कडधान्य पिकाचे महत्त्व कमी उत्पादनाची कारणे आणि उपाय

डिजिटल बळीराजा    19-Aug-2019
 
 
 
 
कडधान्य पिके शेतीची सुपीकता वाढवतात आणि त्यामुळे कडधान्यानंतर घेतलेले पीक चांगले दर्जेदार उत्पन्न देते. असे प्रयोगांती सिद्ध झालेले असून कडधान्य पिकाचे महत्त्व, कमी उत्पादनाची कारणे आणि त्यावर उपाय संबंधीची माहिती या लेखात सादर केली आहे.
 
कडधान्य पीक हे नैसर्गिक अद्भुत देणगी असून, त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. डाळवर्गीय पिकाद्वारे मानवी शरीराच्या सामान्य वाढीसाठी लागणारी प्रथिने मिळतात. जनावरांची उत्पादन क्षमता (दूध, मांस, मेहनत) वाढते, जमिनीचा पोत व मगदूर सुधारतो आणि उद्योगधंद्यांना लागणार्‍या कच्च्या मालाचा पुरवठा होतो. अशा विविध प्रकारचे उपयोग कडधान्य पिकांमुळे होतात. तसेच कडधान्य पिके शेतीची सुपीकता वाढवतात आणि त्यामुळे कडधान्यानंतर घेतलेले पीक चांगले दर्जेदार उत्पन्न देते, असे प्रयोगाअंती दिसून आले आहे.
 
आहारातील महत्त्व :
 
डाळवर्गीय पिकांचे विशेष महत्त्व शाकाहारी मानवाकरिता आहे. भारतीय लोकांच्या आहारात सुमारे 10 ते 15 % प्रथिने आणि 20% कार्बनयुक्त ऊर्जा ही कडधान्यांद्वारे मिळते. कडधान्यामध्ये प्रथिनाशिवाय कर्बोदके, खनिजे आणि जीवनसत्त्वाचे प्रमाणसुद्धा चांगले आहे. शरीरास पचण्यास सुलभ असणारे प्रथिने, लायसिन आणि रिबॉफ्लेवीन कडधान्यात उपलब्ध असतात. तूर व मसुरातील प्रथिने लहान मुलांना व वृद्धांना पचण्यास हलकी असतात. आहारात अमायनो आम्ले ही मूलभूत व अत्यंत आवश्यक असतात. त्यांची उपलब्धता कडधान्यांपासून होते. कडधान्यांच्या कोवळ्या हिरव्या शेंगाचा उपयोग भाजी म्हणून केला जातो, तसेच जनावरांचा आहार म्हणूनही कडधान्य पिके उपयुक्त आहेत.
 
जमिनीची सुपीकता वाढविणे :
 
कडधान्य पिकांमध्ये शेतीची सुपीकता वाढविण्याचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. कडधान्य पिकांच्या मुळावर जिवाणूंच्या असंख्य गाठी असतात. त्या गाठींमध्ये असलेले सूक्ष्म जिवाणू हवेतला मुक्त नत्रवायू शोषून घेऊन पिकाची नत्राची गरज भागवतात व शिल्लक राहिलेले नत्र जमिनित सोडतात. त्यामुळे जमिनीत नत्राचे प्रमाण वाढते. कडधान्य पिके मुळावरील गाठीतील रायझोबियम जिवाणूंच्या साहाय्याने हवेतील नत्र शोषून घेतात व त्याचे नायट्रेट खतामध्ये रूपांतर करतात. सर्वसाधारणपणे कडधान्य पिके प्रतिवर्षी हेक्टरी सुमारे 380 किलो नत्र हवेतून शोषून घेतात. कडधान्य पिकाची मुळे जमिनीत खोल असल्यामुळे जमिनीत सर्व थरांतून अन्नद्रव्ये व पाणी उपलब्ध होते. तृणधान्यानंतर कडधान्याची लागवड करुन पिकांची फेरपालट केल्याने जमिनीची सुपीकता वाढते व उत्पादन क्षमता टिकून राहते, तसेच उत्पादनात वाढ होते. कडधान्याचा उत्पादन खर्चही फार कमी आहे.
 
कडधान्यांचे जमिनीत मिसळणारे सेंद्रिय पदार्थ जमिनीची सुपीकता व पोत टिकवून ठेवण्यास मदत करतात. उडीद, मूग चवळीचे पीक तयार झाल्यानंतर शेंगाची तोडणी करून ते जमिनीत गाडल्यास त्याचा उपयोग हिरवळीच्या खतासारखा होतो. त्यामुळे जमिनीचा कस सुधारण्यास मदत होते. कडधान्य पिकांची मुळे, पाने, फांद्या जमिनीत लवकर कुजतात. तसेच पीक काढणीच्या वेळी मुळावरील गाठी जमिनीत राहत असल्यामुळे सुमारे 10 % नत्र जमिनीत मिसळून जाते. हे नत्र पुढील पिकास उपयोगी पडते. तसेच कडधान्य मिश्रपीक म्हणून खूपच चांगले आहे.
 
