कमी कालावधीत येणारे नगदी शेंगभाजी पीक-लागवड तंत्रज्ञान

डिजिटल बळीराजा    13-Aug-2019
 

 
 

व्यापारी तत्वावर कमी कालावधीत येणारे नगदी शेंग भाजीची लागवडीच्या तंत्रज्ञान माहितीचा उहापोह या लेखात केला आहे.
 
चवळी ही शेंगवर्गातील भाजी असून, महाराष्ट्रात सर्व भागातून तिची लागवड केली जाते. चवळीचा सालीसकट कोवळ्या शेंगा व कोवळे दाणे, तसेच पूर्ण वाळलेले दाणे अशा स्वरूपात भाजीत, आमटीत व उसळीत वापर करतात. काही ठिकाणी कोवळे कोंब पानासकट खुडून त्यांची भाजी केली जाते. झाडांचा वापर जनावरांना चारा म्हणूनही केला जातो.
भाजीचे पीक म्हणून चवळीची लागवड मोठ्या शहरांच्या आसपास आणि ग्रामीण भागात मर्यादित स्वरूपात होते. कडधान्य म्हणूनसुद्धा चवळीची लागवड होते. महाराष्ट्रात जवळजवळ सर्वच जिल्ह्यांतून चवळीची थोड्याफार प्रमाणात लागवड केली जाते. सलग मोठ्या क्षेत्रात व्यापारी तत्त्वावर चवळीची लागवड सध्या करीत आहेत. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 8 हजार हेक्टर क्षेत्र चवळीच्या लागवडीखाली असून एकूण उत्पादन 32-35 हजार मे. टन आहे.
 
पोषक द्रव्ये :-
 
 चवळी हे अत्यंत पौष्टिक असे भाजीचे पीक आहे. चवळीच्या बियांमध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते. विशेषतः शरीर पोषणास आवश्यक असलेल्या लायसिन या अमिनो अ‍ॅसिडचे पुरेसे प्रमाण असल्यामुळे चवळी हे सर्वसामान्य लोकांच्या आहारातील समतोल राखण्यास फारच उपयुक्त आहे. याशिवाय चवळीत फॉस्फऱस, चुना, इतर खनिजे आणि अ, ब आणि क जीवनसत्त्वाचे प्रमाणही भरपूर आहे. 100 ग्रॅम खाण्यायोग्य भाजीमध्ये खालील प्रमाणात पोषक द्रव्ये उपलब्ध असतात.
 
 • पाणी (टक्के ) - 84.06
 • कार्बोहायड्रेट (ग्रॅ) - 8.00
 • रिबोफ्लेवीन (मिग्रॅ ) - 0.09
 • जीवनसत्त्व क (मिग्रॅ) - 13.00
 • प्रोटिन्स (ग्रॅ) - 4.30
 • स्निग्ध पदार्थ (ग्रॅ) - 0.20
 • थायमिन (ग्रॅ) - 0.07
 • अ जीवनसत्त्व (आययू) - 941
 • कॅल्शियम (मिग्रॅ) - 80.0
 • फॉस्फर - 74.00
 • लोह (मिग्रॅ) - 2.50
 
चवळीच्या ओल्या शेंगाचा भाजीसाठी, तर वाळलेल्या बियांचा उसळीसाठी उपयोग होतो, तसेच हिरवळीचे खत म्हणून जमिनीची सुपीकता वाढविण्यास आणि धूप थांबविण्यास चवळी हे फारच उपयुक्त पीक आहे.

वाढीची सवय -

 
चवळी ही आधाराने वाढणारी, वेलवजा वर्षायू वनस्पती आहे. यामध्ये आता झुडूपवजासारख्या जाती सुद्धा उपलब्ध आहेत. बहुतेक शेतकरी झुडूपवजा प्रकारच्या चवळीची लागवड करतात. चवळीच्या झाडांची पाने गडद हिरवी आणि चकचकीत असतात. फुलांचा रंग पांढरा, गुलाबी, निळा किंवा जांभळा असतो. शेंगांचे घोस पानांच्या बेचक्यात येतात. शेंगा चपट्या किंवा गोल असून काही जातींमध्ये शेंगांची लांबी 50 सेंमीपर्यंत असते.
 
जाती -
 
लागवडीसाठी चवळीच्या खालील सुधारित जाती उपलब्ध आहेत.
 
पुसा फाल्गुनी -
 
ही जात झुडूपवजा वाढणारी असून उन्हाळी हंगामासाठी अतिशय चांगली आहे. शेंगा गडद हिरव्या रंगाच्या असून 10 ते 12 सेंमीपर्यंत लांब असतात. त्यांचे दोन बहर येतात. लागवडीपासून 60 दिवसांत शेंगांची काढणी सुरू होते. हेक्टरी 90 ते 110 क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळते.
 
पुसा कोमल -
 
ही जात करपा रोगास प्रतिकारक असून याचे रोपटे झुडूपवजा व मध्यम उंचीचे असते. 90 दिवसांत पीक तयार होते. हेक्टरी 90 ते 100 क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळते.
 
पुसा दो फसली -
 
ही झुडूपवजा वाढणारी जात असून, उन्हाळी आणि पावसाळी या दोन्ही हंगामांत लागवड करता येते. शेंगा सुमारे 18 सेंमी लांब असून शेंगांची काढणी लागवडीपासून 67 ते 70 दिवसांत सुरु होते. हेक्टरी उत्पन्न 100 क्विंटलपर्यंत मिळते.
 
पुसा बरसाती
 
ही जात लवकर येणारी (45 दिवस ) असून पावसाळी किंवा खरीप हंगामासाठी उपयुक्त आहे. शेंगा 15 ते 25 सेंमी लांब असून त्यांचे 2-3 बहार येतात. या जातीच्या हिरव्या चवळीचे उत्पादन 85-90 क्विंटल प्रतिहेक्टरी येते.
 
असीम -
 
ही जात 80 ते 85 दिवस मुदतीची असून खरीप हंगामासाठी अधिक योग्य आहे. पहिली तोडणी 45 दिवसांत मिळते. एकूण 8 ते 10 तोडण्या 35 ते 40 दिवसांत आटोपतात. या जातीच्या शेंगा फिकट हिरव्या मांसल आणि रसरशीत 15 ते 18 सेंमी लांब असतात. बी पांढर्‍या रंगाचे असून फुले पांढरी असतात. हिरव्या शेंगांचे हेक्टरी उत्पादन खरीप हंगामात 75, तर उन्हाळ्यात 60 क्विंटल असते.
 
ऋतुराज
 
झुडूपवजा वाढणारी जात असून पेरणीनंतर उन्हाळ्यात 40 दिवसांनी आणि खरिपात 30 दिवसांनी फुलावर येते. फुले जांभळी असून शेंगा 22 ते 24 सेंमी लांब कोवळ्या असतात. खरीप हंगामात पहिली तोडणी 40 ते 45 दिवसांनी मिळते. त्यानंतर 10-12 तोडण्या होतात. हिरव्या शेंगा आणि बी या दोन्हींसाठी ही जात उपयुक्त असून प्रतिहेक्टरी शेंगांचे उत्पादन 85 क्विंटलपर्यंत मिळते. बियांचे हेक्टरी उत्पादन 10 क्विंटलपर्यंत मिळते. खरीप हंगामात पीक 60 ते 65 दिवसांत आणि उन्हाळी हंगामात 75 ते 80 दिवसांत निघते.
 
हवामान -
 
हे उष्ण हवामानातील पीक असून कोरड्या आणि दमट दोन्ही हंगामांत येऊ शकते. मात्र कडाक्याची थंडी सहन करू शकत नाही. तापमान 20 अंशांच्या खाली गेल्यास झाडांना फुले व शेंगा येत नाहीत. मात्र उष्ण तापमान 40 अंश सेंग्रेमध्ये चवळीचे पीक टॅग धरते आणि पाण्याचा चांगला पुरवठा असल्यास जोमाने वाढून उत्पन्न देते.
 
जमीन -
जमिनीच्या बाबतीत हे पीक तितकेसे चोखंदळ नाही. अगदी हलक्या ते मध्यम किंवा आभारी जमिनीतही ते येऊ शकते. पाण्याचा निचरा न होऊ शकणार्‍या भारी चिकन मातीच्या जमिनी या पिकासाठी निवडू नये. लागवड केलेल्या जमिनीतून पाण्याचा चांगला निचरा होणे आवश्यक आहे. उत्तम निचरा होणार्‍या 6 ते 8.5 आम्ल विम्ल निर्देशांक असलेल्या सेंद्रिय पदार्थयुक्त जमिनीत चवळीचे पीक चांगले येते.
  
