग्रेप्स याचे आपले उद्दिष्ट चांगले साध्य होईल. बेदाण्याच्या द्राक्षाचा विचार केल्यास खूप जास्त साखर व कमी आम्लता असणे गरजेचे असते. द्राक्षमण्यांचा आकार लहान असावा लागतो. याउलट टेबल ग्रेप्सच्या द्राक्षाचा विचार केल्यास कमी साखर म्हणजे 170 ते 200 अंश ब्रिक्स मध्यम ते कमी आणि द्राक्ष मण्यांचा आकार खूप मोठा असण्याची गरज असते. द्राक्ष मण्यांचा मोठा आकार साध्य करण्यासाठी जीए, सीपीयू यांसारख्या संजीवकांचा वापर करावा लागत असल्याने या संजीवकांचा अपेक्षित आणि चांगला परिणाम साध्य करायचा असेल तर मणीवाढीच्या पहिल्या अवस्थेमध्ये पाणी कमी देऊन चालणार नाही. पाण्याचा वापर अचूक होणे आवश्यक असते, म्हणजे शाखीय वाढ, उत्पादक वाढ, मण्यांचा आकार यामध्ये समन्वय दिसून येईल. त्यामुळे मणी वाढीच्या पहिल्या अवस्थेत अपेक्षित असा मण्यांचा आकार आपल्याला मिळेल.
 
द्राक्षवाढीच्या अवस्थांची आपल्याला पूर्ण माहिती असेल, तर आपण पाण्याचे योग्य नियोजन करू शकतो. आता यामध्ये वेगवेगळ्या द्राक्ष जातींमध्ये द्राक्षवाढीच्या अवस्थांचा कालावधी भिन्न असतो. म्हणजेच ‘फ्लेम सीडलेस’ आणि ‘थॉमसन सीडलेस’ या द्राक्ष जातींचा विचार केल्यास ‘प्लेम सीडलेस’ लवकर पक्व होणारी द्राक्षाची जात आहे. त्यामुळे या जातीत द्राक्षवाढीच्या अवस्थांचा काळ थॉमसन सिडलेस या उशिरा पक्वता येणार्या द्राक्ष जातीपेक्षा कमी असल्याने दोन्ही द्राक्ष जातीसाठी समान पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करून चालणार नाही. जरी दोन्ही द्राक्ष जातीत द्राक्षवाढीच्या अवस्था (डोळे कापसणे, डोळा फुटणे, तीन पान अवस्था, पाच पान अवस्था इ.) त्याच असल्या तरी त्यांना लागणारा कालावधी भिन्न असल्याने एक समान पाणी व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे योग्य असणार नाही. कारण दोन्ही द्राक्ष जातींच्या वाढीच्या अवस्थांचा कालावधी भिन्न असतो. म्हणून शाखीय वाढ त्याच द्राक्ष मण्यांची वाढ हे पाणी व्यवस्थापनाच्या माध्यमातून साध्य करावयाचे असेल, तर प्रत्यक्ष जातीतील द्राक्षवाढीच्या अवस्थांची पूर्ण माहिती आपणास असणे आवश्यक आहे. त्याशिवाय शाखीय वाढ व फळांची वाढ नियंत्रित राखायची असेल तर द्राक्ष जातीच्या गुणधर्मानुसार पाण्याचा वापर आवश्यक ठरतो.
 