भारतात उत्पादित कडधान्यांची उपलब्धता दरडोई 40 ग्रॅमपेक्षा कमी आहे. मानवी आहाराप्रमाणे सर्वसाधारण दरडोई दररोज 140 ग्रॅम कडधान्य असावयास पाहिजे, असे आहार तज्ज्ञाचे मत आहे. त्यामुळे सद्यस्थितीच्या तुलनेत 3 पटींपेक्षा जास्त उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. सध्याच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार केल्यास भविष्यातील कडधान्याची गरज त्यापेक्षा जास्तच राहणार आहे.
 
कमी उत्पादनाची कारणे व उपाय :
 
1. अनुवंशिक क्षमतेचा र्‍हास : सध्याच्या काळात परंपरागत पीकपद्धतीत कडधान्य पिकास दुय्यम स्थान असून याची लागवड दुर्लक्षित स्थितीत वर्षानुवर्षे निकृष्ट दर्जाच्या जमिनीवर जवळजवळ 92% ही कोरडवाहू क्षेत्रात केली जाते. त्याद्वारे निविष्ठेला साथ देण्याचा अनुवंशिक क्षमतेचा झालेला र्‍हास हे एक महत्त्वाचे कारण आहे. मागील काही दशकांत अनुवंशिक क्षमता वाढविण्याचे पैदासकाराचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु म्हणावे तसे यश पदरात पडू शकले नाही म्हणून नवीन जाती या अनुषंगाने विकसित करणे आवश्यक आहे आणि सद्य:स्थितीत ते उपलब्ध/विकसित करण्यात काहीअंशी यश आले आहे.
 
2. जैविक अवस्था : परंपरागत कडधान्य लागवडीतून सुरवातीपासून याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामध्ये पिकाची बारमाही सवय, मध्यंतरीची वाढ जास्त कालावधीमध्ये येणारा फुलोरा, खोलवर वाढणार्‍या मुळ्या, एकत्रित पाने, जाणवणारी फुलगळ आणि शेंगा फुटण्याचे प्रमाण याचे मुख्यत्वे करून जास्त उत्पादनापेक्षाही महत्त्वाचे आहे. वरील सर्व परंपरागत त्रुटींचा उत्पादनामध्ये अंतर्भाव होतो.
 
3. सुधारित लागवड तंत्रज्ञानाच्या अवलंबनाचा अभाव : कडधान्य पिकाच्या लागवड तंत्रज्ञानाचा विशेषत: मशागत, खतपुरवठा, पाणीपुरवठा, वेळेवर पेरणी, हेक्टरी योग्य झाडांची संख्या, तण व्यवस्थापन व पीकसंरक्षण याकडे पुरेसे लक्ष न देणे यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास डाळवर्गीय पिकांचे उत्पादन वाढण्यात भर पडेल.
 
4. पीक व्यवस्थापनातील त्रुटी :
 
अ) सुधारित वाणाचा अभाव : कडधान्य पिकाच्या सुधारित जातीचे/वाणाचे खात्रीशीर बियाणे लागवडीस शेतकर्‍यांना मिळत नसल्यामुळे शेतकरी स्वत:कडे पूर्वापार चालत आलेले बियाणेच वापरतात. अशा बियाणांची उत्पादन क्षमता फार कमी होऊन रोग किडीस जास्त बळी पडतात. त्यामुळे उत्पादन कमी येते. नवीन सुधारित अधिक उत्पादन (उत्पन्न) देणार्‍या तसेच रोग व किडीस कमी बळी पडणार्‍या वाणांचे बियाणे सर्व शेतकर्‍यांना मिळत नाही म्हणूनही उत्पादन कमी येते. त्याकरिता नवीन सुधारित जास्त उत्पादन देणार्‍या वाणांचे बियाणे सर्व शेतकर्‍यांपर्यंत उपलब्ध करून द्यावे, म्हणजेच उत्पादनात भरीव वाढ होईल.
 
ब) संशोधन : भारत हा कडधान्यांच्या उत्पादनातील प्रमुख देश असून ज्याप्रमाणे संशोधनाद्वारे नवीन तंत्रज्ञान भात व गहू पिकासाठी वापरतात त्या प्रकारच्या संशोधनाचा अभाव कडधान्याच्या पिकांमध्ये आढळून येत आहे. कडधान्य पिकास प्रमुख संशोधनाचा अभाव आहे म्हणूनच या विस्तृत प्रमाणात प्रमुख कमी उत्पादनाची कारणे शोधून त्यावर खात्रीशीर जास्त उत्पादन निरनिराळ्या हवामानानुसार कडधान्य पिकामध्ये आणणेे प्रमुख उद्दिष्ट आहे.
 
