भाजीपाला पिकावरील रोग आणि त्यांचा बंदोबस्त

डिजिटल बळीराजा-2    20-Dec-2019
|
प्रश्न क्र. 1 : भाजीपाला पिकावरील रोगांचे निदान आणि त्यांचे नियंत्रण करणे गरजेचे आहे का? 
 
उत्तर : होय. आपल्या आहारात भाजीपाल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यापासून आपल्याला जीवनसत्त्वे, खनिजद्रव्ये, प्रथिने आणि उष्मांक यांचा मुबलक पुरवठा होतो. भाजीपाला पिकांपासून अधिक उत्पादन आणि फायदा होण्यासाठी या पिकांवरील रोगांचे निदान आणि त्यांचा बंदोबस्त वेळीच करणे आवश्यक असते. त्यामुळे भाजीपाला पिकांचे रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते.
 
प्रश्न क्र. 2 : भाजीपाला पिकावर प्रामुख्याने कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो? 
               
Vegetables_1  H
 
उत्तर : टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी तसेच वेलवर्गीय यासारख्या भाजीपाला पिकांवर प्रामुख्याने बुरशीजन्य, जीवाणूजन्य, विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो.
 
प्रश्न क्र. 3: टोमॅटो आणि वांगीवर येणार्‍या रोपवाटिकेतील मर/रोपे कुजणे रोग कसा ओळखावा?
 
उत्तर : हा रोग फायटोप्थोरा किंवा पिथियम जातीच्या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव बियाणे उगवण्यापूर्वी तसेच उगवण झाल्यानंतर रोपवाटिकेत होतो. रोपाचा जमिनीलगतचा भाग कुजतो आणि रोपे कोमजून म्हणून होऊन कोलमडतात.
 
प्रश्न क्र. 4 : या रोगाचा बंदोबस्त कसा करावा?
 
उत्तर : या रोगाच्या बंदोबस्तासाठी रोपवाटिकेची जमीन भुसभुसीत आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. रोपांना कमी प्रमाणात, परंतु नियमित पाणी द्यावे. रोपवाटिकेत बी पेरणीपूर्वी तीन ते चार दिवस एक टक्के बोर्डो मिश्रणाची भिजवण करावी. पेरणीपूर्वी थायरम किंवा कॅप्टॉन बुरशीनाशक 3 ग्रॅम प्रतिकिलो बियाणे यापैकी बियाण्यांस चोळावे. तसेच रोपांची संख्या शिफारशीनुसार मर्यादित ठेवावी.
 
 
प्रश्न क्र. 5 : टोमॅटो पिकावर येणार्‍या करपा रोगाची प्रमुख लक्षणे कोणती? 
 
Tomato_1  H x W 
 
उत्तर : हा रोग अल्टरनेरिया सोलानी नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाची सुरवात खालच्या पानापासून होते. पाने प्रथम पिवळी पडतात आणि नंतर पानावर तांबूस काळपट ठिपके पडतात. ठिपक्यांमध्ये स्पष्ट अशी गोलाकार वर्तुळे दिसतात आणि भोवती काळपट रंगाची वलये निर्माण होतात. रोगाचे प्रमाण वाढले की पाने करपतात आणि गळून खाली पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव पानांखेरीज खोड, कळ्या आणि फळांवरही आढळतो. 
 
प्रश्न क्र. 6 : या रोगावर काय उपाय योजावेत? 
 
उत्तर : या रोगाच्या उपाययोजनेसाठी जमिनीलगतची रोगट पाने काढून टाकावीत. बियाणे पेरण्यापूर्वी थायरम हे बुरशीनाशक औषध 3 ग्रॅम प्रति 1 किलो बियाण्यास चोळावे. रोगाची लक्षणे दिसताच मॅन्कोझेब हे बुरशीनाशक औषध 2.5 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे. रोग दिसून येताच औषधाची फवारणी दर 10 ते 15 दिवसांनी तीन ते चार वेळेस केल्यास रोग आटोक्यात येतो.
 
प्रश्न क्र. 7 : टोमॅटोवरील जिवाणूमुळे होणार्‍या या रोगाची लक्षणे कशा प्रकारची आहेत?
 
उत्तर : जिवाणूजन्य मर हा रोग जमिनीत असणार्‍या जिवाणूपासून होतो. पूर्ण लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांनी झाडांचे शेंडे मलूल होतात आणि एक दोन दिवसांत पूर्ण झाड सुकते. झाडाची मर होते.
 
प्रश्न क्र. 8 : या रोगाच्या नियंत्रणासाठी काय करावे?
 
उत्तर : यासाठी रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी. सोनाली, अर्का आलोक, बीडब्ल्यूआर 1.5 इत्यादी जाती या रोगास प्रतिकारक आहे.
 
प्रश्न क्र. 9 : टोमॅटोवरील बुरशीजन्य मर कशामुळे होतो आणि तो कसा ओळखावा?
 
Tomato_1  H x W  
 
उत्तर : हा रोग फ्युजॅरियम बुरशीमुळे होतो. रोगग्रस्त झाडांची पाने पिवळी पडतात. मुळाच्या आणि खोडाच्या आतील पेशी कुजतात. शेतामध्ये रोपे अचानक मलूल होऊन कोलमडतात. एक-दोन दिवसांत झाडे वाळतात. मुळांवर आणि जमिनीत पांढर्‍या बुरशीची वाढ दिसून येते.
 
प्रश्न क्र. 10 : या रोगाच्या बंदोबस्तासाठी काय करावे?
 
उत्तर : या रोगाच्या नियंत्रणासाठी पिकांची फेरपालट करावी, तसेच जमिनीत खोल नांगरट करावी. बियाण्यांस थायरम तीन ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव अधिक आहे. अशा ठिकाणी लाबोनीटा, मारग्लोब या जातींची लागवड करावी.
 
प्रश्न क्र. 11 : या पिकावरील पर्णगुच्छ (लीफकर्ल) रोग कशामुळे होतो आणि त्याची लक्षणे काय आहेत?
 
उत्तर : या रोगाचा प्रादुर्भाव विषाणूमुळे होतो. या रोगामुळे पानावर सुरकुत्या पडतात आणि पाने वेडीवाकडी होऊन आकार लहान होतो. तसेच ती गर्द हिरवी न राहता पांढरट पिवळसर होतात. फांद्यांची लांबी कमी होते. त्यामुळे झाड खुजे राहून पर्णगुच्छासारखे किंवा बोकड्यासारखे दिसते. या रोगाचा प्रादुर्भाव सुरवातीला झाल्यास फळधारणा होत नाही. 
 
प्रश्न क्र. 12 : या रोगाच्या नियंत्रणासाठी काय करावे?
 
उत्तर : नियंत्रणासाठी रोगट झाडे दिसताच उपटून नाश करावीत. तसेच रोगाचा प्रसार पांढर्‍या माशीमुळे होत असल्यामुळे त्याच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट (1 मिली/लिटर) किंवा मोनोक्रोटोफॉस (1.5 मिली/लिटर) औषधे 15 दिवसांच्या अंतराने फवारल्यास रोगाचे प्रमाण कमी होते.
 
प्रश्न क्र. 13 : मिरची या पिकावर येणारे फांद्या वाळणे आणि फळ कुजणे यासारखे रोग कसे ओळखावे? 
 
Chilli_1  H x W  
 
उत्तर : या रोगाची सुरवात शेंड्याकडून होते. प्रथम कोवळे शेंडे मरतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास झाडे सुकून वाळतात. त्याचप्रमाणे पानांवर आणि फांद्यावरदेखील काळे चट्टे पडतात. हिरव्या तसेच लाल मिरच्यांवरसुद्धा वर्तुळाकार खोलगट डाग दिसतात. दमट हवामानात रोगाचे जंतू झपाट्याने वाढतात आणि फळावर काळपट पट्टे दिसतात. रोगाची तीव्रता जास्त झाली की संपूर्ण मिरची काळी पडते आणि कुजते.
 
प्रश्न क्र. 14 : या रोगाचा बंदोबस्त कसा करावा?
 
उत्तर : या रोगाच्या बंदोबस्तासाठी पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यांस 3 ग्रॅम या प्रमाणात कॅप्टॉन किंवा थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी, तसेच रोगग्रस्त झाडाचे शेंडे खुडून बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्यासाठी कार्बेन्डॅझिम 0.1 टक्के, कॉपर ऑक्सिक्लोराइड 0.25 टक्के, मॅकोझॅन 0.3 टक्के यापैकी एका बुरशीनाशकाची फवारणी करावी.
 
 
प्रश्न क्र. 15 : मिरची पिकावर येणार्‍या भुरी रोगाची लक्षणे कशी असतात आणि त्याचे नियंत्रण कसे करावे?
 
 
Chilli_1  H x W  
 
उत्तर : या रोगामुळे पानाच्या वरील व खालच्या बाजूस पिठाप्रमाणे पांढरी बुरशी दिसते. रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास फळावर तसेच फांद्यावरसुद्धा पांढरी बुरशी दिसते. रोग जास्त बळावल्यास पाने आणि फुले गळून पडतात आणि झाडे निस्तेज दिसतात. या रोगांच्या नियंत्रणासाठी रोग दिसताच पाण्यात विरघळणारे गंधक 0.2 टक्के, कार्बेन्डॅझीम 0.1टक्के, ट्रायडेेमॉर्फ 0.025 टक्के, हेक्झॅकोनॅझोल 0.2 टक्के, ट्रायडेमेफॉन 0.2 टक्के यापैकी एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. पंधरा दिवसांच्या अंतराने 2-3 फवारण्या कराव्यात. 
 
प्रश्न क्र. 16 : मिरचीवरील चुरडा मुरडा रोग कशामुळे होतो आणि तो कसा ओळखावा?
 
उत्तर : या रोगाचा प्रादुर्भाव विषाणूमुळे होतो तर रोगाचा प्रसार फुलकिडे, कोळी या किडीमार्फत होतो. पानांच्या शिरांमधील भागांवर सुरकुत्या पडून पाने वेडीवाकडी होतात आणि आकाराने लहान राहतात. झाडांची वाढ न होता ती खुजी राहतात. 
 
प्रश्न क्र. 17 : या रोगांचा बंदोबस्त कसा करावा?  
 
उत्तर : या रोगांच्या बंदोबस्तासाठी रोगग्रस्त झाडे उपटून त्यांचा नाश करावा. गादीवाफ्यावर मिरचीचे बी पेरतेवेळी दोन ओळींमधून फोरेट हे दाणेदार औषध प्रत्येक वाफ्यात 5 ग्रॅम या प्रमाणात द्यावे. या रोगाचा प्रसार किडींमार्फत होत असल्याने तो रोखण्यासाठी एन्उोसल्फान 0.05 टक्के, मोनोक्रोटोफ्रॉस 0.03 टक्के, फॉसफामिडॉन 0.3 टक्के यापैकी एका कीडनाशकाची फवारणी 15 दिवसांच्या अंतराने 3 वेळा करावी.
 
प्रश्न क्र. 18 : वांगी या पिकावर येणार्‍या मर रोगाचे निदान कसे करावे आणि त्यावर उपाय काय आहे? 
 

leafcurl_1  H x 
 
उत्तर : हा रोग जमिनीत असणार्‍या फ्युजॅरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची खालची पाने प्रथम पिवळी पडतात. खोडाचा आतील भाग तपकिरी बनतो. या रोगामुळे झाडे झटपट मरतात आणि अतोनात नुकसान होते. या रोगावर उपाय म्हणून रोगट झाडे काढून नष्ट करावीत. तसेच वाफ्यात रोगाची लागण झाल्यास कॉपर ऑक्सिक्लोराइड (3 ग्रॅम/लिटर) किंवा कार्बेन्डॅझिमचे (1 ग्रॅम/लिटर) द्रावण झाडांच्या बुंध्याशी ओतावे.
 
प्रश्न क्र. 19 : या पिकांवर येणारा करपा रोग कसा ओळखावा आणि त्याचे नियंत्रण कसे करावे? 
 
उत्तर : या रोगाच्या प्रादुर्भावामुळे तपकिरी आणि काळपट रंगाचे ठिपके पानांवर आणि फांद्यावर दिसतात. ठिपक्यांचा आकार वाढतो आणि संपूर्ण पाने करपतात. तसेच या रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब (0.2 टक्के) या बुरशीनाशकाची 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
 
प्रश्न क्र. 20 : वांगी या पिकाची पाने लहान राहणे म्हणजे काय?
 
उत्तर : या रोगामध्ये पाने लहान राहतात. झाडाची वाढ खुंटते. तसेच रोगग्रस्त झाडाला व्यवस्थित फुले येत नाहीत. या रोगाचा प्रसार पानांवरील तुडतुडे या किडीमुळे होतो.
 
प्रश्न क्र. 21 : पाने लहान होऊ नयेत म्हणून काय करावे?
 
उत्तर : यासाठी रोगग्रस्त झाडे त्वरित काढावीत. रोपवाटिकेत 10 टक्के दाणेदार फोरेट टाकावे. पुनर्लागवड करताना रोपांची मुळे 0.03 टक्के डायमेथोएट आणि 0.05 टक्के अ‍ॅग्रोमायसीन या मिश्रणात बुडवावीत. 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 0.03 टक्के डायमेथोएट फवारावे.
 
प्रश्न क्र. 22 : वांगी या पिकावर आढळणार्‍या जिवाणूजन्य मर रोगाचे निदान कसे करावे?
 
उत्तर : या रोगाची लक्षणे साधारणत: पुनर्लागवडीनंतर 30 दिवसांनी दिसून येतात. रोगाची तीव्रतसा पीक फुलोर्‍यात असताना जास्त असते. रोगग्रस्त झाडे अचानक कोमेजतात आणि मरतात.
 
प्रश्न क्र. 23 : या रोगाच्या नियंत्रणासाठी काय करावे? 
 
उत्तर : या रोगाच्या नियंत्रणासाठी अर्का निळकंठ, अर्का केशव, स्वर्णप्रभा या रोगप्रतिबंधक जातींचा वापर करावा. तसेच सातत्याने मर रोग येणार्‍या शेतात फेरपालटणी करावी. तीन वर्षांपर्यंत वांगी कुळातील पिके एकाच शेतात लावू नयेत.
 
प्रश्न क्र. 24 : भेंडी पिकावर येणारा भुरी रोग कसा ओळखावा? 
 
उत्तर : भेंडीच्या पानावर वरच्या आणि खालच्या बाजूस पिठासारखी पांढरी बुरशी दिसते. रोगाचे प्रमाण असल्यास सर्व पाने करपल्यासारखी दिसतात आणि ती झाडावरून गळून पडतात. तसेच पांढरी बुरशी फांद्यांवर व फळांवरही पसरते. त्यामुळे फळे पिवळसर आणि आखूड होतात.
 
प्रश्न क्र. 25 : या भुरी रोगाचे नियंत्रण कसे करावे?
 
उत्तर : हे रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल 0.5 मि.लि. किंवा 0.5 मि.लि. ट्रायडीमॉर्फ प्रतिलीटर पाण्यात मिसळून 10 ते 15 दिवसांनी फवारावे.
 
प्रश्न क्र. 26 : भेंडीवरील हळद्या रोग म्हणजे काय? 
 
Bhendi_1  H x W  
 
उत्तर : हा रोग विषाणूजन्य असून रोगट झाडांच्या पानांच्या शिरा पिवळ्या पडतात. झाडाची वाढ खुंटते. तसेच भेंडीसुद्धा पिवळी पडते. शेंडे वाकडे होतात आणि उत्पादनावर तसेच प्रतीवर अनिष्ट परिणाम होतो. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने पांढरी माशीमार्फत होतो. 
 
प्रश्न क्र. 27 : या रोगाचा बंदोबस्त कसा करावा?
 
उत्तर : या रोगाच्या बंदोबस्तासाठी परभणी क्रांती, अर्का अनामिका, वर्षा उपहार या भेंडीच्या रोगप्रतिबंधक जातींची लागवड करावी. रोगग्रस्त झाडे त्वरित उपटून त्यांचा नाश करावा. तसेच रोगाचा प्रसार रोखण्यासाठी पांढरी माशी आणि अन्य रसशोषक किडींचा संहार करण्यासाठी 1 मि.लि. डायमेथोएट 1 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 
प्रश्न क्र. 28 : पानावरील ठिपके कशा प्रकारचे असतात आणि त्यासाठी उपाय काय? 
 
उत्तर : पानांवर तपकिरी रंगाचे वेडेवाकडे ठिपके दिसतात. पानांचे देठ आणि फांदीवरही त्यांचा प्रसार होतो. रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने गळून पडतात. रोगाची लक्षणे दिसताच कार्बेन्डॅझीम 1 ग्रॅम प्रतिलिटर पाणी किंवा झायनेब किंवा डायफोलेटॉनची 2 ग्रॅम प्रतिलिटर पाणी यांची फवारणी करावी. 
 
प्रश्न क्र. 29 : वेलवर्गीय भाज्यांवर कोणकोणत्या रोगाचा प्रादुर्भाव आढळतो?
 
उत्तर : या भाज्यांवर भुरी, केवडा, करपा, मर, फळ कुजणे इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो.
 
प्रश्न क्र. 30 : भुरी हा रोग कसा ओळखावा?
 
उत्तर : हा रोग संपूर्ण वेलावर आढळून येतो. रोगाची तीव्रता जास्त असल्यास भुरकट पांढर्‍या बुरशीची वाढ पानाच्या दोन्ही बाजूस, सर्व पानांवर आणि खोडावर आढळून येते. नंतर पाने करपतात आणि गळून पडतात.
 
प्रश्न क्र. 31 : या रोगाचे नियंत्रण कसे करावे? 
 
उत्तर : या रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझिम 10 ग्रॅम किंवा हेक्झॅकोनॅझोल 5 मि. लि. प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात 15 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
 
प्रश्न क्र. 32 : केवडा हा रोग वेलवर्गीय भाज्यांवर आल्यास त्याची लक्षणे काय आहेत?
 
उत्तर : या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानाच्या पृष्ठभागांवर पिवळसर तपकिरी ठिपके दिसतात. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानाच्या पृष्ठभागांवर पिवळसर तपकिरी ठिपके दिसतात. रोगाची सुरवात खालील पानापासून होते आणि वरील पानाकडे पसरते. रोगाची तीव्रता जास्त असल्यास पाने पूर्णत: करपतात. 
 
प्रश्न क्र. 33 : यासाठी कोणते उपाय योजावेत?
 
उत्तर : रोगाच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. तसेच मॅन्कोझेब किंवा झायनेब 2.5 ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात दहा ते पंधरा दिवसांनी फवारावे. दोडकीवरील केवड्याच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब (0.25 टक्के) किंवा कॉपर