हरभरा पिकांवरील किडींचे व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    21-Dec-2019
Harbhara_1  H x
 
हरभरा पिकांवरील किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी जागरूक राहून किडींची ओळख करून पीकसंरक्षण खर्चात बचत करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. 
 
Harbhara _1  H
 
महाराष्ट्र राज्यातील रब्बी हंगामातील हरभरा हे प्रमुख डाळवर्गीय पीक असून, ते राज्यात 18.48 दशलक्ष हेक्टर क्षेत्रलागवडीखाली आहे. आणि त्याची उत्पादकता 1018 किलो प्रतिहेक्टरी आहे. इतर कडधान्यांच्या तुलनेत हरभर्‍यावर फार कमी किडी आढळतात. कारण हरभरा हे पीक रब्बी हंगामात म्हणजे थंड हवामानात घेतले जाते, तसेच हरभर्‍याच्या झाडावर पानांवरील लवाद्वारे आम्लयुक्त स्त्राव बाहेर पडतो. ज्यामध्ये मुख्यत्वे मॅलिक अ‍ॅसिड व ऑक्झलिक अ‍ॅसिड असल्याने किडीच्या वाढीला प्रतिरोध होतो. कमी उत्पादन मिळण्याच्या विविध कारणांपैकी किडींपासून विशेषतः यापैकी घाटेअळी, मावा, देठ कुरतडणारी अळी, पाने पोखरणारी अळी, मूळ कुरतडणारी अळी इ. आढळून येतात. यापैकी घाटेअळीपासून जवळपास 30 ते 40 टक्के नुकसान होते. हे टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी जागरूक राहून किडींची ओळख करून पीकसंरक्षण खर्चात बचत करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. 
 
1) घाटेअळी :
 
Harbhara Kid_2
 
घाटेअळी ही बहुभक्षी कीड 181 पेक्षा जास्त वनस्पतींवर जगू शकते. त्यामुळे आपल्याकडे किडीचा प्रादुर्भाव खरीप हंगामात अनुकूल हवामान असल्यास सर्वप्रथम कपाशीनंतर तूर व रब्बी हंगामात हरभरा या पिकावर नियमित दिसून येतो, परंतु मागील काही वर्षांत ही अळी सोयाबीनवर देखील आढळून येते, परंतु हरभरा हे तिचे आवडते खाद्य असल्याने तिला घाटेअळी म्हणून ओळखले जाते. तिचा प्रादुर्भाव कोणकोणत्या पिकावर वर्षभर दिसून येतो म्हणून तिला राष्ट्रीय कीड संबोधले जाते. 
 
जीवनक्रम : 
 
या किडींच्या जीवनाच्या अंडी, अळी, कोष व पतंग अशा चार अवस्था असून, अळीअवस्था पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. घाटेअळीची प्रौढावस्था किंवा पतंग फिकट पिवळसर रंगाचा असतो. प्रौढ साधारणतः 300 ते 500 अंडी देते. ही अंडी पानाच्या देठावर, तसेच कळ्या व फुलांवर एकेक याप्रमाणे टाकली जातात. अंडी गोलाकार हिरवट पिवळी असतात. 5 ते 7 दिवसांत या अंड्यांतून लहान अळी बाहेर पडते. अळीची पूर्ण वाढ होण्यास 14 ते 15 दिवसांचा कालावधी लागतो. अळीचा रंग हिरवट असून, (यजमान पिकानुसार अळीच्या विविध रंगछटा आढळतात) तिच्या शरीरावर तुटक अशा गर्द करड्या रेषा असतात. पूर्ण वाढ झालेली अळी 35 ते 50 मिमी. लांब असते. अळी जमिनीत झाडाच्या अवतीभोवती वेष्टनात कोषावस्थेत जाते. कोषावस्था एक आठवड्यापासून ते महिनाभर टिकते. अशाप्रकारे किडीची एक पिढी तिचा जीवनक्रम 25 ते 52 दिवसांत पूर्ण करते. वर्षभर निरनिराळ्या पिकांवर अनेक पिढ्या निर्माण करते. 
 
नुकसानीचा प्रकार :
 
हरभर्‍यावर सुरवातीच्या काळात लहान लहान अळ्या प्रथम कोवळी पाने कुरतडून खातात. कालांतराने पाने, कळ्या व फुले कुरतडून खातात. शेवटी घाटे लागताच अळ्या घाटे कुरतडून त्यास छिद्र पडून डोके आत खुपसून आतील दाणे खातात. या अळीमुळे हरभर्‍याचे 5 ते 38 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. एक अळी 30 ते 40 घाट्यांचे नुकसान करते. 
 
व्यवस्थापन :
 
1) पिकाची पेरणी वेळेवर करावी.
 
2) शिफारस केलेल्या वाणांचीच योग्य अंतरावर पेरणी करावी. 
 
3) हरभरा पिकात आंतरपीक अथवा मिश्रपीक म्हणून जवस, कोथिंबीर, मोहरी या पिकांची लागवड करावी. 
 
4) पीक एक महिन्याचे होण्यापूर्वीच कोळपणी/निंदणी करून शेत तणविरहित ठेवावे. 
 
5) पीक एक महिन्याचे झाल्यावर पिकापेक्षा अधिक उंचीचे ’ढ ’ आकाराचे 50 पक्षीथांबे प्रतिहेक्टर या प्रमाणात लावावेत. 
 
6) एक ते दोन अळ्या प्रतिमीटर ओळ किंवा 5 टक्के कीडग्रस्त घाटे किंवा 8 ते 10 पतंग प्रतिकामगंध सापळ्यात सतत 2 ते 3 दिवस आढळल्यास आर्थिक नुकसानीची पातळी समजून खालील उपाय करावेत. 
 
7) मित्रकीटकांची भरपूर संख्या असल्यास हानिकारक रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी अथवा वनस्पतीजन्य किंवा सुरक्षित रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी. 
 
अ) वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा उपयोग : 
 
5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. यासाठी पाच किलो वाळलेल्या निंबोळीचा भरडा पातळ कपड्यात बांधून 10 लिटर पाणी असलेल्या बादलीत रात्रभर भिजत ठेवावा आणि सकाळी सदरील 10 लिटर द्रावण गाळून घ्यावे. त्यामध्ये 90 लिटर पाणी मिसळून फवारणी करावी, तसेच त्यामध्ये 200 ग्रॅम धुण्याची पावडर किंवा साबणाचा चुरा मिसळावा. निंबोळी अर्क फवारणीचे
 
फायदे : 
 
1) प्रौढ अंडी घालण्यासाठी कमी आकर्षित होतात. 
 
2) कमी प्रमाणात अंडी घातली जातात. 
 
3) त्यामुळे अळ्यांचे प्रमाण कमी होते. 
 
4) खाण्याची क्रिया मंदावते.
 
5) किडींच्या जीवनक्रमात बाधा तयार होते. 
 
6) प्रजननावर विपरीत परिणाम होतो. 
 
ब) जैविक नियंत्रण :
 
500 एलईएचएएनपव्ही विषाणू प्रति हे. 500 लि. पाण्यात मिसळून अळी लहान असताना फवारणी करावी. याचा वापर किडींविरुद्ध अतिशय प्रभावी आढळून आलेला आहे.
 
ही अंडी पानांच्या देठावर, तसेच कळ्या व फुलांवर एकेक याप्रमाणे टाकली जातात. अंडी गोलाकार हिरवट पिवळी असतात. 5 ते 7 दिवसांत या अंड्यांतून लहान अळी बाहेर पडते. अळीची पूर्ण वाढ होण्यास 14 ते 15 दिवसांचा कालावधी लागतो. अळीचा रंग हिरवट असून, (यजमान पिकानुसार अळीच्या विविध रंगछटा आढळतात) तिच्या शरीरावर तुटक अशा गर्द करड्या रेषा असतात. पूर्ण वाढ झालेली अळी 35 ते 50 मिमी लांब असते. अळी जमिनीत झाडाच्या अवतीभोवती वेष्टनात कोषावस्थेत जाते. कोषावस्था एक आठवड्यापासून ते महिनाभर टिकते. अशाप्रकारे किडीची एक पिढी तिचा जीवनक्रम 25 ते 52 दिवसांत पूर्ण करते व वर्षभर निरनिराळ्या पिकांवर अनेक पिढ्या निर्माण करते. 
 
2) मावा :
 
Harbhara Kid_3
 
ही कीड हरभर्‍यासोबत मूग, उडीद, तूर, भुईमूग, चवळी व वाटाणा इ. पिकांवर आढळते. 
 