क) विस्तार : कृषीविस्ताराचे कार्य मुख्यत्वे करून तृण पिकावर जास्त व कडधान्य पिकावर कमी लक्ष केंद्रित करण्यात येते. संशोधन तंत्रज्ञान आणि शेतकरी यामध्ये फार मोठी दरी आहे, परंतु लागवड तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचा प्रसार जरी खात्रीपूर्वक योग्य प्रकारे केल्यास कडधान्याचे उत्पादन दुप्पट होण्यास मदत होईल.
 
ड) प्रशिक्षण : कडधान्य तंत्रज्ञानाविषयी प्रसार करण्यासाठी शास्त्रज्ञांची कमतरता, विस्तार कर्मचारी आणि शेतकरी यास अपूर्ण ज्ञान असल्यामुळे तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होत नाही. म्हणून शेतकर्‍यास आधुनिक कडधान्य लागवड तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण वेळोवेळी देणे गरजेचे आहे.
 
5. पीकसंरक्षणाचा अभाव : कडधान्य पिकांवरील येणार्‍या विविध कीड आणि रोगांचे नियंत्रण वेळेवर होत नसल्यामुळे कडधान्य उत्पादकतेमध्ये अस्थिरता आहे. पीकसंरक्षणाविषयी वेळीच काळजी घेऊन रोग व कीडप्रतिबंधक वाणाची लागवड सर्वत्र केली जात नाही. जरी प्रतिबंधक वाण मिळाले तरी कीड व रोगाच्या नवीन प्रजाती निर्माण होऊन ती प्रतिबंधकता कायम राहत नाही. त्यासाठी पीकसंरक्षण उपाययोजनेस महत्त्व आहे.
 
6. जिवाणू संवर्धनाचा कमी वापर : रायझोबियम जिवाणूंच्या वापरामुळे हेक्टरी 10 ते 15 % पीक उत्पादनात वाढ आढळून येते, परंतु त्याचा वापर होत नाही. रायझोबियम संवर्धनाच्या प्रभावी कार्यक्षम जिवाणूंचा अभाव, त्याची उपलब्धता आवश्यकतेपक्षा कमी होत आहे. बाजारात हे जिवाणूसंवर्धक उपलब्ध आहेत. अधिक कार्यकाळ चांगली गुणवत्ता असलेले रायाझोबियम जिवाणूंचा वापर आवश्यक आहे.
 
7. पीक नियोजनाचा अभाव : पारंपरिक पद्धतीमध्ये शेतकरी स्वत:च्या कौटुंबिक गरजेप्रमाणे पिकाची निवड करून आपल्या शेतात लागवड करतात, परंतु बर्‍याच वेळा त्यांना लागणार्‍या पिकाच्या लागवडीविषयी माहिती उपलब्ध नसते. कडधान्य पिकाच्या लागवडीविषयीची माहिती उपलब्ध नसते म्हणून कडधान्य पिकाच्या लागवडीबाबतचे वेळीच नियोजन केल्यास अपेक्षित उत्पन्न मिळू शकते.
 
 
कडधान्य पिकाच्या लागवडीची प्रमुख सूत्रे
 1. कडधान्य पिकाची लावगड करण्याबाबतच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अधिक उत्पन्न मिळू शकते म्हणून त्या दृष्टीने खालील बाबींचा अवलंब करणे गरजेचे आहे.
 2. उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी नवीन, सुधारित, अधिक उत्पादन देणार्‍या, लवकर येणार्‍या, तसेच कीड व रोगप्रतिबंधक वाणांचा वापर करणे.
 3. पीक तंत्रज्ञानाचा प्रसार प्रात्यक्षिकाद्वारे करावा.
 4. एकात्मिक पद्धतीने कीड व रोग, तसेच तण व्यवस्थापन करणे.
 5. कडधान्य बियांस प्रतिकारक्षम जिवाणूंचा वापर बीजप्रक्रियेसाठी करणे.
 6. सेंद्रिय, जैविक व रासायनिक खताचे योग्य व्यवस्थापन करणे.
 7. शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी व शेतकर्‍यास वारंवार प्रशिक्षण देणे.
 8. कडधान्य संशोधन व त्याच्या शिफारशींची अंमलबजावणी शेतकर्‍यांच्या शेतावर करणे.
 9. कडधान्य लागवडीसाठी पतपुरवठा, बाजारपेठ उपलब्ध करून देणे.
 10. आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती वेळोवेळी प्रसारित करणे.
 11. पिकाची सुधारित मशागत व पाणीव्यवस्थापन करणे. 
 
डॉ. ए. एस. जोंधळे आणि डॉ. जी. एस. काजी
सहायक प्राध्यापक (कृषी वनस्पतिशास्त्र व कृषी विद्याशास्त्र)
राजीव गांधी कृषी महाविद्यालय, परभणी.