अन्नधान्य सुरक्षेसाठी जमिनीचे संवर्धन

डिजिटल बळीराजा    07-Aug-2019
 

 


जमिनीचे संवर्धन करताना जमिनीचा सामू, क्षारता, सेंद्रिय कर्बव त्याचे योग्य प्रमाण आणि जमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्माची सुधारणा करणे कसे गरजेचे आहे या संबंधीचा उहापोह या लेखात केला आहे.अन्नधान्य सुरक्षा, ग्लोबल वार्मिंग, हवामानबदल यासारख्या अनेक विषयांवर सध्या जोरात विचारमंथन सुरू आहे. पिकांचे उत्पादन घेताना जमीन, पाणी, सूर्यप्रकाश या मुख्य नैसर्गिक साधनसंपत्तीचा प्रामुख्याने वापर होतो, तसेच पिकांचे उत्पादन ठरवण्याचा अधिकार या तीन साधनसंपत्तींबरोबरच हवामानातील घटकही महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. अर्थात, या सर्वांत श्रेष्ठ आणि महत्त्वाच्या पिकाचा पाया म्हणजे जमीन.


जीवसृष्टीची निर्मिती आणि पालनपोषण जमिनीद्वारे होते. म्हणून जमिनीला आपल्या संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. जमिनीला मातेचे रूप देऊन काळी आई, भूमाता यासारखे अतिउच्च बहुमान देण्यात आलेले आहेत. या जमिनीने हजारो वर्षे या सजीवांच्या रक्षणाची, पालनपोषणाची काळजी घेतली आहे. जन्म देणार्याबरोबरच जे पालनपोषण करते त्याला आईचे स्वरूप देण्याची संस्कृती आपल्या रामायण-महाभारतापासून आहे; परंतु आज प्रगत तंत्रज्ञानाच्या नावाखाली काही बाबींचा विसर पडलेला आहे. जमीनशास्त्राचा, जमिनीत सुरू असलेल्या जैविक घटनांचा; तसेच जमिनीच्या विविध गुणधर्मांचा विचार न करता आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली चुकीचा प्रसार झाल्यामुळे शेतीक्षेत्रात अनेकदा नको त्या तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू आहे. जमीन हा कारखाना नसून एक नवनिर्मिती करणारी यंत्रणा आहे. एका छोट्याशा रोपट्याचे किंवा बियांचे रूपांतर मोठ्या झाडात करणे आणि त्यापासून अनेक पटीने उत्पादन घेणे ही कला फक्त जमिनीद्वारेच शक्य आहे, कारण जमीन सजीव आहे. निर्जीव कारखान्यात कधीही एक किलो वजनापासून दोन किलो उत्पादन मिळू शकत नाही. म्हणूनच जमीन सजीव आहे, ही त्रिकालाबाधित सत्य बाब आपल्याला मान्य करावंच लागेल. त्यासाठी कोणाचा सल्ला किंवा त्यावर विचारमंथन करण्याची गरज नाही. जे सत्य आहे त्याची सत्यता पडताळण्यासाठी चर्चा करणे म्हणजे अविचारीपणा होईल.


जमीन सजीव आहे, ही बाब मान्य केल्यानंतर मग तिला सजिवासारखी वागणूक देणेही आवश्यक आहे. कोणत्याही सजिवाचे अन्न हे रसायन नसते. कोणताही सजीव रासायनिक औषधांचा किंवा आहाराचा वापर हा सर्वांत शेवटी म्हणजेच सर्व पर्याय संपल्यानंतरच करतो. मात्र, जमीन-पीक यांच्या पोषणाचा विचार करताना आपल्या समोर पहिल्यांदा रासायनिक खतांचा विचार येतो. म्हणजेच रसायनांना आपण पिकाच्या पोषणातील पहिला घटक गृहीत धरलेले आहे, तर सेंद्रिय पदार्थाला आपण शेवटचे स्थान देतो. या विचारपद्धतीमुळेच आज अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. या प्रश्नांच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा वेध घेण्याऐवजी आपण वरवरच्या बाबींवर चर्चा करतो आणि तिथूनच प्रश्नातील गुंता वाढत जातो. अनेकदा शेतकरी सांगतात, की मी एवढे उत्पादन घेतले;, परंतु हे सांगत असताना कोणत्या प्रकारच्या गुणधर्माची जमीन आहे, हे ते सांगत नाही.


