मधमाश्या पाळण्यास योग्य क्षेत्र

डिजिटल बळीराजा-2    21-Dec-2019
Bees_1  H x W:  
मधुबनाची जागा योग्य असेल तरच मधोत्पादन भरपूर मिळते. या संबंधी माहिती या लेखात सादर केली आहे. 

Telbiya_1  H x   
मधमाश्यांना वर्षभर पुरेसे खाद्य उपलब्ध होणे गरजेचे असते. यासाठी स्थानिक फुलोर्‍याची माहिती ही असावी लागते. जंगल पिके यांचे फुलोर्‍याबरोबरच पाळता येणार्‍या सातेरी जातीच्या मधमाश्यांच्या नैसर्गिक वसाहती ही सहजासहजी उपलब्ध व्हाव्या लागतात. ज्या ठिकाणी हा उद्योग सुरू करावयाचा आहे ती जागा म्हणजेच मधुबनाची जागा ही योग्य ठिकाणी निवडावी लागते. मधुबनाची जागा योग्य असेल तरच मधोत्पादन भरपूर मिळते.
 
यासाठी खालील बाबी लक्षात घ्यावा लागतात. 
 
1) सदाहरित, निम्नसदाहरित जंगल असावे, जंगलात मकरंद, पराग भरपूर असलेल्या वनस्पती असाव्यात. 
2) शेती-पिके असतील तर तेलबिया, फळझाडे व इतर मधमाश्यांना उपयुक्त पिके असावीत. 
 
3) मधुबनाच्या परिसरात सतत फुलोरा मिळण्याकरिता वेगवेगळ्या महिन्यांत फुलणार्‍या वेगवेगळ्या वनस्पती असाव्यात. 
 
4) जास्तीत जास्त मकरंद व पराग मिळवण्यासाठी मधुबन जंगलाच्या मधोमध असावे. 
 
5) जवळपास स्वच्छ, वाहते पाणी असावे. 
 
6) मधुबनाच्या परिसरात नैसर्गिक वसाहती असणे हे मधुबनासाठी योग्य जागा आहे याचे द्योतक आहे. 
 
7) मधुबनापर्यंत वाहतुकीसाठी रस्ता असावा, तसेच साहित्य ठेवण्यासाठी गोडाऊन असावे. 
 
8) मधुबन एकदम उंच ठिकाणी नसावे. कारण मधमाश्यांना लोड घेऊन येतेवेळेस त्रास होतो. तसेच एकदम तळाशी सूर्यप्रकाश येत नाही अशा ठिकाणी मधुबन स्थापन करू नये. 
 
9) दोन वसाहतींत कमीत कमी दहा फूट अंतर ठेवावे. एकाच मधुबनात जास्त वसाहती ठेवू नयेत. 
 
madhpeti_1  H x 
10) मधुपेटीचे तोंड सर्वसाधारणपणे पूर्व दिशेला असावे. त्यामुळे वसाहती लवकर कामाला सुरवात करतात, तसेच वसाहतीचे पाऊस व वार्‍यापासून संरक्षण होते. 
Madhmashya_1  H
 
मधमाशापालनासाठी उपयुक्त पिके : 
 
1. फळझाडे : लिंबू, सफरचंद, संत्री, मोसंबी, पेरू, चिकू, केळी, कलिंगड, स्ट्रॉबेरी, सीताफळ, कवठ, बोर, पपई, नारळ, लिची, आवळा, आंबा. 
 
2. फळभाज्या : कारले, पडवळ, काकडी, दुधीभोपळा, वांगी, भेंडी, मिरची, गवार, टोमॅटो, घोसाळे, दोडका, शेवगा. 
 
3. भाज्यांची बियाणे : कोबी, कॉली फ्लॉवर, राजगीरा, कोथिंबीर, कांदा, मुळा, बीट व पालक. 
 
4. डाळी : चवळी, मटकी, उडीद, मूग, तूर, हरभरा, वाल, वाटाणा व घेवडा. 
 
5. तेलबिया पिके : सूर्यफूल, कारळा, तिळ, आंबाडी, मोहरी, करडई, ओवा. 
 
6. जंगली वनस्पती : कारवी, व्हायटी, बुखी, पिसा, गेळा, जांभूळ, हिरडा, चिंच, कडुलिंब, निलगिरी, गुलमोहर, शिकेकाई, पागळ, चिमट, लोखंडी, रानपेरव, सावर, चाफा, बेहडा, वाघचावर, ऐन, सुरंबी, अजंन, अंबुळकी, पळस. 
 
7. तृणधान्ये : ज्वारी, बाजरी, मका व हायब्रीड. 
 
8. फुलझाडे : गुलछडी, कॉसमॉस, ग्लॉडिओलस, प्लॉक्स, डेलिया, झेंडू, गुलाब. 
 
9. इतर पिके : कापूस, कॉफी, सर्व प्रकारची फुलझाडे, निरगुडी, गवत, तेरडा.