एकात्मिक पीकपद्धती शेतीपूरक उद्योगास व्यवसायाची जोड

डिजिटल बळीराजा-2    19-Dec-2019
 

Ekatmik_1  H x  
 
वडिलोपार्जित पिढ्यान् पिढ्या शेती व्यवसाय कुटुंबात जन्म झाला. सन 1997 मध्ये कृषी महाविद्यालय, नागपूर येथून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1997 ते 2000 सालापर्यंत वडिलांच्या पारंपरिक शेतीस हातभार लावला, पण इतरत्र जेव्हा फिरायची वेळ आली तेव्हा सर्व मित्रमंडळी नोकरी करत होते. दर महिन्याला पगार मिळवणार व छान जीवन जगणार मी मात्र शेती व्यवसाय व्यवसाय करत कसाबसा कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होतो आणि मग मनात विचार आला, आपणही कोठेतरी छोटी नोकरी करावी आणि छानपैकी जीवन जगावे. शेतीत काही दम नाही, असा विचार करून 2001 मध्ये शेती व्यवसायाला रामराम केला. जवळच असलेल्या कृषी विज्ञान केंद्र (बाभळेश्वर) येथे नोकरीस सुरवात केली.
 
एकूण 12 वर्षे नोकरी केली. नोकरी ज्या संस्थेमध्ये केली ती संस्था शेतीशी निगडित काम करत असल्यामुळे शेतीतील अनेक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळवली. संस्थेत काम करत असताना नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. शेतात नवनवीन वेगवेगळ्या तंत्रज्ञान वापरणारे शेतकरी भेटत असत. अगदी माझ्या वयाचे, पण काही पूर्ण वेळ शेती करणारे व माझ्यापेक्षाही उच्चशिक्षित, पण पूर्ण वेळ शेती करणार्‍यांची भेट झाली. त्यानंतर मनात पुन्हा चलबिचल सुरू साली. पुन्हा शेतीकडे जायचे विचार मनात सुरु झाले, पण पूर्वीचे दिवस आठवले की नको वाटायचे, आहे त्यातच समाधान मानायचे, पण डोळ्यांपुढे एक स्वतंत्र जीवन जगण्याचे स्वप्न होते ते केवळ शेतीवर पूर्ण होत होते, पण मनात एक पूर्ण गाठ बांधली, की शेती करायची पण पूर्ण व्यावसायिक पद्धतीने. पारंपरिक पद्धत पूर्णपणे बंद करायची, तिला पूर्णपणे तंत्रज्ञानाची जोड द्यायची.
 
या सर्व घडामोडींना जवळपास 10 ते 11 वर्षे झाली. एकत्रित कुटुंब. 10 लोकं कुटुंबामध्ये. आईवडील, भाऊ, भावजय आणि आम्हा दोघांना प्रत्येकी 2 मुले. माझी गावात नातेवाईक, समाजामध्ये एक वेगळी ओळख होती. पदवीधर, नोकरी करणारा, कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारा इ. परंतु या सर्व गोष्टींचा विचार बंद केला आणि फक्त कुटुंबातील सदस्यांची परवानगी घेतली. त्यांनी होकार दिला. नोकरीला पूर्णविराम दिला. नोकरी करत असतानाची शेती-एकूण शेती 12 एकर.
 
शेतातील पीकपद्धती 2 ते 3 एकर. ऊस, बाजरी, सूर्यफूल, कपाशी, लसूनघास, चारापिके इ. पिकांची लागवड होती. सर्व पिकांचे व्यवस्थापन अगदी पारंपरिक पद्धतीने. ऊस लागवड अरुंद सरी पद्धत, पाणी, मोकाट पद्धतीने देणे, कीडरोग नियंत्रणासाठी फक्त रासायनिक औषधांचा वापर. खत व्यवस्थापनास फक्त रासायनिक खते या सर्वांतून आम्हाला वर्षातून 2.5 ते 3 लाख रुपये मिळायचे. थोडेफार पैसे डेअरी व्यवसायातून मिळायचे आणि त्यातून आमच्या कुटुंबाचा खर्च करणे पण अवघड होऊन जायचे.
 
एकंदरीत काय तर वर्षभर पाणी उपलब्ध असूनसुद्धा केवळ शेतीचे व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे केवळ शेतीवर आयोजन करणे अवघड होते आणि हो नोकरीचा थोडाफार कुटुंब खर्चासाठी उपयोग होत राहतो. नोकरी सोडल्यानंतरची शेती व्यवस्थापनामध्ये केलेले बदल एकूण क्षेत्रापैकी 50 % क्षेत्रामध्ये शाश्वत उत्पन्न देणारे वार्षिक पीक 25% क्षेत्रावरती नियमित उत्पन्न देणारे बहुवार्षिक पीक आणि उर्वरित 25% क्षेत्रावर नियमित उत्पन्न देणारे भाजीपाला देणारे पीक व चारापिके (डेयरी उद्योगासाठी)
 
बहुवार्षिक पीक : पेरू 10 ते 12 वर्षे (क्षेत्र 1 एकर)
 
लसूणघास : 3 ते 4 वर्षे (क्षेत्र 2 एकर)
 
वार्षिक पीक : ऊस (क्षेत्र 6 एकर)
 
कमी कालावधी पीक : भाजीपाला पीक : शेवगा (क्षेत्र 20 गुंठे)
 
चारापिके : ज्वारी, मका (क्षेत्र 1 एकर)
 
शेतीपूरक व्यवसाय 
 
1) डेअरी व्यवसाय
 
2) गांडूळखत प्रकल्प

शेती व्यवस्थापनात केलेले ठळक बदल 
 
1) पाणी व्यवस्थापन : संपूर्ण क्षेत्रात मोकाट पाणी पद्धती होती ती 100 % बंद करून संपूर्ण क्षेत्रावर ठिबक संच स्प्रिंकलर संच वापरतो.
 
2) खत व्यवस्थापन : रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर व जास्त करतो. रासायनिक खतांचा वापर व जास्त करतो. रासायनिक खतांचा 50 % खर्च कमी केला. माझा स्वतःचा गांडूळखत प्रकल्प असल्यामुळे त्याचा वापर जास्त करतो
 
3) कीड रोग व्यवस्थापन : रासायनिक औषधांचा अगदी कमी वापर. जैविक व सेंद्रिय औषधांचा वापर करतो.
 
शेती व्यवस्थापन करताना पीकपद्धती :
 
1) ऊस : पिकांमध्ये 5 फूट सरींचा वापर पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक संचाचा वापर आणि त्यामुळे त्याद्वारे पिकाला खत व्यवस्थापन गोमूत्र व्हर्मीवॉशचा वापर. त्यामुळे पीक उत्पादनात कमी खर्चात झालेली वाढ एकरी मला 60 टनांपर्यंत उत्पन्न मिळू लागले आहे. एक शाश्वत चांगले पैसा मिळण्याचा मार्ग मिळाला.
 
2) लसूणघास : एकूण 2 एकर क्षेत्रावर लसूणघास पेरणी केली आहे. पाणी देण्यासाठी स्प्रिंकलर संचाचा वापर केला आहे, यापैकी 20 गुंठे क्षेत्रावरील पीक घरच्या डेअरी व्यवसायासाठी वापरतो, उर्वरित पिकाची नियमित विक्री करतो. त्याची कापणी दर 20 ते 21 दिवसांनी करावी लागते. वर्षभरामध्ये 15 कापणी होतात, प्रतिकापणी प्रतिएकर 4 ते 4/5 टन उत्पन्न मिळते. याला 2.5 ते 3 रु पर्यंत प्रतिकिलो भाव मिळतो. सर्वांत महत्त्वाचे या पिकापासून दर 20 दिवसांनी नियमित उत्पन्न मिळते. वर्षभर चांगले नियोजन केल्यास निव्वळ नफा 1.5 लाख प्रतिएकर रु. मिळतो.
 
3) पेरू : इतर फळबाग (डाळिंब, द्राक्षे) पिकांपेक्षा अगदी कमी खर्चिक व कमी उत्पन्न असणारे, पण अगदी शाश्वत उत्पन्न देणारे पेरूचे 1 एकर क्षेत्र. मी सधन पद्धतीने अंतर 12*12 फूट घेऊन 302 झाडे लागवड केली. दोन वर्षांचीच झाडे असल्यामुळे या वर्षीचे उत्पन्न येण्यास सुरवात झाली, पण पुढील वर्षी चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे. पेरू फळबागेमध्येसुद्धा मी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला आहे. 
 
4) शेवगा : 20 गुंठे क्षेत्रावर शेवगा भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. झघच् 1 जातीचे शेवगा लागवड अंतर 12* 6 फूट 1 एकर क्षेत्रातील झाडे सधन पद्धत वापरून 20 गुंठे क्षेत्रावर बसवली आहे. साधारणतः 1 वर्ष पूर्ण झाले आहे. अतिशय अनपेक्षित असे उत्पन्न मला या भाजीपाला पिकांतून मिळाले आहे. एकंदरीत 3 महिन्यांच्या काढणीपासून जवळपास 45 ते 50 रु प्रति कि. भाव मिळाला. एकूण 1400 कि. शेंगांपासून 70000 रु उत्पन्न मिळाले. मी जुलैमध्ये छाटणी घेतली आहे. माझ्याकडे वर्षभर पाणी उपलब्ध असल्यामुळे मी छाटणीपद्धतीत जरा बदल करून एप्रिल मेऐवजी जुलैमध्ये केली. त्यामुळे इतर शेतकर्‍यांपेक्षा माझा शेवगा मार्केटमध्ये उशिरा येईल. भावही चांगला मिळेल ही अपेक्षा आहे. 
 
चारापिके 
 
माझा स्वतःचा डेअरी व्यवसाय असल्यामुळे मला वर्षभर चारा लागतो. त्यामुळे मी ज्वारी व मकाची आलटून पालटून लागवड करतो. मका व ज्वारीपासून गाईसाठी मुरघास बनवतो व त्याचा वापर वर्षभर करतो. वर्षभर 15 ते 20 लि. दूधपुरवठा करतो. त्यामुळे दर 15 दिवसांनी पैशाची उपलब्धता होते.
 
शेतीपूरक व्यवसाय : 
 
1) गांडूळखत : माझ्याकडे डेअरी व्यवसाय खूप पूर्वीपासून आहे. त्यामुळे शेणखत बर्‍यापैकी माझ्याकडे उपलब्ध असायचे. मी त्याचा वापर शेतीमध्ये करत असे, परंतु नोकरी सोडल्यानंतर मी लगेच निर्णय घेतला की कच्चे शेणखत जमिनीत टाकायचे नाही. त्यापेक्षा आपण त्याचे गांडूळखत तयार करू, त्याची गुणवत्ता वाढवू व नंतर शेतीत वापर करू. 2015 मध्ये 40 फूट लांब व 40 फूट रुंद पत्र्याच्या शेडमध्ये गांडूळखत तयार करण्यास सुरवात केली. नोकरी करत असताना मी अनेक प्रकल्पांना भेटी दिल्या होत्या. मला त्या व्यवसायाची कल्पना होती. मनात तसा विचारही होता. त्या दृष्टीने शेडची चांगल्या पद्धतीने बांधणी केली होती. मनात विचार होता 50% शेतीत वापरायचे व 50 % विक्री करायची ते स्वप्न पूर्ण झाले. गांडूळखताची गुणवत्ता आणि शेतकर्‍यांना मिळालेले अनुभव यातून 2 वर्षांंत गांडूळखताला खूप मागणी वाढली आणि 2017 मध्ये 100 * 25 फूट या नवीन शेडची उभारणी केली. थोड्याच दिवसांत 40 * 30 च्या शेडची उभारणी केली. आज असे एकूण 3 शेड असून, त्यापासून सुमारे 9 ते 10 टन गांडूळखताची निर्मिती करत असून गरजेपुरते शेतीस वापरतो व उरलेले सर्व खत पॅकिंग करून विक्री करत आहे. या 3 शेड पासून मला जवळजवळ 3 ते 4 लाख रुपये नफा मिळतो.

2) व्हर्मीवाश / गांडूळ कल्चर :
 
या प्रकल्पासोबत शेतकर्‍यांचा वाढत कल पाहून मी व्हर्मीवाशाची निर्मिती सुरू केली. त्यालाही शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळून त्याचीही मागणी वाढली आहे. तसेच शेतकर्‍यांना नवीन प्रकल्प उभारणीसाठी गांडूळ कल्चरही करून देतो. भरपूर शेतकरी माझ्याकडून कल्चर खरेदी करून नवीन प्रकल्प सुरू करत आहेत. मी गांडूळ कल्चरसाठी नवीन स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. हे करत असताना मी बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करून त्यातून मिळणारा गॅस घरातील स्वयंपाकासाठी वापरतो व स्लरीचा वापर गांडूळखतासाठी करतो.
 
3) डेअरी प्रकल्प :
 
हा व्यवसाय वडिलोपार्जित आहे. माझ्याकडे नेहमी 5 ते 6 गायी आजही आहेत. त्यामध्ये फक्त बदल असा केला की मुक्तसंचार पद्धतीने गोठा निर्मिती केली. त्यामुळे मजूर खर्चावरील 70% पर्यंत बचत झाली व नफ्याचे प्रमाण वाढले. कुटुंबासाठी चांगले दूध मिळते व उर्वरित दुधाचा वर्षभर डेअरीला पुरवठा करतो. त्यातून कुटुंबाला पैशाचा नियमित हातभार लागतो.
 
तरुण शेतकर्‍यांना माझ्या अनुभवातील सल्ला :
 
1) एकाच पिकावर अवलंबून राहू नका. ते कितीही जास्त उत्पन्न देणारे असले तरीसुद्धा.
 
2) फक्त पिकामधून येणार्‍या उत्पन्नावर 100 % अवलंबून राहू नका. तर त्यासाठी शेतीवर आधारित अनेक प्रकारचे शेतीपूरक व्यवसाय आहेत. त्या व्यवसायातून कुटुंबाला आर्थिक मदत होण्यासाठी चांगल्या व्यवसायाची निवड करा.
 
3) पीकपद्धतीची निवड करताना कमी पैसे मिळाले तरी चालतील, पण कमी जोखीम असणारे व शाश्वत उत्पन्न देणारे पीक निवडा, म्हणजे तुम्हाला ताणविरहित जीवन जगता येईल.
 
4) शेतीमध्ये पारंपरिक व नवीन तंत्रज्ञान यांचा योग्य पद्धतीने वापर करा.
 
5) आपल्याकडे उपलब्ध असलेल्या क्षेत्राची योग्य विभागणी करून पिकांची लागवड करा.
 
6) पिकाची निवड करताना आपला जिल्हा, त्यातील हवामान, जमीन, पाणी इ. गोष्टींचा विचार करून पिकाची निवड करा, उगाच नको ते शेतीत प्रयोग करू नका.
 
7) शेतात नवीन प्रयोग करताना योग्य त्या चांगल्या व्यक्तीचा सल्ला घ्या.
 
8) जीवनात सर्व काही पैशाने साध्य होत नाही हे जरी 100% खरे असले तरी कुटुंबातील गरजा आत्मसात करा, नवीन तंत्राचा वापर करा.
 
9) शेती करताना प्रत्येक गोष्टीत व्यावसायिक दृष्टिकोनाचा अवलंब करा. यश नक्की मिळते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
 
जय जवान जय किसान