केळी पिकावरील पनामा विल्ट आणि सिगाटोका रोगावरील उपाययोजना

डिजिटल बळीराजा-2    27-Sep-2019
 
 
 
रोगापासून पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे असते. केळी या फळपिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण कसे करावे याबद्दल या लेखात माहिती पाहू.
 
केळी पिकाची सतत लागवड करणे, जमिनीचे उबदार तापमान, हलकी जमीन आणि जमिनीत सतत ओलावा राहणे यामुळे या रोगाची लागण जास्त प्रमाणात होते. जमिनीतून होणारा हा रोग, पिकाच्या मुळांवर हल्ला करतो.
 
लक्षणे
 
केळीच्या खोडाच्या जमिनीकडील पाने पिवळी पडतात.
पिवळी पडलेली पाने जमिनीकडे झुकून, जवळपास सरळ लटकतात.
खोड आडवे चिरले असता त्यातून पिवळसर, लालसर रंगाचा द्रव दिसून येतो. हा प्रकार मुळांकडील खोडाच्या भागाकडे वाढत जातो.
 
उपाययोजना
 
1. रोग जर कमी प्रमाणात असेल तर रोगग्रस्त रोपे उपटून टाकावीत.
2. रोपाच्या मुळांजवळील भागात क्विक लाइम (कॅल्शियम ऑक्साइड)चा वापर करावा. साधारणत 1000 खोडांसाठी 500 ग्रॅम ते 1 किलो कॅल्शियम ऑक्साइडच्या ताज्या तयार केलेल्या द्रावणाचा वापर करावा. द्रावण रोपांवर आणि खोडावर पडणार नाही याची दक्षता घ्यावी.
3. जास्त प्रमाणात लागवड असेल तर 3-5 वर्ष केळीची लागवड करू नये.
4. या शेतात ऊस देखील लागवड करू नये.
5. कंद लागवड करण्यापूर्वीत् यावर बाविस्टीनची प्रक्रिया करावी. बावीस्टिन 200-250 ग्रॅम आणि कॉपरऑक्सिक्लोराइड 200 ग्रॅम प्रति 100 लि. पाण्यात घेऊन त्यात खोड 5-10 मिनिटे बुडवून ठेवून त्यानंतर लागवड करावी.
6. रोप लागवड करीत असल्यास पहिल्या पाण्यासोबत 1000 खोडांसाठी जमिनीतून बावीस्टिन 200-250 ग्रॅम आणि कॉपरऑक्सिक्लोराइड 500 ग्रॅम मुळांजवळ द्यावे.
7. रोप 4 ते 5 महिन्यांचे झाल्यानंतर जमिनीतून बॅसिलस सबटिलस, ट्रायकोडर्मा, किंवा सुडोमोसासफ्लुरोसंसचा वापर करावा.
8. जमिनीत हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. जमिनीत पाणी जास्त साचू देऊ नये.
केळीच्या खोडाच्या जमिनीकडील पाने पिवळी पडतात
खोड आडवे चिरले असता त्यातून पिवळसर, लालसर रंगाचा द्रव दिसून येतो.
 केळी पिकावरील सिगाटोका नियंत्रणाचे उपाय 
 
केळीवरील करपा या सामान्य नावाने ओळखला जाणारा हा रोग मायकोस्पेरेलाम्युसिकोला आणि मायकोस्पेरेला फिजीनिस या बुरशीमुळे होतो. म्युसिकोला जातीमुळे पिवळा सिगाटोका, तर फिजीनिसमुळे काळा करपा होतो. रोगाची लागण अस्कोस्पोआर्स आणि कोनिडीया या स्पोअर्सद्वारे होते. स्पोअर्स पानांच्याखालच्या बाजूने तसेच पानांच्या वरील बाजूने पानांवर पडल्यानंतर रोगाची जर्म ट्यूब तयार करतात. त्यानंतर पानांत प्रादुर्भाव होतो. रोगाच्या वाढीसाठी जास्त प्रमाणातील आर्द्रता, हलक्या स्वरुपाचे दव पडणे, हलक्या स्वरुपाचा पाऊस, कुपोषित रोप, तसेच गर्दी झालेली लागवड यासारखी परिस्थिती फायदेशीर ठरते.
 
मोठ्या रोपांच्या तिसर्‍या किंवा चौथ्या पानांच्या खालील बाजूस मध्य शिरेलालागून पिवळसर ठिपके पडतात. कालांतराने हे ठिपके मोठे होतात व त्यांचा रंग तपकिरी होतो. काही काळ गेल्यानंतर पानांच्या वरील बाजूस ठिपके दिसतात व कालांतराने ते तपकिरी किंवा काळसर बनतात. लहान रोपांच्या पानांवर सहसा गोलसर ठिपके दिसून येतात व त्या ठिपक्यांच्या भोवताली तपकिरी रंगाचे हलकेसे वलय दिसून येते.
 
केळी पिकाच्या पानांवर लक्षणे दिसण्याच्या 20 ते 70 दिवस अगोदर रोगाची लागण झालेलीअसते.
ज्यावेळेस रोगाच्या वाढीस पोषक वातावरण असेल त्या वेळेसच बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी. महाराष्ट्रात साधरणपणे अशी परिस्थिती पावसाळ्यात असते, मात्र त्यावेळेस पानांवर काहीच लक्षणे दिसत नसल्याने शेतकरी त्यावर फवारणी घेण्याचे टाळत असतात. रोगाच्या नियंत्रणासाठी शेतात योग्य तेवढीच रोपांची संख्या ठेवावी जेणेकरून शेतात हवा खेळती राहील.
 
रासायनिक बुरशीनाशके -
 
कॉपरहायड्रॉक्साइड, कॉपरऑक्सिक्लोराइड, मॅन्कोझेब, मॅनेब, फेनब्युकोनॅझोल, अझॉक्सिस्ट्रोबीन, टेब्युकोनॅझोल, फॉसेटील-एएल फॉस्पोरिक असिड यांचा वापर करावा. कोणतेही बुरशीनाशक 3 पेक्षा जास्त वेळेस वापरू नये. 
 
केळी पिकावरील सिगाटोका नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करावी.
 
केळी पिकावर सिगाटोकाची लक्षणे दिसून आल्यानंतर देखील वरीलप्रमाणे क्रमाने आलटून पालटून बुरशीनाशकांची फवारणी घेता येईल. वातावरण सिगाटोकासाठी पोषक असतांना वरील फवारण्या कमी दिवसांच्या अंतराने घ्याव्यात तसेच जमिनीतून ट्रायक्लाझोलकिंवा बावीस्टिन 250 ग्रॅम प्रति 1000 खोडांस ड्रिपद्वारे द्यावे. तसेच बॅसिलस सबटिलसचा वापर जमिनीतूनदेखील 200 ग्रॅम प्रति 1000 खोडांसाठी ड्रिपद्वारे करावा.
 
 
 लागवडी नंतर दिवस बुरशी नाशक   एफआरएसी कोड  प्रतिकारक शक्ती धोका प्रमाण प्रती लि. 
 20-30 दिवस  कॉपर ऑक्सिक्लोराइड  एम 1  कमी  1.5 ते 2 ग्रॅम
 30-60 दिवस  क्लोरोथॅलोनिल  एम 5  कमी  1 ते 1.5 ग्रॅम
 80-100 दिवस  हेक्झाकोनॅझोल व मॅन्कोझेब  3 व एम 3  मध्यम व कमी  1 ते 2 ग्रॅम
 120-150 दिवस  क्लोरोथॅलोनिल  एम 5  कमी  1 ते 1.5 ग्रॅम
 --  बॅसिलस सबटिलस --   --  0.5 ते 1 ग्रॅम
 160-180 दिवस  कॉपर ऑक्सिक्लोराइड  एम 1  कमी  1.5 ते 2 ग्रॅम
 210-240 दिवस  हेक्झाकोनॅझोल व मॅन्कोझेब  3 व एम 3  मध्यम व कमी  1 ते 2 ग्रॅम
 --  बॅसिलस सबटिलस  --  --  0.5 ते 1 ग्रॅम
 
 
प्रा. हर्षल. डी. पाटील,
प्रा. हर्षल. डी. पाटील,