भुईमूग : बदलत्या हवामानात प्लॅस्टिक आच्छादनाची उपयुक्तता

डिजिटल बळीराजा-2    18-Dec-2019
 
Bhuimug1_1  H x
 
 
प्रस्तुत लेखामध्ये भुइमुग पिकावर हवामानाचा परिणाम व प्लास्टिक आच्छादन मशागत पद्धतीची उपयुक्तता या संबंधीची माहितीचा समावेश केला आहे.
 
तेलबिया पिकापैकी भुईमूग महत्त्वाचे पीक आहे. मनुष्याच्या आहारात भुईमुगाचे खाद्यतेल, खाद्यपदार्थ यासाठी खास महत्त्व आहे, तसेच जनावरांसाठी सकस चारा, जमिनीची सुपीकता वाढविणे, औद्योेगिक उत्पादनासाठी कच्चा माल, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी नगदी पीक आहे. देशामध्ये 1990 मध्ये भुईमुगाचे एकूण लागवड क्षेत्र 20.83 दश लक्ष एकर व सरासरी प्रतिएकर उत्पादकता 4.06 क्विंटल होते. 2016 मध्ये देशाचे लागवड क्षेत्र 11.5 दश लक्ष एकर व उत्पादकता प्रतिएकर 5.86 क्विंटल आहे. खरीप हंगामात वारंवार ढगाळ वातावरण, अतिवृष्टी, पाण्याचा अतिताण यामुळे भुईमुगाचे क्षमतेपेक्षा उत्पन्न फार कमी मिळते.
 
भुईमुगाची खरीप हंगामापेक्षा उन्हाळी हंगामात उत्पादकता अधिक आहे. देशामध्ये 1980 नंतर सिंचनाची उपलब्धता झाल्यानंतर उन्हाळी भुईमूग क्षेत्रात वाढ झाली आहे. उन्हाळी हंगामात भुईमुगाची लागवड वातावरणातील तापमान 18 अंश सें. ग्रे.पेक्षा अधिक व जानेवारी महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यानंतर होते. उन्हाळी 2017 हंगामात भुईमुगाची लागवड झाल्यानंतर तापमानात अचानक वाढ झाली. नंतर वाढत गेली. याचा भुईमूग पीकवाढ, उत्पन्न व उत्पादित मालाच्या दर्जावर दुष्परिणाम झाला व उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. मशागतीच्या पारंपरिक पद्धतीमध्ये दुष्परिणाम अधिक प्रमाणात झाला. प्लॅस्टिक आच्छादन मशागत पद्धतीमध्ये हवामानातील बदलाचा दुष्परिणाम झाला नाही. प्रस्तूत लेखामध्ये भुईमूग पिकावर हवामानाचा परिणाम व प्लॅस्टिक आच्छादन मशागत पद्धतीची उपयुक्तता याबद्दल माहिती दिली आहे.
 
  Bhuimug_1 H x
 
भुईमूग उत्पादनामध्ये जमीन, पाणी व हवामान महत्त्वाचे व पायाभूत नैसर्गिक घटक आहेत. भुईमूग उष्ण कटीबंधातील पीक आहे. हवामान यामध्ये तापमान, पर्जन्यमान व सूर्यप्रकाश यांचा पीकवाढ व उत्पन्नावर प्रत्यक्ष परिणाम होतो. भुईमूग पिकाचे स्पॅनिश (फांद्यांची संख्या मध्यम) व व्हर्जीनिया (फाद्यांची संख्या अधिक) प्रमुख प्रकार आहेत. स्पॅनिश प्रकारच्या वाणाचा पक्व काळ लवकर व व्हर्जीनिया प्रकारच्या वाणाचा पक्व काळ उशिरा असतो.
 
भुईमूग लागवडीपासून पीकवाढीच्या अवस्था :
 
1) उगवण : 8 ते 10 दिवसांनी होते.
 
2) फुलधारणा : 25 ते 35 दिवसांनी होते.
 
3) आरा सुटणे : 30 ते 40 दिवसांनी होते.
 
4) शेंग धारणा : 45 ते 55 दिवसांनी होते.
 
5) शेंग पोषण : 60 ते 75 दिवसांनी होते.
 
6) शेंग पक्वता : 115 ते 135 दिवसांनी होते.
 
Bhuimug_1  H x  
 
भुईमूग पीकवाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत तापमानाचा परिणाम :
 
1) बियाणांची उगवण : जमिनीतील तापमानाचा परिणाम बियाणांच्या उगवण, अंकुर व रोप वाढीवर होतो. जमिनीतील तापमान 15ओ सें. ग्रे. व वातावरणातील तापमान 18ओ सें ग्रे. पेक्षा अधिक अनुकूल असते.यापेक्षा तापमान कमी असल्यास उगवण उशिरा व कमी होते. वातावरणातील तापमान 54 अंश सें. ग्रे. पेक्षा अधिक झाल्यास बियाणांतील भ्रूण मरतो व उगवण होत नाही.
 
2) रोप वाढ : वातावरणातील 20 ते 30 अंश सें. ग्रे. तापमानामध्ये रोपाची वाढ जलद गतीने होते.
 
3) फुलधारणा : वातावरणातील तापमान 24 अंश ते 27 अंश सें. ग्रे. मध्ये फुलधारणा अधिक प्रमाणात होते. वातावरणातील तापमान सतत 33 अंश सें. ग्रे. पेक्षा अधिक राहिल्यास फुलातील पराग कणांच्या सजीव क्षमतेवर परिणाम होतो. फुलामध्ये वंध्यत्व (वांझपणा) होतो. त्यामुळे शेंग धारणा होत नाही.
 
4) शेंगधारणा : जमिनीतील तापमान 30 अंश ते 34 अंश सें. ग्रे.मध्ये शेंगाची वाढ व पोषण चांगले होते. फुलधारणा ते पक्वता या कालावधीत जमिनीतील व वातावरणातील तापमानात वाढ झाल्यास शेंगाच्ंया संख्येत घट होते.
 
5) सूर्यप्रकाशाचे महत्त्व : भुईमूग पिकास भरपूर सूर्यप्रकाश मानवतो. सूर्यप्रकाशाचा पानाच्या प्रकाश संश्लेषण (फोटो सिन्थेसीस) व श्वासोच्छवासावर परिणाम होतो. दिवसा सूर्यप्रकाश कालावधी 10 तास असल्यास झाडाची वाढ जोमदार होते. अधिक तासाच्या दिवसामध्ये झाडांना फुलधारणा कमी होते. आकाशामध्ये स्वच्छ व निरभ्र सूर्यप्रकाश असल्यास फुल व आरांच्या संख्येत वाढ होते. शेंगामध्ये दाणे भरण्याचे प्रमाण वाढते, दाणे आकर्षक होतात व उत्पन्नात वाढ होते.
 
अधिक तापमानापासून संरक्षण व पाण्याची बचत यासाठी पालापाचोळा, गव्हाचे काड, लाकडाचा भुसा, भाताचे तूस, उसाची पाचट इत्यादीचा आच्छादनासाठी उपयोग करण्याची पारंपरिक पद्धती आहेत. तथापि प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर सुलभरीत्या करता येतो,
 
  Bhuimug_1 H x  
 
तसेच फायदे अनेक आहेत :
 
1) शेंगाचे व झाडाचे (चारा) उत्पन्न अधिक व दर्जेदार मिळते.
 
2) बियाणांची उगवण 2 ते 3 दिवस व पक्वकाळ 7 ते 10 दिवस लवकर होतो.
 
3) आंतरमशागत करण्याची गरज नसते. खर्चाची बचत होते.
 
4) जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी प्रमाणात होते. गादीवाफ्याच्या पृष्ठभागावर सतत वाफसा अवस्था ओलावा रहातो. पाण्याची बचत होते.
 
5) तणाचे नियंत्रण, निंदनी ः खुरपणी करण्याची गरज नसते. मजुरासाठी खर्चाची बचत होते.
 
6) रासायनिक खताचा पूर्ण क्षमतेने उपयोग होतो.
 
7) उन्हाळ्यामध्ये दिवसा जमिनीचे तापमान वाढते व रात्री तापमान कमी होते. गादीवाफ्यातील पृष्टभागावरील ओलाव्यामुळे आर्द्रता निर्माण होते. त्यामुळे दिवसाचे तापमान 5 अंश सें. ग्रे.ने कमी होते व रात्री 5 अंश सें.ग्रे.ने वाढते. तापमान नियंत्रित राहते.
 
8) गादीवाफ्याच्या पृष्ठभागावर जमिनीमध्ये रवाळपणा वाढतो. यामुळे झाडाच्या मुळापर्यंत खोलवर हवा खेळती राहते. झाडाची वाढ जोमदार राहते.
 
9) सशक्त आरा जमिनीत घुसतात. जमीन भुसभुशीत असल्याने आरा जमिनीत जलद गतीने घुसतात. शेंगांची वाढ व पोषण चांगले होते, दाण्याच्या दर्जामध्ये व तेलाच्या प्रमाणात वाढ होते.
 
10) प्लॅस्टिकमुळे सूर्यप्रकाशाचे परावर्तन होते. यामुळे वातावरणातील किडीचा उपद्रव कमी होतो. तसेच वातावरणातील किडी व विषाणूंचा जमिनीत घुसण्यास अटकाव होतो.
 
11) पावसाळ्यामध्ये गादीवाफ्यावरील प्लॅस्टिकचा छत्रीसारखा उपयोग होतो. झाडाभोवती पाणीसाठा होत नाही.
 
12) गादीवाफ्याच्या पृष्ठभागावर जमीन भुसभुशीत असल्याने काढणी सुलभ होते.
 
महत्त्वाची सूचना :
 
1) प्लॅस्टिक आच्छादनासाठी प्राथमिक खर्च वाढतो. परंतु उत्पन्न अधिक व दर्जेदार मिळते व फायदा अधिक होतो.
 
2) काढणी व शेंगातोडणी करताना झाडापासून प्लॅस्टिक अलग करून ते नष्ठ करणे आवश्यक असते. प्लॅस्टिकसह भुईमूग झाडाचा जनावरांसाठी चारा उपयोग करू नये.
 
देशामध्ये प्रथम कोल्हापूर जिल्हातील कृषिभूषण शेतकरी जयकुमार गुंडे (मो. नं. 9325112327) यांनी उन्हाळी हंगामात ट्रॉम्बे भुईमूग (टीजी) वाण व प्लॅस्टिक आच्छादन मशागत पद्धतीचा 20 गुंठे क्षेत्रावर प्रयोग केला. या प्रयोगात गुंडे यांना प्रतिएकर 30 क्विंटल उत्पन्न मिळाले. हा देशातील भुईमूग उत्पन्नाचा उच्चांक होता. (सुदर्शन बुगटे-सकाळ-12 जुलै 1997). या प्रयोगाची
 
भुईमूग-राष्ट्रीय संशोधन केंद्र (एनआरसीजी) जुनागड येथील तत्कालीन डायरेक्टर डॉ. मधुसूदन बासू यांनी दखल घेतली. देशातील प्रमुख तेलबिया संशोधन केंद्रावर उन्हाळी हंगामात सलग तीन वर्षे प्लॅस्टिक आच्छादन मशागत पद्धतीच्या तुलनात्मक चाचण्या घेतल्या. या चाचण्यांमध्ये प्लॅस्टिक आच्छादन मशागत पद्धतीने प्रचलित मशागत पद्धतीपेक्षा 15 ते 40% ने अधिक उत्पन्न मिळाले. भारत सरकारच्या कृषी संशोधन विभागाने या मशागत पद्धतीची शेतकर्‍यांच्या शेतावर सर्वसाधारण लागवड शिफारसीला मान्यता दिली आहे.
 
रायगड जिल्ह्यातील कृषिभूषण व कृषी पर्यटन तज्ज्ञ श्री. चंद्रशेखर भडसावळे (मो. नं. 980000623) यांनी नेरळनजीक ‘सगुणा बाग’ प्रयोग क्षेत्रात भर पावसाळ्यात (2002 खरीप हंगाम) भात पिकाशेजारी टीजी भुईमूग वाण व प्लॅस्टिक आच्छादन मशागत पद्धतीचा अवलंब करून प्रतिएकर 18 क्विंटल उत्पन्न घेतले. खरीप हंगामात अतिवृष्टीपासून संरक्षण करण्यासाठी प्लॅस्टिक आच्छादनाचा छत्रीप्रमाणे उपयोग झाला, तसेच सरीमधून पावसाच्या पाण्याचा निचरा झाला. कोकणामध्ये पावसाळी हंगामात ’सपाट वरकस’ जमिनीमध्ये भुईमुगाचे उत्तम पीक घेता येते हे या प्रयोगातून सिद्ध झाले. (वैदेही पुरोहित : रायगड, तरुण भारत 15-10-2002).
 

Bhuimug_1  H x  
 
सातारा जिल्ह्यातील शेतकरी धर्माजी जाधव (मो. नं. 9272520826) यांनी 2014 उन्हाळी हंगामात एक एकर क्षेत्रामध्ये वेस्टर्न संशोधित भुईमूग वाण व प्लॅस्टिक आच्छादन मशागत पद्धतीचा अवलंब करून प्रतिएकर 32 क्विंटल उत्पन्न घेतले. यानंतर 2015 उन्हाळी हंगामात पाण्याचा दुष्काळी परिस्थितीतही दीड एकर क्षेत्रामध्ये वेस्टर्न संशोधित भुईमूग वाण व प्लॅस्टिक आच्छादन मशागत पद्धतीचा आवलंब करून प्रतिएकर 26 क्विंटल उत्पन्न घेतले. (पाण्याअभावी काढणी एक आठवडा अगोदर केली.)
 
महाराष्ट्रामध्ये 2017 उन्हाळी हंगामात भुईमूग लागवड झाल्यानंतर मार्च महिन्याच्या आरंभापासून वातावरणातील तापमानात अचानक वाढ झाली व पुढे वाढत राहिली याचा पीकवाढीवर परिणाम झाला व उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. विदर्भ व मराठवाडा विभागात काही शेतकर्‍यांच्या शेतामध्ये भुईमूग झाडाची वाढ भरपूर झाली, परंतु झाडाला शेंगाचा लाग झाला नाही. काही क्षेत्रामध्ये शेंगांचा थोड्या प्रमाणात लाग झाला, परंतु शेंगांचे पोषण बरोबर झाले नाही. दाण्याचा दर्जा कमी झाला व उत्पन्नात घट झाली.
 
या निमित्ताने हवामानाची नोंद खालील तक्त्यामध्ये दिली आहे.
 
तापमान : उन्हाळी हंगाम 2017
 
 अ.क्र.
 महिना
 आठवडा
 सरासरी तापमान (सें.ग्रे.)
 सरासरी सूर्यप्रकाश (तास)
 कमाल / किमान
 1.  जानेवारी  3 - 4
 30.7 (28.4-32.8)
 13.8 (12.0-15.4)  8.0 (3.1-10.0)
 2.  फेब्रुवारी  5 - 8
 33.5 (30.0-36.2)
 14.4 (11.0-16.4)  9.5 (8.0-10.5)
 3.  मार्च  9 - 12
 36.0 (31.0-40.4)
 15.3 (11.0-19.6)  9.7 (8.4-10.8)
 4.  एप्रिल  13 - 16
 41.9 (38.3-44.4)
 22.3 (22.2-27.4)  9.3 (8.5-9.2)
 5.  मे  17 - 20
 41.9 (40.2-43.9)
 26.5 (22.2-27.4)
 10.3 (8.8-10.9)
  सरासरी   38.8 (28.4-44.4) 18.5 (11.0-27.4) 9.2 (3.1-10.9)
 
सौजन्य : तेलबिया संशोधन केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, जळगाव.
 
देशामध्ये जवळजवळ सर्व विभागात तापमानात बदल झाल्याची नोंद झालेली आहे.
 
वर तक्त्यामध्ये दिलेल्या नोंदीनुसार फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मे महिनाअखेर वातावरणातील तापमान 33 सें.ग्रे.पेक्षा अधिक होते. याचा भुईमूग पिकाच्या फुलधारणा अवस्थेत परागीभवन क्रियेवर परिणाम झाला. बदलत्या वातावरणातही सातारा जिल्ह्यातील शेतकरी प्रभाकर गाढवे (मो. नं. 9096509096) यांना 26.6 गुंटे क्षेत्रात वेस्टर्न संशोधित नवीन वाणांचे व प्लॅस्टिक आच्छादन मशागत पद्धतीने सरासरी प्रतिएकर 29 क्विंटल (27 ते 32 क्विंटल) उत्पन्न मिळाले, तसेच जनावरांसाठी चारा सरासरी प्रतिएकर 37.05 क्विंटल (31 ते 46 क्विंटल) उत्पन्न मिळाले. दाण्याचा उतारा 72.2% (69.9 ते 74.6) व दाण्याचा दर्जा उत्तम मिळाला, तसेच तेलाचे प्रमाण अधिक मिळाले. (काढणी 110-115 दिवसांत केली.) 
 
प्लॅस्टिक आच्छादन लागवड पद्धत :
 
1) जमिनीची नांगरणी व उभी आडवी वखरणी करून माती भुसभुशीत करणे
 
2) जमिनीमध्ये प्रतिएकर 50 कि. (1 पोते) डायअमोनियम फॉस्फेट (डीएपी), 10 कि. फेरस सल्फेट, 10 कि. झिंक सल्फेट व 2 कि. बोरॅक्स रासायनिक खत सम प्रमाणात मिसळणे व पृष्ठभाग एकसमान सपाट करणे. 
 
3) गादीवाफे तयार करताना तळाची रुंदी 3.5 फूट, माथ्याची रुंदी 3.0 फूट व उंची 6 इंच ठेवावी. वाफ्यामध्ये एक फूट रुंदीची सरी (पाट) तयार होते. गादीवाफ्याचा माथा एक समान सपाट करणे. लागवड करण्याअगोदर कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार पेंडीमिथालीन 30% ईसी तण नाशकाची फवारणी केल्यानंतर ताबडतोब एक-दीड तास हलके सिंचन करावे.
 
4) गादीवाफ्यावर 7 मायक्रॅान जाडी, 3 फूट रुंद व त्यावर 8 ु 8 इंच अंतरावर 1.25 इंच व्यासाची छिद्रे असलेले प्लॅस्टिक एक समान अंथरावे. प्लॅस्टिकच्या दोन्ही बाजूंच्या कडा अलगद ताणून गादीवाफ्याच्या कडावर अलगद खोचून बंद करावेत (पलंगावर चादर खोचून लावतात त्याप्रमाणे). लागवड करताना प्रत्येक छिद्रात मध्यभागी जमीन भुसभुशीसत करून दोन बिया अंकुर फुटणारी बाजू खाली किंवा आडवी करून जमिनीत अर्धा ते एक इंच अलगद टोकण करावे. नंतर सरीतील मूठभर भुसभुशीत मातीने छिद्र पूर्ण झाकावे.
 
5) लागवड केल्यानंतर पहिले तुषार सिंचन सहा ते सात तास करावे. यानंतर जमिनीच्या प्रकारानुसार (मध्यम-हलकी) दर चार-पाच दिवसांनी प्रत्येक वेळी तीन ते चार तास तुषार सिंचन करावे.
 
 
 
डी. एम. काळे
निवृत्त शास्त्रज्ञ अधिकारी, बीएआरसी, मुंबई
 शास्त्रज्ञ (भुईमुग), वेस्टर्न अ‍ॅग्री सीड्स. लि. गांधीनगर, गुजरात (मो. नं. 9930757225 )
शेतकरी : सौ. अनुसया व श्री. प्रभाकर गाढवे