यंत्राद्वारे भातरोवणी

डिजिटल बळीराजा-2    09-Sep-2019

 
 
 
मजुरीचे दर व मजुरांची अनुपलब्धता यामुळे उत्पादन खर्च वाढतो व वेळेवर भाताची लागवड पूर्ण न झाल्यामुळे उत्पादनात घट येते. त्यामुळे लागवडीकरिता सुधारित औजाराचा वापर करणे गरजेचे आहे. या संबंधीची माहिती सादर लेखात वाचावयास मिळणार आहे. 
 
पूर्व विदर्भामध्ये खरीप व उन्हाळी हंगामामध्ये जिथे ओलिताच्या पाण्याची खात्रीची सोय आहे अशा ठिकाणी उन्हाळी धानाचे पीक घेतले जाते. सध्याच्या काळामध्ये शेतकर्‍यांसमोर मजुरांचा प्रश्न भेडसावत असून भातरोवणी फार वेळखाऊ, जास्त मजूर लागणारे काम असून लागवड करण्यासाठी वारंवार मोठ्या प्रमानात मजुरांची गरज भासत असते. मजुरीचे दर व मजुरांची अनुप्लब्धता यामुळे उत्पादन खर्च वाढतो व वेळेवर रोवणी पूर्ण न झाल्यामुळे उत्पादनात घट येते. त्यामुळे धान पिकातील रोवणीकरिता सुधारित औजारांचा वापर करणे गरजेचे आहे. भाताचे सध्याचे भाव लक्षात घेता, धान लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना जास्त खर्च परवडण्यासारखे नाही, या सर्वांवर उपाय म्हणून धान लागवड रोवणी यंत्राने करणे फायद्याचे होईल.
 
बियाणे निवड :
 
भातरोवणी यंत्राच्या साह्याने रोवणी करण्यासाठी चांगल्या प्रतीचे 15 ते 20 किलो एकर भात बियाणे पुरेसे आहे. जे की पारंपरिक पद्धतीने एक एकर रोवणीसाठी साधारण रु. 30 किलोपर्यंत बियाण्यांची आवश्यकता असते. जर श्री पद्धतीने भाताची लागवड केल्यास बियाणे कमी प्रमाणात (2 किलो, एकर) लागते.
 
बियाण्यांस अंकुर आणणे :
 
भातपेरणी करण्यासाठी भात बियाण्यांस बीजप्रक्रिया करून अंकुर आणणे ही अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. त्याकरिता सुरवातीस एका मोठ्या भांड्यात बियाणे घ्यावे. त्यामध्ये 3 टक्के मिठाचे द्रावण घ्यावे व बियाणेे ढवळून घ्यावे. हलके व पोचट बियाणे, जे बियाणे पाण्यावर तरंगत आहे असे बियाणे काढूण टाकावे. चांगले बियाणे स्वच्छ पाण्याने ध्ाुवून घ्यावे व 24 तास पाण्यामध्ये बुडवून ठेवावे. नंतर बियाण्यांतील पाणी काढून टाकावे आणि असे ओले बियाणे पोत्यामध्ये भरावेे. बियाणे भरलेले पोते उबदार, सावली असलेल्या ठिकाणी, पोत्यावर भाताचे तूस टाकून झाकावे व असे झाकलेले बियाणे 24 तासांसाठी ठेवावे. बियाण़्यांची उगवण क्षमता तापमानावर अवलंबून असते. ज्यावेळी बियाण्यांस अंकुर फुटण्यास सुरवात होईल व बियाण्यांची मुळे 2 ते 3 मिलिमीटर लांबीची होतील असे बियाणे रोपवाटिकेवर लागवडीसाठी तयार आहे, असे समजावे. जास्त मोठ्या अंकुरांची वाढ होऊ देऊ नये, त्यामुळे बियाण्यांची मुळे पोत्यामध्ये घ्ाुसू शकतात किंवा मुळे एकमेकांत गुंतू शकतात.
 
मॅट नर्सरी तयार करणे :
 
 
  
भातरोवणी यंत्राच्या साह्याने भाताची रोवणी करण्यासाठीे एक एकर क्षेत्रासाठी 1.2 मीटर रुंदीचे व 10 मीटर लांबीच्या दोन बेडची आवश्यकता आहे. योग्य लागवडीसाठी रोपवाटिकेची जागा समपातळीत असावी, जेणेकरून बेडची जाडी एकसमान राहील. दोन बेडमध्ये चर तयार करावा, जेणेकरून त्यामधून पाण्याचा निचरा होईल. साधारणपणे बेड तयार करण्याच्या जागेवर कंपोस्ट खत किंवा गांडूळखत मातीमध्ये मिश्रण 1:3 याप्रमाणात व गाळाची माती असल्यास त्यामध्ये माती, वाळू व कंपोस्ट खत याचे मिश्रण 3:1:1 याप्रमाणात असावे. मिश्रण दगड, गोटेविरहित असावे.
 
समपातळीत तयार केलेल्या बेडवर पॅालिथीन सीट अंथरून घ्यावा. नंतर बेडवर 21 सेंमी ग 55 सेंमी ग 2 सेंमी आकाराची फ्रेम रोपांचे केक तयार करण्यासाठी वापरावी. फ्रेम मातीच्या मिश्रणाने फ्रेमच्या काठोकाठ भरून घ्यावे. फ्रेमच्या वापरामुळे बियाणे वाया जात नाही, रोवणी यंत्रासाठी आवयक असलेले केक तयार होतात व एकसमान केकची 2 सें.मी. उंची राखली जाते व नंतर फ्रेम अलगद काढून घ्यावी. जर केकची उंची 2 सें. मी.पेक्षा जास्त असल्यास रोवणी योग्य पद्धतीने होत नाही. बियाण़्यांच्या वाणाच्या प्रकारानुसार अंकुर आलेले बियाणे 120 ग्रॅम ते 150 ग्रॅम प्रतिकेक याप्रमाणात एकसमान पसरून घ्यावेत. अंकुर आलेल्या बियाण्यांची काळजीपूर्वक हाताळणी करावी, जेणेकरून बियाण्यांची नाजूक मुळे तुटू नयेत. अशा रीतीने एक केक तयार झाल्यानंतर एकापाठोपाठ एक याप्रमाणे पूर्ण बेड भरेपर्यंत केक तयार करण्यात यावेत. नंतर बेड हिरव्या पानांनी किंवा भात तुसाच्या साहाय्याने झाकण्यात यावे, जेणेकरून पक्ष्यांपासून व पावसापासून बियाण्यांचे रक्षण होईल. हवामानतील तापमानानुसार दिवसातून 2 ते 3 वेळा बेडवर झारीच्या साह्याने 3 ते 4 दिवस पाणी द्यावे. बेड कधीही कोरडा पडू देऊ नये.चौथ्या दिवशी रोपांची चांगली वाढ होत असल्याबाबत पडताळणी करावी व रोपवाटिका हिरवी दिसत असल्याची खात्री करावी. 2 ते 2.5 सेंमीची रोपे दिसायला सुरवात होईल. नंतर भाताचे तूस काढून घ्यावे व रोपवाटिकेमध्ये 2 सेंमी उंचीपर्यंत पाण्याची पातळी ठेवावी. पाण्याची पातळी ही रोपांच्या उंचीच्या निम्यापर्यंत असावी.
 
रोपवाटिकेवर बारकाईने लक्ष ठेवावे. कीड व रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास तात्काळ नियंत्रणाचे उपाय करावेत. अंकुर आलेले बियाणे रोपवाटिकेमध्ये टाकल्यापासून 17 ते 18 दिवसांपर्यत 12.5 ते 15 सेंमी उंची असलेली रोपे तयार होतील 3 ते 4 पाने असलेली रोपे रोवणी यंत्राच्या साह्याने रोवणीसाठी योग्य आहेत. रोपवाटिकेमध्ये रोपांची जास्त दिवस वाढ होऊ देऊ नये. जाड व टणक अशी मॅटमधील मुळे रोवणी यंत्राच्या बोटांनी रोवणी करणे सोपस्कर होत नाहीत.
 
रोवणी करण्यासाठी मुख्य शेताची तयारी करणे :
 
भातरोवणी यंत्राच्या साह्याने भातरोपांची रोवणी करण्यासाठी मुख्य शेताची योग्य प्रकारे मशागत करणे आवश्यक आहे. शेत मातीची ढेकळे व काडीकचराविरहीत असावे. पूर्ण कार्यक्षमतेने रोवणी यंत्राचा वापर होण्यासाठी चिखलणी ही उथळ व 10 ते 15 सेंमीपर्यत असावी.
 
गाळाची माती असलेल्या शेतामध्ये चिखलणी पॉवर टिलर किंवा ट्रॅक्टरने रोटाव्हेटरच्या साहाय्याने करावी. मुख्य शेत रोवणीसाठी तयार झाल्यानंतर रोपवाटिकेतील साठविलेल़्या पाण्याचा निचरा 6 ते 12 तास रोवणी करण्यापूर्वी करावा. हळुवारपणे रोपांचे केक उचलून भात रोवणी यंत्राच्या रोपे ठेवण्यासाठी असलेल्या कप्प्यामध्ये ठेवावेत. रोपांची उचल केल्यानंतर त्याच दिवशी रोपांची रोवणी करणे आवश्यक आहे.
 
रोवणी यंत्राची वैशिष्टे : धान रोवणीकरिता बाजारात विविध कंपन्यांचे धान रोवणी यंत्र उपलब्ध आहेत. शेतकर्‍यांनी स्वतःच्या गरजेनुसार 4 ओळी किंवा 8 ओळींची रोवणी करणारेयंत्र निवडावे. स्वयंचलित, बसून चालविता येणारे किंवा यंत्रामागे फिरून रोवणी करता येते. एका फेरीमध्ये 2, 4, 8 ओळींची रोवणी करता येते.
 
वजनाने हलके, वापरास सोपे. पेट्रोल किंवा डिझेल इंजिनाचा वापर केलेला असतो.भात यंत्रास पकड असलेले मजबूत चाकाचा उपयोग शेतामधील रोवणीसाठी अरुंद अशा रस्त्यावरील वाहतुकीसाठी चाकांचा वापर करता येतो. यंत्राचा वापर मॅट नर्सरी व कप्पा पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवडीकरिता करता येतो. दोन रोपांमधील अंतर 10 सेंमी ते 23 सेंमीपर्यंत व दोन ओळींमधील अंतर 23.8 सेंमी ठेवता येते.
 
 
 

 
 भातरोवणी यंत्र  भातरोवणी यंत्राच्या साह्याने रोवणी
 
 
डॉ. उषा डोंगरवार,
श्री. सुमेध रा. काशिवार