संवर्धित शेतीतून संकटाशी सामना

डिजिटल बळीराजा-2    23-Sep-2019

 
 
शेतकर्‍यांना सतत कोणत्या ना कोणत्या संकटाला सतत सामोरे जावे लागते. यात मानवनिर्मित व निसर्गनिर्मित अशा दोन प्रकारची संकटे असतात. निसर्गनिर्मित संकटात महापूर, अवर्षण, वादळ, अवकाळी पाऊस, गारपीट, हवेतील अचानक उष्ण व थंड लहर, कीड, रोग वगैरेंचा उल्लेख करावा लागेल. मानवनिर्मितमध्ये अतिरिक्त उत्पादनामुळे दर कोसळणे, कारण नसताना आयात, निर्यातबंदी, आयात-निर्यातीवरील कर धोरणे, जमिनीची सुपीकता, सुधारित ज्ञानाचा अभाव वगैरे संकटांचा उल्लेख करावा लागेल. हवामानबदल असे एक नवीन येऊ घातलेले संकट हे नैसर्गिक असले तरीही मानवनिर्मित म्हणावे लागेल. ही सर्व संकटे एकावेळी येत नाहीत, परंतु प्रतिवर्षी कोणते ना कोणते संकट असतेच. सर्व काही आलबेल असे वर्ष अपवादात्मक म्हणून शोधावे लागेल. तरीही शेतकरी सालोसाल शेती करीत आला आहे. एखाद्या वर्षी सर्वच पिके संकटात सापडली असे होत नाही. आलटून पालटून वेगवेगळी पिके केंव्हा संकटात सापडतात, केंव्हा चांगले उत्पादन मिळून शेतकरी सावरला जातो. पुढील चांगले उत्पादन मिळून शेतकरी सावरला जातो. पुढील चांगल्या उत्पादनाच्या आशेने पुन्हा नवीन उभारी घेऊन दरवर्षी शेतकरी पीक पेरत असतो. अशा संकटांना शेतकर्‍याला तोंड देणे शक्य व्हावे, यासाठी काय करता येणे शक्य आहे, त्यावर या लेखात आपण अभ्यास करणार आहोत.
 
यावर उपाय म्हणजे शेतीचा उत्पादन खर्च कमीत कमी करण्याचा प्रयत्न करणे. उत्पादन खर्च कमी म्हणजे उत्पादन कमी असे नव्हे. खर्च कमी ठेवून वाजवी अगर चांगले उत्पादन मिळाले, तरच शेतकरी बर्‍यापैकी संकटाला तोंड देऊ शकेल. एखादे वर्षी अजिबात उत्पादन मिळाले नाही तरी होणारे नुकसान सोसण्याची पातळीत ठेवता आले पाहिजे. संवर्धित शेती हाच एकमेव पर्याय आज आपल्यापुढे आहे. संवर्धित शेती म्हणजे संसाधनांचा कमीत कमी वापर करून केलेली शेती. आपण जे जे शेतीत काम करतो त्या प्रत्येक कामाला दोन प्रश्न विचारावेत. आपण जे काम करतो ते पिकाच्या उत्पादनाला मदत करणारे आहे का की परंपरा, शेजारी करतो म्हणून करतो. या प्रश्नांच्या शोधयात्रेतून शेतातील काही कामे आपणाला बंद करून टाकता येतील. दुसरा प्रश्न आता एखाद्या कामासाठी आपण जो खर्च करीत आहे त्याला सोपा स्वस्त/सुलभ काही पर्याय आहे का? सुरवातीला हे केवळ अशक्य वाटेल. परंतु सतत चिंतन करीत राहिल्यास प्रत्येक कामासाठी स्वस्त पर्याय सापडू शकतात हे मी अनुभवाने सांगू शकतो. 
 
उत्पादन पातळी कमी झाल्याने त्याच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जमिनीची सुपीकता कमी झाली म्हणजे नेमके काय झाले. पूर्वी जमीन उत्तम उत्पादन देत होतो. त्या वेळी त्यात काय होते, व आता कमी उत्पादन देती म्हणजे त्यात नेमके काय कमी झाले, याचा वैज्ञानिक शोध घेतला असता जमिनीत सेंद्रिय कर्बाची टक्केवारी कमी झाल्याने उत्पादकता कमी झाली आहे, हे ध्यानात आले आहे. आता सेंद्रिय कर्बाची टक्केवारी वाढविण़्याच्या मार्गाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. प्रचलित पद्धतीत सेंद्रिय पदार्थाच्या व्यवस्थापनात चांगले कुजलेले 20 ते 25 गाड्या शेणखत, कंपोस्ट खत, जमिनीला देणेही शिफारस आहे. 1990 च्या सुमारास या मार्गाने कितीही वाटचाल केली तरी आपण आपल्या फक्त फेरपालटावरील 33% क्षेत्राला सेंद्रिय खत देऊ शकतो. त्यावेळी माझी व आजही बहुतेक शेतकर्‍यांची अशी समजूत आहे की इतके शेणखत टाकले की 2-3 वर्षे नाही टाकले तरी चालते. 20 वर्षांनी उत्पादकता खालावल्यावर ही समजूत चुकीची असल्याचे लक्षात आले. तोपर्यंत मी भू-सूक्ष्मजीव शास्त्राचा विद्यार्थी झालो होतो. या शास्त्राने शिकविलेले तर्क सेंद्रिय खत हे सर्व सूक्ष्मजीवांच्या काट्यासाठी वापरले जाते. एखादे पीक पूर्ण वाढवायचे म्हणजे सूक्ष्मजीवांना जमिनीत भरपूर काम करावे लागते. या कामापोटी जमिनीतील सेंद्रिय कर्ब वापरला जातो. एखाद्या पिकासाठी जितका वापरला जातो त्यापेक्षा थोडा जास्त आपण पुढील पीकपेरणीपूर्वी त्या जमिनीला दिला पाहिजे. तरच सेंद्रिय कर्बाची पातळी टिकवून ठेवणे शक्य आहे. याचा सरळ अर्थ 3 वर्षांतून एकदा टाकलेला सेंद्रिय कर्ब अत्यंत अपुरा आहे. प्रत्येक पिकाला प्रत्येक वर्षी टाकणे गरजेचे आहे. तसे न केल्यास उत्पादकता घटणार.

सेंद्रिय खताच्या उपलब्धतेचा विचार केल्यास असा खत वापर केवळ अशक्य आहे. मग सुपीकता कमी होणेही परवडणारे नाही. आता काही तरी सोपा स्वस्त सुलभ पर्याय शोधणे गरजेचे होते. तोपर्यंत सूक्ष्मजीवी शास्त्राने शिकविले होते. चांगले किंजलेले खत टाकणे चुकीचे आहे. यात जमिनीबाहेर आपण कुजवण्याची क्रिया करतो असे न करता ती क्रिया जमिनीतच झाली पाहिजे. एका बाजूला पीक वाढत राहिले पाहिजे, दुसर्‍या बाजूला तेथेच किजविण्याची क्रियाही चाली राहिली पाहिजे. कुजण्याची क्रिया म्हणजे जमीन सुपीक करणे. ही क्रिया जितका जास्त काळ चालेल तितकी जास्त सुपीकता. आता कुजणारा पदार्थ सर्व जमिनीसाठी कोठून प्राप्त करावयाचा हा शोध सुरु झाला. तसे ऊस शेतीत मोठ्या प्रमाणावर पाचट उपलब्ध होते. तोच कुजणारा पदार्थ वापरणेच निर्णय घेतला. कुजणारा पदार्थ निवडताना शक्यतो विकत घ्यावयास लागू नये. वाहतूक, मजूर, यंत्राचा वापर कमीत कमी अगर अजिबात होऊ नये असे धोरण होते. यात पाचट बरोबर बसण्याजोगे होते. जवळपास एकही पान न जाळता 15 वर्षे पाचट कुजविण्याचे वेगवेगळे प्रयोग केले. उसाच्या उत्पादनात अजिबात वाढ मिळाली नाही. याचा सरळ अर्थ पाचटातून सुपीकतेत वाढ होत नाही असा होता. आता आणखी एखादा असाच पर्याय उपलब्ध होतो का, याची चाचपणी चालू झाली. खोडवे तोडणीनंतर भात हे आमचे फेरपालटाचे पीक आहे.

भाताच्या पूर्वमशागतीच्या जमिनीची नांगरणी केल्यानंतर उसाची खोडवी रानात विवरुन पडत. बायका ती जळणाला गोळा करून नेत. फुकटात रानातील कचरा गेल्यामुळे शेतकरी खुश होत. ही खोडवी कुजविता आली तर त्यातून आणखी सेंद्रिय खत तयार होईल व उत्पादकतेत काही वाढ मिळेल, या अपेक्षेने खोडकी कुजविण्याचा निर्णय घेतला. खोडकी कशी कुजविता येतील यावर भरपूर चिंतन केले असता असे लक्षात आले की जमिनीची कोणतीही हलवाहलवी न करता जशी वाढली आहेत तशीच तणनाशकाने मारून जागेलाच कुजवायची यातून बिनानांगरता (शून्य मशागत) भात पीक घेण्याचा निर्णय पक्का झाला. आता पूर्वीसारखे पेरणी यंत्राने भात पेरणे शक्य नव्हते. पेरणीची पद्धत बदलावी लागणार होती. टोकं पद्धतीने भात पेरणी केली. यासाठी रान पाटाने अगर पावसाने ओलित टोकण व परत पाणी अशी पेरणी पार पाडली. भात उगविण़्यास पाच दिवस लागतात. तत्पूर्वी खोडव्यावर ग्लायफोसेट व जमिनीवर गोल हे तणनाशक फवारले. हळूहळू खोडवे मरून गेले व भात वाढत राहिले. पुढे एक महिन्याने भातात परत तण उगवू लागले. ते अलमिक्स या तणनाशकाने मारले. तणनाशकाला दाद न देणारी काही तणें हाताने भांगलणी करून काढावी लागली. भात पीक उत्तम येते.

भात सरीवरंब्यावर असल्याने जुन्या सर्‍यातच ऊस लावणीचा निर्णय घेतला. फक्त सरीच्या तळात एक नांगराचे तास मारून कांडी पुरली जाण्यापुरती मशागत केली. नेहमीप्रमाणे लावणं केली. उसाची उगवण फुटीची अवस्था व्यवस्थित पार पडली. पॉवर टिलरने खांदणी (भरणी) केली. भरणीनंतर उसाची उभार वाढ झाली. यानंतर वाढीचा वेग असा होता की आजपर्यंत गेल्या बर्‍याच वर्षांत असा वेग मी पहिला नव्हता. ऊस कारखान्याला गेल्यानंतर उत्पादनात 25 ते 50 % वाढ मिळाली. बाकी रासायनिक खते, पाणी, पीकसंरक्षण वगैरे गोष्टीचा वापर नेहमी प्रमाणेच होता. ही उत्पादनवाढ पाचटाचा खताऐवजी खोडक्याचे खतामुळे झाली होती. या निरीक्षणातून असे लक्षात आले की कोणत्याही पिकाचा जमिनीखाली वाढणारा भाग म्हणजे बुडखा व मुळांचे जाळे ह्यापासून उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत जमिनीला मिळते, जर जमिनीचे पृष्ठभागापासून जसजसे वर वर जावे तसतसे खत हलक्या हलक्या दर्जाचे होते. पानांचे खत सर्वात हलके. ह्याचा आणखी एक अर्थ असा की आजपर्यंत आपण जमिनीला जे शेणखत कंपोस्ट दिले ते हलक्या दर्जाचे होते. पुढे अभ्यास असा झाला की जमिनीत दोन प्रकारचे सेंद्रिय कर्ब असतात. 1) स्थिर 2) अस्थिर लवकर कुजणारा पदार्थ अस्थिर दर्जाचे खत, तर उशिरा कुजणारा पदार्थ स्थिर दर्जाचे खत देतो. ज्याला शास्त्रीय भाषेत ह्युमस असे म्हणतात. हे दोनही सेंद्रिय कर्ब असल्यासच जमिनीला शाश्वत सुपीकता प्राप्त होते. 
 
पुढे मनुष्यबळाच्या टंचाईमुळे पाचट पेटविणे सुरू केले. अस्थिर सेंद्रिय कर्बासाठी दुसरा पर्याय शोधला, पिकाची मुळे व बुडखा जमिनीला चांगली सुपीकता देत असतील तर हाच नियम तणाला का लावू नये. तण जागेला फुकटात नको इतकी वाढतात व त्यांच्या नियंत्रणासाठी शेतकर्‍यांचा बराच मोठा खर्च होतो. आता तणनियंत्रणाऐवजी तण व्यवस्थापन करणेचे ठरविले. मुख्य पीक जवळील तण वाढू दिली नाहीत. सुरुवातीच्या 60-70 दिवसांत दोन ओळींत युक्तीने म्हणजे पिकाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने तण वाढविले, मोठे केले जून केले व तणनाशकाने मारले. तण वर मोठे झाले. त्या प्रमाणात जमिनीखाली मुळांचीही वाढ झाली. आपल्याला मुळामध्येच रस होता. तण मेल्यानंतर कुजून त्याचेही खत जमिनीला मिळाले. आजपर्यंत जे सेंद्रिय खत वापरत होते ते 2-4 वनस्पतीपासून तयार झालेले होते, तणांचे खत मोजता येणार नाही. इतक्या वनस्पतीपासून तयार झाले होते. एक संदर्भ असा वाचनात आला कीद्विदल वनस्पतीपेक्षा गवतवर्गीय वनस्पतीचे खत जास्त उत्तम दर्जाचे. तणाचे निरीक्षण केले असता त्यात एकदल गवतवर्गीय तणें जास्त तर होतीच. त्याचबरोबर विविध जातीचे गवत होते. 
 
यातून कमी झालेली उत्पादकता भरून निघाली व परत 40- 50 वर्षांपूर्वी जसे चांगले उत्पादन मिळत होते. तसे आता मिळू लागले. प्रचलित पद्धतीने दरवर्षी सुपीकता कमी कमी होत होती ती आता वाढत चालली. शेतकरी सुपीकता टिकविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करतात. त्यावर भरपूर खर्च करावा लागतो. मी जवळपास फुकटात सुपीकता मिळविली होती. तण व्यवस्थापनासाठी तणनाशकाचा जो खर्च होतो तो पुढे जमिनीला मिळणार्‍या खतातून भरून निघतोच व वर पैसे शिल्लक राहतात. शेतीतील एक मोठ्या खर्चाच्या बाबीचे उत्पन्न देणार्‍या बाबीत रूपांतर झाले. आता शेतीचा हिशेब असा मशागतीचा, सेंद्रिय खतांचा व भांगलणीचा खर्च वाचला. जमिनीत सेंद्रिय कर्ब भरपूर वाढल्याने पाणी कमी लागले. रासायनिक खतांचा वापर जास्त कार्यक्षमतेने होऊ लागला. कमीत कमी मनुष्यबळात शेती पिकू लागली. खर्च कमी व उत्पादन जास्त ींशहळ पूर्वीपेक्षा उत्तम दर्जाचे. दर्जा हा एक स्वतंत्र मोठ्या लेखाचा विषय आहे. 
 
शेतीवर सतत संकटे येत असतात. खर्च कमी ठेवल्यास उत्पादन कमी आले तरी फायदा कमी होईल अगदी नापिकी झाली तरी सोसण्याइतपत तोटा होईल. मागील नुकसान भरून काढून शेतकरी आपल्या पायावर उभा राहील. तसा तो उभा राहावा यासाठीच हा लेखन प्रपंच. याला इंग्रजीत कॉन्झव्रेशन अग्रीकल्चर मराठीत संवर्धित शेती म्हणतात, ही जगभर चालू असणारी असणारी एक चळवळ आहे. आपण त्याच्याजवळ जाणे गरजेचे आहे. थोडा फार फरक करून कोणत्या पिकाला करता येते. (सर्व शेती प्रकारात)
 
श्री. चिपळूणकर 
8215450088