लिंबूवर्गीय पिकावरील रोग व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    26-Sep-2019
लिंबूवर्गीय पिकावरील प्रभावीपणे नियंत्रणासाठी रोगाची लक्षणे, रोगास अनुकूल घटक व त्यावरील उपाययोजना कशी करावी यासंबंधी माहितीचा समावेश या लेखात केला आहे.
 
भारतामध्ये लिंबूवर्गीय फळांचे क्षेत्र 789.10 हजार हेक्टर असून, त्यापैकी लिंबाखालील 286.30 हजार हेक्टर, मोसंबीखालील 288 हजार हेक्टर व संत्राखालील 214.80 हजार हेक्टर इतकी आहे. देशातील लिंबूवर्गीय पिकाच्या लागवडीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर (161.3 हजार हे.) असून उत्पादना बाबतीत आंध्र प्रदेशचा प्रथम क्रमांक लागतो. त्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो, तर कर्नाटक राज्यात लागवड सर्वांत कमी (11.7 हजार हे.) असून उत्पादकतेमध्ये मात्र प्रथम क्रमांक (21.4 टन/हे.) लागतो.
 
लिंबू हे साधारण हलक्या जमिनीपासून भारी जमिनीत येते, मात्र संत्री हे मध्यम, भारी जमिनीत मुक्त चुन्याचे (उरउे3)चे प्रमाण 3 ते 5% असल्यास संत्र्याचे उत्पादन चांगले येते. मोसंबीला देखील लिंबाप्रमाणे मध्यम काळी जमीन चांगली ठरते. 30 वर्षांपूर्वी आजारी लोकांनीच फक्त मोसंबी खावी अशी प्रथा होती. पण आता उत्पन्नाचे स्रोत वाढल्याने सामान्य माणूसदेखील मोसंबी हे आपल्या फळ आहारात समाविष्ट करू लागला आहे. महाराष्ट्रात डिंक्या, कोरडी मुळसड, फांद्या वाळणे, फळगळ व फळसड इ. बुरशीजन्य ग्रीनिंग व देवी हे जीवाणूजन्य आणि ट्रिस्टीझा, मोझोक, रिंगस्पॉट व एकसोकॉरंटीस हे विषाणूजन्य रोग आढळून आलेले आहेत. या प्रमुख रोगांची कारणे, लक्षणे आणि उपाययोजना या लेखात दिल्या आहेत.
 
1) डिंक्या : डिंक्या हा रोग मोसंबी, संत्रा व कागदी लिंबावर येणारा प्रमुख बुरशीजन्य रोग आहे. लिंबुवर्गीय बागेचा र्‍हास होण्यामध्ये या रोगाचा मोठा वाटा आहे. या रोगाची लागण झाल्यामुळे झाडांची उत्पादकता कमी होते व रोगाच्या तीव्रतेनुसार झाडांचा र्‍हास होतो. त्यामुळे आर्थिक नुकसान होते.
 
रोगाची कारणे : हा रोग फायटोफ्थोरा पालमिव्होरा, फायटोफ्थोरा सिट्रीफ्थोरा व फायटोफ्थोरा निकोशियाना या प्रमुख बुरशीमुळे होतो. या बुरशीचे वास्तव्य जमिनीमध्येच असते. या बुरशीचे जिवाणू व गाठी उष्ण हवामानातही जमिनीत तग धरून राहतात. पावसाळ्यामध्ये ओलसर वातावरणात बीजपिशवी तयार होऊन त्यातून अस्पोअर्स बगीचातील पाण्यात पोहत राहतात व पसरतात. हे झाडाच्या मुळांच्या उतीत प्रवेश करून धाग्यासारख्या बुरशीच्या तंतुरूपात विकसित होऊन पुढे पुन्हा नवी पिढी तयार होते. अशाप्रकारे जोपर्यंत मातीत बीज आहेत, तोवर या रोगांची निर्मिती ओलसर वातावरणात सुरूच राहते.
 


 

लक्षणे :
 
या रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडाच्या बुंध्याची साल फाटून त्यातून डिंक स्त्रवतो, त्यामुळे त्याला ’डिंक्या’ हे नाव आहे. त्याचा रोपे व बागेतील झाडांना प्रादुर्भाव होतो. रोपवाटिकेतील रोपाच्या मुळांना रोगाची लागण होऊन मुळे कुजतात. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडून गळतात. रोगाची तीव्रता वाढल्यावर जमिनीलगत खोडे कुजतात व रोपे कोलमडून मरतात. रोगग्रस्त पण न मेलेल्या रोपट्याच्या खोडावर डिंक स्त्रवतो. बागेमधील झाडांची तंतुमय मुळे, जमिनीलगतचे खोड व सोटमुळे खोड, फांद्या, झाडाच्या जमिनीलगतच्या फांद्यावरील पाने व फळे यांना रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रत्येक प्रादुर्भावित भागावर दिसणारी लक्षणे वेगळी असतात. तंतुमय मुळे, जमिनीलगत खोड व मुळांना प्रादुर्भाव जमिनीखाली होत असल्यामुळे लवकर लक्षात येत नाही. पण खोड, फांद्या व फळे यावरील प्रादुर्भाव लवकर लक्षात येतो. फळे सोडून झाडांच्या कोणत्याही भागावर प्रादुर्भाव झाला तरी त्याची लक्षणे पानाच्या शिरा पिवळसर होऊन दृश्य होते. पुढे पिवळेपणा वाढून पानगळ होते व फांद्या शेंड्याकडून खाली वाळतात व शेवटी रोगाच्या तीव्रतेनुसार झाडाचा र्‍हास होतो. तंतुमय मुळास प्रादुर्भाव झाल्यामुळे, ती कुजतात व त्यांची साल सहज अलग होते. मुळे सडल्यामुळे अन्न व पाणी शोषणाच्या क्रियेत अडथळा निर्माण होतो. त्याचा परिणाम पाने पिवळी पडून गळतात व फांद्या शेंड्याकडून मरू लागतात. झाडाची सर्व बाजूची मुळे सडली तर झाडे खुरटी राहून, पाने गळतात व झाडांचा र्‍हास लवकर होतो. जमिनीलगत खोड व मुळांना लागण झाली, तर त्यांची साल सडू लागते. त्यावरून जमिनीत बुरशीची वाढ झालेली आहे असे समजते. पुढे जमिनीलगत खोडाची साल चोहोबाजूने सडून, त्याची पानावर लक्षणे दिसून झाडांचा र्‍हास लवकर होतो. खोडावर व फांद्यावर लागण झाल्यास त्या ठिकाणापासून डिंकाचा स्त्राव सुरू होतो. काही वेळा खोडावर स्त्रावांमुळे तेलकट डाग दिसतात. प्रादुर्भावित खोडे व फांद्यावरील साल कुजते. नंतर ती कठीण होते. ती निरोगी सालीपासून वेगळी होते. निरोगी सालीच्या कडा जाड होतात. त्यामुळे प्रादुर्भाव पसरण्यास अटकाव होतो. पावसाळ्यात जमिनीलगतच्या फांद्यावरील पाने व फळांना या बुरशीची लागण झाली तर पाने करपतात व फळे सडून गळतात. फळ सडीस ’ब्राउन रॉट’ असे म्हणतात.
 
प्रसार : या बुरशीचा प्रादुर्भाव जमिनीद्वारे होतो. रोपवाटिकेतील रोगग्रस्त रोपाद्वारे हा रोग बागेत येतो. अशा प्रसारास प्राथमिक प्रसार असे म्हणतात. बागेत रोगग्रस्त झाडाबरोबर आलेली बुरशी वाढून, निरोगी झाडांना प्रादुर्भावित करते. त्यास दुय्य्स प्रसार असे म्हणतात. हा प्रसार पावसाचे व भिजवणीच्या प्रवाहित पाण्याद्वारे होतो, तसेच पावसाच्या थेंबामुळे उडणार्‍या मातीच्या कणास झुस्पोअर्स असतात, ते खोडावर, फांद्यावर जमिनीलगतच्या फांद्यावरील पाने व फळावर पडून त्यांना प्रादुर्भाव होतो.
 