टेबल ग्रेप्स उत्पादनाचे आपले उद्दिष्ट हे आहे की मण्यांचा आकार किंवा मण्यांची लांबी आवश्यक तेवढी असावी. मण्यात साखर व आम्लता अचूक असावी. या गोष्टी साध्य करण्यासाठी पाणी नियोजन कसे असावे, याची द्राक्ष जातीनुसार अचूक माहिती आपल्या जवळ असावी. म्हणजे टेबल ग्रेप्स उत्पादनाचे आपले उद्दिष्ट आपल्याला साध्य करता येईल. हे सगळं साध्य करण्यासाठी व आपली द्राक्ष चांगली पिकण्यासाठी आवश्यक तेवढे पूर्ण क्षेत्र असावे लागते. कारण पाणी प्रकाशसंश्लेषणाच्या माध्यमातून साखर तयार करतात. ही साखर द्राक्षमण्यांत भरते. तसेच या साखरेच्या संश्लेषणातून पेशीचे घटक, पेशी ती अत्तंसत्वाचा, अमिनो अॅसिडस, प्रथिने, सेंद्रिय आम्ले वेगवेगळ्या शर्करा मिळतील. प्रत्येक द्राक्ष जातीतील पक्वता येणे, योग्य साखर व आम्लता येणे यासाठी सर्वांची पूर्तता करणारे पूर्ण क्षेत्र तयार करून घेण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यास पाणी व्यवस्थापनाच्या अचूकते लक्ष देणे आवश्यक असते. यासाठी अचूक असे शाखीय व्यवस्थापन करावे लागते. गरजेपेक्षा जास्त शाखीय वाढ झाल्यास घडकूज, घडगळ, मणीगळ वाढते. विस्तारातील सूक्ष्म वातावरणीय घटक आवश्यक तसे राहात नाहीत. रोग, किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता राहते. द्राक्षाला आवश्यक ती चव, गंध, रंग, साखर येत नाहीत, म्हणजेच द्राक्षाच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होतो.
 
टेबल ग्रेप्सचे उत्पादन व गुणवत्ता ही पाणी व्यवस्थापन व नंतर पोषण व्यवस्थापनाशी निगडित असते. फळधारणाअगोदरची शाखीय वाढ ही समस्या निर्माण करणारे ठरते. याचा अर्थ असा आहे की घडाच्या काडीचा 15 पानांवर शेंडा मारल्यानंतर पुन्हा होणारी वाढ आपल्या काही विभागांमध्ये ऑगस्ट महिन्याचा शेवट ते ऑक्टोबर सुरुवात अशावेळी कटिंग असेल, जमीन खोलवर काळी किंवा सुपीक असेल, तसेच नत्राच्या जादा मात्रेचा उपयोग केला असेल आणि अशा परिस्थितीत पाऊस पडला तर होणारी वाढ खूप असते. ती नियंत्रित करणे अवघड बनते. अशा परिस्थितीत वनस्पतीतील वहनशील पोषणद्रव्य (घ,ास) खुडावाडीकडे जातात. साखर खुडा वाढीकडे जाते. तसेच वेलीत वहनशील नसणार्या पोषण द्रव्यांची कमतरता खुड्यावर जाणवते. या समस्येची भरपाई करणे आपल्याकडे अवघड बनते. बहुतांशवेळी द्राक्षबागायतदार याची फारशी काळजी न करता ती समस्या तशीच सोडून देतात.
 
अचूक पाणी व्यवस्थापनाचा अवलंब करण्यास जमीन-द्राक्षवेली-वातावरणीय घटक यांचा बारकाईने अभ्यास करून पाण्याची अजूक मात्रा निश्चित करावी लागते. त्यासाठी इतर काही घटक जसे जमिनीतील ओलावा, द्राक्षवेलींना उपलब्ध होणारे पाणी, जमिनीचा प्रकार, जमिनीची खोली, द्राक्षवेलीच्या मुळाचा विस्तार, मुळाची खोली या सर्वांचा अभ्यास करून द्राक्षवेलींना उपलब्ध पाणी, मातीच्या कणाभोवती किमान जलधारणक्षमता निश्चित करून पाणी नियोजन करणे गरजेचे असते. ही सगळी माहिती संकलित करण्यासाठी, न्यूट्रॉन प्रोब, टेंशिओमीटर, कॅप सिटन्स प्रोब इ.च्या मदतीने जमिनीतील ओलावा मोजता येतो आणि मग पाणी कधी, किती द्यावयाचे हे निश्चित करता येते. हे सर्व असले तरी एक एकर द्राक्षबागेचा विचार केल्यास बागेची जमीन सर्वत्र सारखी असत नाही. जमिनीची खोली भिन्न असते. काही काही ठिकाणी जमिनीचा वरचा स्तर घट्ट (कठीण) असतो. या सगळ्या घटकांचा विचार करून उपलब्ध ओलावा निश्चित करावा लागतो. मगच कधी, किती दिवसांनी, पाणी द्यायचे हे निश्चित करता येते. यासाठी दररोजची द्राक्षवेलींची पाण्याची गरज निश्चित करावी लागते. ही गरज निश्चित करण्यासाठी पुढील काही घटकांचा अभ्यास करावा लागतो. त्यावरून गणना करून पाण्याची गरज काढावी लागते. त्यामध्ये प्रामुख्याने पानांतून होणारे बाष्पोत्सर्जन हे काढण्यासाठी वर्ग-ए-पॅन इव्हापोरेशनचा उपयोग करतात. याशिवाय पीक गुणांक विस्तारातील पर्णक्षेत्र संपूर्ण पर्णक्षेत्राचा आवाका हे द्राक्षवेलीची घटक समजावून घेऊन दर दिवसाची द्राक्षवेलीची पाण्याची गरज काढतात. त्यावरूनच सर्वसाधारण अशी आठवड्याची पाण्याची द्राक्षाची गरज निश्चित करतात. ही गरज आपल्याकडे बदलती राहते. कारण आपल्याकडे वातावरणीय घटकात सतत बदल होत राहतो. आपल्या परिस्थितीत प्रतिदिनी द्राक्षबागेला 2.0 मि.मी. ते 7.6 मि.मी. इतके पाणी देणे आवश्यक असते. द्राक्षबागेचा पीक गुणांक काढताना द्राक्षवेलीच्या सावलीने जमिनीचा किती टक्के भाग व्यापला आहे. (भर दुपारच्या वेळी सर्वसाधारणपणे बारा वाजता) यावरून (टक्के सावली ×0.17+0.002) याचा उपयोग करून पीक गुणांक काढता येतो आणि हा जास्त विश्वसनीय असतो. हे प्रयोगाने सिद्ध झालेले आहे. प्रत्येक मांडव पद्धतीत पीक गुणांक वेगळा येतो. यामुळे मांडवपद्धतीनुसार पीक गुणांक काढावा. एकसमान पर्णक्षेत्र असून वळण पद्धती (मांडवपद्धती) भिन्न असताना पीक गुणांक भिन्न असतो. कारण प्रत्येक वळण परस्पर सावलीच्या भागाचा बाष्पोत्सर्जनावर परिणाम होताना दिसून येतो. म्हणून द्राक्षाची एकूण पाण्याची गरज काढताना एकूण पाण्याची गरज = बाष्पोत्सर्जन × पीक गुणांक यांचा उपयोग केल्यास द्राक्षबागेची पाण्याची गरज निघते. या माहितीचा उपयोग करून द्राक्षबागेला द्यावयाचे पाणी आणि दोन पाण्यांमधील कालावधी ठरवता येतो. द्राक्षाची शाखीय वाढ आणि फळवाढ यामध्ये समन्वय (समतोल) राखून पाणी व्यवस्थापन असावे. द्राक्ष जात आणि त्या द्राक्ष जातीनुसार द्राक्षवाढीच्या विविध अवस्था यांमध्ये कधी थोडासा पाण्याचा ताण देता येईल. द्राक्षवेलीच्या त्या वेळेतील प्रतिसादाचा आपण जरूर विचार करून पाण्याचा ताण कधी देता येईल हे निश्चित करावे, पाणी व्यवस्थापनात अचूकता येईल. द्राक्षवेलीच्या विद्यमान स्थितीचा अंदाज घेऊन द्राक्षवेलीच्या पाण्याच्या ताणाचा विचार करावा. द्राक्षवेलीच्या विद्यमान पाण्याच्या स्थितीचा अंदाज यावा म्हणून वातावरणाच्या तापमानाच्या तुलनेनेे द्राक्षवेलीच्या पाण्याचे तापमान इन्फ्रारेड सेन्सरच्या मदतीने मोजून विद्यमान स्थितीचा अंदाज घेता येतो. द्राक्षवेलीच्या सध्याच्या संभवनीयता पाण्याच्या स्थितीचा अंदाज येण्यास आधुनिक हातातून सहज नेता येणार्या नियर इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटरचा वापरसुद्धा शक्य आहे.
 
द्राक्षवेलीच्या वाढीच्या अवस्थांमधील निर्णायक अशी संभवनीय पातळी निश्चित करण्यास अजूनही यामध्ये प्रगतीचा टप्पा गाठणे आवश्यक आहे. सध्याच्या अवस्थेत आपणास हा प्रगतीचा टप्पा गाठण्यास खूप काम करावे लागणार आहे. पाणी देण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याकडे कुठेच वैज्ञानिक पद्धतीचा आधार घेतला जात नाही. प्रत्येकाची वेगळी अशी स्वतःची पाणी देण्याची पद्धत आहे. त्यामुळे टेबल ग्रेप्सचे उत्पादन व त्याची गुणवत्ता यामध्ये सातत्य नाही हे आपले वास्तव चित्र आहे.
 
द्राक्षकाडीने डोळे फुटण्यापासून फुलोरा अवस्थेपर्यंत अथक परिश्रमातून जमिनीतील ओलाव्याची पातळी योग्य राखून शाखीय वाढ विस्तारातील 60 टक्के आकाशव्यापी असे पाणी व्यवस्थापन राखणे. जमिनीची पाणीधारण क्षमता, द्राक्षवेलीच्या मुळांची खोली यांचा विचार करून द्राक्ष जमिनीच्या क्षमतेच्या 75 ते 95 टक्के ओलावा टिकावा असे नियोजन ठेवावे. वापरलेला रुटस्टॉक आणि त्यावरील द्राक्ष यांचा समन्वय आणि द्राक्षवेलीची प्रवृत्ती जास्त शाखे वाढीकडे असेल, तर जमिनीत ओलावा कमी राखावा ज्यायोगे काडी वाढ मर्यादित होऊन घडाची वाढ व विकास चांगला होण्यास मदत होईल. याउलट वापरलेला रुटस्टॉक व त्यावरील वापरलेली द्राक्ष जात यांचा शाखीय वाढीकडे कमी कल असेल तर जमिनीतील ओलाव्याची पातळी वाढवावी. डोळे फुटण्यापासून फुलोरावस्थेपर्यंतचा विचार केल्यास सुरुवातीला 10 दिवस पर्ण क्षेत्र खूप कमी असते. हळूहळू फुलं अवस्थेपर्यंत क्षेत्र वाढत जाते. या अवस्थेत पीक गुणांक आणि एकूण बाष्पोत्सर्जन कमी असल्याने पाण्याची गरज कमी असते. याचा अर्थ प्रीब्लूम अवस्थेपर्यंत पाण्याची गरज थोडी कमी असते. तिथून पुढे फुलोरा अवस्थेपर्यंत पाण्याची गरज वाढत जाते. इथे पीक गुणांक जलद बदलत राहतो. तसेच एकूण बाष्पोत्सर्जनसुद्धा जलद बदलत राहते. याची नोंद घेऊन पेशीविभाजनावर तसेच घडाची वाढ व विकास यावर पाण्याचा ताण बसून विपरित परिणाम होणार नाही याकडे लक्ष द्यावे. दुपारी पाण्याची संभवनीय पातळी 1.0चरि किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर पाण्याचा थोडा ताण बसण्याची शक्यता वाटते, परंतु संभवनीय पाणी 1.0चरि आणि 1.2 चरि असेल. द्राक्षवेलीच्या वाढीवर त्याचा परिणाम होताना दिसून येईल. संभवनीय पाणी 1.2 चरिच्या खाली असेल द्राक्षवेलीवर खूप ताण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे या अवस्थेत एवढे कमी पाणी धोकादायक ठरू शकते, त्यामुळे एवढे पाणी कमी येईल हे टाळावे, कारण भारी जमिनीत ऑक्सिजन राहणार नाही. त्याचा परिणाम मुळांची वाढ विकास यावर होतो. परिणामत: केश मूळ किंवा पांढरी मुळी मरण्याची भीती असते. परिणामत अन्नद्रव्य शोषण गोत्यात येते. मुख्यतः सूक्ष्म अन्नद्रव्ये जसे की जस्त, बोरॉन मुळांचा जाळीदार विकास संकटात आल्याने पाणीशोषण सुद्धा अडचणीत येते.
 
फुलोरा अवस्थेत पाण्याचा ताण 1.2 चरि किंवा त्यापेक्षा कमी; द्राक्षाच्या दृष्टीने हानिकारक असून त्याचा परिणाम फलधारणा कमी होण्याची शक्यता असते. म्हणून या काळातील पाणी नियोजन अत्यंत अचूक असावे. या काळातील द्राक्षाची पाण्याची गरज गुणांकन बाष्पोत्सर्जन आणि जमिनीतील ओलावा हे समजून घेऊन ठरवावे. त्या पद्धतीने पाणी नियोजन असावे. म्हणजे शाखीय वाढ उत्पादक वाढ यामध्ये समन्वय राहून चांगले उत्पादन मिळेल. बरेचसे लोक या काळात भीतीपोटी खूप पाणी देतात त्याचा परिणाम शाखीय वाढ खूप होण्यावर होतो. परिणामत: आकारमान व पोषण द्रव्ये यांच्याबाबतीत शाखीय वाढ उत्पादक वाढ यामध्ये स्पर्धा निर्माण होऊन फलधारणा आणि फळांचा विकास यावर त्याचा विपरित परिणाम होताना दिसून येतो. सर्वसाधारण निरीक्षण आहे की फलधारणेनंतर पहिले दहा ते बारा दिवस पेशीविभाजन जलद गतीने होते. ही क्रिया 30 दिवसांपर्यंत पुढे पुढे हळूहळू सुरू राहते. द्राक्षमण्यांच्या आकारमान वाढीच्या दृष्टीने पेशीविभाजन हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. द्राक्षवेलीच्या शरीरशास्त्रीय दृष्टीने द्राक्षमणी वाढीच्या दृष्टीने शेवटचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ज्याचा पाणी ताणाशी खूप मोठा संबंध आहे. म्हणून या वेळच्या 7 ते 10 किंचितसा पाण्याचा ताण देऊन, शाखीय वाढ कमी करून द्राक्षघड वाढीकडे कल राहील हे पाहावे. या थोड्याशा काळात जमिनीतील ओलावा योग्य राखून संभवनीय पाणी 1.0चरि आणि 1.2चरि एवढे राखण्याचा प्रयत्न करावा. आता जेथे जमिनीची खोलवर अशा ठिकाणी जमिनीची खोली कमी आहे (उथळ जमीन) आहे अशा ठिकाणी अचूक ओलावा राखणे ही तारेवरची कसरत असते. या काळात पेशीविभाजनाने पेशींची संख्या वाढल्याने मण्यांचा आकार व मणी यांची लांबी वाढते. म्हणून टेबल ग्रेप्स उत्पादनाच्या ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यादृष्टीने या काळातील पाण्याच्या नियोजनाकडे पाहावे.
द्राक्षाच्या वाढीच्या अवस्थेत शरीरशास्त्रीय दृष्टीने या पुढच्या अवस्थेला मणीवाढीच्या विचारातून लॅग फेज म्हणतात. सीडलेस द्राक्षाच्या दृष्टीने ही फार प्रभावी नसते. बियांच्या द्राक्षाच्या दृष्टीने ही महत्त्वाची अशी विशिष्ट अवस्था आहे. याकाळात मण्यांची वाढ मंदावते किंवा कमी राहते. मण्यांची वाढ आणि विकास कमी लागण्याची ही अवस्था माल मऊ पडण्याच्या अगोदरपर्यंत टिकते. काळ्या व तांबड्या द्राक्षाच्या दृष्टीने या कालावधीत थोडासा पाण्याचा ताण दिला की, अबसेसीक असिडची निर्मिती द्राक्षवेलीत होते. ते रंगनिर्मिती उत्तेजक तसेच रंगनिर्मितीच्या क्रियेला चालना देण्याचे काम करते. त्यामुळे रंगीत द्राक्ष जातीत एकसमान रंग येण्यास मदत होते.
 
Table Grapes I_1 &nb
 
परंतु त्या दैवयोगाने बर्याचवेळा बदलत्या वातावरणीय घटक समजून घेऊन पाण्याचा ताण देणे शक्य होईल. तसेच घडाजवळची थोडी पाने कमी करून विस्तारातील घनता कमी झाल्याने थोडा सूर्यप्रकाश विस्तारात शिरल्याने द्राक्षघडाला एकसमान रंग येणे शक्य होईल. विस्तारातील गर्दी कमी झाल्याने रोगकिडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी राहते. हा बदल अचूक पद्धतीने व्हावयाचा असेल तर अचूक अशा ओलाव्याच्या अंदाजाची पातळी द्राक्षवेलीकडून होणारे पाण्याचे उपयोजन आणि पाण्याचा अचूक ताण दिला असता रंगनिर्मिती साध्य होईल याचा अंदाज घेणे आवश्यक ठरते. द्राक्ष जातीचे व्यवस्थापन अचूक करता येते त्यांनी हे काम करावे नाहीतर नुकसान होण्याची शक्यता असते.
 
माल मऊ पडण्याच्या सुरवातीच्या अवस्थेत असून पाण्याचा कमीत कमी ताण बसेल शाखीय वाढ म्हणजेच खुडा वाढणार नाही, अशा पद्धतीचे पाणी व्यवस्थापन असावे. कारण या अवस्थेत विस्तार जास्त असतो पण क्षेत्र जास्त असते. हवा कोरडी, तापमान वाढत जात असते. त्याचा परिणाम म्हणून एकूण बाष्पोत्सर्जन खूपच जास्त असते. त्यामुळे द्राक्षवेलीच्या पाण्याच्या गरजेचा अचूक अंदाज घेऊन पाणी व्यवस्थापन करावे. ज्या ठिकाणी दररोज पाणी देणे शक्य नसते. त्या ठिकाणी पाण्याचा ताण दुसर्यावेळी पाण्याची पाण्याची पाळी येईल तोपर्यंत बसणार नाही याची काळजी घ्यावी. कारण या काळात खूप जलद गतीने पेशींची लांबी व आकार वाढत असतो. याशिवाय द्राक्षमण्यांच्या साखरेत सातत्याने वाढ होत असते. तसेच यावेळी द्राक्षवेलीच्या शरीरशास्त्रीय क्रियांचा वेग जास्त असतो तसेच प्रकाशसंश्लेषण कार्बन वाहतूक साखर व द्राक्षकाढणीपर्यंत सुरू असतात. त्यांची ही अवस्था अत्यंत गुंतागुंतीची अवस्था असल्याने या काळातील पाण्याचे नियोजन करताना खूप काळजीपूर्वक करावे लागते.
 
द्राक्षकाढणीनंतर आपण द्राक्षवेलीची कोणतीच व्यवस्थापनीय काळजी घेत नाही. साध्या पाणी व्यवस्थापनाचा विचारसुद्धा आपण करत नाही. द्राक्षकाढणीनंतर जर आपण पाणी दिले नाही तर अनेक परिणाम द्राक्षवेलींवर होताना दिसून येतात, त्यामध्ये प्रामुख्याने द्राक्षवेलीची पाने पिवळी पडून गळून पडतात. पाणी न दिल्याने पानांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया थांबते. त्याचा परिणाम म्हणून कार्बोहायड्रेटच्या रूपातील मुळातील व खोडांतील राखीव अन्नसाठा कमी होतो. विश्रांती काळात मुळांची वाढ व विकास होत असतो. परंतु द्राक्षवेलींना जर आपण पाणी दिले नाही तर मुळांची वाढ व विकास होत नाही. पोषणद्रव्यांचे शोषण पाहिजे तसे होत नाही. परिणाम म्हणून एप्रिल कटिंगनंतर फुटींना निरोगी वाढीसाठी राखीव अन्नसाठा उपलब्ध न झाल्याने त्यांच्या वाढीवर परिणाम होऊन काडीच्या डोळ्यात तयार होणार्या घडाच्या आकारावर विपरित परिणाम होतो. एप्रिल काडी निरोगी, सशक्त, योग्य जाडीची नसेल, ऑक्टोबर कटिंगनंतरचे घड लहान राहतात. घडकूज किंवा घडगळीचे प्रमाण वाढते. टेबल ग्रेप्स मणीवाढीवर याचा परिणाम होतो. विस्तार व्यवस्थापन चांगले राहत नाही, त्यामुळे एकूण उत्पादन व उत्पादनाची गुणवत्ता या दोन्हींवर याचा प्रतिकूल परिणाम होतो. म्हणून उत्पादनामध्ये पाणी व्यवस्थापनाकडे खूप काळजीपूर्वक पाहणे गरजेचे आहे.
 
श्री. एन. बी. म्हेत्रे
तासगाव, 93706142