शिंगाडा लागवड तंत्रज्ञान

डिजिटल बळीराजा-2    31-Aug-2019

 
 
 
 
शिंगाडा या पिकाची सुधारित तंत्रज्ञानाने लागवड कशी करावी तसेच काढणी व साठवणुकीची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे.
 
पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यामध्ये सरासरी पर्जन्यमान 1330 मि.मी. असून 55 पावसाचे दिवस असतात. पाऊउस साठवण्यासाठी या जिल्ह्यामध्ये बोड्या व तलाव मोठ्या प्रमाणात निर्माण केलेले आहेत. या तलावांमुळे भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळे शेतकरी धानाचे पीक घेतात, परंतु धानाचा उत्पादन खर्च भरपूर येतो आणि हेक्टरी नफा फार कमी मिळतो. पूर्व विदर्भातील शेतकर्‍यांनी धान लागवडीकरिता बांध्या बनवलेल्या आहेत. या भागात धुरे उंच व मोठे असल्यामुळे काही बांध्या खोल बनतात. या खोल बांधीमध्ये 75 ते 90 सेंमीपर्यंत उंचीची पाण्याची पातळी साठवून शिंगाडा पीक घेऊ शकतात. पावसाळ्यात जेंव्हा खूप पाऊस पडतो तेंव्हा जास्तीचे पाणी शेताबाहेर वाहून जाते. ते पाणी ज्या बाजूला शेताचा उतार आहे अशा बाजूला खोल बांधीमध्ये पाणी साठवून त्या पाण्याचा उपयोग शिंगाडा शेती करण्याकरिता घेतला जाऊ शकतो.
 
 
धानास पूरक म्हणून भंडारा जिल्ह्यात उपलब्ध संसाधनांचा वापर करून शिंगाडा शेती घेणे शक्य आहे. यामुळे पूरक व्यवसाय मिळून शेतकर्‍याची आर्थिक परिस्थिती सुधारेल. भंडारा जिल्ह्यातील बहुतेक शेतक र्‍यांकडे खोल बांधी किंवा छोटे-छोटे तलाव (बोड्या) आहेत या खोल बांधी किंवा छोटे-छोटे तलावामंधील 75 ते 90 सें.मी.पर्यंत उंचीच्या पाण्याचा वापर शेतकरी ओलितासाठी करतात. याच 75 ते 90 सें.मी.पर्यंत उंचीचे पाण्यात त्यांना इतर उत्पादन घेता येते. शेतकरी खोल बांधी किंवा बोडी व तलावातील पाण्यात मत्स्यसंवर्धन, कोळबीसंवर्धन, खेकळासंवर्धन, सुसाभित मासेसंवर्धन आणि शिंगाळा लागवड करू शकतात. हे उत्पादन पूरक व्यवसाय म्हणून धान लागवड करणार्‍या शेतकर्‍यांनी केले असता, त्याना आर्थिक लाभ मिळू शकतो, तसेच गावातील बेरोजगारांना प्रेरणा मिळून ते छोटे-छोटे शेततळे निर्माण करून पूरक व्यवसाय करण्यास पुढाकार घेऊन बेरोजगारीवर मात करू शकतात.
 
शिंगाडा पिकाचे मूळ स्थान समशितोष्ण व जास्त तापमान असलेला युराशिया (युरोप व एशिया यांचे उपमहाद्विप) असून ऑस्ट्रेलिया, अमेरिका, पाकीस्तान, बांगलादेश, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, चीन, तैवान या देशांत उत्पादन घेतले जाते. भारतामध्ये जवळपास 3000 वर्षांपासून शिंगाडा पिकाचे उत्पादन घेतले जाते. 
वनस्पतीविषयी वर्णन
 
शिंगाडा पिकाची लागवड चिखलात, पाणी असलेल्या ठिकाणी, भातखाचरात, तलावात, बोडीमध्ये करता येते. शिंगाळा पिकाची पाने गुच्छे स्वरूपात पाण्यावर तरंगत असून मुळे चिखलात असतात. पानांची लांबी अर्धा ते एक इंच असते, पिकाची दांडी पाण्यात 15 सेंमीपर्यंत वाढू शकते.
 
फुले उभयलिंगी असून कीटक परागीकरणानंतर फुले फलीत होऊन फळधारणा होते. या पिकाच्या फुलाला चार पाकळ्या असतात. फळे पाण्याच्या खाली विकसित होतात. फळांचा रंग हिरवा, लालसर असून त्याला चार शिंगे असतात. शिंगाळा फळाची लांबी 1 इंच रुंंद आणि फळाचे वजन 6 ग्रॅमपर्यंत असते.
 
शिंगाडामधील पोषक घटक अ.क्र. पोषक घटक मात्रा
 
1 पाणी 48.2 ग्रॅम 
2 प्रथिने 3.4 ग्रॅम 
3 फॅट 0.2 ग्रॅम 
4 कार्बादके 32.1 ग्रॅम 
5 साखर 3.3 ग्रॅम 
6 कॅलरीज 730 ग्रॅम 
7 टायटरी फायबर 14.9 ग्रॅम 
8 कॅल्शियम 17.6 ग्रॅम 
9 झींक 0.4 ग्रॅम 
10 लोह 0.7 ग्रॅम 
11 सोडीयम 0.8 ग्रॅम 
12 पोटॅशियम 468 मिली ग्रॅम
 
मानवी आरोग्यास फायदे
 
शिंगाडाचे आयुर्वेदामध्ये महत्त्वाचे स्थान असून औषधी गुणधर्म आहेत, याचा उपयोग पोटाच्या आजारावर, यकृत आणि प्लीहाच्या आजारावर उपयुक्त आहे.
 
1.शिंगाडा फळ थंड असून उन्हाळ्यामध्ये उपयुक्त आहे.
2.शिंगाडा रससेवनामुळे भ्ूुक वाढते व मळमळीपासून आराम मिळतो
3.शिंगाडा बियांची पेस्ट पायांच्या भेगा भरण्याकरिता वापरतात
4.अतिसार, हगवणकरिता शिंगाडा रस वापरतात
5.शिंगाडा पावडर खेाकल्याकरिता उपयुक्त
 
इतर फायदे
  • ग्लुटेन फ्री
  • फॅट प्रमाण कमी
  • कोलेस्टेरॉल फ्री
  • सोडीयमचे प्रमाण कमी
  • पोटॅशियमचे प्रमाण जास्त
  • खनिजामध्ये कॅल्शियम, लोह, झिंकफॉस्फरसचे प्रमाण जास्त
  • फायबरचे प्रमाण जास्त
  • ऊर्जाचे उत्तम स्रोत
 
शिंगाडा ही वनस्पती जलचर असून 75 ते 90 सें.मी. खोल बांधी किंवा छोटे-छोटे तलाव ; बोड्या तलावाच्या दलदलीमध्ये याची मुळे वाढतात आणि वेल पाण्यावर अलगद अधांतरीत तरंगतात. निसर्गत: वनस्पतीची रचना वैशिट्यपूर्ण आहे. या वेलीच्या पाणावर वैशिट्यपूर्ण रचना असल्यामुळे ते कमळासारखे तरंगतात. शिंगाडा वेलाला प्रत्येक पानाच्या देठाला फुगीर भागाची गाठीच्या आकाराची निर्मिती झाल्याचे दिसून येते. शिंगाडा वेलाला प्रत्येक पानाच्या देठाला फुगीर भाग असतो. या फुगीर भागाला हाताने दाबून पाहिले असता तो पोकळ असतो. या पोकळ भागालाच हवेच्या पिशव्या अळी इरसी म्हणतात. या हवेच्या पिशव्यांच्या मदतीने शिंगाडा वेलीला तरंगता येते. नैसर्गिकरीत्या ़या हवेच्या पिशव्या वेलीला प्रदान केल्यामुळे त्या पाण्यावर तरंगतात. जसजसा शिंगाडाचा वेल पाण्यावर वाढत जातो. तसतशी फुगीर हवेच्या पिशव्यांची संख्याही वाढत जाते. त्यामुळे वेली संतुलित राहून पाण्यावर तरंगतात.
 
हवामान
 
शिंगाडा पिकास उगवणीकरिता 12-15 अंश सेल्सियस तापमान आवश्यक आहे. फुलांचा चांगला विकास होण्याकरिता 20 अंश सेल्सियस तापमान गरजेचे असते. वर्षभरातील ऋतूनुसार असलेल्या तापमानात हे पीक उत्तम वाढते.
 
जमीन
 
ही जलचर वनस्पती असल्यामुळे लागवडीमध्ये मातीची भूमिका फार महत्त्वाची नसते, परंतु असे निदर्शनास आले आहे की तलाव, बोळीची मातीची माती सुपीक, काणदार, सेंद्रिय पदार्थ भरपूर प्रमाणात असतील तर शिंगाडा उत्तम वाढतो. 
पर्णपुष्प : वेल काढण्यास कारणीभ्ाूत असणार्‍या पर्णपुष्पामुळेच पानांची संख्या व वेलीचा विस्तार होतो. जर कीड व रोगांमुळे पर्णपुष्प नष्ट झाल्यास संपूर्ण वेल हा निकामी होतो.
 
शिंगाड्याच्या जाती :
 
या पिकाचे वर्गीकृत जातींचा फारसा अभ्यास झालेला नाही. सध्या प्रचलित असलेल्या खालीलप्रमाणे तीन जातींची लागवड केली जाते.
 
भगवा शिगांडा :
 
हा आकाराने मोठा असून 20 ते 25 ग्रॅम याचे वजन असते. तरी प्रचलित जातीपेक्षा हा शिंगाडा चवदार आहे. पिकाचा कालावधी 180 ते 210 दिवस. भगव्या शिगांड्याचे उत्पादन प्रतिहेक्टरी 35 क्विंटलपर्यंत मिळू शकते.
 
लालसर शिंगाडा :
 
या शिंगाड्याचा रंग लालसर हिरवा असून मध्यम आकाराचा आहे. जास्तीत जास्त याचे वजन 20 ग्रॅम असते. पिकाचा कालावधी साधारणत: 180 ते 200 दिवसांचा असतो. 28 ते 30 क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन मिळू शकते.
 
हिरवा शिंगाडा:
 
ही जात आकाराने लहान असून पिकाचा कालावधी 180 दिवसांपेक्षा कमी असतो. हिरव्या शिगाड्याचे उत्पादन साधारणत: 22 ते 25 क्विंटल/हेक्टरी मिळू शकते.
 
शिंगाडा रोपे तयार करण्याची पद्धत :
 
पेरणी : पेरणीचा काळ एप्रिल व मे महिन्यात नर्सरीत रोपे तयार केली जातात. शिंगाडा या पिकाची एप्रिल व मे महिन्यात नर्सरी तयार करून रोपे मुख्य क्षेत्रात लागवडीकरिता तयार करून ठेवावी. रोपे लागवडीयोग्य होईपर्यंत खोल बांधी किंवा तलावात पाणी साचवून ठेवण्यात येतो. शिंगाडा पिकाचे बी पेरणी करून नर्सरी तयार केली जाते. पूर्णपणे पक्व झालेला शिंगाडा ओलावा असलेल्या ठिकाणी उगवणीकरिता ठेवतात. अंकुर आलेले शिंगाडे निवडून नंतर नर्सरीमध्ये पेरतात. पावसाळा सुरू झाल्यानंतर ही रोपे नर्सरीमधून काढून मुख्य शेतात लागवड करतात. जर तलावाची माती फार सुपीक असेल तर 1-2 मीटर किंवा 2-3 मीटर अंतरावर लागवड करावी.
 
हेक्टरी बियाणे : याची लागवड बियाण्यांद्वारे व कलमाद्वांरे करतात. एक हेक्टर क्षेत्राकरिता लागवडीकरिता 27,000 बेणे पुरेसे होतात.
 
बीजप्रकिया : लागवडीेकरिता बियाणे निरोगी वापरावे. शिंगाडा या पिकामध्ये मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. याकरिता लागवडीपूर्वी कॉपर ऑक्सीक्लोराईड किंवा बाविस्टीन किंवा टायकोडर्मा यांची प्रक्रिया केल्यामुळे मुळकुज व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो.
 
रोवणी : जेव्हा वेल 30 सेंमी उंच वाढतो तेव्हा मुख्य तलावात लागवड करावी. नर्सरी वेल वाढविल्यामुळे मुख्य तलावात वाढीचा 6 आठवडे कालावधी कमी केला जातो. जर नर्सरीमध्ये वेलीची जास्त वाढ झाली असेल तर वेलीचे शेंडे खुडावेत. लागवडीवेळी वेल ओलसर जागेत ठेवाव्यात, परंतु पाण्यात डुबणार नाहीत याची काळजी घ्यावी. नर्सरीत तयार झालेली रोपे खोल बांधी किंवा तलावात पुरेसेे पाणी साचल्यानंतर लागवड करावी.
 
अंतर : लागवडीचे अंतर साधारणपणे 60 ग 60 सेंमी असावे. या अंतरावर लावणी केली असता रोपांची संख्या 27,000 प्रतिहेक्टरी आढळून येते.
 
पाणसोट: वेलवाढीच्या काळात वेलीस पाणसोट म्हणजेच बचरी ही काढून टाकणे आवश्यक असते. ती अशीच राहू दिल्यास उत्पादनात घट येते.
 
हायड्रोपोनिक्स
 
शिंगाडा पीक हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाने बकेट वापरून घेता येते. परमाईट व गांडूळखत वापरून व इतर पिकांची अन्नद्रव्ये वापरूनसुद्धा घेता येते.
 
खताचे व्यवस्थापण : या पिकाला खते देण्यासाठी उन्हाळ्यात तलावातील पाणी सुकल्यानंतर काडीकचरा, तसेच इतर सेंद्रिय पदार्थ नांगराद्वारे जमिनीत गाडावेत. पावसाळ्यात तलावात पाणी साचून गाडलेला काडीकचरा, तसेच सेंद्रिय पदार्थाचे विघटन होऊन लागवड केलेल्या शिंगाडा वेलीला अन्नद्रव्य उपलब्ध होतात.
 
शिंगाडा पिकाला उत्तम वाढीकरिता व विकासाकरिता विशेष अन्नद्रव्याची गरज असते. कोंबडीखत आणि काही प्रमाणात रासायनिक खते द्यावीत. अधिक उत्पादनासाठी 6-7.5 सामू असल्यास उत्तम. (चुना) डोलोमाइटसुद्धा (मॅग्नेशियम ) वापरला जातो. बंगालमध्ये 30-40 किलो युरिया/हे लागवडीनंतर वापरतात. त्यानंतर पुन्हा 20 दिवसांनी 30-40 किलो युरिया/हे वापरण्याची शिफारस आहे.
 
पाणी व्यवस्थापन :
 
एप्रिल व मे महिन्यात तलावातील पाणी सुकल्यानंतर तलावातील क्षेत्राप्रमाणे नर्सरीची जोपासना केली जाते व पावसाचे पाणी तलावात साचल्यानंतर नर्सरीतील रोपांची लागवड केली जाते. शिंगाडा पिकाचे नर्सरीचे संपूर्ण वाढीचे काळात मातीवर 10 ते 30 सेंमी पाण्याची पातळी असणे गरजेचे आहे. तलावात 75 ते 90 सें.मी.पर्यंत उंचीची पाण्याची पातळी असणे गरजेचे आहे. या उंचीपर्यंत पुरेशा प्रमाणात वेलींची वाढ होऊन त्या उत्पादनक्षम होतात.
 
आंतरमशागत
 
जर दुष्काळ असेल व पाण्याची कमतरता असेल तर तलावात/बांधीत पाणी टाकण्याची सोया करावी. जर जमीन फार सुपीक असेल तर शाखीय वाढ जास्त होऊन उत्पादन कमी मिळते. अशावेळी वेलीची हलकी छाटणी करावी. तणांचा बंदोबस्त करावा.
कीड व तणांचा बंदोबस्त :
 
प्रचलित पद्धतीनुसार पर्यावरणाला पोषक असणार्‍या बाबींचा अंतर्भाव करून कीड व रोगाचा बंदोबस्त केला जातो. शिंगाडा ही वनस्पती जलचर असल्यामुळे रोग, कीड व तणांचे नियंत्रण अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते, अन्यथा तलावातील पाणी विषारी होऊन तलावातील जीवजंतूंना हानी होण्याची शक्यता असते. याकरिता रोग, कीड व तण नियंत्रणासाठी प्रचलित पद्धतीचा अंतर्भाव करून पर्यावरणाला साथ देणार्‍या पद्धती वापराव्यात.
 
पानकोंबडया, पाणबदकांद्वारे किडींचा बंदोबस्त : तलावात मोठ्या प्रमाणात पाणकोंबड्या, पाणबदक सोडाव्यात. या सर्वांच्या मदतीने वेलीवरील पाने कुरतडणार्‍या अळ्यांचा खाद्य म्हणून हे पक्षी वापर करतात आणि त्यांचे नियंत्रण करण्यास व पर्यावरणास मदत करतात. तलावात मोठ्या प्रमाणावर पाणकोंबड्या, पाणबदकांद्वारे वेलींवरील पाने कुरतडणार्‍या अळ्यांचा या पक्ष्यांचे खाद्य म्हणून वापर होतो व पर्यावरणाद्वारे किडींचा बंदोबस्त होतो.
 
तरंगाणार्‍या वेलीवर पाणकोंबड्या इतर पक्षी आपली घरटे बांधून पिलांची जोपासना करतात याचा फायदा किडीचा नायनाट करण्यास होतो. आणि शिंगाडा पिकाला रोगमुक्त ठेवण्यास मदत होते. अशाप्रकारे कीडनियंत्रण केल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होऊ शकते
 
मित्रकिडीद्वारे कीड नियंत्रण : शिंगाडा पिकावर येणार्‍या किडीचा आणि त्यांच्या अंड्यांचा नायनाट करण्यासाठी मित्रकीटकांचा वापर केला जातो.
 
अ. मुग्धामाशी : माशी व चतुर ही बहुरंगी कीटक असून त्यांचे पंख पारदर्शक असतात. या किडींची पिले जलचर असून शिंगाडाच्या खोडावर चढून अंडी व पिलांचा नाश करतात.
याव्यतिरिक्त किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यास स्थानिकरीत्या उपलब्ध असलेली तंबाखू भ्ाुकटीची हाताने वेलींवर धुरळणी केली जाते.
ब. पाण्यावर चालणारे ढेकूण : हे ठेकून पाण्यावर चालता चालता शिंगाड्याच्या वेलीवर चालू लागतात आणि वेलीवर असणार्‍या शत्रुकिडींचा नाश करतात.
क. पाणझोपया : प्रतिदिवशी 19 ते 20 भक्ष्य पकडून खातो. याचा जीवनकाळ 1 ते 1.5 महिने असतो.
ड. पाण्यातील ढेकूण : शिंगाड्याच्या आतील बाजूस असणार्‍या किडीचे अंडे तसेच किडीचा नायनाट करतो आणि उत्पादनात वाढ घडवण्यास मदत करतो.
 
किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास स्थानिकरीत्या उपलब्ध असलेली तंबाखूची भ्ाुकटी हाताने वेलीवर धुरळणी करावी.
 
जलकुंभी : ब्रिटिश काळात शो प्लांट म्हणून आणण्यात आलेली वनस्पती हे एक जलचर तण असून याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात शिंगाडा शेतीमध्ये दिसून येतो. ही वनस्पती जलाशय, नदी, तलावात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
फुले येण्याचा काळ : फुलावर येण्याचा कालावधी क्षेत्रानुसार बदलतो, परंतु सर्वसाधारणपणे जुलै, ऑगस्ट महिन्यात फुलोरा सुरू होतो. शिंगाडा या पिकाची लागवड झाल्यानंतर 45 ते 60 दिवसांत वलींवर लहान पांढर्‍या रंगाची फुले येतात. फुले उभयलींगी असून कीटक परागीकरणानंतर फुले फलीत होऊन फळधारणा होते. 20 ते 30 दिवसांत फळे काढणीला तयार होतात.
काढणी :
 
पहिली काढणी : शिंगाडा वेलीवर सतत फुले येत राहतात व आलेल्या फुलांची फळधारणा होऊन पक्व झालेल्या शिंगाड्याची दर 15 दिवसांनी काढणी केली जाते. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून काढणीला सुरवात होते. पहिल्या काढणीत 2 ते 3 क्विंटलपर्यंत शिंगाडा उत्पादन मिळू शकते.
 
दुसरी ते सातवी काढणी : दर 15 दिवसांनी जानेवारीअखेरपर्यंत किमान सात वेळा शिंगाडा तोडणी केली जाते व दुसर्‍या काढणीनंतर प्रत्येक वेळी 5 ते 6 क्विंटलचे दरम्यान उत्पादन मिळते.
काढणी केलेली शिंगाडा फळे थंड जागी साठवावीत. फळे सुकू नयेत याकरिता प्लॅस्टिक थैली किंवा कंटेनर वापरावेत. काही फळांना काढणी किंवा हाताळताना इजा झाल्यास ते सडतात तर ते निवडून वेगळी करावीत. सुस्तावस्थाकरिता काही ठिकाणी मोठे फ्रिजसुद्धा वापरले जातात.
 
काढणीपश्चात तंत्रज्ञान : पक्व झालेले शिंगाडे तोडून पाण्याच्या माठामध्ये भरले जातात. माठामध्ये फक्त 1 लिटर पाणी टाकून शिंगाडे उकडतात. शिंगाड्याच्या होणार्‍या रंग परिवर्तन त्याचा टणकपणा यावरून ते शिजले की नाही ते प्रमाण निश्चित केले जाते.
ब्ल्यू कॉपरची प्रकिया : शिजवलेल्या शिंगाड्यावर 0.5 ते 1 टक्का ब्ल्यू कॉपर द्रावणाची प्रक्रिया केली जाते. त्यामुळे कवचास काळा रंग व आतील भाग पांढरा होण्यास मदत होते.
 
बाजारात विक्री : प्रक्रिया झालेल्या शिंगाड्याची विक्री किमान 2 दिवसांत करणे आवश्यक असते, अन्यथा ते खराब होतात.
कच्या शिंगाड्याची बाजारात विक्री : शिंगाडे खराब होऊ नये म्हणून दूर अंतरावरील बाजारपेठेकरिता कच्चा शिंगाडा पाठविला जातो व त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून बाजारात विक्रीकरिता उपलब्ध करून दिला जातो.
 
थोडे महत्त्वाचे व काळजी :
 
पर्णपुष्प : वेल वाढण्यास कारणीभूत असणार्‍या पर्णपुष्पामुळे पानांची संख्या व वेलीचा विस्तार होतो. कीड व रोगामुळे पर्णपुष्प नष्ट झाल्यास संपूर्ण वेल निकामी होतो.
 
पाणसोट : वेलवाढीच्या काळात वेलीस पाणसोट येतात. ही पाणसोट म्हणजेच बचरी ही काढून टाकणे आवश्यक असते ती तशीच राहू दिल्यास उत्पादनात घट येते.
 
प्रचलित लागवड ही पर्यावरणाचा समतोल राखणारी आहे.
1. शिंगाड्याच्या अधिक उत्पादनासाठी संशोधित वाणांची निर्मिती होणे आवश्यक आहे.
2. प्रतिहेक्टरी उत्पादन 45 ते 50 हजारांपर्यंत जरी मिळत असले तरी कामाच्या प्रमाणात उत्पादन कमी आहे.
3. मासेमारीतून अतिरिक्त उत्पन्न येते.
 
डॉ. उषा डोंगरवार, श्री प्रमोद पर्वते, श्री सुमेध काशीवार