ऊस खोडवा पिकाकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन व्यवस्थापन केल्यास खर्चाची बचत होऊन अधिक फायदा मिळवता येतो. शेतकरी साधारणतः 2 ते 3 खंडवा पिके घेतात, योग्य जातीची निवड करून 1 लागण व 4 खोडवा पिके किफायतशीरपणे घेता येतात.
ऊस हे महाराष्ट्र राज्याचे महत्त्वाचे नगदी पीक असून प्रामुख्याने आडसाली, पूर्वहंगामी व सुरू हंगामामध्ये लागण मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्याच्या एकूण ऊसक्षेत्रापैकी 40 % क्षेत्र खोडवा पिकाखाली असून त्याचा उत्पादनामध्ये 35% इतका हिस्सा आहे. ऊस लागणीपासून सरासरी एकरी अधिक उत्पादकता मिळते, पण खोडवा पिकापासून बर्याच वेळेला उसाचे उत्पादन कमी मिळते. खोडवा पिकाचे व्यवस्थापन आधुनिक तंत्राचा वापर व पिकांचे वेळोवेळी चांगली निगा केल्यास खोडव्याचे उत्पादनही लागणीच्या उसापेक्षा जास्त येते असे आढळले आहे.
ऊस खोडवा पिकाकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन व्यवस्थापन केल्यास खर्चाची बचत होऊन अधिक फायदा मिळवता येतो. शेतकरी साधारणतः 2 ते 3 खोडवा पिके घेतात, योग्य जातीची निवड करून 1 लागण व 4 खोडवा पिके किफायतशीरपणे घेता येतात.
खोडवा पीक घेताना घ्यावयाची काळजी :
1. सर्वसाधारणपणे 15 फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवावा.
2. लागणीच्या उसाचे एकरी 40 ताणापेक्षा जास्त उत्पादन असावे.
3. सुरवातीलाच ऊस खोडवा पिकातील नांग्या भरून घ्याव्यात किंवा तूट अली भरून घ्यावी.
4. खोडवा पिकासाठी योग्य जातीची लागण केलेल्या व चांगले उत्पादन देणार्या शिफारस केलेल्या जातीची लागण करावी. उदा. को-86032, को-एम 0265, को-10001 या जातींचा खोडवा ठेवणे फायद्याचे ठरते.
5. योग्यवेळी तोडलेल्या उसाचा खोडवा राखणे, आडसाली, पूर्वहंगामी व सुरु हंगामातील लागणीचा ऊस एकाच वेळी तोडून त्यांचा खोडवा राखला जातो, पण पूर्वहंगामी उसापासून ठेवलेल्या खोडव्याचे उत्पादन इतर हंगामांतील खोडव्यापेक्षा अधिक दिसून आले आहे.
वेगवेगळ्या महिन्यांत ठेवलेल्या खोडव्यामध्ये फेब्रुवारीपर्यंत ठेवलेल्या खोडव्याचे उत्पादन समाधानकारक आढळल्याचे खालील तक्त्यावरून दिसून येते.
खोडवा ठेवलेल्या दिनांकांचा उत्पादनावर दिसणारा परिणाम :
अ.क्र. |
खोडवा ठेवल्याची तारीख |
हेक्टरी उत्पादन (टन) |
1. |
15 सप्टेंबर |
160 |
2. |
15 ऑक्टोबर |
146 |
3. |
15 नोव्हेंबर |
144 |
4. |
15 डिसेंबर |
140 |
5. |
15 जानेवारी |
139 |
6. |
15 फेब्रुवारी |
129 |
7. |
15 मार्च |
63 |
6. लागण पिकाची तोड झाल्यानंतर पहिल्या 15 दिवसांच्या आत उसाचे पाचट गोळा करून सरीत खोडवा पीक राखावे. बुडक्यांची छाटणी करून छाटणी केलेल्या भूतलावर 0.1 % बावीस टिनची फवारणी करावी. त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा बंदोबस्त होईल. काही वेळा बुडके छाटण्याकरिता धारधार कुदळ्याने किंवा ट्रॅक्टरच्या साह्यानेही छाटणी चांगली करता येते. त्यामुळे फुटवे जोमदार येऊन पिकाची वाढ सुरवातीपासून चांगली होऊ शकते. शेणखत / कंपोस्ट खत / कृत्रिम सेंद्रिय खते टाकून वरंभ्याच्या दोन्ही बाजू नांगराने किंवा बंडग्याच्या साह्याने फोडून घ्याव्यात. यामुळे जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते, जुनी मुळे तुटून नवीन मुळांची जोमदार वाढ होण्यास मदत होते. बर्याच वेळेला ट्रॅक्टरच्या साह्याने ऊस पाचट बारीक करून सरीमध्ये बसविले जाते. याचाही फायदा अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतो. पाचटावर 32 किलो युरिया आणि 40 किलो सिंगल सुपर फॉस्फेट समप्रमाणात पसरून घ्यावे. त्यावर 4 किलो पाचट कुजविणारे जिवाणू पसरवून टाकावे. यामुळे पाचट कुजण्यास मदत होते.