रोगास अनुकूल घटक :
1) रोगाला बळी पडणार्‍या मातृवृक्षाचा खुंट म्हणून वापर.
2) रोगग्रस्त झाडाच्या बुडाचा डोळाबांधणीसाठी वापर.
3) कमी उंचीवर डोळा बांधणे.
4) बगीचा, वाफ्यात बराच काळ पाणी साचून राहणे व त्याचा संबंध झाडाच्या बुंध्याशी येणे.
5) रोपवाटिकेसाठी तीच ती जमीन वारंवार वापरणे.
6) रोगग्रस्त, जुन्या बागीचाशेजारीच रोपवाटिका असणे.
 
डिंक्या रोगाच्या बंदोबस्ताकरिता खालील उपाययोजना अमलात आणावी.
 
1) फळबाग भारी जमिनीत नसावी.
2) कलमाचा खुंट शक्य तो रंगपूर लिंबू जातीचा असावा.
3) कलमयुतीचा भाग जमिनीच्या वर असावा.
4) डोळा साधारणत : 30 से.मी. उंचीवर बांधलेला असावा.
5) ओलीत करताना दुहेरी आळे पद्धतीचा वापर करावा.
6) पाण्याचा उत्तम निचरा ठेवावा.
7 ) ज्या ठिकाणाहून डिंक ओघळतो तेथील साल झाडाच्या आतील भागास इजा नाही अशा प्रकारे पटाशीद्वारे खरवडून काढावी. नंतर 1% पोटॅशियम परमँगनेट या द्रावणाने धुवून काढावी व बोर्डोमलम लावावे.
8 ) तरीही प्रादुर्भाव आढळल्यास जखमेवर पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर 50 ग्रॅम मेटॅलॉफ्झिल 1 लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण लावावे.
9 ) संपूर्ण झाडावर फॉसीटिल एएल 20 ग्रॅम/10 लिटर पाणी या द्रावणाची झाडाच्या वयानुसार फवारणी करावी.
10 ) पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर बोर्डोमलम जमिनीपासून 1 मीटर उंचीपर्यंत लावावे.
 

 
आरोह (डायबॅक)
 
रोगाची कारणे :
 
अयोग्य जमिनीची निवड : या पिकास हलकी, मध्यम व चुनखडीविरहित जमिनीची आवश्यकता असते, परंतु अभ्यासाअंती असे दिसून आले की, बहुतेक ठिकाणी मोसंबीची लागवड ही अतिभारी, चुनखडीयुक्त किंवा क्षारयुक्त जमिनीत झालेली आहे. वेगवेगळया नदीच्या, ओढ्याच्या काठावरील काळ्या किंवा पोयट्याच्या जमिनीत ही लागवड आहे व अशा जमिनीत माती व पाण्याद्वारे वाढणार्‍या बुरशीचीदेखील वाढ झपाट्याने होते. सारांशाने अयोग्य अशा जमिनीतील लागवड या रोगास कारणीभूत आहे.
 
पाण्याचा अयोग्य वापर : पूर्वी पाणी हे मोटेद्वारे मर्यादित प्रमाणात दिले जात असे. अलीकडे मात्रा इलेक्ट्रिक मोटारीद्वारे अमर्याद पाणी अयोग्य पद्धतीने दिले जाते. झाडाचा बुंधा सतत पाण्याच्या संपर्कात राहिल्याने फायटोपथेरा नावाच्या बुरशीचा प्रादुर्भाव व प्रसार फार झपाट्याने आणि मोठ्या प्रमाणावर होतो आणि एका रोगट झाडापासून अनेक झाडांस रोग लागण्यास पाणीसंपर्क कारणीभूत ठरतो. त्याचप्रमाणे अति पाण्यामुळे जमिनीच्या खालच्या थरातील क्षार वर येतात व जमिनीत हवा खेळती न राहिल्यामुळे जमिनीत कर्ब नत्राचे प्रमाणदेखील समतोल राहत नाही. पर्यायाने जमिनीचा सामू हा विम्लतेकडे झुकतो. त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता होऊन झाडावर त्याची विपरीत लक्षणे दिसू लागतात. झाड कमजोर होऊन वेगवेगळया रोगांना सहज बळी पडते.
 
अशास्त्रीय आंतरमशागत : यामध्ये लोखंडी नांगर किंवा ट्रॅक्टरद्वारे खोल व अगदी झाडाच्या बुंध्यापर्यंत नांगरणी, वखरणी, मोडगणी करीत असताना झाडाच्या मुख्य मुळ्यांना जखमा होणे, दुय्यम मुळ्या तुटणे किंवा उपसून बाहेर येणे, बर्‍याच वेळा झाड फाटणे अथवा मुख्य मुळ्या फाटाळणे किंवा तुटणे असे प्रकार घडतात आणि त्यामधून जमिनीद्वारे पसरणार्‍या रोगजंतूंचा शिरकाव होऊन झाडे रोगग्रस्त होतात.
 
सेंद्रिय खताचा अभाव व असेंद्रिय खतांचा वापर : शेणखत किंवा सेंद्रिय खताऐवजी आता सरळ असेंद्रिय खताचा वापर करतात की, ज्यामध्ये प्रामुख्याने युरिया किंवा मिश्रखतांचाच भर असतो. त्यामुळे काही अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी होतो, तर काही अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढून झाडातील रोगप्रतिकारक शुक्ती कमी होते व झाड झपाट्याने रोगास बळी पडते.
 
पीकसंरक्षणाचा अभाव : इतर पिकांप्रमाणे मोसंबीवर कुठल्याच पीकसंरक्षण उपायाचा वापर केला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे रोग/कीडग्रस्त बागांवर रोगकिडीची तीव्रता सतत वाढत जाऊन झाडावर 10 ते 80 टक्क्यांपर्यंत डायबॅकची तीव्रता क्रमाक्रमाने वाढून काही दिवस झाड टिकते व नंतर पूर्णपणे वाळते.
 
रोपांची निवड: रोगमुक्त मातृवृक्षापासून रंगपूर खुंटावर तयार केलेली रोपे निवडावीत.
वरील सहा प्रमुख कारणांव्यतिरिक्त इतर कारणेदेखील आहेत. त्यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो.
1 अयोग्य रोपांची निवड
2 बहर धरतेवेळेस पाण्याचा अवाजवी जास्तीचा ताण
3 एका वेळेस दोन किंवा तीन बहरांची फळे धरणे
4 फळधारणेच्या काळात पाण्याचा अभाव असणे
5 जमिनीच्या मगदुराप्रमाणे किंवा झाडाच्या गरजेनुसार पाणी न देणे
6 आजारी झाडावर आवश्यकतेपेक्षाजास्त फळे धरणे
7 अपुरा खताचा पुरवठा
8 सूक्ष्म अन्नद्रव्याचा अभाव
9 सूत्रकृमीचा प्रादुर्भाव
10 रोगकिडीपासून वेळीच नियंत्रण न करणे
 
2) ट्रिस्टीझा: हा एक विषाणूजन्य रोग असून, लिंबुवर्गीय झाडाचा र्‍हास होण्यामध्ये याचा मोठा वाटा आहे. रोगाची झाडास लागण झाल्यानंतर विषाणू नष्ट करण्यासाठी अजून उपाय सापडलेला नाही. पण एकात्मिक पद्धतीने रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित झालेले आहे.
 
नुकसान: भारतासह इतर अनेक देशांत या रोगामुळे लिंबुवर्गीय फळबाग संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आहेत. त्यामुळे बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे.
 
रोगाचे कारण:
हा रोग ट्रिस्टीझा नावाच्या विषाणूमुळे होतो. हा विषाणू झाडाच्या सालीतील फ्लोयम नावाच्या उतीस प्रादुर्भावित करतो, त्यामुळे मुळास अन्नपुरवठा होत नाही व मुळे अशक्त होऊन अकार्यक्षम होतात. त्यामुळे झाडास पाण्याचा ताण पडून झाडे र्‍हास पावतात.
 
 
 
रोगाची लक्षणे:
 
पिकांची जात, विषाणूची प्रजात व हवामान इ. कारणांमुळे या रोगाच्या लक्षणांमध्ये मोठ्या प्रमाणावर विविधता आढळून येते. प्रादुर्भावित झाडांच्या पानावर येणारे लक्षण स्पष्ट दिसेल असे नसते. परंतु पानांचा हिरवागारपणा व चमक कमी होऊन संपूर्ण झाड मलुल झालेले दिसते. अशा झाडाची पाने संपूर्णपाने थोड्या कालावधीत गळून जातात व झाडांचा र्‍हास होतो. र्‍हास झालेल्या झाडावरील फळे न गळता लटकलेली राहतात. दुसर्‍या प्रकारात प्रादुर्भावित झाडाची पाने मलुल होऊन, ते शिरासहित पिवळी पडून हळूहळू गळतात. त्यामुळे झाडावरील पाने विरळ होतात. फांद्या शेंद्याकाधून मरण्यास सुरुवात होते व झाडांचा र्‍हास मंद गतीने होतो. रोगग्रस्त झाडांना निरोगी झाडापेक्षा अधिक फुले व फळे लागतात. ते आकाराने लहान राहून अकाली पिवळी पडतात. पण गळत नाहीत. रोगग्रस्त होऊन र्‍हास पावलेल्या झाडाच्या खोडावर खड्डे पडलेल दिसतात.
 
