आडसाली ऊस लागवड

डिजिटल बळीराजा-2    20-Sep-2019
 
 
 
महाराष्ट्रात गेल्या साठ वर्षात साखर कारखानदारी बरोबर उसाचे क्षेत्र, साखर उत्पादन यामध्ये भरीव वाढ झालेली दिसून येते. मात्र प्रति हेक्टरी ऊस उत्पादकतेमध्ये फारशी वाढ झाल्याचे दिसून येत नाही.आजही राज्याची सरासरी उत्पादकता एकरी 35 टन एवढीच आहे. या परिस्थीतीत ऊसाखालील क्षेत्र वाढविण्यापेक्षा उसाची प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. 
 
महाराष्ट्रात उसाची लागवड आडसाली, पुर्वहंंगामी आणि सुरू या तीन हंगामात केली जाते. या तीनही हंगामाची तुलना करता आडसाली हंगाम फायदेशीर असल्याचे दिसून येते. उगवणीपासूनच आडसाली उसास अनुकूल हवामान मिळते. त्यामुळे उगवण चांगली होऊन फुटवा जोमदार येतो. तसेच उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ताण बसणार्‍या ठिकाणी आडसाली ऊस 8 ते 9 महिन्याचा महिन्यांचा झालेला असतो यामुळे हे पिक पाण्याचा ताण चांगल्याप्रकारे सहन करु शकते. तसेच किड व रोग यांचा प्रादुर्भाव सुरु व खोडवा उसाच्या तुलणेत कमी राहतो. 
 
आडसाली ऊसाची उत्पादकता वाढविण्यासाठी जमिनीची निवड व पूर्वमशागतीपासून ऊसाच्या तोडणीपर्यंत पुढीलप्रमाणे योग्य ती काळजी व नियोजन करणे आवश्यक आहे. 
 
जमीन व पुर्वमशागत
 
आडसाली उसासाठी मध्यम ते भारी मगदुराची व उत्तम निचर्‍याची जमीन असावी. अशा जमिनीची खोली 60 ते 120 सें.मी. असावी. तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 0.5 टक्के पेक्षा जास्त असावे.
 
जमिनीची उभी व आडवी खोल नांगरट करावी. जमीन तापल्यानंतर ढेकळे फोडावीत. कुळवाच्या उभ्या-आडव्या पाळया घालून जमीन भुसभुशीत करावी व जमीन सपाट केल्यानंतर रिजरच्या सहाय्याने भारी जमिनीत 120 -150 सें.मी. व मध्यम जमिनीत 100 -120 सें.मी. अंतरावर सर्‍या पाडाव्यात. पट्टा पध्दतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीसाठी 2.5 - 5.0 फुट व भारी जमिनीसाठी 3.0 - 6.0 फुट अशा जोड ओळ पध्दतीचा अवलंब करावा. पट्टा पध्दतीचा आंतरपिक घेण्यासाठी व ठिबक सिंचन संच बसविण्यासाठी चांगला उपयोग होतो. यांत्रिक पध्दतीचा (पॉवर टिलर/लहान ट्रॅक्टर) वापर करावयाचा असल्यास दोन सरीतील अंतर 120-150 सें.मी. (चार ते पाच फुटापर्यंत) ठेवावे. 
सुधारीत जाती
 
आडसाली ह्ंगामात उसाची लागवड करण्यासाठी फुले 265, को 86032 को व्हीएसआय 9805 किंवा व्हिएसआय 8005 या सुधारीत जातींची लागवड 15 जुलै ते 15 ऑगष्ट या कालावधीत करावी. 
 

 
को 86032
 
 
 
फुले 265 
 
लागवड
 
आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगष्ट या कालावधीतच करावी. ऊस लागवडीसाठी बेणे मळयातील बेणेच वापरावे. दर तीन ते चार वर्षांनी ऊस बेणे बदलावे. उसाची लागवड एक डोळा किंवा दोन डोळयांची टिपरी वापरुन करावी. एक डोळा पध्दतीने करावयाची असल्यास दोन डोळयातील अंतर 30 सें.मी. ठेवावे. शक्यतो कोरड्या पध्दतीने लागण करावी. डोळा वरच्या बाजूस ठेवून हलकेसे पाणी द्यावे. दोन डोळयांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपरीमधील अंतर 15 ते 20 सें.मी. ठेवावे. यासाठी ओल्या पध्दतीने लागण केली तरी चालेल, मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. लागणीसाठी हेक्टरी दोन डोळयांची 25,000 टिपरी लागतील. एक डोळा पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड करावयाची असल्यास दोन रोपातील अंतर 1.5 ते 2.0 फुट ठेवावे व सरीतील अंतर 4 ते 5 फुट ठेवावे. या पद्धतीने हेक्टरी 13,500 ते 14,000 रोपे लागतील.
 
बेणे प्रक्रिया
 
लागणीसाठी बेणेमळ्यात वाढविलेले 9 ते 11 महिने वयाचे निरोगी, रसरशीत आणि अनुुवंशिकदृष्ट्या शुध्द बेणे वापरल्यास ऊस उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ होते. 
 
काणी रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी, तसेच कांडीवरील खवले कीड व पिठया ढेकूण यांच्या नियंत्रणासाठी 100 ग्रॅम कार्बेंडॅझिम व 300 मि.ली. मॅलॅथिऑन किंवा डायमिथोएट 100 लिटर पाण्यात मिसळून बेणे 10 मिनिटे बुडवावे. या प्रक्रियेनंतर अ‍ॅसिटोबॅक्टर 10 किलो व स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत 1.25 किलो 100 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात टिपरी 30 मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी. जीवाणू खताच्या प्रक्रियेमुळे 50 टक्के नत्र व 25 टक्के स्फुरद खतांची बचत होते व उत्पादनात वाढ होते.
 
एकात्मिक खत व्यवस्थापन 
 
आडसाली ऊसासाठी हेक्टरी 50 ते 60 गाडया चांगले कुजलेले शेणखत अगर कंपोष्ट खत टाकून जमिनीत मिसळावे. यापैकी अर्धी मात्रा दुस-या नांगरटीपूर्वी द्यावी व उर्वरीत मात्रा सरीमध्ये द्यावी. शेणखत अगर कंपोष्ट खत उपलब्ध नसल्यास ऊस लागवडीपूर्वी ताग किंवा धैंचा यासारखे हिरवळीचे पीक घेवून पिक फुल कळी अवस्थेत असताना जमिनीत गाडावे.
 
ऊसासाठी रासायनिक खतांचे व्यवस्थापन पुढील तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे करावे. स्फुरद व पालाशयुक्त खते लागणीपूर्वी सरीत पेरुन द्यावीत. नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नत्रयुक्त खते उसाच्या मुळाच्या सानिध्यात येतील अशा पध्दतीने द्यावीत. तसेच युरियाचा वापर करतांना निंबोळी पेंडीचा 6ः1 या प्रमाणात वापर करावा.
 
जमिनीचे माती परिक्षण करुन घेतल्यानंतर सुक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता असणार्‍या जमिनीसाठी गरजेनुसार हेक्टरी 25 किलो फेरस सल्फेट, 20 किलो झिंक सल्फेट, 10 किलो मँगेनिज सल्फेट व 5 किलो बोरॅक्स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये (10 : 1 प्रमाणात) 5 ते 6 दिवस मुरवून सरीत द्यावे. 
 
तक्ता क्र. 1. पश्चिम महाराट्रासाठी खत देण्याचे हंगामनिहाय वेळापत्रक (किलो प्रति हेक्टर)
 
 अ.न.  खतमात्रा देण्याची वेळ आडसाली नत्र (युरिया) स्फुरद (सिं.सु.फॉ.)पालाश  (म्यु.ऑ.पो.) 
 1   लागणीच्या वेळी 40  (87)85  (531)85  (142)
 2   लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांंनी  160  (347)  --  --
 3   लागणीनंतर 12 ते 16 आठवडयांनी  40  (87)  --  --
 4  मोठया बांधणीच्या वेळी  160  (347)85  (531)85  (142)
   एकूण  400  (868)170  (1062)170  (282)
 
 
1.को 86032 ही जात रासायनिक खतांच्या जादा खत मात्रेस प्रतिसाद देत असल्यामुळे प्रती हेक्टरी नत्र, स्फुरद व पालाश या रासायनिक खतांची 25 टक्के जादा मात्रा द्यावी. 
 
2.अ‍ॅसेटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू या जिवाणूखतांची बीज प्रक्रिया केल्यास नत्र खताची मात्रा 50 टक्के व स्फुरद खताची मात्रा 25 % कमी करून द्यावी. 
 
आडसाली उसातील आंतरपिके
 
आडसाली हंगामात 15 जुलै ते 15 ऑगष्ट या दरम्यान ऊसाची लागण केली जाते. या हंगामात जमिनीच्या प्रकारानुसार खरीप हंगामातील भुईमूग, चवळी, सोयाबीन व भाजीपाला इत्यादी आंतरपिके घेता येतात. 
 ऊसामध्ये सोयाबीनचे आंतरपिक 
 
उसाची लागण करतांना पट्टा पध्दतीने 2.5 - 5 किंवा 3 - 6 फुट अशा जोड ओळ पध्दतीने लागवड केल्यास पट्टयामघ्ये आंतरपिक चांगल्या प्रकारे घेता येते. उसामध्ये आंतरपिकांच्या बियाणेचे प्रमाण आंतरपिकाच्या ओळीच्या संख्येनुसार व व्यापलेल्या क्षेत्रानुसार ठरवावे. तसेच आंतरपिकासाठी त्यांनी व्यापलेल्या क्षेत्रानुसार त्या त्या पिकाची शिफारशीत रासायनिक खतांची मात्रा वेगळी द्यावी.
 
ऊस पिकामध्ये ताग, धैंचा यासारख्या हिरवळीच्या पिकांचा आंतरपिक म्हणून समावेश करता येतो व बाळबांधणीच्यावेळी हिरवळीची पिके सरीमध्ये गाडून बाळ बांधणी करता येते. यामुळे जमिनीची सुपिकता टिकविण्यास मदत होते.
 
आंतरमशागत व तण नियंत्रण
 
ऊस लागवडीनंतर 3 ते 4 दिवसांनी जमीन वापश्यावर असतांना हेक्टरी 5 किलो अ‍ॅट्रॅझीन किंवा मेट्रीब्युझिन हेक्टरी एक किलो 500 लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण जमिनीवर फवारणी करावी. ऊस उगवल्यानंतर हरळी किंवा लव्हाळा या तणांचा प्रादुर्भाव आढळून येतो. यासाठी 10 लिटर पाण्यात 80 मि.ली. ग्लायफोसेट वापरावे. हे तणनाशक उसावर पडू देवू नये यासाठी प्लॅस्टिक हुड वापरून जमिनीलगत तणांवर फवारणी करावी. ऊसाच्या उगवणीनंतर आवश्यकतेनुसार तणांचा बदोबस्त करावा. आंतरमशागतीमध्ये तणनियंत्रणाबरोबरच बाळ बांधणी करणे अत्यंत महत्वाची आहे. ऊस लागणीनंतर 3 महिन्यांनी बाळ बांधणी कृषिराजसारख्या औजाराच्या सहाय्याने बाळ बांधणी करावी.यामुळे पिकाला हलकी भर लागते, फुटव्यांची संख्या नियंत्रीत होते व येणारे फुटव्यांची वाढ जोमदार होते.
मोठी बांधणी
 
ऊस पीक 4 ते 4.5 महिन्याचे झाल्यानंतर पहारीच्या औजाराने वरंबे फोडून व नंतर सायन कुळव चालवून आंतरमशागत करावी व रासायनिक खतांची मात्रा देवून रिजरच्या सहाय्याने मोठी बांधणी करावी व पाणी देण्यासाठी सर्‍या, वरंबे सावरुन घ्यावेत.
 
पाणी व्यवस्थापन
 
ऊस लागवडीपासून मोठया बांधणीपर्यंत सर्वसाधारणपणे पाण्याच्या पाळया 8 सें.मी. खोलीच्या द्याव्यात. त्यानंतर 10 सें.मी. खोलीच्या पाणी पाळया द्याव्यात. हंगामानुसार उन्हाळयात 8 ते 10 दिवसांनी, पावसाळयात 14 ते 15 दिवसांनी व हिवाळयात 18 ते 20 दिवसांनी पाण्याच्या पाळया द्याव्यात. यापेक्षा अधिक पाण्याचा वापर करु नये. पाण्याच्या जास्त वापरामुळे जमीन क्षारयुक्त बनतात व अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन पाण्याबरोबर अन्नद्रव्यांचाही र्‍हास होतो. त्यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता कमी होते. ठिबक संचाचा वापर करावयाचा असल्यास पट्टा पद्धत किंवा रुंद सरी पद्धत वापरुन लागवड करावी. ठिबक सिंचनामुळे 50 % पाण्याची बचत होते. तसेच ठिबक संचाद्वारे खते दिल्यास खतांमध्ये 20 % पर्यंत बचत होऊन ऊस उत्पादनात 15 ते 20 % वाढ होते.
  
किड व रोगांचे नियंत्रण
 
कार्बेंडॅझिमच्या बेणे प्रक्रियेमुळे उसातील काणी रोगाचा बंदोबस्त होतो. आडसाली उसात खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास हेक्टरी 5 फुले ट्रायकोकार्डची 10 दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार 2 ते 3 प्रसारणे करावीत. हुमणीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस हेक्टरी 2.5 लिटर 1000 लिटर पाण्यात मिसळून जमीन वापश्यावर असतांना सरीतून द्यावे, तसेच पहिला पाऊस झाल्यानंतर निम, बाभूळ व बोर या झाडांवरील भुंगेरे सामुदायीकरित्या सायंकाळच्यावेळी गोळा करुन नष्ट करावेत.
 
कांडी किडीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी 5 फुले ट्रायकोकार्ड मोठया बांधणीनंतर दर 15 दिवसांनी ऊस तोडणीपूर्वी एक महिन्यापर्यंत लावावीत. पोंग्यातील पिठया ढेकूण या किडीच्या मॅलॅथिऑन 50 टक्के प्रवाही 20 मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
 
लोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी कोनोबाथ्रा, मायक्रोमस, डिफा अशा मित्र किटकांच्या प्रत्येकी 1000 अळया किंवा कोष प्रती हेक्टरी शेतात सोडाव्यात. मित्र किटकांची उपलब्धता नसल्यास फोरेट 10 टक्के दाणेदार हेक्टरी 15 ते 20 किलो या प्रमाणात 9 महिन्यापर्यंतच्या उसास वापरावे किंवा मिथील डिमेटॉन 25 टक्के प्रवाही 10 लिटर पाण्यात 15 मि.ली. या प्रमाणात मिसळून आलटून पालटून आवश्यकतेनुसार 2 ते 3 वेळा फवारावे.
ऊस तोडणी व उत्पन्न
 
आडसाली उसाची तोडणी 16 ते 18 महिन्यानंतर करावी. सध्या प्रचलित फुले 265 आणि को 86032 या जातींचा वापर केल्यास हेक्टरी 200 टनांपर्यंत ऊस उत्पादन सहज मिळते.
 
डॉ.भरत रासकर, श्री.संदेश देशमुख
श्री. दिपक पोतदार