जीवनक्रम : 
 
मावा मृदू शरीराचा, अर्थ गोलाकार, प्रौढावस्था 2 मी. मी लांब व रंगाने चमकदार हिरवट काळ्या रंगाचा असतो. बर्‍याचदा पंख असलेला मावाही आढळून येतो. पिल्लावस्था ही प्रौढ अवस्थेप्रमाणेच, परंतु आकाराने लहान असते. पंख असलेला तसेच पंखहीन मावा प्रजननक्षम असतो, तर मादीच्या संयोगाशिवाय माव्याचे प्रजनन होते. मादी अंडी न टाकता सरळ पिलांना जन्म देते. एक मादी दिवसात 8 ते 25 पिलांना जन्म देते. 10 ते 15 दिवसांत पिलांची पूर्ण वाढ होते. अनुकूल हवामानात एक आठवड्यात एक पिढी तयार होऊ शकते. 
 
नुकसानीचा प्रकार :
 
मावा कीड बहुसंख्येने राहून झाडावरील शेंडे, फांद्या, फुले व घाटे यावर राहून रस शोषण करते. रोप अवस्थेत माव्याच्या प्रादुर्भाव झाल्यास पान आकसतात. त्यामुळे झाडाच्या वाढीचा जोम कमी होतो व झाडाची वाढ खुंटते. मावा शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ बाहेर सोडतात व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होऊन पानांतील प्रकाशसंश्लेषणाची क्रिया मंदावते. 
 
व्यवस्थापन :
 
1. पंखधारी प्रौढ मावा उडत असल्याने पानांवरील व घाट्यावरील आम्लयुक्त स्त्रावामुळे बरेचशे प्रौढ मावा मारतात. त्यामुळे ज्या वाणात आम्लाचे प्रमाण कमी आहे असे वाण मावा किडीस बळी पडतात. त्यामुळे लागवड करताना प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी. 
 
2. या किडीसोबतच भक्षक किडी जसे ढालकिडा (लेडीबर्ड बीटल) ही मित्रकीड भरपूर संख्येने आढळून येते, त्यामुळे रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करण्याचे टाळावे, ज्यामुळे या मित्रकिडीचे संरक्षण व संवर्धन होईल. 
 
3. किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळल्यास डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिलि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे. 
 
3) मुळे कुरतडणारी अळी : 
 
Harbhara Kid_4
 
ही एक बहुभक्षी कीड असून, हिचा प्रादुर्भाव हरभर्‍यासोबतच टोमॅटो, भेंडी, बटाटा, मिरची, भोपळा व कांदा पिकांवर आढळतो. 
 
जीवनक्रम :
 
या किडीची अंडी, अळी, कोष व पतंग या चार अवस्था असून, मादी पतंग जमिनीवर अथवा झाडाच्या विविध भागांवर पांढर्‍या रंगाची 1500 पर्यंत गोलाकार अंडी देते. अंडी अवस्था 4 ते 7 दिवसांची असते. अळ्या काळपट तपकिरी असतात. अळ्यांना स्पर्श करताच अंग आखडून घेतात व गोलाकार होतात. पूर्ण वाढ झालेली अळी 40 मिमी. लांब असते. अळीची अवस्था 10 ते 30 दिवसांपर्यंत असते. कोषावस्था जमिनीतच 10 ते 30 दिवसांपर्यंत पूर्ण होते. प्रौढ पतंग 25 मी. लांब असून त्याचे पुढील पंख तपकिरी रंगाचे, तर मागील पंख पांढरट रंगाचे असतात. समोरील पंखावर करड्या तपकिरी रंगाचे वाकडे पट्टे असतात. अशाप्रकारे अनुकूल वातावरणात या किडीची एक पिढी पूर्ण होण्यासाठी 4 ते 5 आठवड्यांचा कालावधी लागतो. 
 
नुकसानीचा प्रकार : 
 
या किडींची अळी निशाचर असते. त्यामुळे ती दिवसा जमिनीत राहते व रात्री बाहेर येऊन जमिनीलगत रोपण कुरतडते. तसेच अळी पानांवरही उपजीविका करते. 
 
व्यवस्थापन :
 
1. पूर्ण कुजलेल्या शेणखताचा वापर करावा. 
 
2. पिकास वेळोवेळी खुरपणी करावी किंवा पिकाला हलके पाणी द्यावे. त्यामुळे जमिनीत दडून बसलेल्या अळ्या बाहेर येऊन पक्ष्यांचे भक्ष बनतील. 
 
3. प्रादुर्भावग्रस्त शेतात सायंकाळी ठिकठिकाणी गवताचे पुंजके ठेवावेत व दुसर्‍या दिवशी सकाळी पुंजक्याखाली दडलेल्या अळ्या जमा करून नष्ट कराव्यात. 
 
4. उगवण होत असलेल्या हरभरा पिकावर क्लोरोपायरीफॉस 20 % प्रवाही 25 मिलि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या मुळे व खोडाजवळ फवारणी करावी.
 
एकात्मिक कीड व्यवस्थापन :
 
एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे वातावरणाशी समन्वय साधून एकमेकास पूरक अशा सर्व तंत्रज्ञानाचा वापर करून किडीची संख्या नुकसान पातळीच्या खाली ठेवणे. त्यामध्ये मशामतीय, जैविक तांत्रिक व क्रमित कमी रासायनिक जैविक व तांत्रिक व कमीत कमी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणे. 
 
मशागती पद्धती : 
 
1. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीतील किडींची अवस्था नष्ट होईल.
 
2. शिफारस केलेल्या कालावधीत पेरणी करावी. 
 
3. हरभरा पिकात आंतरपीक अथवा मिश्रपीक अथवा शेताच्या सभोवताली दोन ओळी जवस, कोथिंबीर किंवा मोहरी या पिकांची लागवड करावी, म्हणजे परभक्षी कीटकांचे संवर्धन होण्यास मदत होईल. 
 
4. हरभरा पेरताना त्यासोबत 100 ग्रॅम प्रतिहेक्टरी ज्वारीचे बियाणे मिसळून पेरणी करावी. ज्यामुळे पक्षी आकर्षित होऊन घाटेअळीच्या अळ्या वेचून खातील. 
 
5. पिकांचा फेरपालटीसाठी बाजरी, ज्वारी, मका अथवा भुईमूग यांचा वापर करावा.
 
6. मुख्य पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावावी. 
 
7. कोळपणी/निंदणी करून पीक एक महिन्यापर्यंत शेत तणविरहित ठेवावे. 
 
8. शेताच्या बांधावरील किडीची पर्यायी खाद्यतणे उदा. कोळशी, रानभेंडी, पेटारी ही पर्यायी खाद्यतणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत
 
यांत्रिक पद्धती :
 
1. पिकावरील मोठ्या अळ्या वेचून त्याचा नाश करावा.
 
2. पीक एक महिन्याचे झाल्यावर पिकापेक्षा 1 ते 1.5 फूट उंचीचे इंग्रजी ’ढ ’अक्षराच्या आकाराचे 50 पक्षीथांबे प्रति हे. घाटेअळीसाठी लावावेत. 
 
3. घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रतिहेक्टरी 5 कामगंध सापळे जमिनीपासून 1 मीटर उंचीवर लावावेत. कामगंध सापळ्यांमध्ये 8 ते
 
4. 10 पतंग प्रतिसापळा सतत 2 ते 3 दिवस आढळल्यास कीटकनाशकाची फवारणी करावी. 
 
जैविक पद्धती :
 
पिकास फुले येत असताना सुरवातीच्या काळात 5 टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी. घाटेअळी लहान अवस्थेत असताना एचईएनपीव्ही 500 एलई विषाणूची प्रति हे. फवारणी करावी. म्हणजे एलई विषाणू (500 मिलि) 500 लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये 500 मिलि. चिकट द्रव (स्टिकर) आणि राणीपाल (नीळ) 200 ग्रॅम टाकावा. 
 
रासायनिक पद्धत :
 
कीड दिसताक्षणी फवारणीच्या जागी ’गरजेनुसार फवारा ’ रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करण्याआधी, पिकावरील किडीचा प्रकार, नुकसान करणारी अवस्था, किडींची संख्या, परोपजीवी व परभक्षी मित्रकीटकांची संख्या, आठवड्यातून किमान 1 वेळा पिकाचे सर्वेक्षण करणे.
 
फवारणीसाठी कीटकनाशके : 
 
किडी कीटकनाशके मात्रा/10 लि. पाणी 
 
घाटेअळी क्लोरपायरीफॉस 20 ईसी किंवा 20 मिलि. 
 
क्विनॉलफॉस 20 ईसी किंवा 20 मिलि. 
 
इमामेक्टीन बेन्झोउट 5 एसजी किंवा 4 ग्रॅम 
 
क्लोरँट्रोनिलीप्रोल 18.5 एससी किंवा 2.5 मिलि. 
 
लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 12 मिलि. 
 
पेट्रोल पंपासाठी औषधाची मात्रा तीनपट वापरावी. 
 
शेतात कीटकनाशकांचा वापर करताना हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा.