दुधाळ जनावरांच्या आहाराचे नियोजन

डिजिटल बळीराजा-2    24-Dec-2019
Gay_1  H x W: 0
 
दुधाळ जनावरांच्या आहाराच्या संबंधी महत्वाच्या बाबी, प्रकार, गरज, समतोल खुराक व दुभत्या जनावरांचे संवर्धन कसे करावे या संबंधीची माहितीचा समावेश या लेखात केला आहे.
 
दुग्धोत्पादन हा शेतकर्‍यांसाठी नियमित व हमखास उत्पादन देणारा जोडधंदा आहे. दूध उत्पादनासाठी गाई-म्हशी जास्त दूध देणार्‍या अशा जातीवंत असाव्यात. दूध उत्पादनासाठी जी जनावरे पाळण्यात येतात
 
त्यांना द्यावयाचा आहार प्रामुख्याने खालील कारणांसाठी देण्यात येतो.
 
1. शरीरपोषणासाठी

2. शरीराची वाढ होण्यासाठी

3. गर्भाची वाढ होण्यासाठी

4. दूध उत्पादनासाठी

शेतीमधून उत्पादित होणारे दुय्यम पदार्थ, त्यामध्ये असणार्‍या अन्नघटकांच्या प्रतीनुसार व जनावरांच्या अन्नघटकांच्या गरजेनुसार (दूधवाढीसाठी, शरीरपोषणासाठी) एकत्र मिसळून किंवा संतुलित करून जास्तीत दूध उत्पादन करणे हाच आहारशास्त्राचा आधारस्तंभ मानला जातो.
 
थोडक्यात, आहार पुरविण्याविषयी काही महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे :-
 
1.जनावरांचे वजन, वय, उत्पादन क्षमता, विविध शारीरिक क्रियेसाठी आवश्यक असणारे सर्व अन्नघटक योग्य प्रमाणात एकत्र मिसळणे यास संतुलित आहार असे म्हणतात.

2.आहारात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे मिश्रण असणे आवश्यक आहे.

3.आहार शुष्क तत्त्वाच्या आधारावर द्यावा. 100 किलोस 2.5 ते 3.0 किलो या प्रमाणात शुष्क पदार्थ द्यावेत.

4.पशुआहारात 2/3 भाग वैरण असावी, तर 1/3 भाग आंबवण असावे.

5.आहाराच्या प्रमाणात व घटकात एकदम बदल करू नये.

6.एकदल वर्गातील हिरवा चारा (मका, कडवळ, ओर बाजरा, नेपियर इ.) यामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण जास्त असते.

7.द्विदल वर्गातील चारा (लुसर्न, बरसीम, सुबाभुळ, चवळी, शेवरी) यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.

8.वाळलेली वैरण (कडबा, सरमाड, पेंढा, वाळलेले गवत, बगॅस, गव्हाडे काड, उसाचे वाढे) यामध्ये एकूण पचनीय प्रथिने यांच ेप्रमाण अतिशय कमी असते.

9.आंबोण : यामध्ये 14 ते 16 % पचनीय प्रथिने असे प्रमाण असावे.

10.जनावरांच्या शरीराची खनिजांची गरज भागविण्यासाठी खनिज मिश्रण व खनिज चाटण देणे गरजेचे आहे.

11.हिरवा चारा मुबलक प्रमाणात असल्यास आंबोणाचा 30 टक्के खर्च कमी करता येतो.

12.हिरवा चारा फुलोर्‍यात असताना द्यावा.

13.आहारात नियमितपणा असावा.

दुभत्या जनावरांच्या आहाराचे प्रकार :-

Cow_1  H x W: 0
 
1. खाद्य वैरण

2. एकूण पचनीय अन्नघटकांचे प्रमाण जास्त / तंतुमय घटकांचे प्रमाण जास्त

3. तंतुमय घटकांचे प्रमाण कमी अन्नघटकांचे प्रमाण कमी

दुधाळ जनावरांच्या खुराकाचे प्रामुख्याने पाच भाग करता येतील :-

Dudhal Janavar_1 &nb
 
1.खाद्य : भरडा, पेंड, चुनी, भुसा, टरफले, कोंडा यांचे मिश्रण

2.ओली वैरण : मका, ज्वारी, सातू (ओट), बाजरी, गवत, चवळी, नेपियर, लसुणघास

स्टायलो, दशरथ, ओट, बर्सीम, सुबाभुळ इत्यादी.

3.सुकी वैरण : गवत, कडबा, सरमाड, गहूकाड, भाताचा पेंडा, उसाचे वाढे, वैरणीसाठी

लावलेल्या पिकांपासून वाळवून तयार केलेली सुकी वैरण.

4.मूरघास : गवत किंवा द्विदल एकदल वैरणीपासून विशिष्ट प्रक्रिया करून मुरविलेली वैरण

5.इतर : मीठ, खनिज क्षार, जीवनसत्त्वे, मासळीची कुटी वगैरे.

दुभत्या जनावरांना देण्यात येणारा खुराब त्यांचे वय, जात, लिंग, कार्यक्षमता व दूध उत्पादन यावर अवलंबून असतो. सर्वसाधारण नियमाप्रमाणे दुभत्या गुरांना त्यांच्या शरीर वजनाच्या दोन ते साडेतीन टक्के शुष्क खाद्य देणे जरूरीचे असते. ज्या संतुलित आहारामुळे गाय किंवा म्हैस तिला दिलेल्सा खाद्याचे रूपांतर जास्तीत जास्त दूध घटकांमध्ये करू शकेल तो आहार किफायतशीर मानावा लागेल. अशा आहारात संतुलित आहाराचा समावेश होतो. त्यामध्ये 2/3 भाग वैरण व 1/3 भाग आंबोण देणे आर्थिकदृष्ट्या हितावह ठरते.

दुधाळ जनावरांना दैनंदिन आहाराची गरज :-

Cow1_1  H x W:

1. देशी गाय संकरित गाय/म्हैस

2. शरीरपोषणासाठी 1 ते 1.5 किलो 1.5 ते 2.5 किलो

3. दूध उत्पादनासाठी प्रत्येक 10 लि. दुधामागे 4 कीलो प्रत्येक 10 ली. दुधामागे 5 की.

(40% षळश्रज्ञ र्वीलींळेप) (50% षळश्रज्ञ र्वीलींळेप)

अंबोण/खुराक : अंंबोण तयार करण्यासाठी लागणारे घटक निवडताना त्यांची स्थानिक उपलब्धता, किंमत, पचनियता व परिवर्तनक्षमता या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्यावयास हव्या. शेतकर्‍यांनी/दूध उत्पादकांनी शक्यतो त्यांच्या स्वतःच्या शेतातील पिकांपासून प्राप्त होणार्‍या खाद्यघटकांचाच प्रामुख्याने वापर करावा.

उदाहरणार्थ :

1. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, ओट, बार्ली, सोयाबीन ही धान्ये.

2. हरभरा, तूर, मूग, भुईमूग, उडीद, मसूर, यांपासून मिळणारी चुणी

3. धान्याची टरफले व पिकांपासून मिळणारा कोंडा किंवा भुसा

4. सरकी, भुईमूग, मोहरी, जवस, तीळ, खोबरे इत्यादींची पेंड

5. टॉपीओका, गाजरे, मासळीची कुटी, दुधाची पावडर.

वरील खाद्यपदार्थांचा उपयोग योग्य प्रमाणात करून अंबोण तयार करावे.

व्यावसायिकदृष्ट्या दुधाचे उत्पादन करण्यासाठी पाळलेल्या गायी/म्हशींना 16 ते 20 टक्के प्रथिने व 65 ते 70 टक्के एकूण पचनीय अन्नघटक असलेले खाद्य मिश्रण 4 ते 8 तास आधी भिजवून अंंबोण म्हणून द्यावे. यामध्ये चौथा 4% पेक्षा कमी असावा.

दुधाळ जनावरांचा समतोल खुराक

हा सकस, स्वस्त, चवदार, भिन्न घटक असलेला, बुरशी किंवा इतर हानिकारक पदार्थ नसलेला आणि तंतुमय पदार्थाचा समावेश असलेला असा असावा.

खाद्यमिश्रण

समतोल खाद्य मिश्रण तयार करताना सर्वसाधारणतः पेंड 25 ते 35 टक्के, चुनी 15 ते 20 टक्के, भरड 25 ते 35 टक्के, टरफले/ कोंडा/भुसा 10 ते 20 टक्के असे प्रमाण असावे. शिवाय त्यात खनिज क्षार 2 टक्के व मीठ 1.0 टक्के मिसळावे.

आवश्यकतेप्रमाणे जीवनसत्त्वे, मासळीची कृटी अशी रवंथ अतिरिक्त पूरक खाद्ये घालावीत. जनावरांना खुराक नियमित वेळेवर द्यावा. त्यामध्ये एकदम बदल करू नये. रवंथ करणार्‍या दुभत्या जनावरांचे जठर चार भागात विभागलेले असल्यामुळे व ते मोठे असल्यामुळे गुरांना परिमाण मोठे असलेला व ततुंमय घटकांनी युक्त असा आहार दिला नाही तर त्यांचे पोट भरत नाही व समाधान होत नाही. म्हणून गुरांना भरपूर वैरण देणे अत्यावश्यक आहे.

गाय विल्यानंतर पाचव्या दिवसापासून घुगर्‍याऐवजी दीड कि. खुराक शरीरपोषणासाठी द्यावा आणि उत्पादित दुधाच्या चाळीस टक्के या प्रमाणात जास्तीचा खुराक थोडा थोडा वाढवत नेऊन 8-10 दिवसांत पूर्ण संतुलित आहार द्यावा. गाय रोज 10 लि. दूध देत असेल तर 4 कि. जास्तीचा खुराक द्यावा. अशाप्रकारे गाईला 1.5 कि. अधिक 4 कि. असा एकूण 5.5 किलो खुराक, निम्मा-निम्मा करून सकाळ-संध्याकाळ द्यावा.

हिरवा चारा/वैरण

दुभत्या जनावरांना सकस हिरवी वैरण देणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असते.

ओल्या वैरणीचे वर्गीकरण खाली दिले आहे :-

1. गवत : पैरा , गिनी, नेपिअर, मारवेल, अंजन.

2. द्विदल : चवळी, बरसीम, लसूण, घास, सोयाबीन, दशरथ, हादगा, शेवरी.

3. एकदल : ज्वारी, बाजरी, मका, बार्ली, ओट.

इतर : सुबामूळ, गजराज, अंजनाचा पाला, ऊस इत्यादी खाद्य दुधाळ जनावरांना, विशेषतः संकरित गाय किंवा म्हैस ह्यांना दररोज 15 ते 25 किलो एवढ्या प्रमाणात देणे जरूरीचे आहे. कोणताही हिरवा चारा यंत्रावर बारीक तुकडे करून नंतरच द्यावा.

मुरघास : कोणत्याही हिरवा वैरणीप्रमाणेच मुरघास देणे फार हितावह असते. विशेषतः उन्हाळ्यात जेव्हा हिरवी वैरण फार कमी मिळते तेव्हा मुरघास द्यावे.

कोरडी/अथवा सुकी वैरण : प्रत्येक संकरित गाईला/म्हशीला फूल, बेर, मारवेल इत्यादी गवते, ज्वारी बाजरीचा कडबा, भात, गहू यांचा पेंडा, वाळविलेली द्विदल वैश्रण यंत्रावर बारीक कापून त्या सार्‍यांचे मिश्रण दैनंदिन 4 ते 8 कि. या प्रमाणात द्यावे. गुरांची वैरण सुरक्षित जागी साठवावी.

आर्थिकदृष्ट्या दूध उत्पादन फायदेशीर ठरण्यासाठी शेतकर्‍यांकडे उपलब्ध असलेले, परंतू पशुखाद्यासाठी न वापरलेले टाकाऊ उपपदार्थ जसे की गव्हाचे व भाताचे काड यांच्यावर 4 % युरियाची प्रक्रिया करून (हिरवा चारा व पोष्टीक सुक्या चार्‍याची कमतरता असलेल्या काळात) जनावरांचे पोषण करता येईल.

450 किलो ग्रॅम वजन असलेल्या व सरासरी 10 लि. प्रतिदिन दूध देणार्‍या गाईचा आहार :- 

 अ.क्र  शिफारस   उपलब्धतेनुसार गट (कि. ग्रॅ.)
     1  2  3
 1.
 हिरवा चारा 
 15  10  ---
 2.

 सुका चारा 

 6
 8  9
 3.  पशुखाद्य  2.5  4  5
 
पाणी : आहाराबरोबरच जनावरांना खासकरून उत्पादनासाठी मुबलक पाणी प्यावयास देणे जरुरीचे आहे.

जनावरांना पिण्यासाठी द्यावयाचे पाणी वासरहित, रंगहीन असावे. तसेच त्यात कोणत्याही प्रकारचे अपायकारक क्षार नसावेत. गाई/म्हशींना द्यावयाचे पिण्याचे पाणी शक्यतो ताजे व स्वच्छ असावे. आपल्या देशातील उष्ण हवामानामुळे जनावरांना पाणी अधिक प्रमाणात लागते. पिण्याच्या पाण्याचे हे प्रमाण जनावरांना द्यावयाच्या (1) खाद्य (2) सुकी वैरण आणि (3) ओली वैरण यावर अवलंबून असते.