लागवडीचा हंगाम ः
 
चवळीची लागवड साधारणतः उन्हाळी आणि खरीप या दोन्ही हंगामांत करतात, पण महाराष्ट्रात हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडत नसल्याने चवळीचे पीक जवळजवळ वर्षभर घेता येते. उन्हाळी पिकाची लागवड फेब्रुवारी, मार्चमध्ये, तर खरीप हंगामात जून-जुलै महिन्यात करतात. हिवाळी हंगामासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात लागवड करतात. विदर्भातील शेतकरी ज्वारी पिकात मिश्रपीक म्हणून चवळीचे पीक घेतात.
 
पूर्वमशागत व पेरणी
 
 • जमिनीचे क्षेत्र नांगरट करून कुळवाने भुसभुशीत करावे. मशागत करताना हेक्टरी 10-15 टन कंपोस्ट अथवा शेणखत टाकावे. भाजीसाठी पीक घ्यावयाचे असल्यास सरी-वरंबे तयार करावेत. दोन रोपांतील अंतर 15 सेंमी ठेवून वरंब्याच्या मध्यावर बी टोकावे. दोन सरींमधील अंतर 45 सेंमी ठेवावे.
 • हल्ली उच्च प्रतीच्या, कोवळ्या व एकसारख्या लांबीच्या शेंगांची मागणी असल्याने झुडूपवजा चवळी पिकाची लागवड गादीवाफ्यावर टोकण पद्धतीने करून पीक आणि खतांच्या मात्रा ठिबक सिंचन पद्ध्त वापरून द्यावे. ठिबक सिंचन पद्धत आणि गादीवाफ्यावर लागवड केल्यास शेंगांची प्रत उत्तम मिळून उत्पादन मिळते.
 • जमिनीची मशागत झाल्यानंतर गादीवाफे 60 सेंमी रुंद, 30 सेंमी उंच आणि दोन गादीवाफ्यात 40 सेंमी अंतर ठेवून तयार करावेत. गादीवाफ्यावर लागवड दोन ओळींत करावी. दोन ओळींत 45 सेंमी अंतर ठेवून दोन रोपांमध्ये 15 सेंमी यानंतर ठेवावे. हेक्टरी 15 किलो बियाणे पुरते.

खते -

 
 • जमिनीची सुपीकता, लागवडीचा हंगाम व जाती यानुसार खताचे प्रमाण ठरवावे लागते, तसेच मातीपरीक्षण लागवडीपूर्वी करून घेणे आवश्यक आहे. तरी साधारणतः चवळी पिकाला हेक्टरी 50 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
 •  
 • जमिनीची मशागत झाल्यानंतर संपूर्ण स्फुरद, पालाश आणि अर्ध्या नत्राची मात्रा बी पेरणीपूर्वी जमिनीत पेरून द्यावे. पहिली खुरपणी झाल्यानंतर म्हणजे अंदाजे 25 ते 30 दिवसांनी राहिलेला अर्धा नत्राचा हप्ता द्यावा.

 • गादीवाफ्यावर टोकण पद्धतीने लागवड केली असल़्यास ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याबरोबर खालील विद्राव्य खताच्या मात्रा द्याव्यात.
 
 पिकाची अवस्था  एकूण मात्रा द्यावयाचे दिवस  विद्राव्य खतांचे शेकडा प्रमाण नत्र : स्फुरद : पालाश खते कि / दि / हे  एकूण खते कि / हे  एकूण मात्रा कि / हे नत्र : स्फुरद : पालाश 
 लागवडीपासून पुढे    30  12 :61:0 स्फुला
46:0:0 उज्वला युरिया
0:0:50 सुजला
 2.755 1.130 0.933  82.623 33.890 28.00  
9.91:50.40:0.00
15.59:0.00:0.00
0.00:0.00:0.00
 लागवडीपासून 31 दिवस ते 60 दिवसांपर्यंत  30   19:19:19
+
0:0:51
 2.633
1.00
 79

 30
15.00:15.00:15.00
0.0:0.0:15.300
लागवडीपासून 61 दिवस ते 100 दिवस    40   19:19:19
+
  0:0:51
 1.260

 0.980
 50.260

 39.215
 10.00:10.00:10.00
 0.00:0.00:20.00
 (मातीपरीक्षण करून घेणे आवश्यक आहे.)   एकूण  50.0:75.400:74.300
 

आंतरमशागत:-
 
पेरणीनंतर 3 ते 5 दिवसांत बी उगवून येते व रोपांच्या वाढीला जोम धरतो. थोड्याच दिवसांत तो जमीन झाकून टाकतात. खुरपणी करून तण काढून टाकावे. खुरपणी करताना वरील माती भुसभुशीत करून झाडांना मातीची भर द्यावी. चवळीला फुले येण्याच्या थोडे आधी म्हणजे लागवडीपासून 6 ते 8 आठवड्यांनी 15 पीपीएम मॅलिक हायड्रासाइडचा फवारा दिल्यास रोपांची वाढ मर्यादित राहून शेंगांचे उत्पादन 30 ते 5 टक्क्यांनी वाढते, असे प्रयोगांती आढळले आहे.
पाणी:-
 
 • खरीप हंगामात पाऊस जास्त दिवस न पडल्यास चवळी पिकाला हलके पाणी द्यावे. उन्हाळी हंगामात 5 ते 6 दिवसांनी नियमित पाणी द्यावे. 
 • पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत वापरत असल्यास पिकाची दर दिवसांची पाण्याची गरज लिटरमध्ये निश्चित करून तेवढेच पाणी मोजून द्यावे.

काढणी आणि उत्पादन- 

 
बी लावल्यापासून 6 ते 8 आठवड्यांनी झाडाला फुले येऊ लागतात. त्यानंतर दोन आठवड्यांनी शेंगा तोडणीस तयार होतात. भाजीसाठी कोवळ्या भरदार शेंगा जशा तयार होतील त्याप्रमाणे तोडणी करावी. खास दाण्यासाठी पूर्ण पक्व झालेल्या शेंगा सुकल्यानंतर काढाव्यात. दाणे काढण्यासाठी पक्व होऊन सुकलेले पीक कापून ते शेतात वाळू द्यावे. चांगले वाळल्यानंतर वाळलेल्या शेंगांमधून दाणे व भुसा वेगळा करावा. तोडणी वरचेवर करीत राहिल्यास कोवळ्या शेंगा मिळतात. साधारणतः 6 ते 8 आठवड्यापर्यंत तोडणी चालते. हेक्टरी सुमारे 90 ते 120 क्विंटल हिरव्या शेंगांचे उत्पन्न मिळते. खरीप हंगामात 15 ते 20 क्विंटल, तर उन्हाळी हंगामात 10 ते 15 क्विंटल प्रतिहेक्टरी वाळलेल्या दाण्याचे उत्पन्न मिळते. 
 
 
रोग व कीड:- शेंगभाज्यांच्या उत्पादनात बुरशीजन्य, अणुजिवी आणि व्हायरसजन्य रोगामुळे दरवर्षी बरीच घट येते. महत्त्वाचे रोग आणि त्यावरील नियंत्रणाबद्दल पुढे माहिती दिली आहे.
 
करपा -
हा रोग बुरशीजन्य असून दमट, पावसाळी आणि थंड हवेत या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. या रोगामुळे खोड, पाने, शेंगा आणि बियांवर लांबट खोल आणि काळपट लाल चट्टे पडतात. त्यामुळे पाने करपून गळून पडतात आणि शेंगांना बी धरत नाही. उत्पादनात घट येते.
उपाय ः
रोगग्रस्त पिकाचे बी वापरू नये. कारण बियांपासून रोगाचा प्रसार होतो. पेरणीपूर्वी बी 0.125 टक्के सिरसॉनच्या द्रावणात अर्धा तास बुडवावे किंवा बियांना थायरम हे औषध प्रतिकिलोस 3 ते 4 ग्रॅम या प्रमाणात चोळावे, तसेच पिकाची फेरपालट करावी. लागवड केल्यापासून वाढीच्या काळात बाविस्टीन 1 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 2 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने 3-4 फवारण्या कराव्यात.
 
 
भुरी -
भुरी हा बुरशीजन्य रोग असून, रोगाची सुरवात पानाच्या दोन्ही बाजूंवर काळपट डागांनी होऊन नंतर संबंध पानावर पांढरी पावडर शिंपडल्यासारखे दिसते. रोग, खोड आणि शेंगावरही पसरतो. रोग बहुतेक उशिरा येतो.
उपाय -
या रोगाच्या नियंत्रणासाठी 1 टक्का बोर्डोमिश्रण (मोरचूद 1 किलो : 1 किलो कळीचा चुना+100 लिटर पाणी) फवारावे. 10 ते 12 दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात, तसेच बॅलेटोन हे औषध 250 ग्रॅम+500 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.
 
तांबेरा -
दमट आणि पावसाळी हवेत हा रोग प्रामुख्याने आढळतो. रोगाची सुरवात पानाच्या खालच्या बाजूवर बारीक, काळपट, तपकिरी फुगीर ठिपक्यांनी होते. पाने पिवळी पडून गळून पडतात.
उपाय - रोगाची सुरवात होण्याआधीच हेक्टरी 25 किलो गंधकाची भुकटी (300 मेश) धुरळूस रोगाचे नियंत्रण होते.
 
 
बीन मोझेक - हा रोग व्हायरसजन्य असून, पानांवर हिरव्या, पिवळ्या रंगाचे सरमिसळ ठिपके दिसतात. पाने आकसून वेडीवाकडी, सुरकुतल्यासारखी होतात. रोगाचा प्रसार बियांमधून आणि मावा किडीद्वारे होतो. 
 
उपाय -  रोगप्रतिकारक जातीची लागवड करावी. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी रोगट झाडे उपटून काढावीत व मावा या किडीचे नियंत्रण करावे. मॅलेथीऑन 10 मिली किंवा अ‍ॅसिफेट 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून 3 ते 4 फवारण्या 8 ते 10 दिवसांच्या अंतराने कराव्यात.

 
कीटक:- प्रमुख किडी आणि त्यावरील नियंत्रण खाली दिले आहे.

सोंड्या भुंगा:-

पीक शेतात असताना हे भुंगे शेंगा पोखरतात आणि साठवणीत बियांना छिद्र पडून बियांचे नुकसान करतात.

उपाय -

फॉस्फोमिडॉन (85 डब्ल्यूएससी) हे औषध (100 मिली+500 लिटर पाणी ) प्रतिहेक्टरला पिकावर फवारावे. साठवणीतील किडीचा बंदोबस्त करण्यासाठी 1.5 ते 4 किलो कार्बनडाय सल्फाईड हे औषध प्रतिएक हजार घनफूट साठवणीतील जागा या प्रमाणात वापरावे.

 
मावा -
हिरव्या किंवा काळपट रंगाचे हे बारीक किडे पानातील अन्नरस शोषून घेतात. वेळीच बंदोबस्त न केल्यास पिकाचे अतोनात नुकसान होते. व्हायरस रोग इतर चांगल्या झाडांवर पसरविण्याचे कार्य मावा किडीमार्फत होत असल्याने या किडीचे नियंत्रण पूर्णपणे करणे आवश्यक आहे.
 
उपाय -
मावा किडीचे नियंत्रण करण्यासाठी फॉस्फोमिडॉन (85 डब्ल्यूएससी) 100 मिली किंवा अ‍ॅसिफेट 250 मिली किंवा डायमिथोएट 30 ईसी 400 मिलिओ, 500 लिटर पाण्यात मिसळून प्रतिहेक्टरी फवारावे. मॅलीथिऑन 5 टक्के पावडर हेक्टरी 25 किलोप्रमाणे फवारावी.
 
 
शेंगा पोखरणारी अळी:- ही तपकिरी रंगाची अळी शेंगा पोखरून आत शिरते व बियांचे नुकसान करते.

उपाय ः कीड थोड्या प्रमाणात असल्यास अळ्या हातांनी वेचून नष्ट कराव्यात. फॉस्फोमिडॉन (85 डब्ल्यूएससी) हेक्टरी 100 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
 
                                                                                                                डॉ. अरुण नाफडे 
                                                                                                                             उद्यान विशेषज्ञ 
   डी/6, बह्मा मेमोरीज, भोसलेनगर, पुणे- 7 
मो. 9822261132