बटाटा पिकांवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    23-Dec-2019
|
Potato_1  H x W 
 
बटाटा पिकांवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे या संबंधीची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे. 
 
Potato_1  H x W
 
बटाटा हे पीक प्रामुख्याने उत्तर भारतात थंड हवामानाच्या ठिकाणी घेतले जाते. भारतामध्ये बटाटा लागवडीखालील क्षेत्र 13 लाख हेक्टर असून, उत्पादन 236 लाख टन आहे. देशाच्या मानाने महाराष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र फारच कमी 1600 हेक्टर एवढेच असून, उत्पादनही कमी आहे. भाजीपाल्याच्या वार्षिक उत्पादनात बटाट्याचे पीक अग्रस्थानी आहे. बटाटा पीक मूळचे दक्षिण अमेरिकेतील आहे. भारतामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, पंजाब आणि आसाम या राज्यांत बटाट्याची लागवड प्रामुख्याने होते. बटाट्याखालील एकूण क्षेत्रापैकी 80 टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र या पाच राज्यांतील आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, बीड, औरंगाबाद आणि नागपूर जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पोषक द्रव्ये व आहारातील महत्त्व : 100 ग्रॅम खाण्यायोग्य बटाट्यामध्ये खालील पोषक द्रव्ये उपलब्ध असतात. बटाटा हे कंदवर्गीय प्रमुख भाजीपाला पीक असून, आपल्या दररोजच्या आहारात प्रामुख्याने बटाट्याचा सर्रास वापर केला जातो. बटाट्यामध्ये जीवनसत्त्व ’ब’ आणि ’ क’ भरपूर प्रमाणात असते. तसेच पिष्टमय पदार्थही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे बटाटा हे शक्तीवर्धक पीक आहे. तसेच हे पीक कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारे पीक असून, योग्य पद्धतीने हाताळल्यास अल्यावधीत अधिक पैसा मिळवून देणारे पीक आहे. 
 
किडी :-
 
1) मावा
Potato-Kidi_1   
 
1. ही कीड पानांच्या खालच्या बाजूवर राहून रस शोषून घेतात.
 
2. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने खाली मुरडतात, पिवळी पडून गळून जातात.
 
3. या किडींद्वारा विषाणू व विषाणूजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होतो.
 
4. मावा किडीच्या शरीरातून चिकट स्राव पानांवर पसरून त्यावर बुरशी वाढते. प्रकाशसंश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो.
 
2) तुडतुडे
Potato-Kidi_2   
 
1. तुडतुडे पानातील शिरेच्या जवळ रसशोषण करतात. त्यामुळे पाने वाकडी होऊन पिवळी पडतात.
 
2. हवेत आर्द्रता जास्त असल्यास या किडीचे प्रमाण वाढते.
 
3) फुलकिडे
Potato-Kidi_3  
 
1. प्रौढ, तसेच पिले झाडाच्या कोवळ्या शेंड्यावर विशेषतः न उमललेल्या पानात आढळतात.
 
2. फुलकिडे पानांचा पृष्ठभाग खरडून निघणारा अन्नरस शोषण करतात. त्यामुळे पानांवरील भागावर पिकट पिवळसर हिरवे, तर खालील बाजूस तांबडे चट्टे पडतात.
 
3. नुकसानग्रस्त पाने जाडसर आणि वक्र होतात.
 
4. तीव्र प्रादुर्भावाने झाडांची वाढ खुंटते. कधीकधी झाडे पूर्णपणे वाळतात.
 
4) पांढरी माशी

Potato-Kidi_4  
 
1. प्रौढ, तसेच पिले पानातील अन्नरस शोषण करतात.
 
2. या किडीच्या शरीरातून चिकट स्राव पानांवर पसरून त्यावर बुरशी वाढते, प्रकाशसंश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो.
 
5) कोळी

Potato-Kidi_5  
 
1. कोळी ही कीड अतिशय सूक्ष्म असून, ती पानांचा पृष्ठभाग खरवडून वर येणारा रस शोषण करतात. त्यामुळे पानावर पांढुरके चट्टे पडतात.
 
2. प्रादुर्भावग्रस्त शेंडे काळपट पडून चकाकतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास चट्ट्याचा भाग वाळतो.
 
6) पाने खाणारी स्पोडोप्टेरा अळी
Potato-Kidi_6   
 
1. अळ्या दिवसा जमिनीत लपून राहतात, रात्रीच्या वेळी बटाटा पिकाची पाने खाऊन फस्त करतात.
 
2. अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास पानांच्या फक्त शिराच शिल्लक राहतात.
 
3. काही वेळेस या अळ्या जमिनीत पोसणारे बटाटेदेखील पोखरून खातात. त्यामुळे उत्पादनात घट येते.
 
7) देठ कुरतडणारी अळी
Potato-Kidi_7   
 
1. अळी काळपट रंगाची असून, तिला स्पर्श होताच वेटोळे करून मातीत पडते.
 
2. अळी रात्रीच्या वेळी रोपांचे देठ जमिनीजवळ कुरतडून टाकते, कोवळी पाने खाते. त्यामुळे रोपे मोठ्या प्रमाणावर मरतात.
 
8) बटाटा पोखरणारी अळी
Potato-Kidi_8   
 
1. अळ्या पानांत, देठात तसेच कोवळ्या खोडात शिरून ते पोखरतात.
 
2. जमिनीतील उघड्या पडलेल्या बटाट्यांवर मादी अंडी घालते, अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या बटाट्याच्या डोळ्यातून आत शिरतात व बटाटे पोखरतात.
 
3. अळ्या गराच्या आत किंवा खाली बोगदे पाडतात. त्यांची विष्टा डोळे व अंकुराजवळ दिसते. त्यामुळे बटाट्याचे वजन घटते, प्रतही खराब होते.
 