जीवनक्रम : हा संपूर्ण परोपजिवी विषाणू असून तो लिंबूवर्गीय पिकांना प्रादुर्भावित करून, त्या पिकांची झाडे जिवंत असेपर्यंत त्यांच्या फ्लोअम पेशीमध्ये वाढतो. झाडाचा र्‍हास होण्यापूर्वी मावा या किटकाद्वारे याचे संक्रमण निरोगी झाडावर होते व रोगाची लागण होते. अशा तर्‍हेने या विषाणूच्या पिढ्या लिंबूवर्गीय पिकांवर वाढतात.
 
प्रसार : या रोगाचा प्रसार दोन प्रकारे होतो. प्राथमिक प्रसार रोगापासून रोगग्रस्त रोपाद्वारे होतो. अशा रोगग्रस्ट रोपापासून बागेतील निरोगी झाडांना माव्यामुळे होणार्‍या प्रादुर्भावास दुय्यम प्रसार म्हणतात. तपकिरी व काळा मावा या रोगाचा प्रसार बागेत फार झपाट्याने करतात. तसेच रोपावटिकेत व बागेत वापरात येणार्‍या अवजाराद्वारेसुद्धा रोगाचा प्रसार होतो.
 
व्यवस्थापन : या रोगांचे एकात्मिक पद्धतीने क्वारंटाइन, प्रमाणीकरण, निर्जंतुकीकरण, रोगवाहक मावा किडीचे नियंत्रण व प्रतिसंरक्षण इ. घटकांचा वापर करून उत्तमरीत्या व्यवस्थापन केले जाऊ शकते.
1) कायद्याद्वारे दुसर्‍या देशातील ट्रिस्टीझाग्रस्त रोपे किंवा रोपे करण्यासाठी लागणार्‍या कळ्या आपल्या देशात आणण्यासाठी प्रतिबंध करणे.
2) निरोगी रोपे तयार व्हावेत महणून मातृवृक्ष रोगमुक्त असल्याचे प्रमाणीकरण व त्यापासून तयार झालेली रोपे रोगमुक्त असल्याचे प्रमाणीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच रोपे बंदिस्त मावाविरहित रोपवाटिकेत करणे गरजेचे आहे.
3) रोप तयार करण्यासाठी व बागेत वापरात येणार्‍या औजारांचे निर्जंतुकीकरण सोडियम हायपोक्लोराइडच्या 1 ते 2 टक्के द्रावणात करावे.
4) ट्रिस्टीझावाहक मावा किडींचे आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करून नियंत्रण करावे. फवारणीसाठी प्रत्येक वेळी वेगळे औषधे वापरावे.
 
3) ग्रीनिंग : हा रोग लिबरीबॅक्टर आशीयाटिक्स नावाच्या अतिसूक्ष्म जिवाणूमुळे होतो. त्यामुळे मुळांना अन्नपुरवठा होत नाही. मुळे कमजोर होऊन झाडाच्या जमिनीवरील भागास पाणी व अन्न योग्यरीतीने पोेचविण्यास असमर्थ होतात. त्यामुळे झाडे र्‍हास पावतात.
 
