असे करा फॉल आर्मी वर्मचे (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा    23-Jul-2019

 
 
सध्या हवामानबदलाचा काळ असून खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतोय. अनेक दुय्यम किडीसुद्धा अधिक नुकसानकारक ठरत आहेत. मुख्य किडी कीडनाशकांना प्रतिकारक होत आहे. या परिस्थितीमध्ये अमेरिकन लष्करी अळी मका पिकावरील फॉल आर्मी वर्म या नावाने ओळखली जाणारी लष्करी अळी 2016 मध्ये आफ्रिकेतील नायजेरिया या देशात प्रथम आढळली. आशिया खंडात सर्वप्रथम भारतातच ही कीड दाखल झाली, तसेच भारतात कर्नाटक, तेलंगणापाठोपाठ आपल्या राज्यातसुद्धा ही कीड पोचली आहे. या किड़ीने देशात मागील वर्षी खरीप हंगामात जवळपास 84 हजार 486 हेक्टरवरील मकापिकाचे नुकसान केले. या किडीचा प्रसार प्रामुख्याने आयात-निर्यातीतून होत असून प्रसार व प्रादुर्भाव रोखण्याबरोबर प्रभावी नियंत्रणासाठी या किडीची ओळख शेतकर्‍यांना असायला हवी.


मकापिकात देशातील पहिली नोंद शिमोगा (कर्नाटक) येथील कृषी महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक डॉ. शरणबसप्पा देशमुख व डॉ. सी. एम. कल्लेश्‍वर स्वामी यांनी केली.ही कीड इतकी धोकादायक का?

किडीचे पतंग ताकदवान असून, एका रात्रीत सुमारे 100 कि.मी. प्रवास करतात.

किडीची जास्त प्रजनन क्षमता.

मादी सुमारे 1 ते 2 हजार अंडी घालू शकते.

झुंडीने आक्रमण करत असल्यामुळे काही दिवसांतच पीक फस्त करून टाकते.

यजमान वनस्पती : प्रमुख मका पीक (सुमारे 80 अन्य पिके- भात, भुईमूग, ऊस, ओट, ज्वारी, शुगर बीट, सोयाबीन, तंबाखू, गहू आणि कापूस इ.)ओळखण्याची पद्धत :

1. रंग मातकट, तपकिरी, काळसर हिरवा, अळीच्या डोक्याच्या पुढच्या बाजूस उलट ‘ध’ आकाराची खूण.

2. अळीच्या शेवटून दुसर्‍या शरीराच्या खान्यावर चौकोनी आकारात चार ठिपके.

3. पाने खरडवून पानांचे पापुद्रे दिसतात. पोंग्यात शिरून आतील भाग खाल्ल्याने अळीची विष्ठा दिसून येते.जीवनक्रम :

अंडी : घुमटाच्या आकाराची असून, ती पुंजक्यांत घातली जातात. जून अंडीअवस्था सुमारे 2 ते 7 दिवस असते.


अळी : सुमारे 6 अवस्था पूर्ण करते. प्रथम अवस्था- आकाराने लहान, रंगाने हिरवी असून, त्यांचे डोके काळ्या रंगाचे असते. दुसर्‍या अवस्थेत- डोक्याचा रंग नारंगी, तिसरी अवस्था- अळीचा रंग तपकिरी होऊन शरीराच्या दोन्ही बाजूने पांढर्‍या रेषा दिसतात. चौथी ते सहावी अवस्था- शरीरावर उंचवट्यासारखे ठिपके दिसून अळीअवस्था 14 ते 30 दिवसांत पूर्ण होते.


कोष :

सहाव्या अवस्थेतील अळी पिकांवरून जमिनीखाली कोशात जाते (लालसर तपकिरी रंगाचा15 मिमी. लांब)

कोषावस्था 8 ते 30 दिवस, तर जीवनक्रम वातावरणानुसार 30 ते 90 दिवसांत पूर्ण होतो.एकात्मिक व्यवस्थापन :

1. किडीच्या अंडी व अळ्या वेचून नष्ट कराव्यात.

2. एकरी 2 कामगंध सापळे लावावेत.

3. प्रादुर्भावग्रस्त पोंगे नष्ट करावेत.

4. पोंग्यातील अळी मारण्यासाठी पोंग्यात माती/वाळू/ राख किंवा लाकडाचा भुस्सा टाकावा किंवा चुना/साबण /मीठ/ इ. पाण्यात टाकून फवारावे.

5. पक्षी किडींच्या अळ्या आणि कोष खात असतात म्हणून शेतात पक्षीथांबे उभारावेत

6. परोपजिवी कीटक उदा. ट्रायकोग्रामा प्रेटीओसम, टेलिनॉमस रीमस, चेलोनस इंसुल्यारिस यांचा वापर व संवर्धन करावे.

7. जैविक कीडनाशके उदा. विषाणू (एनपीव्ही), जिवाणू (बॅसिलस थुरिंगिएन्सिस) तसेच बुरशी (बेव्हरिया ब्यासियाना, मेटॅरिझियम अ‍ॅनिसोप्लीय किंवा नोमुरिया रिलेयी 5 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

8. प्रादुर्भाव दिसून येताच 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी अथवा अंझाडिरेक्टीन 10000 पीपीएम 1 मिलि. प्रतिलिटर किंवा अंझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 2.5 मिलि. प्रतिलिटर घेऊन फवारणी करावी.

9. किडीने जेव्हा आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल तेव्हाच खालील रासायनिक कीडनाशकांचा वापर करावा.

10. लँबडा सायहॅलोथ्रीन (5 ईसी) 1 मिलि. किंवा थायामेथोक्झाम अधिक लँबडा सायहॅलोथ्रीन 2.5 ते 3 मिलि. प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

                                                                                                        
 
                                                                                                               डॉ. वववेक सवडे 
(सहायक प्राध्यापक, कृषी कीटकशास्त्र ववभाग, कृषी र्महाववद्यालय, सेलु 9673113383)