9) हुमणी

Potato-Kidi_9   
 
1. अळी अवस्था ही पिकास अत्यंक हानिकारक आहे.
 
2. अळ्या जमिनीत राहून पोसणार्‍या बटाट्यांवर, तसेच बटाट्यांच्या मुळांवर आपली उपजीविका करतात. पिकांच्या मुळांचा नाश झाल्यामुळे पीक सुकू लागते व नंतर वाळून जाते.
 
3. प्रादुर्भावग्रस्त बटाटे सडतात.
 
बटाटा पिकातील रोग व किडींचे एकात्मिक व्यवस्थापन :-
 
1. निरोगी बटाटा बेणे वापरावे.
 
2. बटाटा बियाणांस बीजप्रक्रिया करावी. प्रक्रियेसाठी 2.5 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रतिलिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बटाटा बेणे 15 ते 20 मिनिटे बुडवून घ्यावे.
 
3. उगवणीनंतर येणार्‍या रसशोषण करणार्‍या किडींच्या नियंत्रणासाठी बटाटे बियाणे लागवडीपूर्वी इमिडाक्लोप्रिड (200 एसएल 0.04 टक्के) चार मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 10 मिनिटे प्रक्रिया करावी.
 
4. लागवडीसाठी योग्य अंतर ठेवावे. (60 सें.मी. बाय 20 सें.मी.)
 
5. रोगप्रतिकारक (कुफरी ज्योती, पुखराज, सूर्या) या जातींची लागवड करावी.
 
6. आठवड्यातून 2 ते 3 दिवसांतून पिकाचे सर्वेक्षण करावे.
 
7. पिकांमध्ये तसेच कडेने सापळा पिके लावावीत.
 
8. रस शोषणार्‍या किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतात पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.
 
9. पोकोळी, स्पोडेप्टेरा, देठ कुरतडणारी अळी या किडींच्या नियंत्रणासाठी पिकास वेळेवर भर द्यावी.
 
10. कामगंध सापळ्यांचा वापर करावा. उदा. पाकोळी, स्पोडोप्टेरा, देठ कुरतडणारी अळी.
 
11. रस शोषणार्‍या किडी विषाणूजन्य रोगांचा प्रसार करतात. त्यामुळे पीक उगवणीनंतर झाडांची कोवळी पाने आणि शेंडे यांवर वेळेवर लक्ष ठेवून शिफारशीत कीटकनाशकाची फवारणी करावी.
 
12. पिकावर रसशोषण करणार्‍या किडींच्या नियंत्रणासाठी पीक उगवल्यानंतर किडीचा प्रादुर्भाव आणि आर्थिक नुकसान पातळीनुसार स्पायरोमायसीफेन (240 एससी) 10 मि.लि. किंवा थायामेथोक्झाम (25 ईसी) 8 मि.लि. किंवा ऍसिटामीप्रीड तीन ग्रॅम किंवा डायमिथोएट (30 टक्के) 15 मि.लि. यांपैकी एका कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून 15 ते 20 दिवसांच्या अंतराने गरज भासल्यास आलटून पालटून फवारणी करावी.
 
13. बटाट्यावरील अळीवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी पिकामध्ये एकरी 6 ते 7 पक्षीथांबे उभारावेत.
 
14. पाने खाणार्‍या स्पोडोप्टेरा आणि देठ कुरतडणार्‍या अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास शेतात गवताचे लहान लहान ढीग रात्रभर ठेवावेत. आणि सकाळी अळ्यांसह गवताचे ढीग नष्ट करावेत.
 
15. पाने खाणार्‍या स्पोडोप्टेरा अळींचे अंडीपुंज दिसल्यास नष्ट करावेत.
 
16. पाने पिवळी पडल्यास अथवा पाने जाळीदार धरलेली असल्यास अशा पानांवर अळीपुंज असतात. ते नष्ट करावेत.
 
17. पाने खाणार्‍या स्पोडेप्टेरा अळीसाठी बुरशीजन्य कीटकनाशक न्यूमोरिया रायली 5 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 
18. अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस (20 ईसी) दोन मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस (50 ईसी) दोन मि.लि. किंवा लॅम्बडा सायलोथ्रीन (5 ईसी) एक मि.लि. यांपैकी एका कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून 15 ते 20 दिवसांच्या अंतराने गरजेनुसार आलटून पालटून फवारणी करावी.
 
19. मर रोगाच्या नियंत्रणासाठी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा व्हिरिडी 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 
20. जिवाणूजन्य मर रोगासाठी स्ट्रेप्टामायसीन 20 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 
21. पावसामुळे मर रोगाचे प्रमाण वाढल्यास पाण्यात मिसळणारी मॅन्कोझेब भुकटी (75 टक्के) 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
 
22. लवकर येणार्‍या करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पाण्यात मिसळणारी मँकोझेब भुकटी (75 टक्के) 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 
23. उशिरा येणार्‍या करपा रोगासाठी पाण्यात मिसळणारी मॅन्कोझेब भुकटी (75 टक्के) 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड (50 टक्के) 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त आढळल्यास मेटॅलॅक्झिल (8 टक्के) अधिक मॅन्कोझेब (64 टक्के) हे संयुक्त बुरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दुसरी फवारणी करावी.
 
  
 
प्रा. पी. बी. खैरे (सहायक प्राध्यापक) वनस्पती विकृतिशास्त्र विभाग (मो. नं. 9665304467)
प्रा. लैचट्टीवार एम. ए. (सहायक प्राध्यापक) कृषी कीटकशास्त्र विभाग (मो. नं. 8318984349)
कृषी महाविद्यालय, नायगाव (बा.), नांदेड
गायकवाड ए. एम. (एमएस्सी कृषी), बदनापूर