 
 
लक्षणे: 
ह्याचे प्रथम लक्षण प्रादुर्भावित पानावर चट्ट्याच्या रूपाने दृश्य होते. हे पानाच्या दोन्ही बाजूस कमी अधिक प्रमाणात असतात. रोगग्रस्त काही पानावर एक किंवा अधिक इंग्रजीतील ’व्ही’ आकाराच्या खाचा तयार होतात. काही वेळा पानाच्या खालच्या बाजूच्या शिरा फुगतात. त्यानंतर शिरांमधील पानाचा भाग पिवळा होण्यास सुरवात होते. हा पिवळेपणासुद्धा मध्यशिरेच्या दोन्ही बाजूस सारखा नसतो. पाने शेवटी संपूर्णपणे पिवळी होतात. त्यापैकी बर्‍याच पानावर अनेक हिरवे ठिपके आढळतात. रोगट पाने आकाराने लहान राहून ती फांद्यावर उभट सरळ होतात. फांद्याची कांदे आखूड झाल्यामुळे पानाचा सौम्य गुच्छ झालेला दिसतो. शेवटी रोगग्रस्त पाने फांद्याच्या शेंड्याकडून गळण्यास प्रारंभ होतो व फांद्या शेंड्याकडून वाळण्यास सुरुवात होते. झाडांची एक किंवा एकापेक्षा अधिक फांद्या किंवा संपूर्ण झाड रोगग्रस्त होऊ शकते. रोगग्रस्त झाडे खुरटी राहतात व लागण झाल्यापासून 5 ते 8 वर्षांत त्यांचा र्‍हास होतो. रोगग्रस्त झाडास लागलेली फुले व फळे अकाली गळून जातात. फळे आकाराने लहान राहून त्यांची वाढ असमतोल होते. फळातील बिया काळ्या पडून नष्ट होतात. फळातील रसाची चव कडू होते. रोगग्रस्त झाडावरील फळांचा उन्हाकडील भाग पिवळा व सावलीतील किंवा पानात झाकलेला भाग गडद हिरवा राहतो. फळांच्या गडद हिरवेपणामुळे या रोगास ’ग्रीनिंग’ असे म्हणतात.
 
प्रसार : प्राथमिक लागण रोगग्रस्त मातृवृक्षापासून तयार केलेल्या रोपांद्वारे होते. अशा रोगग्रस्त रोपाची शेतात लागवड झाल्यानंतर त्यापासून रोगाचा प्रसार ’सायला’ नावाच्या किडीद्वारे मोठ्या प्रमाणात होतो. या किडीची, पिले जिवाणू घेतात व प्रौढ झाल्यावर निरोगी झाडास रोगाची लागण करतात. रोगग्रस्त प्रौढ त्यांच्या जीवनभर रोगाचा प्रसार करीत असतो. या किडीशिवाय बागेत व रोपवाटिकेत वापरण्यात येत असलेल्या औजाराद्वारेही या रोगाचा प्रसार होतो.
 
व्यवस्थापन : या रोगाचे खालील घटकांचा एकात्मिक पद्धतीने अवलंब करून व्यवस्थापन केल्यास, रोग नियंत्रणात राहून रोगग्रस्त झाडाचे आयुष्य 5 ते 8 वर्षे वाढविणे शक्य आहे.
1) क्वारंनटाइन : रोगग्रस्त रोपे किंवा रोगग्रस्त झाडांचे डोळे, रोगमुक्त राज्यात किंवा देशात आणणे व नेणे यावर कायद्याने प्रतिबंध करणे.
2) रोगमुक्त रोप तयार करणे : यासाठी रोपे बंदिस्त रोपवाटिकेत तयार करणे गरजेचे आहे. याशिवाय मातृवृक्ष व तयार होणारी रोपे रोगमुक्त असल्याचे प्रमाणित करणे व त्यासाठीच्या तांत्रिक सोयी उपलब्ध करणे आवश्यक आहे.
3) छाटणी : रोगग्रस्त फांद्या 30 ते 40 से. मी. निरोगी फांदीसह छाटाव्यात, झाड संपूर्ण रोगग्रस्त असेल तर काढून नष्ट करावे.
4) सायालाचे नियंत्रण : प्रत्येक नवीन पालवी फुटण्याच्या वेळी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने कोणत्याही आंतरप्रवाही कीटकनाशकाच्या दोन फवारण्या कराव्यात. प्रत्येक फवारणीत एकच कीटकनाशक वापरू नये.
5) टेट्रासायक्लीन 600 पीपीएमची (6 ग्रॅम/10 लि. पाण्यात) जानेवारी ते मार्च महिन्यात फवारणी करावी.
4) देवी : देवी हा जिवाणूजन्य रोग असून, याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर लिंबू पिकावर महाराष्ट्रात होतो. मोसंबी व संत्रा पिकावर प्रादुर्भाव अगदी नगण्य आढळून येतो.
 
रोगाचे कारण : हा रोग ’झाँन्थोमोनास अ‍ॅक्झोनोपोडीस’ पीव्ही सीट्री या अणूजिवामुळे होतो.
 
रोगाची लक्षणे :
या रोगाची लक्षणे पाने, कोवळ्या फांद्या आणि फळावर दिसतात. देवीच्या फोडाची सुरवात अतिशय लहान ठिपक्याने होते ते आकाराने 3 ते 10 मिमीपर्यंत वाढतात. फोड सुरवातीस वर्तुळाकार असतात. मोठे झाल्यावर ते आकाराने अनियंत्रित होतात. फोडाचा आकार पिकाची जात, पानाचे वय व हवामानावर अवलंबून असतो. कागदी लिंबावरील फोड आकाराने मोठे व स्पष्ट दिसणारे असतात. फोडांच्या भोवती पिवळी वर्तुळे तयार होतात. फोडांचे संख्या जास्त झाल्यास ती एकमेकांत मिसळून मोठी व अनियमित आकाराचे चट्टे तयार होतात. अशी तीव्र रोग असलेली पाने व फळे अकाली गळतात. कोवळ्या फांद्या शेंड्याकडून खाली वाळत जातात. फळावर आलेली फोडे फक्त फळाच्या सालीवर असतात. त्यांचा फळाच्या फोडी व रसाच्या गुणवत्तेवर काहीही परिणाम होत नाही.
 
जिवाणूचा जीवनक्रम : जिवाणू रोगग्रस्त पाने, फांद्या व फळे जोपर्यंत झाडावर असतात तोपर्यंत त्यात जिवंत राहतात. जमिनीवर पडलेल्या रोगग्रस्त झाडाच्या अवशेषामध्ये ते काही महिने जिवंत राहतात. त्यामुळे या रोगाचा प्रसार जमिनीद्वारे होत नाही. रोगग्रस्त झाडापासून निरोगी झाडांना लागण होते. अशा तर्‍हेने जिवाणूंचा जीवनक्रम सुरू राहतो.
 
रोगाचा प्रसार : रोगाचा प्रसार प्रामुख्याने पावसाचे थेंब, पाने पोखरणारी अळी व अवजारांद्वारे होतो.
1) रोगग्रस्त झाडावर पाऊस पडून उडणारे थेंब, ज्यात जिवाणू असतात, वार्‍याबरोबर वाहत जाऊन शेजारील झाडावर पडून रोगाचा प्रसार होतो.
2) पाने खाणारी अळी या रोगाचा प्रसार करते.
3) रोपवाटिकेत किंवा बागेत वापरत येणार्‍या औजाराद्वारेसुद्धा या रोगाचा प्रसार होतो.
4) रोगग्रस्त रोपवाटिकेत काम करणार्‍या मजुरांद्वारेसुद्धा रोगाची लागण होऊ शकते.
 
हवामान : या रोगास पावसाळ्यातील उष्ण, दमट व ढगाळ व आर्द्रतायुक्त हवामान अतिशय अनुकूल असते.
 
रोगाचे व्यवस्थापन :
 
1) निरोगी रोपे लागवडीस वापरावीत.
2) रोगग्रस्त पाने, फळे वेचून नष्ट करावीत. तसेच रोगग्रस्त फांद्याची छाटणी करून त्या नष्ट कराव्यात
3) पावसाळा सुरू होताच कॉपर ऑक्सिक्लोराईद (30 ग्रॅम) अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन (1 ग्रॅम) 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा 1 टक्का बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी. रोगाची तीव्रता व पावसाच्या प्रमाणानुसार 1 महिन्याच्या अंतराने 4 फवारण्या पावसाळ्यात कराव्यात. नवीन पालवी आल्यावरसुद्धा फवारण्या कराव्यात.
4) पाने पोखरणार्‍या अळीचे नियंत्रण करावे.
5) मोसंबी फळगळ
 

 
 
मोसंबीमध्ये फळधारणेनंतर 15 ते 20 दिवसांत एकदा व काढणीपूर्वी एक ते दीड महिन्यात दुसर्‍यांदा अशा फळगळीच्या दोन लाटा येतात. मोसंबीमध्ये प्रामुख्याने आंबिया बहरच मोठ्या प्रमाणात घेतला जात असल्यामुळे पहिली लाट ही फेब्रुवारी-मार्चदरम्यान, तर दुसरी लाट ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये येते. मोसंबीमध्ये फळगळीची प्रामुख्याने खालील कारणे आहेत.
 