जनावरांना पिण्यासाठी व धुण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. एका प्रौढ जनावरामागे पाण्याची दैनदिन गरज पुढीलप्रमाणे आहे :-

 जनावरांचा प्रकार
 पिण्यासाठी पाणी (लि.)
 धुण्यासाठी पाणी (लि.)  एकूण (लि.) 
 प्रौढ संकरित गाय किंवा प्रौढ म्हैस  15 ते 25  50 ते 85  सुमारे 100
 
दुभत्या जनावरांचे संवर्धन :
 
Cow2_1  H x W:
 
दुग्धव्यवसायामध्ये व्यवस्थापनाला फार महत्त्व आहे. दुग्धव्यवसायाचे यश हे व्यवस्थापनावरच अवलंबून असते. या दुभत्या जनावरांची सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक असते.
 
या गोष्टी नियमित करा.
 
1.गाई-म्हशींचा गोठा नियमित स्वच्छ ठेवा. त्यामध्ये घाण, कचरा किंवा पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्या.

2.गोठ्याप्रमाणेच गाई-म्हशींची स्वच्छता तितकीच महत्त्वाची. त्यांना दिवसातून एकदा धुण्याची सवय ठेवा.

3.जनावरांना ब्रशने स्वच्छ करा, जेणेकरून कातडीवरील मरके केस व अन्य घाण निघून जाईल. मरक्या केसांच्या ठिकाणी नवीन केस येतील व कातडीसुद्धा चमकू लागेल. जनावरांची उष्णता बाहेर पडल्यामुळे जनावर जास्त धाप देणार नाही. शरीराला रक्ताचा व प्राणवायूचा पुरवठा नियमित झाल्यामुळे शरीर कांती सुधारण्यास मदत होईल.

4.गोठ्यात वरचेवर जंतुनाशके फवारून गोचीड, उवा, माशा आणि डांस यांचा नाश करा. म्हणजे जनावरांना चांगले शरीरस्वास्थ्य मिळेल.

5.खाद्यातून क्षार आणि जीवनसत्त्वे भरपूर मिळत नसतील तर ती औषधाच्या रूपाने द्या.

6.खराब, सडके, बुरशीयुक्त खाद्य देऊ नका.

7.गाईच्या दुधाच्या वाढीनुसार खाद्यात वाढ करा.

8.खाद्य विभागून देणार्‍या मात्रा वाढवा. म्हणजे दुधातदेखील वाढ होईल.

9.दिवसातून 3 ते 4 वेळा पाणी पाजा. जास्त दूध देणार्‍या गाईंना अधिक पाण्याजी गरज असते शेवटचे पाणी रात्री 10 ते 12 च्या सुमारास दिल्यास दुधात वाढ होते.

10.जनावरांच्या गोठ्यात लाइटची व्यवस्था करा. गोठ्यातील वातावरण प्रसन्न ठेवा. त्यांचे आरोग्य प्रसन्न राखण्यास मदत होते.

11.जनावरांच्या खाण्यापिण्यात बदल वाटल्यास वेळीख लक्ष देऊन तज्ज्ञाच्या सल्ला घ्या.

12.दूध कमी देणे, चारा कमी खाणे हे आरोग्य बिघडल्याचे लक्षण आहे. त्याची कारणे शोधा.

13.जनावरांचे बदलणार्‍या ऋतुनुसार संरक्षण करा.

14.जनावरांच्या आहारात अथवा त्यांना सांभाळणार्‍या व्यक्तीमध्ये वारंवार बदल होऊ देऊ नका. दोहण करणारे व्यक्ती तर मुळीच बदलू नये. त्यामुळेदेखील उत्पादनावर बदल होण्याची शक्यता असते.

15.त्यांचे हात स्वच्छ असावेत, नखाने इजा होऊ नये याची काळजी घ्या. अधुनमधून जंतुनाशकांचा वापर करा.

16.अंगठा दुमडून धार काढू नका. कास दुखावण्याची शक्यता असते.

17.जास्त दूध देणार्‍या गाई सकाळी आधी व संध्याकाळी शेवटी पिळा.

18.वासरांना शक्यतो वरून दूध पाजा.

अशाप्रकारे दुधाळ जनावरांची सर्वतोपरी काळजी घेतल्यास व उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर केल्यास दुग्धव्यवसाय हा शेतकर्‍यासाठी जोडधंदा न राहता मुख्य व्यवसाय होऊन शेतकर्‍याची आर्थिक स्थिती सुधारण्यास निश्चितच फायदा होईल.

डॉ. व्ही. जी. अतकरेप्रकल्प अन्वेषक तथा प्राध्यापक,
डॉ. आचल शंभरकर कनिष्ठ संशोधक सहकारी,
डॉ. कविता कडूवरिष्ठ संशोधक सहायक,
                   पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, नागपूर-440010.