जमिनीच्या गुणधर्मावरच पिकाचे उत्पादन अवलंबून आहे; परंतु जमिनीच्या गुणधर्माचा पीकपोषण होत असताना कोणत्याही प्रकारचा विचार होत नाही. पिकांचे पोषण करत असताना आपण फक्त रासायनिक खतांचाच विचार करतो. मातीपरीक्षण करत असतानाही जमिनीमध्ये विविध अन्नघटक किती प्रमाणात उपलब्ध आहेत, यावरच आपले लक्ष असते. मातीपरीक्षण केल्यानंतर अन्नद्रव्यांचा वापर किंवा त्यामध्ये बदल करताना रासायनिक अन्नद्रव्य पुरवणार्या खतांच्या मात्रेमध्येच कमी-जास्त करत असतो. म्हणजेच जमिनीमध्ये जर काही क्रिया होतात, त्या फक्त रासायनिक क्रिया होतात, असेच आपले मत आहे. जमीन म्हणजे रासायनिक प्रयोगशाळा किंवा रसायनांचा कारखाना नव्हे. जमिनीचे भौतिक, जैविक आणि रासायनिक हे शेंडेफळ लाडके असण्याच्या आपल्या मानसिकतेमधून रासायनिक खतही सुटलेले नाही. जमिनीच्या भौतिक गुणधर्मावरच इतर गुणधर्म अवलंबून असतात. जमिनीचे भौतिक गुणधर्म बदलणे शक्य होत नाही किंवा फार अवघड असते. हवा-पाणी यांचे प्रमाण, मातीच्या कणांचा आकार, जलधारणशक्ती, निचराशक्ती यांसारख्या महत्त्वाच्या बाबींमुळे जमिनीचा भौतिक गुणधर्म चांगला पाहिजे. जमिनीचा तिसरा गुणधर्म म्हणजे रासायनिक गुणधर्म, ज्यामध्ये पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या घटकांच्या उपलब्धतेचा विचार होतो. अर्थात, ही उपलब्धता जमिनीच्या भौतिक आणि जैविक गुणधर्मावर अवलंबून असते. म्हणजेच पिकाच्या पोषणासाठी लागणार्या अन्नद्रव्यासाठी भौतिक आणि जैविक गुणधर्म योग्य असणे गरजेचे आहे. हे दोन गुणधर्म योग्य प्रमाणात असतील, तर रासायनिक गुणधर्म चांगले राहून एक चांगली उत्पादक जमीन तयार होते.


जमिनीच्या तीनही गुणधर्मांचे आधारस्तंभ म्हणजे जमिनीचा सामू, क्षारता आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण. मात्र, या तीनही बाबींकडे आज दुर्लक्ष झालेले दिसते. पिकाला अन्नद्रव्ये देताना जमिनीतील या तीनही मुख्य घटकांचा विचार होत नाही. अपेक्षित उत्पादनासाठी तयार केलेल्या सूत्रामध्येही या तीनही गुणधर्मांचा विचार केलेला नाही. मातीपरीक्षणानुसार रासायनिक खतांचे प्रमाण सांगतानाही या गुणधर्माचा विचार केला जात नाही. फक्त जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचा विचार केला जातो. उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण हे पीकवाढीच्या अवस्थेनुसार बदलते असते, परंतु जमिनीचा सामू, क्षारता आणि सेंद्रिय कर्ब यांचे प्रमाण सर्वसामान्यपणे सारखे असते. या तीन घटकांमुळेच जमिनीत असलेली अन्नद्रव्ये किंवा वरून दिलेल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता अवलंबून असते.


जमीन आरोग्याच्या तीन नाड्या

मानवी आरोग्याची तपासणी करताना नाडीपरीक्षण ही पूर्वीपासून आलेली सर्वांत महत्त्वाची तपासणी. मानवी आरोग्य हे वात, पित्त, कफ या तीन गुणधर्मांवर अवलंबून असते. माणसाला कोणताही गुणधर्म अतिजास्त होण्यामुळे विविध आजार होतात. म्हणूनच वैद्य नाडी तपासण्याबरोबर माणसाला कोणता विकार आहे ते सांगतात. जमिनीच्या आरोग्याचाही सामू, क्षारता आणि सेंद्रिय कर्ब या तीन नाड्या आहेत. या तपासण्यांनंतर जमिनीची सर्व परिस्थिती लक्षात येते.जमिनीचा सामू, क्षारता आणि सेंद्रिय कर्ब या तीनही घटकांचा जमिनीच्या उत्पादनक्षमतेशी फारच जवळचा संबंध आहे. जमिनीतील अन्नद्रव्ये पिकांच्या गरजेनुसार उपलब्ध होतात, तसेच बाहेरून पिकांना वेळोवेळी उपलब्ध करून देण्यासाठी जमिनीचे हे तीनही गुणधर्म योग्य प्रमाणात असणे महत्त्वाचे आहे. जमिनीचा सामू 7 ते 75.च्या दरम्यान असेल तर पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता सहज होते. सामूचे प्रमाण वाढल्यामुळे जमिनीत अन्नद्रव्याचे स्थिरीकरण किंवा विविध घातक स्वरूपात रूपांतर होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे पिकांना खते देऊनही त्यांची उपलब्धता न झाल्यामुळे पिकांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता जाणवते. पिकांची असंतुलित वाढ होऊन रोग-किडींचे प्रमाण वाढते, तसेच उत्पादनाची योग्य प्रत मिळत नाही. जमिनीतील क्षाराचे प्रमाण एक मिलिमोजपेक्षा कमी असेल तर जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये पिकांना सहज घेता येतात. जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढल्यामुळे मुळांभोवती क्षारयुक्त पाण्याचा दाब वाढून पिकांना अन्नद्रव्यांचे शोषण करता येत नाही, तसेच क्षारांमुळे पिकांच्या पांढर्या मुळांना जखमा होऊन त्यामधून जमिनीतील घातक बुरशी मुळांमध्ये शिरकाव करतात. मुळे कुजून झाड वाळण्याचे प्रमाण वाढते किंवा मुळांद्वारे अन्नद्रव्ये घेण्याची क्षमता कमी होते. म्हणजेच क्षारतेचे प्रमाण वाढल्यामुळे जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्ये किंवा बाहेरून दिलेली अन्नद्रव्ये पिकांना घेता येत नाही आणि त्यामुळे पिकांचे कुपोषण होऊन उत्पादनात घट येते.


सेंद्रिय कर्ब हा तर जमिनीचा आत्माच. जमिनीचे भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्म टिकवण्यासाठी सर्वांत जास्त जबाबदारी सेंद्रिय कर्बावर असते. सेंद्रिय पदार्थ कुजत असताना ह्युमस नावाचा पदार्थ तयार होतो. हे ह्युमस म्हणजे पिकांच्या मुळांचे आवडीचे खाद्य. सेंद्रिय पदार्थ कुजत असताना अनेक जीव-जिवाणू, गांडुळे आपला उदरनिर्वाह करतात आणि त्यातून पिकांना अन्नद्रव्ये पुरवतात, तसेच कुजत असताना तयार झालेल्या ह्युमिक अॅसिड, कार्बानिक अॅसिड यामुळे जमिनीतील क्षार विरघळून त्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, तसेच जमिनीचा सामूही त्यामुळे कमी होतो. चांगल्या उत्पादक जमिनीमध्ये 25 टक्के हवा, 25 टक्के पाणी, 45 टक्के खनिजे आणि 5 टक्के सेंद्रिय पदार्थ असणे आवश्यक आहे. अशा जमिनीचा सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब योग्य प्रमाणात राहते, तसेच जमिनीचे तीनही गुणधर्म उत्तम स्थितीत राहतात. जमिनीचा सेंद्रिय कर्ब एक टक्क्यापेक्षा जास्त राहण्यास मदत होते. जमिनीत दिलेली कोणतेही अन्नद्रव्ये पिकांच्या मुळांना सहजपणे घेता येतात. सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक प्रकारची जैविक-प्रतिजैविके तयार होऊन पिकांमध्ये रोग-कीड, तसेच निसर्गात होणार्या बदलांना सहन करण्याची ताकद म्हणजे प्रतिकारशक्ती पिकामध्ये निर्माण होते. पिकांची नैसर्गिक वाढ होऊन शाश्वत उत्पादन मिळते. हवा, पाणी यांचे योग्य संतुलन राहिल्यामुळे जमिनीत सतत वाफसा परिस्थिती राहून पिकांना गरजेनुसार पाणी उपलब्ध होते आणि मुळांद्वारे ते सहजपणे घेताही येते. मातीपरीक्षणाचा रिपोर्ट देताना सेंद्रिय कर्बाचे उपलब्ध नत्राच्या स्वरूपात रूपांतर करून दिले जाते. ही चुकीची पद्धत आहे. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण किती आहे, हे शेतकर्यांना समजले पाहिजे.


सेंद्रिय कर्बाच्या विविध गुणांचा विचार करता एक लक्षात येईल, की नत्राची उपलब्धता हा तर त्यातील एक छोटासा कार्यभाग आहे. याबरोबरच अनेक कार्ये या सेंद्रिय कर्बाच्या माध्यमातून होत असतात. आपल्या जमिनीत एक टक्क्यापेक्षा जास्त सेंद्रिय कर्बाचे प्रमाण होते; परंतु हरितक्रांतीनंतरच्या शेतीपद्धतीमुळे आज मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येते. पंजाब-हरियानासारख्या राज्यात हरितक्रांतीचा मोठ्या प्रमाणात अवलंब झाला; परंतु आज या राज्यातील 90 टक्क्यांपेक्षा जास्त जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 0.30 टक्क्यांपेक्षा कमी झालेले दिसून येते. महाराष्ट्रातही बागायती जमिनीतील माती पृथक्करण केले असता असे दिसून येते, की अनेक जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 0.50 पेक्षा कमी झालेले आहे. उसाखालील जमिनीत तर सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 0.20 ते 0.30 टक्के एवढेच आहे. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण यापेक्षा कमी झाल्यास त्या जमिनीत गवताची काडीही वाढणार नाही; परंतु त्यांच्या जमिनीतही सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 0.50 ते 0.60 टक्क्यांपेक्षा जास्त आढळत नाही. सेंद्रिय कर्ब एकपेक्षा जास्त झाला तर जमिनीमधून शाश्वत उत्पादन घेण्यासाठी जास्त कष्ट आणि खर्च करावा लागणार नाही. त्यासाठीच जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी एक टक्क्यापेक्षा जास्त ठेवण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. सेंद्रिय कर्ब वाढवल्यानंतरही तो विविध प्रकारच्या सेंद्रिय खतांपासून तयार झालेला असावा. लवकर, मध्यम व उशिरा कुजणार्या पदार्थांपासून तयार झालेल्या सेंद्रिय कर्बामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे संतुलन राहते.जमीन सुधारण्याचे उपाय

जमिनीची सुधारणा म्हणजे तिच्यातील भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्मांची सुधारणा. या तीनही गुणधर्मांमध्ये सुधारणा करण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढवणे आवश्यक आहे. आपला देश हा उष्णकटिबंधात येत असल्यामुळे सेंद्रिय पदार्थांचे ज्वलन जास्त प्रमाणात होते. त्यामुळे आपल्याकडे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण स्थिर ठेवणे अवघड असते. पाश्चिमात्य राष्ट्रांच्या कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करताना आम्ही मात्र त्यांच्या जमिनीचा प्रकार, त्यामधील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण आणि थंड प्रदेश असल्यामुळे सेंद्रिय पदार्थांचे कमी ज्वलन यांचा मात्र कधीही विचार केला नाही. अनेक प्रगत देशांमध्ये शेतीच्या उत्पादनाची काढणी यांत्रिकी पद्धतीने होत असल्यामुळे पिकांचे वाया जाणारे अवशेष हे जमिनीत मिसळले जातात. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वाढतो, तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे ज्वलन झाल्यामुळेही जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. म्हणून त्यांच्या तंत्रज्ञानाचे अंधानुकरण करून आज आपण अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत. आजही आपण त्यांच्याबरोबर तुलना करताना सांगतो, की ते हेक्टरी रासायनिक खते 200 ते 300 किलो वापरतात आणि आपले प्रमाण फक्त 100 किलोच्या जवळपासच आहे. हा विचार करताना आपण तेथील जमिनीतील सेंद्रिय पदार्थांच्या उपलब्धतेचा विचार करत नाही. रासायनिक खतांचा योग्य वापर होण्यासाठी सेंद्रिय पदार्थ जास्त असणे महत्त्वाचे आहे.जमिनीतील सेंद्रिय पदार्थ सुधारण्यासाठी पिकाच्या अवशेषांचा जमिनीमध्ये जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. कंपोस्टच्या माध्यमातून किंवा जमिनीमध्ये गाडणे किंवा त्याचे आच्छादन करणे या माध्यमातून सेंद्रिय पदार्थांचा वापर करता येईल. पिकांचे अवशेष, काडीकचरा किंवा शेतामधील कोणताही वाया जाणार्या आणि कुजणार्या पदार्थांचा वापर करता येईल, तसेच हिरवळीच्या पिकांचाही वापर पिकाच्या अगोदर किंवा पिकांच्या ओळीमध्ये करता येतो. हिरवळीच्या पिकांचा वापर करताना एकाच प्रकारचे पीक करण्याऐवजी विविध पिकांचे बियाणे त्यामध्ये एकत्र करावे. द्विदल, एकदल आणि तेलवर्गीय पिकांचे बियाणे त्या त्या हंगामानुसार घ्यावे. त्यामुळे अनेक प्रकारचे मुख्य, तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळतात. त्याबरोबर जमिनीतील सेंद्रिय कर्बही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. हिरवळीची खते गाडावीत किंवा पिकाच्या खोडाजवळ आच्छादन म्हणून वापरावीत. शेण, विष्ठा, काडीकचरा यांना शेतकर्यांची संपत्ती म्हणून संबोधले जातात. अर्थात, या सर्व संपत्तीला पेटवून देऊन बाहेरची घाण आपण आपल्या शेतात आणून टाकतो. त्यामुळे शेतकर्याकडील पैशाच्या स्वरूपातील संपत्तीही कमी होत आहे. शेण-गोमूत्र यांची स्लरी म्हणजे पिकाचे रेडिमेड खाद्य. लहान मुलांना तांदळाची पेज पाजतात त्याचप्रमाणे शेण-गोमूत्राची स्लरी म्हणजे झाडांच्या पांढर्या मुळांसाठी पेज होय. म्हणूनच स्लरीच्या वापरामुळे पिकाची जोमदार वाढ होते, तसेच या स्लरीमुळे जमिनीतील जीवजिवाणू मोठ्या प्रमाणात कार्यरत होऊन पिकांच्या पोषणासाठी योग्य अन्नद्रव्ये, जैविके, प्रतिजैविक उपलब्ध करून दिली जातात. याचा परिणाम पीकवाढीवर होतो.


जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध सेंद्रिय पदार्थ या सर्वसाधारण भर खतांबरोबर विविध खाद्य पेंडी, जनावरांच्या अवशेषांपासून बनवलेले खत यासारख्या कसदार सेंद्रिय खतांचा वापर म्हणजे जमिनीचा पौष्टिक खुराक. यामुळे जमिनीतील जैविक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये चांगली सुधारणा होते. पिकांना मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. पिकाच्या उत्पादनवाढीबरोबरच गुणवत्तावाढीसाठीही फायदा होतो. अर्थात, सेंद्रिय पदार्थ, तेलबिया पेंडी किंवा जनावरांच्या अवशेषांपासून बनवलेल्या खतांमध्ये किती रासायनिक अन्नद्रव्ये आहेत, याचाच फक्त विचार न करता त्याचे अप्रत्यक्षरीत्या किती फायदे होतात, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे.


जमिनीमध्ये रसायनांचा वापर म्हणजे डॉक्टरद्वारे पेशंटला दिलेली ट्रीटमेंट. कोणताही पेशंट हा स्वत: डॉक्टर होऊन स्वत:च्या मर्जीप्रमाणे कोणतेही औषध घेत नाही. जमिनीत रसायनांचा वापर म्हणजे पिकामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता आल्यानंतर त्याचा उत्पादन, यांच्यावर अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून केलेली उपाययोजना. ही उपाययोजना करताना शेतकर्यांनी स्वत: डॉक्टर होऊ नये. कारण स्वत:च्या मनाने किंवा इतर शेतकर्यांनी केले म्हणून अनेक गोष्टी केल्या जातात, त्या कायमच घातक असतात. विशेषत: रसायनांचा वापर करताना एवढे टन उत्पादन घेतल्यामुळे एवढे अन्नद्रव्य जमिनीतून पिकाने ओढून घेतले आणि मग तेवढी अन्नद्रव्ये जमिनीला रसायनातून दिली, तरच पुढील पीक येईल, हा खरोखरच मांडलेला अशास्त्रीय खेळ आहे. तसे असते तर हजारो वर्षांमध्ये किती प्रमाणात अन्नद्रव्ये जमिनीतून घेतली आणि किती रासायनिक खतांचा किंवा इतर स्वरूपातील अन्नद्रव्यांचा वापर झाला याचा पहिला विचार करूनच रसायनांचा वापर केला पाहिजे. रासायनिक खतांचा जमिनीत वापर करत असताना त्यामुळे जमिनीवर काय परिणाम होतील, याचा विचार करावा. त्यानुसारच खतांचा वापर करावा. रसायनांचा वापर जमिनीत अत्यंत अल्प प्रमाणात, गरज असेल त्याच वेळी करावा. समस्या निर्माण होईल, असे वाटल्यास किंवा अन्नद्रव्यांची कमतरता जाणवली तर तिची दुरुस्ती करण्यासाठी करावी. स्वस्त मिळते म्हणून नायट्रेट, क्लोराईडयुक्त खतांचा वापर करण्याऐवजी सल्फेटयुक्त खतांचा वापर करावा. मिश्रखतांपेक्षा सरळ खतांचा वापर करावा. एकाच वेळी जास्त प्रमाणात रासायनिक खते टाकण्याचे टाळावे. विद्राव्य खतांचा पीपीएमच्या स्वरूपात वापर करता येतो. यामुळे जमिनीतील जैविक किंवा भौतिक गुणधर्मांत फरक पडत नाही. रासायनिक खते ही कधीही सेंद्रिय पदार्थाची जागा भरून काढू शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे सेंद्रिय पदार्थ हा खरा जमीन सुधारण्याचा मूलभूत घटक आहे, तर रासायनिक खते ही टॉनिकसारखे काम करून काही प्रमाणात उत्पादन वाढवण्यास मदत करू शकतात. अर्थात तेही योग्य पद्धतीने, योग्य सल्ला घेऊन केले तरच. आज आपल्या आरोग्याची तपासणी करून गरजेनुसार पथ्यपाणी केले जाते, आहार घेतला जातो. काही सवयी सोडल्या जातात. जमिनीचीही तीन वर्षांतून कमीत कमी एकदा तरी तपासणी करून तिचेही पथ्यपाणी पाळले पाहिजे. काही सवयी मोडल्या पाहिजेत, तरच तिची उत्पादनक्षमता टिकून राहील.


जमीन ही विश्वाची जननी आणि सर्व जीवसृष्टीचे पालनपोषण करणारी भूमाता आहे. ही शेतकरी-बळीराजाला दिलेले एक साधन आहे, एक संपत्ती आहे. त्याद्वारे तो स्वत:चा प्रपंच चालवतो, तसेच सर्व समाजाला अन्नदान देतो; परंतु आजच्या प्रगत युगाने आणि आधुनिकीकरणाच्या पगड्यामुळे आज आम्ही जमिनीला आमची बटीक मानत आहोत. जमीन ही काही कोणाची बटीक किंवा दासी होऊ शकत नाही. तिला प्रेम दिले ती तर आपल्याला प्रेम देईल. तिला आपण चांगले खाऊ घातले तर ती आपल्या बळीराजाच्या पोषणाचा विचार करेल. तिच्या अंतरंगात (म्हणजेच जमिनीत) सर्व सजिवांच्या चाललेल्या संसाराचा विचार केला तर ती आपल्याला विष घ्यायला लावेल. भूमातेच्या आरोग्याचा विचार आपण केला, तरच ती निरोगी अन्न आणि पाणी देईल. ‘जैसी करनी, वैसी भरनी’ याचा विचार करून आपण आपल्या जमिनीच्या संवर्धनाचा आणि संरक्षणाचा विचार करावा. कारण जमीन सुपीक करायला हजारो वर्षे लागतात; परंतु नापीक करण्यासाठी दोन-तीन दशकेही पुरे होतात, याचा अनुभव आपणा सर्वांना आलेला आहे. जमीन ही नैसर्गिक संपत्ती आहे. ती कोणत्याही कारखान्यात तयार होऊ शकत नाही किंवा पैसे देऊनही तयार होऊ शकत नाही. पैसा तर कारखान्यात तयार होतो, ज्याला आपण संपत्ती म्हणतो. म्हणजे जमिनीसारखी सजीव संपत्ती पैशासारख्या निर्जीव संपत्तीपेक्षा किती तरी श्रेष्ठ आहे. जमिनीची सुपीकता वाढवली, तर ती निश्चितच पुढील सात पिढ्यांना संपत्ती आणि धन देऊ शकते. मात्र, या जमिनीचा नाश करून जास्त संपत्ती मिळवून ठेवली तर ती पुढील सात पिढ्यांना पुरेल याची कोणतीही खात्री देऊ शकत नाही. म्हणून पुढील पिढ्यांच्या शाश्वत जीवनासाठी या भूमातेला शक्तिमान करण्यासाठी तिचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन केले पाहिजे. सर्व जीवसृष्टीला शाश्वत जीवन दिले, तरच मानवालाही शाश्वत जीवन मिळेल. या सर्व बाबींचा विचार करून या भूमातेचीही सुपीकता वाढवूनच आपल्या अन्नसुरक्षेचा प्रश्न मिटू शकतो. म्हणूनच भूमातेच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करणे हीच काळाची गरज आहे.
लेख वाचला-चव्हाण