नैसर्गिक फळगळ : ही फळगळ झाडांमध्ये आवश्यक असते, कारण झाड प्रमाणाबाहेरील फुलांची गळ करते.
 
प्रतिकूल हवामान : वाढते तापमान, त्यात होणारे अचानक बदल, अवेळी पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे फुलगळ व फळगळ होते. पावसाच्या दिवसांत पाण्याचा कमी निचरा होणार्‍या बागेत पाणी साचते. अशावेळी जमिनीची पाण्याची पातळी वर येते. पर्यायाने मुळांना हवा न मिळाल्याने पांढर्‍या मुळ्यांचा नाश होतो. फळातील रसशोषण करणारे पतंग फळास छिद्र पाडून फळातील रस शोषतात. छिद्रातून नंतर बुरशीचा फळात प्रवेश होतो. त्यामुळे फळ सडते व सडलेले फळ गळून पडते.
1 अयोग्य अशा आंतरमशागतीच्या पद्धतीमुळे
2 संजीवकांच्या असमानतेमुळे
3 अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे
4 रोग व किडींच्या प्रादुर्भावामुळे
5 ऍबसिशन लेअरमुळे
 
उपाय :
 
आपल्याकडे प्रामुख्याने आंबिया बहर घेतला जात असल्यामुळे बाजरी ते वाटाण्याच्या आकाराची फळे फेब्रुवारीमध्ये तयार होतात. एकदम ऊन वाढल्यामुळे व जास्त तापमानामुळे फळांतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, त्यामुळे लगेच फळांच्या देठांत ऍबसिशन लेअर तयार होऊन फळगळ होते. यासाठी बागेत ठिबक जरी केलेले असले, तरी दोन-तीन पाण्याच्या पाळ्या मोकाट पद्धतीनेच द्याव्यात, जेणेकरून बागेत गारवा राहण्यास मदत होईल. यामुळे काही प्रमाणात फळगळीवर नियंत्रण राखता येईल, तसेच गारवा राखण्यासाठी व उन्हाच्या झळींपासून कोरड्या हवेच्या संरक्षणासाठी बागेभोवती उंच वाढणारी वाराप्रतिबंधक झाडे लावावीत. बागेमध्ये शिफारशींप्रमाणे सर्व खतमात्रा मुळांच्या पसार्‍यापर्यंत योग्य पद्धतीने द्याव्यात. याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा गरजेप्रमाणे जमिनीतून, तसेच फवारणीतून वापर करावा. बागेमध्ये एकदा ताण संपल्यानंतर फुले-फळे लागतात, या काळात कोणत्याही कारणाने जारवा तुटेल, अशी खोल मशागत करू नये. हा सुरवातीचा काळ नवीन फुटीचा असल्यामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव मोठा होतो, म्हणून रोग व कीडनाशकांची योग्य प्रमाणात फवारणी करावी. अन्नद्रव्यांचा समतोल राखून, तसेच ऑक्सिजनसारख्या संजीवकाचा वापर करून फळगळीचे नियंत्रण करता येते. मोसंबी बागांना उन्हाचा चटका जाणवायला सुरवात झाल्यास, वरील उपायांबरोबर खालील काही बाबींचा वापर करावा.
 
1 शिफारशीप्रमाणे खतांच्या व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा द्याव्यात.
2 पाण्याच्या पाळ्या योग्य देऊन बागेत गारवा राहील, याची काळजी घ्यावी.
3 फळे वाटाण्याच्या आकाराची असताना 15 (पंधरा) पीपीएम एनएए + एक ग्रॅम कार्बेन्डॅझिम प्रतिलिटर पाणी+एक टक्का युरिया यांच्या पंधरा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. याप्रमाणे व्यवस्थापन केल्यास फळगळीचे चांगले नियंत्रण मिळविता येऊ शकते.
 
प्रा. पी. बी. खैरे,
प्रा. एल. जी. हाके