7. खोडवा पीक 11 ते 12 महिन्यांत तयार होत असल्यामुळे त्यास शिफारस केल्याप्रमाणे खालील रासायनिक खतमात्रा द्याव्यात.
खोडवा पीक रासायनिक खते प्रतिहेक्टरी
अ.क्र. |
कालावधी |
युरिया |
सिंगल सुपर फॉस्फेट |
म्युरेट ऑफ पोटॅश |
1. |
तोडणीपासून 15 दिवसांच्या आत |
66 |
150 |
40 |
2. |
40 ते 45 दिवसांनी |
66 |
- |
- |
3. |
भरणीच्या वेळी |
86 |
138 |
36 |
4. |
एकूण |
218 |
288 |
76 |
वरील खते पहरीच्या साह्याने देताना 2 सामान हफ्त्यांत विभागणी करून ऊस तुटल्यानंतर 15 दिवसांच्या आत पहिला हफ्ता सरीच्या एका बाजूला बुडक्यापासून 15 सेंमी अंतरावर 20 सेंमी खोल छिद्र घेऊन सरीच्या एका बाजूला द्यावेत. दोन छिद्रांमधील अंतर 30 सेंमी ठेवावे. दुसरा हफ्ता याच नाळेपद्धतीने विरुद्ध बाजूच्या सरीच्या बगलेत 135 दिवसांनी द्यावा.
8. खोडवा पिकास सूक्ष्म अन्नद्रव्याची बर्याच वेळेला कमतरता दिसून येते. अशावेळी मातीपरीक्षणानुसार जमिनीत सूक्ष्म अन्नद्रवे देणे जरुरीचे असते. लोह, जस्त, मंगल व बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसून आल्यास सेंद्रिय स्वरूपात सूक्ष्म अन्नद्रवे, चिलेटेड मिश्रखतांचा वापर करणे फायदेशीर ठरते. उदा. ऑर्सिकेम एकरी 20 किलोप्रमाणे समान हफ्त्यांत घ्यावे. लोह, जस्त, मंगल व बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसून आल्यास एकरी 10 किलो फेरस सल्फेट 10 किलो/10 किलो मॅग्नीज सल्फेट/10 किलो झिंक सल्फेट तसेच शेणखत/ गांडूळखताबरोबर मिसळून उसाच्या बेटाशेजारी द्यावे.
9. जैविक खतांचा वापर करावा.
उदा. अझोटोबॅक्टर 1 किलो व 1 किलो ऍझोस्पिरिलियम किंवा अझोटोबॅक्टर, ऍझोस्पिरिलियम, ऍसेटोबॅक्टर आणि स्फुरद, विरघळणारी जिवाणू प्रत्येकी 1/2 किलो. एकरी 2 किलो जिवाणू चांगल्या कुजलेल्या शेण खतात किंवा गांडूळखतात मिसळून द्यावे. त्यामुळे 25 % नंतर वाव 25 % स्फुरद खताची बचत होते.
10. खोडवा पीक घेत असताना आधुनिक तंत्राचा वापर करावा.
* संतुलित खते, पाणी व पाचट व्यवस्थापन
* जैविक खतांचा वापर
* तूट आळी भरणे.
* पाचटाचा वापर करतो त्या ठिकाणी नत्र व स्फुरद खतांचा वापर 25% जास्त करावा. म्हणजे जिवाणूंची वाढ चांगली होऊन पिकावर पाचट कुजत असताना अनिष्ट परिणाम होत नाही.
* खोडवा पिकामध्ये उंच वाढणारी व जास्त अन्नद्रव्याची शोषण करणारी मक्का व सूर्यफुलासारखी आंतरपिके घेऊ नयेत. याऐवजी नंतर खताचा कार्यक्षमतेने वापर होण्याकरिता हिरवळीची पिके घेऊन ती सरीत गाडावीत.
उदा. ताग, चवळी, घेवडा, धैंचा इ.
* आंतरपिके घ्यावयाची झाल्यास कमी कालावधीची आंतरपिके घ्यावीत. उदा. भाजीपाला पिके
* खोडवा पिकांचे रोग व किडींपासून वेळीच संरक्षण करावे.
