अंजीर : मीठा बहार

डिजिटल बळीराजा-2    30-Dec-2019
Anjir Fruit_1  
 
अंजीराची वाढ उष्ण व कोरड्या हवामानात चांगली होते. अंजीराच्या फळांच्या वाढीच्या काळात तापमान 32 ते 34 सेल्सिअसपेक्षा उष्ण असते, तसेच पावसाचा अभाव असणे या गोष्टी दर्जेदार आणि चांगल्या प्रतीची फळे मिळवण्यासाठी आवश्यक बाबी आहेत. अंजीराची मीठा बहाराची फळे फेब्रुवारी ते मे महिन्यात तयार होतात. या बहाराची फळे चवदार व गोड असतात.
 
अंजीराचा मीठा बहार धारणेसाठी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये बागेची छाटणी करावी. बागेची चाळणी राहिली असल्यास लगेचच बागेची छाटणी करून घ्यावी व शेणखताची मात्रा बागेस द्यावी. बागेची छाटणी करून घ्यावी. याकरिता फांदीचा जोम पाहून 1/3 किवा 2/3 भाग छाटून काढावा. बागेत असणार्‍या वाळलेल्या फांद्या, काडक्या, तांबेरा रोगग्रस्त, कीडग्रस्त पाने व फळे गोळा करून त्यांचा नायनाट करावा, तसेच बागेमध्ये स्वच्छता ठेवावी.
 
छाटणीनंतर बागेची चांगली व एकसारखी फूट येण्यासाठी 10 मिली हायड्रोजन सायनाइड 50 टक्के प्रतिलिटर पाण्यातून झाडावर फवारावे व लगेचच बागेस पानी द्यावे.छाटणीनंतर लगेचच अंजीर बागेस शिफारशीप्रमाणे खतमात्र द्यावी. (40 किलो शेणखत, 900 ग्रम - नत्र, स्फुरद-275 ग्रॅम, पालाश प्रतिझाड) यापैकी शेणखत, स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा व नत्राची अर्धी मात्रा झाडास द्यावी व बागेस पानी द्यावे.
 
झाडांची खोडे जमिनीपासून दोन फूट रिकामी ठेवावीत व या भागावर बोर्डोपेस्ट लावावी, तसेच खोड किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून डायक्लोरोव्हास 2 मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून खोडावर व फांद्यांवर फवारावे. नवीन फूट निघाल्यानंतर 1 ते दीड महिन्याने राहिलेला दुसरा हप्ता बागेस द्यावा. अंजीरावर प्रामुख्याने तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.
 
Image_1  H x W:
 
तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणाकरिता क्लोरोथॅलोनील 20 ग्रॅम़ + कार्बेनडॅझीम 10 ग्रॅम किंवा कार्बेनडॅझीम 10ग्रॅम + मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 10 दिवसांच्या आवश्यकतेनुसार पुढील फवारण्या कराव्यात.
 
झाडाची शाकीय वाढ मर्यादित ठेवण्यासाठी म्हणजेच फुटवे दीड ते 2 फुटांचे झाल्यावर सायकोसील किवा लिहोसीन 2 मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे. आवश्यकता भासल्यास लगेचच दुसरी फवारणी 5 दिवसांच्या अंतराने करावी. यामुळे झाडाची शाकीय वाढ थांबून फळाने जोमाने वाढण्यास मदत होते.
 
सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माप्लस हे जैविक बुरशीनाशक जमिनीतून द्यावे.फळे काढण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण बसणार नाही, याची काळजी घ्यावी. म्हणजे फळे तडकणार नाहीत. अंजीर बागेवर प्रामुख्याने खवले कीड, मावा, पांढरे ढेकूण, हिरवे तुडतुडे, पाने खाणारी अळी या अशा किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. याच्या नियंत्रणाकरिता शिफारशीत औषधांचा वापर करावा. अंजीर फळांच्या वाढीच्या काळात बागेची चार ते पाच वेळा चाळणी करावी, तसेच पिकास सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी.