किफायतशीर द्राक्षशेती

डिजिटल बळीराजा-2    10-Jan-2020
Draksha_1  H x
 
द्राक्ष उत्पादन खर्च कमी करण्यासाठी अंतर मशागत , रासायनिक खते, पीक संरक्षण औषधे, सेंद्रिय खत व्यवस्थापन, संजीवकांचा वापर, मजूर खर्च अशा सर्व खर्चात बचत होणे कसे आवश्यक आहे याचा उहापोह या लेखात केला आहे.
 
मी ऊस, भात, कडधान्यवाला शेतकरी, माझ्याकडे द्राक्षे नाहीत, परंतु माझा अभ्यासाचा विषय जमिनीची सुपीकता असल्याने हा विषय जागतिक कोणत्याही भौगोलिक परिस्थितीतील सर्वच पिकांसाठी गरजेचा आहे. जमीन सुपीक झाल्याशिवाय कोणत्याही पिकाची किफायतशीर शेती करणे अवघड आहे. सुपीकतेचा प्रामुख्याने संबंध हा जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या टक्केवारीशी आहे. सुपीकतेसंबंधित इतर सर्व गुणधर्म या सेंद्रिय कर्बाभोवतीच फिरत असतात. आपण जे परंपरागत शेणखत कंपोस्टचा वापर करतो, तो सेंद्रिय कर्बाची टक्केवारी योग्य पातळीवर राखण्यासाठीच असतो. आता शेणखत कंपोस्ट मिळविणे व वापरणे ही गोष्ट खूप अवघड होत चालली आहे. सर्वसामान्य धान्ये, कडधान्ये पिकांसाठी अपवादात्मकच सेंद्रिय खत वापरले जाते. उसासाठीचा वापरही कमी कमी होत आहे. भाजीपाला व फळबाग तथा काचग्रहातील शेती ही मोठ्या प्रमाणावर पैसा देणारी व उत्पादन दर्जावर विकली जाणारी असल्याने अशा शेतीतच उपलब्ध खताचा प्रामुख्याने वापर केला जातो. द्राक्ष पीक याला अपवाद नाही.
 
द्राक्षवाले शेतकरी मिळेल तितके व लागेल तितका पैसा खर्च करून जास्तीत जास्त सेंद्रिय खतवापराचा प्रयत्न करतात. प्रति 40 आरसाठी 30-3500 रुपये शेणखतावर खर्च करणारे अनेक शेतकरी आहेत. मी या बाबीवर अभ्यास करीत असता असे लक्षात आले, की या मार्गाने जाऊन जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे अगर वाढविणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. याला काही पर्यायी मार्ग शोधणे गरजेचे आहे. पर्यायी मार्ग शोधत असता ते खर्चिक नसले पाहिजेत. सहज उपलब्धता व सुलभता असली पाहिजे.
 
अशा मार्गाच्या शोध यात्रेत मला भू-सूक्ष्मजीवशास्त्र (सॉइल मायक्रोबायोलॉजी) या विज्ञान शाखेने मदत केली. या शास्त्राने अनेक नवीन गोष्टी सेंद्रिय खत व्यवस्थापनाबाबत सुचविल्या त्या अशा :
 
1) सेंद्रिय खत जमिनीबाहेर कुजविणे चुकीचे ते पीक वाढत असता जमिनीतच कुजले पाहिजे. 
 
2) सेंद्रिय पदार्थ कुजण्याचे काम सतत चालू राहणे सुपीकतेच्या दृष्टीने जास्त चांगले. कुजणे म्हणजे जमीन सुपीक करणे. कुजण्याची क्रिया थांबणे म्हणजे सुपीकता वाढण्याचे काम थांबणे. याचा अर्थ पिकाची वाढ थांबणे असा नाही. 
 
3) कुजण्यास जड पदार्थ (काष्ठमय पदार्थ) कुजविणे गरजेचे. 
 
4) कोणत्याही वनस्पतीच्या जमिनीखालील भागाचे खत सर्वांत उत्तम दर्जाचे असते. जमिनीपासून जो वर जाते तो खत हलक्या दर्जाचे होत जाते. सर्वांत हलके खत पानांचे. 
 
5) जमिनीमध्ये जिवाणूंचे दोन गट काम करीत असतात. 
 
अ) सेंद्रिय पदार्थ कुजविणारा गट. 
 
ब) वनस्पतींना गरजेप्रमाणे अन्नपुरवठा करणारा गट पहिला गट. जमिनीला सुपीकता देतो, तर दुसरा पिकाला पोषण.
 
पिकाला पोषण देणार्‍या गटाचा सुपीकतेशी संबंध नसतो. सुपीकता वाढण्यासाठी पहिल्या गटातील जिवाणू वाढविणे गरजेचे असते. पहिल्या गटाने तयार केलेले सेंदिय खत हेच दुसर्‍या गटाचे खाद्य असते. पहिला गट वाढला की दुसरा आपोआप वाढतो. चांगले कुजलेले खत टाकण्याच्या प्रचलित पद्धतीत कुजविणारा गट जमिनीबाहेर वर फक्त दुसरा गट जमिनीत वाढतो. 
 
6) लवकर मध्यम व दीर्घ मुदतीने कुजणारे पदार्थ कुजविणारे जिवाणू वेगवेगळे असतात. प्रत्येक गटात जिवाणूंच्या अनेक जातीप्रजाती काम करीत असतात. सर्वांना खाद्य म्हणजे लवकर मध्यम व दीर्घ मुदतीने कुजणारे पदार्थ जमिनीत ठेवल्यास सर्व प्रकारच्या जिवाणूंना खाद्य मिळते व जिवाणूंचे जैववैविध्य जपले जाते. 
 
7) लवकर कुजणार्‍या पदार्थांपासून तयार झालेले खत लवकर संपून जाते. तर दीर्घ मुदतीने कुजणार्‍या पदार्थांपासून तयार झालेले खत जमिनीत दीर्घकाळ टिकून राहते. दोनही गटांतील खतांचा वापर करणे चांगले प्रचलित पद्धतीत फक्त संयुक्त जाणार्‍या गटातील सेंद्रिय खतांचाच वापर केला जातो. 
 
8) कुजण्याच्या क्रियेतून प्रामुख्याने दोन उपपदार्थ तयार होतात.
 
अ) सेंद्रिय आम्ले.
 
ब) पॉलिसॅकराइडनामक डिंकासारखे पदार्थ. 
 
सेंद्रिय आम्लांचा जमिनीत अन्नद्रव्ये साठविणे व जमिनीच्या सामू उदासीन (7 चे आसपास) ठेवणे तर डिंकासारखे पदार्थ जमिनीची कणरचना सुधारतात. ज्यांचा निचरा शक्तीशी संबंध असतो. हे दोनही पदार्थ अस्थिर असतात. तयार झाल्यानंतर त्यांना काम नसल्यास ते संपून जातात अगर नष्ट पावतात.

Draksha I_1  H
 
आता वरील सर्व माहितीचा वापर करून द्राक्षशेती कशी किफायतशीर करता येईल ते पाहू. पीक कोणतेही असो. शेवटी त्याच्या पोषणासंबंधी व ते वाढत असलेल्या जमिनीचे आरोग्यसंबंधित सर्व कामे जमिनीत सूक्ष्मजिवाकडूनच पार पाडली जातात. हे एकदा गृहित धरले की शेतकर्‍याची प्राथमिक जबाबदारी हे जमिनीतील सूक्ष्मजिवांचे कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी शेतकर्‍याने जमिनीची काय पूर्वतयारी केली पाहिजे, याचा अभ्यास करणे गरजेचे ठरते. यात सूक्ष्मजिवाचे पालन पोषण व प्रजोत्पादन गरजेप्रमाणे होणे यासाठी त्या संबंधित जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी योग्य पातळीवर ठेवणे इथेच शेवटी यावे लागते. आता वरील सूक्ष्मजीव शास्त्राच्या नियमांचे पालन करावयाचे असेल तर प्रचलित शेणखत कंपोस्ट या मार्गाने ते शक्य नाही. इतका अभ्यास झाल्यानंतर जसे आपण पिकाचे उत्पादन करतो, तसेच सेंद्रिय कर्बाचेही उत्पादन करावयास शिकले पाहिजे. इथे तीव्र मनुष्यबळ टंचाईचा प्राधान्याने विचार केल्यास ज्या जागी सेंद्रिय कर्ब वापरावयाचा आहे, त्याचजागी तो निर्माण करावयाचा 1-2 मीटरसुद्धा इकडून तिकडे वाहतूक शक्यतो करावयास लागू नये, असे आणखी एक पथ्य मनाशी ठाम केले. असे करीत असता सर्व पिकांसाठी एकच नियम लावून चालत नाही. पीकवार त्यात थोडा थोडा बदल करावा लागतो. द्राक्षबागेत कुजण्यास जड असणारा पदार्थ म्हणजे एप्रिल छाटणीतील काष्ठमय पदार्थ. मध्यम व लवकर कुजणार्‍या पदार्थांसाठी बागेत आपोआप येणार्‍या तणांचा वापर करून काम भागवायचे. 
 
एप्रिल छाटणीनंतर छाटणीतील जैवभार तेथेच खाली संपूर्ण बोधावर पाडावा. जमिनीची कोणतीही हलवा हलवी करू नये. बाकी सर्व कामे नेहमीप्रमाणे करावीत. पावसाळ्याचे सुरुवातीपर्यंत मालकाडी उत्तम प्रकारे तयार होईल. त्याचा ठराविक पानानंतर शेंडा मारला की पुढे पावसाळ्यात बागेत कमी कामे असतात. गरजेप्रमाणे फवारणी व खुडा काढणे ही कामे चालू राहतात. या काळात काही शेतकरी दोन बोधांमध्ये चाळणी अगर आंतरमशागत करतात. हे काम पॉवर टिलरने केले जाते. पावसाळ्यात इथे बेसुमार तण वाढते. अनेक शेतकर्‍यांचे म्हणणे बाग स्वच्छ राहिली पाहिजे असे असते, तर काहीजण ताग अगर एखाद्या कडधान्यासारखे हिरवळीचे पीक घेतात. सेंद्रिय कर्ब मिळावा, हा यामागे हेतू असतो. बाग स्वच्छ ठेवण्यामागे जमिनीतील अन्नद्रव्ये व पाणी फक्त पिकालाच मिळावे. त्यात स्पर्धा नको असाही हेतू असतो. काही शेतकर्‍यांचे म्हणणे असे आहे की बाग स्वच्छ राहिल्यास उपलब्ध अन्नद्रव्ये फक्त वेळानाच मिळाल्याने त्यांचे अतिरिक्त पोषण होते. अशा अतिरिक्त पोषणाचे दोन वाईट परिणाम संभवतात. पावसाळ्यात डाउनी व भुरीचा प्रादुर्भाव वाढू शकतो व सतत फवारण्या करीत राहिल्याने खर्च वाढत जातो. यासाठी आंतरमशागत अजिबात बंद करावी व मुक्तपणे तणे वाढू द्यावीत. एका शेतकर्‍याने 6 फुटांच्या मांडवाखाली 4-4.5 फुटांपर्यंत तण वाढू दिल्याचे एक उदाहरण माझ्या अभ्यासात आहे. 
 
आपण नेहमीच गरजेपेक्षा जास्त अन्नपुरवठा करीत असतो. अन्नद्रव्य पुरवठ्याची कार्यक्षमता 18 ते 20% असते. बागेत पावसाळ्यात उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढते. या काळात तणांना वाढू दिल्यास अतिरिक्त अन्न तणे फस्त करतात. वेळींचे योग्य प्रमाणात पोषण होते. याचा परिणाम शेंडा मारलेल्या कांडीतून फूट येण्यावर होतो. ही फूट सतत काढण्याचे काम द्राक्षबागेत पावसाळाभर चालू असते. चौकशी करता एक फेर फूट काढण्याचे काम 40 आरसाठी 8 ते 10 बायकांकडून केले जाते व अशा 5 ते 6 वेळा फुटी काढाव्या लागतात, अशी माहिती मिळाली. खुडा करणे असा शब्द द्राक्षशेतीत या कामासाठी प्रचलित आहे. याचा अर्थ 40 आरसाठी एकूण 50-60 मजुरांची गरज पडते. हे काम वेळेत झाले नाही तर काडीचा दर्जा घसरतो. एका बाजूने बाग स्वच्छ ठेवण्याचा खर्च व दुसर्‍या बाजूला खुडा काढण्याचा खर्च अशा दुहेरी खर्चात शेतकरी अडकतो. 
 
पावसाळ्यात बागेत तणे वाढू दिल्यास वेळीस अतिरिक्त पोषण न झाल्याने खुड्याचे काम 70-80% कमी होते असा अनुभव आहे. बागेत तणे वाढविण्याचा हा एक फायदा सूक्ष्म जीवशास्त्राच्या अभ्यासाप्रमाणे चांगल्या दर्जाच्या सेंद्रिय खतासाठी जमिनीखालील भागापासून खत केले पाहिजे व ते जागेलाच कुजले पाहिजे. तणे जमिनीवर ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर वाढतात त्यावेळी त्याच्या मुळांचा पसाराही जमिनीत खोलवर व मोठ्या प्रमाणावर वाढतो. पुढे ऑक्टोबर छाटणीपूर्वी ही तणे औजाराने जमिनीवर आडवी झोपवावीत व यथावकाश तणनाशकाने मारावीत. या तंत्राचे अनेक फायदे बागेला मिळतात. अतिरिक्त पोषण न मिळाल्याने पर्ण देठातील नत्राचे प्रमाण मर्यादित राहिल्याने डाउनीचा त्रास होत नाही. कीटकांना इतर खाद्य उपलब्ध झाल्याने त्यांचा प्रादुर्भाव अत्यंत कमी राहतो. जमिनीवरील तणांच्या आच्छादनामुळे बागेची पाण्याची गरज मोठ्या प्रमाणावर कमी होते. द्राक्षबागा प्रामुख्याने अवर्षणप्रवण भागात जास्त करून घेतल्या जातात. या क्षेत्रात प्राण्याचे दुर्भिक्ष असते. यंदा दुष्काळी साल असलेले पाणीप्रश्न अतिशय गंभीर आहे. अनेक शेतकरी शेततळी पावसाळ्यात भरून घेतात व पुढे ते पाणी पुरवून पुरवून वापरतात, तर काहीजणांना टँकरने पाणी आणून शेततळे भरून घ्यावे लागते. यातून पाणी व्यवस्थापनावरील खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ होते. तण व्यवस्थापनातून पाण्यात मोठ्या प्रमाणावर बचत करता येते. तणनाशकाने तण मारल्यानंतर, जिवंत मुळामध्ये 80-85% पाणी असते. पुढे ती वाळू लागतात व आकसू लागतात. आकसल्याने जमिनीत लहान मोठ्या पोकळ्या तयार होतात. या पोकळ्यातून एखाद्या अवकाळी पावसात पाणी साठविले जाते, तर हवाही खेळती राहते. अशी खेळती हवा राहणे वनस्पतीच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे असते. वनस्पतींच्या मुळाच्या श्वासोच्छ्वासासाठी जशी हवा गरजेची असते, तसेच मुळांचा पसारा कुजविणार्‍या व वेलींना गरजेप्रमाणे अन्नपुरवठा करणार्‍या सूक्ष्मजिवांनाही हवा गरजेची असते. शेतीत जमिनीचे हवा व्यवस्थापन हा एक नवीन विषय आहे. तण व्यवस्थापनात तो आपोआप घडून येतो. बहुतेक शेतकर्‍यांना या विषयाची माहिती नाही व कोठे चर्चाही नाही. 
 
वरील तण व्यवस्थापनातून पुढे जागेलाच तणांच्या मुळांचा पसारा, तणाचे जमिनीवरील आच्छादन व एप्रिल छाटणीचा जैवभार असा टप्प्याटप्प्याने पदार्थ कुजत जातो. या जागेलाच कुजण्याच्या क्रियेचे फायदे जमिनीला व पिकाला प्रचंड आहेत. ज्याची माहिती फक्त सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासातूनच होऊ शकते. कुजणे म्हणजे सेंद्रिय खताच्या निर्मितीचा कारखाना. दररोज थोडे थोडे सेंद्रिय खत तयार होते व वापरलेही जाते. उष्णकटिबंधात तापमान जास्त असल्यामुळे विघटन होऊन खत संपून जाण्याचे प्रमाण जास्त असते. चांगले कुजलेले खत टाकल्यास त्यात फुकट जाणार्‍या खताचे प्रमाण भरपूर असते. कुजलेले खत टाकण्याऐवजी आपण कुजणारा पदार्थ वापरणे या तत्त्वाचे येथे उत्तमप्रकारे पालन होते. लवकर, मध्यम व दीर्घ मुदतीने कुजणारे पदार्थ असल्याने कुजविणार्‍या जिवाणूसृष्टीचे जैवविविध्य उत्तमप्रकारे जमिनीत राहते. कुजण्याच्या क्रियेच्या उपपदार्थाची निर्मितीही सातत्याने होत राहिल्याने, टाकलेल्या रासायनिक खतांचा जास्त कार्यक्षमतेने वापर होतो. जमिनीची कणरचना सुधारल्याने निचराशक्तीत सुधारणा होते. सामू उदासीन होतो. बाग वाढविण्यातून जमिनीत अल्कता निर्माण होते. ही अल्कता सेंद्रिय पदार्थ कुजत असता तयार होणार्‍या आम्लातून उदासीन केली जाते. उदासिनीकरणामुळे जमिनीचे शुद्धिकरण होते. अशा जमिनीतील कोणत्याही शेती उत्पादनाचा दर्जा उत्कृष्ट असतो. चव, स्वाद, टिकाऊपणा अशा सर्व गुणांमध्ये सुधारणा झाल्याने बाजारात दर चांगला मिळतो. मंदीच्या काळात आपला माल अगोदर उचलला जातो. फळबागेसाठी दर्जाच्या महत्त्वाबाबत जादा लिहिणेची गरज नाही. द्राक्षबागेसंबंधी आज अवशेषमुक्त (रेसिड्यू फ्री) द्राक्ष उत्पादनाला अतिशय महत्त्व आहे. जागेला कुजण्याच्या प्रक्रियेतून बहुतेक रसायनांचे अवशेष विघटन होऊन संपून जातात. हा या तंत्राचा सर्वांत महत्त्वाचा फायदा. 
 
द्राक्षशेती आज पूर्वीप्रमाणे फायद्याची राहिलेली नाही. खर्च प्रचंड वाढत चालले आहेत त्या मानाने मालाचे दर वाढत नाहीत. बहुसंख्य शेतकरी संख्यात्मक उत्पादनवाढीच्या मागे आहेत. गुणात्मक वाढीवर फारसे कामकाज चालत नाही. शेतकरी कमाल संजीवकांचा वापर करून मण्यांची फुगवण करण्यामागे वेड्यासारखा धावतो आहे. या मार्गात धोके भरपूर आहेत. नुकतेच एका द्राक्ष बागायतदाराच्या शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करीत असता तज्ज्ञ सांगत होते. 40 आरसाठी 18 ते 20 टन द्राक्षाचे उत्पादन काढण्यामागे वेड्यासारखे धावू नका. 12 ते 15 टनांपुढे उत्पादन नेऊ नका, गुणवत्तेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. काही कार्यक्रमात दक्षिण आफ्रिका व चिनी या देशांतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यांचे म्हणणे असे आहे, की भारतातील शेतकरी पिकाकडे जितके लक्ष देतो त्या मानाने जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. त्यांनी नेमके वर्मावर बोट ठेवले आहे असे मला वाटते. 
 
उत्पादन खर्च कमी होणे गरजेचे आहे. वरील तंत्रात आंतरमशागत, रा. खते, पीकसंरक्षण औषधे, पाणी, सेंद्रिय खत व्यवस्थापन (बाहेरून आणून टाकणे बंद) संजीवकांचा वापर, मजूर खर्च अशा सर्व खर्चात बचत करण्याचे मार्ग सांगितले आहेत. खर्च कमी करून उत्पादन, उत्तम घेऊन गुणवत्ता उत्तम राखल्यासच शेतकर्‍यांच्या खिशात दोन पैसे राहू शकतात. गेल्या वर्षी या तंत्राने एका शेतकर्‍याने आपल्या 25 आर बागेतून 40,000 रु. खर्चात 3,50,000 रुपयांचे उत्पन्न मिळविले. वरील उदाहरण या तंत्राची गुणवत्ता समजून घेण्यास पुरेसे आहे. शेतकरी बंधूंनी यावर चिंतन करावे. 
 
 प्र. र. चिपळूकर