* ऊस खोडवा पिकास जानेवारीपासून पाण्याचा ताण बसल्यास आणि असंतुलित रासायनिक खते वापरल्यास बर्याच वेळेला पहिल्या माशीचा उपद्रव होत असतो. खोडवा सुरवातीच्या काळात तापमानात वाढ झाल्यास खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो, तर काही वेळा हवामानातील बदलानुसार पांढरा लोकरी मावा ही कीड दिसून येते.
*गवताळ वाढ किंवा केवडा दिसून आल्यास शिफारशीनुसार ऊस पिकांचे संरक्षण करावे.
उदा. खोड किडीसाठी क्लोरोपायरीफॉस 50% ईसी प्रतिपंपाला 20 मिली किंवा ट्रायकोग्रामा थिलोनिस या जातीच्या परोपजीवी किडीची अंडी प्रतिएकरी 80 हजार सोडावी.
1.केवडा आढळल्यास 0.5% फारससल्फेटची फवारणी करावी.
2.गवताळ वाढ रोगट बेटे मुळासकट उपटून नष्ट करावीत.
3.पांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास रोगर करून 50% ईसी प्रतिपंप 10 मिलि पाण्यातून फवारावे व नत्रखताच्या मात्रा 20 किलो प्रतिएकरीप्रमाणे 3 महिन्यांच्या अंतराने दोन वेळा द्यावेत.
4.हुमणी किडा आढळल्यास बायोटॉझीन 2 लि+500 मिली क्लोरोपायरीफॉस 50% एकत्रित मिसळून आळवणी किंवा ठिबक सिंचनातून द्यावे अथवा व्हटीको 2.5 किलो एकरी रासायनिक खताबरोबर द्यावीत. त्यामुळे हुमणीचा बंदोबस्त करून चांगल्या प्रकारे होतो. तसेच यासोबत ह्युमिक अॅसिड 60 ते 70 मिलि प्रतिपंपास वापरल्यास पांढर्या मुळ्या जोरदार येतात व फुटव्याचे प्रमाण वाढते.
5.पांढरा लोकरी माव्याकरता क्रायसोपलीकारनी या परभक्ष्यी कीटकांचा अंडी किंवा अळ्या प्रतिएकरी 1 हजार या प्रमाणात झोडाव्यात किंवा कोनोबाग्री.
ऑफिडाव्होरा या परभक्ष्यी अळ्या पानावर सोडाव्यात अथवा व्हरटिसिलिअम लेकानी बुरशी 2 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रासायनिक उपाय म्हणून 1 सर्पशजन्य व आंतरप्रवाही कीटकनाशक एकत्रित करून फवारणी करण्यास हरकत नाही.
उदा. (मेलॅथिनॉन + डायमेथिएट)
तणनियंत्रण
खोडवा पिकामध्ये तणनियंत्रण वेळेवर करणे गरजेचे असते. एकदल व द्विदल तणांचे नियंत्रण करण्याकरिता 6 ते 8 आठवडे कालावधीमध्ये 800 ग्रॅम मिसळून उसावर पडणार नाही अशाप्रकारे फवारणी करावी. किंवा सॉल्ट 1 किलो+अॅटमासिन 500 ग्रॅम 200 लिटर पाण्यातून तणावर फवारणी करावी. पूर्ण वाढ व फुले आलेल्या तणांच्या नियंत्रणाकरिता 2-4 डी सोडियम सॉल्ट 1 किलो +अॅट्रायझिन 500 ग्रॅम 200 लिटर पाण्यातून तणावर फवारणी करावी. पूर्ण वाढ व फुले आलेल्या तणांच्या नियंत्रणाकरता 2-4डी सॉल्ट (एरोमाइन)1 लीटर+500 ग्रॅम अट्रायाजीम 100 लिटर पाण्यातून तणावर फवारणी करावी.
तोडणी
ऊस पिकांची तोडणी 12 ते 13 महिने पूर्ण झाल्यानंतर पक्वतेनुसार केल्यास उसाचे उत्पादन व साखर उत्पादनही अधिक आढळून आले आहे. साखर कारखान्यांनी कारखाना सुरू झाल्यापासून खोडवा पीक तोडण्यास प्राधान्य दिल्यास कारखान्याचा साखरउतारा अधिक मिळून शेतकर्यास एकरी ऊस खोडवा पिकांचे उत्पादनही अधिक मिळते.
खोडवा पिकांचे फायदे
1) पूर्वमशागत करावी लागत नसल्यामुळे पूर्वमशागतीवरील होणारा खर्च व वेळ आणि श्रमाची बचत होते.
2) बेण्याच्या लागणीचा व बेणे प्रक्रिया इत्यादी खर्च वाचतो.
3) खोडवा पिकांची मुळे खोलवर गेल्यामुळे पीक जोमदार वाढून पक्वता लवकर येत असल्यामुळे ऊस गाळपास लवकर तयार होतो.
4) ऊस लागणीपेक्षा 1 ते दीड महिना लवकर पीक तयार होते.
5) खोडवा पीक पाण्याचा ताण मोठ्या प्रमाणात सहन करते.
6) खोडवा पिकात पाचट वापरल्यामुळे जमिनीचे गुणधर्म सुधारण्यास मदत होते.
7) पाचटाच्या वापरामुळे खोडवा पिकात तणांचे नियंत्रण होण्यास मदत होते.
8) खोडव्यातील नांगी किंवा तूट आणि भरल्यामुळे लागणीपेक्षा कमी खर्चात अधिक उत्पादन घेता येते.
9) वेळेत तोड केल्यास खोडव्यापासून चांगल्या प्रतिमा गूळ तयार करता येतो. उदा. का. सी. 671 व को. 92005.
यशस्वी खोडवा पीक व्यवस्थापनातील महत्त्वाची सूत्रे
1) लागण केलेल्या उसाचे एकरी उत्पादन सरासरीने 60 ते 65 टन असावे आणि एकरी ऊस संख्या कमीत कमी 40,000 पर्यंत असावी. शक्य तो को-86032, कोएम 0265, व्हीएसआय 08005 आणि एमएस 10,001 त्या जातींची खोडव्यासाठी निवड करावी.
2) लागणीचा ऊस तुटल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत खोडवा पिकाचे नियोजन करावे.
3) धारदार कुदळीने अथवा कोयता इत्यादी हत्याराने बुडक्यांची छाटणी करावी.
4) गरज भासल्यास एक टक्का बुरशीनाशकाची आळवणी घ्यावी.
5) खोडव्याची फूट व्यवस्थित होत नसल्यास एक किलो अझोटोबॅक्टर+एक किलो अझोस्पेरिलम हे जिवाणू+चांगले कुजलेले व चाळून घेतले. 20 किलो शेणखत किंवा गांडूळखत एकत्रित मिसळून तुटलेल्या कोंबावर चिमूटभर टाकावे. जमिनीत वायसी असताना या पद्धतीने जिवाणू खते द्यावीत.
6) तूट आळी किंवा गॅप असल्यास खोडव्यास हलके पाणी देऊन ऊस रोपाचीलागण करून घ्यावी. रोपलागणीनंतर झारीने त्या रोपास हलके पाणी द्यावे. रान तणविरहित ठेवावे. तणनाशक 2,40, सेन्कार किंवा याचवळी सेंद्रिय खते सरीत द्यावीत उदा. ग्रीन हार्वेस्ट अंदाजे 200 ते 800 किलो प्रतिएकरी द्यावीत.
7) एकआड एक सरी पद्धतीने पाचराचा वापर करावा.
8) ऊस खोडवा पिकात केवडा दिसत असल्यास फेरस सल्फेट 2.5% पर्यंत आळवणी करावी.
उदा. 500 ग्रॅम फेरस सल्फेट + शेणाची 20 लिटरची स्लरी करून ते मिश्रण 100 लिटरपर्यंत करून आळवणी करावी.
9) शिफारस केल्याप्रमाणे रासायनिक खताचे हप्ते नळी पद्धतीने द्यावीत.
10) गरजेनुसार विद्राव्य खताच्या दोन फवारण्या 40-45 दिवसांनी पहिली व 7-65 दिवसांनी दुसरी फवारणी घ्यावी.
11) पहिली फवारणी : 12.61:0 = 75 ग्रॅम + 0:0:50 = 50 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाकरिता
दुसरी फवारणी : 0.52:34 = 100 ग्रॅम
अमोनियम सल्फेट : 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपास
12)सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज खोडवा पिकास जास्त असते म्हणून एकरी 15 ते 20किलो ऑरमीकम हे खत द्यावे.
13) रोग व किडीचा वेळीच बंदोबस्त करावा.
14) पीकवाढीची अवस्था व गरज याप्रमाणे ठिबक किंवा प्रचलित पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे.
15) ऊस पक्व झाल्यानंतर 15 ते 20 दिवस अगोदर पाणी तोडावे.
वर नमूद केल्याप्रमाणे खोडवा पीक व्यवस्थापन करून लागणीपेक्षाही जास्त उत्पादन घेता येते. शिफारस केलेले ऊस वाणाचा खोडवा पिकही चांगले येऊ शकते. मग काही वेळा अशा वाणाची निगा व्यवस्थित करावी लागते. सर्वसाधारणपणे खोडवा पीक पक्वता लवकर येत असल्याने त्याची तोड 12 ते 13 महिन्यांत होईल असे नियोजन करावे.
श्री. डॉ. जे. पी. पाटील, माजी वरिष्ठ संशोधन अधिकारी
प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर