कोकणची नारळ उद्योगाकडे वाटचाल

डिजिटल बळीराजा-2    17-Dec-2019
|

Coconut1_1 H x
 
  
नारळापासून एकच व्यवसाय सुरू करण्यापेक्षा हे विविध व्यवसाय एकत्रितपणे एकात्मिक पद्धतीने केल्यास नारळाचा खराखुरा उपयोग होईल. त्याचप्रमाणे कोणताही भाग वाया जाणार नाही. अनेक मंडळी या सर्व व्यवसायांत सामावून घेता येतील आणि कोंकणात खर्‍या अर्थाने नारळप्रक्रिया उद्योगास चालना मिळालीच, तर आर्थिक उन्नत्तीला चालना मिळेल.
 
Coconut_1  H x  
 
भारतात नारळ हे बागायती पीक असून, भारतीयांच्या जीवनात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीयांच्या आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात नारळाची फार महत्त्वाची भूमिका आहे. भारतात कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत नारळ पीक घेतले जात नसले, तरी त्याचा धार्मिक तसेच मंगल कार्यात सर्वच ठिकाणी वापर असल्याने ते आपल्या ऐक्याचे प्रतीक आहे. नारळ आरोग्यदायी अन्न तसेच पेय पुरविण्याबरोबरच निवारा, संपत्ती आणि सौंदर्य देणारा वृक्ष आहे. जगातील लाखो लोक जे प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्षरीत्या या पिकावर अवलंबून आहेत. याच्या प्रत्येक भागाचा उपयोग करून विविध खाद्य, तसेच इतर पदार्थ तयार करता येतात. ते निसर्गाने दिलेले अढच आहे. त्यामुळेच त्याला कल्पवृक्ष, जीवनाचा वृक्ष (ढीशश ेष ङळषश), स्वर्गातील वृक्ष (ढीशश ेष कशर्रींशप), विपुलतेचा वृक्ष (ढीशश ेष रर्लीपवरपलश), निसर्गाचे सुपर मार्केट (छर्रीीींश र्डीशिी चरीज्ञशीं) असे संबोधले जाते.
 
जगामध्ये 93 देशांत नारळाचे पीक हे 12.18 दशलक्ष हेक्टरवर घेतले जात असून, त्यापासून वार्षिक 67841.67 दशलक्ष नारळाचे उत्पादन मिळते. जगात नारळाखालील क्षेत्राचा विचार करता भारत तिसर्‍या क्रमांकावर असून, उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. भारतात एकूण 19 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांत नारळाचे पीक घेतले जाते. महाराष्ट्रात 27750 हेक्टर उत्पादित क्षेत्र असून त्यापासून 271.24 दशलक्ष नारळाचे उत्पादन मिळते. सन 1990 पासून रोजगार हमी योजनेअंतर्गत नारळाची लागवड होऊन नारळाखालील क्षेत्र 50000 हेक्टरच्या वर पोचले असावे, तसेच उत्पादित क्षेत्रातदेखील वाढ होत राहणार आहे.
 
महाराष्ट्रात विशेषत: कोकणात मोठ्या प्रमाणात नारळाची लागवड आहे. त्याचबरोबर उर्वरित महाराष्ट्रातदेखील नारळ लागवड होत आहे. त्याचप्रमाणे घरटी 4 ते 5 झाडे लागवड करणार्‍यांचे प्रमाणही विपुल आहे. त्याचप्रमाणे बांधावर लागवड करणारे असंख्य आहेत. त्याचा वरील क्षेत्रात विचार झालेला नाही.
 
कोंकणात नारळ लागवड ही समुद्रकिनारे आणि नदीकिनारे यामध्ये दिसून येते, परंतु नारळाचा वापर (खाण्यासाठी अगर इतर कारणांसाठी) मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे कोंकणातील उत्पादन हे कोंकणवासीयासाठी पुरेसे नाही. त्यामुळे इतर राज्यांतून नारळाची आवक होत आहे.
 
दक्षिणेकडील केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, आंध ्रप्रदेश या राज्यांची आर्थिक उन्नती ही प्रामुख्याने नारळ प्रक्रिया उद्योगातून आणि पर्यटनातूनच होत आहे. त्यासाठी उत्पादन वाढविण्यावरही या राज्यांतील बागायतदारांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
कोंकणात नारळ कारखानदारीचा विचार करता ती वाढविणे शक्य आहे, परंतु त्यासाठी कच्च्या मालाची (नारळ) उपलब्धता महत्त्वाची आहे. त्याचबरोबर नारळाच्या दराचा विचार करता नारळाचे दर केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, तमिळनाडूपेक्षा कोंकणात अधिक आहेत. त्याचबरोबर वाहतुकीच्या खर्चाचा विचार होणे गरजेचे आहे, तसेच कोंकणात नारळाखालील क्षेत्र हे विखुरलेल्या स्वरूपात असल्याने सहकारी तत्त्वावर अगर छोटे उद्योग यशस्वी ठरू शकतात. त्याचबरोबर एकात्मिक कारखानदारीचा विचार होण्याची गरज आहे.
 
एकात्मिक नारळ कारखानदारी :
 
यामध्ये अखंड नारळ खरेदी करून त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग करून स्वतंत्र उद्योग निर्माण होण्याची गरज आहे. नारळाचा प्रत्येक भागाचा उपयोग एक किंवा अनेक पदार्थ तयार करण्यासाठी होऊ शकतो. यासाठी तंत्रज्ञान आणि काही प्रमाणात अनुदान नारळ विकास मंडळाकडे उपलब्ध आहे.तसेच नारळ विकास मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त श्री. राजाभाऊ लिमये यांच्या प्रयत्नाने डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठामध्ये सन 2007 मध्ये भारतातील पहिले नारळ प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
 
एकात्मिक नारळ कारखानदारीचा विचार करता अखंड नारळ खरेदी केल्यानंतर त्यापासून खालीलप्रमाणे उद्योग सुरू करता येतील.
 
1) काथ्या उद्योग :
 
अखंड नारळ सोलल्यानंतर त्यापासून सोडणे उपलब्ध होतील या सोडणापासून काथ्या काढला जातो त्यापासून अनेक वस्तू तयार केल्या जातात. त्यापैकी काही म्हणजेच सुंभ, दोरखंड, पायपुसणी इत्यादी तयार करता येतील. त्याला स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे.त्याचबरोबर काथ्यानंतर उपलब्ध होणारा सोडण भुसा (क्वायर पीथ) उपलब्ध होतो. तो जवळजवळ 70 टक्के असतो. याचा उपयोग मातीची प्रत सुधारणे, मुळे फुटण्यासाठी माध्यम, आच्छादणीसाठी होतो. त्याचबरोबर त्याच्यापासून उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत तयार करता येते. त्याच्यामध्ये त्याच्या वजनाच्या 10 पट पाणी धरून ठेवण्याची क्षमता असल्याने त्याचा वापर पाणी कमतरता असलेल्या विभागात पिकासाठी चांगला होऊ शकतो.
 
2) नारळपाण्यापासून व्हिनेगर :
 
पक्व नारळ सोलून फोडल्यानंतर त्यांच्या मधून जे पाणी उपलब्ध होते त्यापासून व्हिनेगर तयार करता येते. हा उद्योगही स्वतंत्रपणे करण्याची गरज आहे.या पाण्यापासून नाता-डी-कोको, मध, सॉस, सरबतदेखील तयार करता येते.
 
Coconut Oil_1  
 
3) खोबरे :
 
हा सर्वांत महत्त्वाचा पदार्थ आपल्याला नारळापासून मिळतो. त्यामुळे त्याचे अनेक पदार्थ तयार करता येतात. ज्यामध्ये सुके खोबरे, खोबरेल तेल, नारळ खोबरे दूध, शुद्ध खोबरेल तेल (व्हर्जिन कोकोनट ऑइल), नारळ खोबरे मलई, दुधपावडर, नारळ चीप्स्, खोबरे पीठ यांचा समावेश आहे. त्यामुळे बाजारपेठ आणि शक्य असेल अशा पदार्थांची निवड करून पदार्थांची निर्मिती करता येईल.
 
4) करवंटी :
 
उपलब्ध होणार्‍या करवंटीपासून कोळसा तयार करता येतो. त्यापासून क्टिव्हेटेड कार्बन तयार करता येतो. याचा उपयोग वनस्पती तेल शुद्ध आणि साफ करण्यासाठी, पाण्याचे शुद्धीकरण, द्रावकाचा उतारा, सोन्याचा उतारा, विषारी वायूपासून संरक्षणासाठी वापरण्यात येणारा गॅस मास्कमध्ये केला जातो. त्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तसेच परदेशात या कोळशाला प्रचंड मागणी आहे.त्यामुळे नारळापासून एकच व्यवसाय सुरू करण्यापेक्षा हे विविध व्यवसाय एकत्रितपणे एकात्मिक पद्धतीने केल्यास नारळाचा खराखुरा उपयोग होईल. त्याचप्रमाणे कोणताही भाग वाया जाणार नाही. अनेक मंडळी या सर्व व्यवसायांत सामावून घेता येतील आणि कोंकणात खर्‍या अर्थाने नारळप्रक्रिया उद्योगास चालना मिळालीच, तर आर्थिक उन्नत्तीला चालना मिळेल.
 
या सर्व उद्योगांसाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध आहेच. त्याचबरोबर नारळ विकास मंडळामार्फत काही प्रमाणात आर्थिक साह्यदेखील अनुदानावर मिळू शकते. त्यासाठी देखील श्री. राजाभाऊ लिमये यांच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी राज्य केंद्राचे कार्यालय ठाणे येथे सुरू करण्यात आले असून, त्याचा लाभ नारळ बागायतदारांनी घेण्याची गरज आहे.
 
कोकणातील सध्या अस्तित्वात असलेल्या काही नारळ उद्योगांची माहिती.
 
1) शहाळे विक्री :
 
हा व्यवसाय आता चांगलाच जोर धरू लागला आहे. पालघर, ठाणे आणि रायगडमधील अनेक बागायतदार शहाळ्याचा व्यवसाय करतात. रायगडमध्ये श्री. उदय बापट यांच्या म्हणण्यानुसार बागायतदार व्यापार्‍यांना वार्षिक कराराने नारळाची झाडे देतात. त्यामुळे पाडप ते विक्री हे व्यापारी पाहतात. त्यामुळे हा व्यवसाय चांगला आहे, तर पालघरमध्ये सहकारी संस्थामार्फत शहाळ्याची विक्री केली जाते. तेथेही पाडप ते विक्री संस्थेमार्फत होते.
 
रत्नागिरीमध्ये अनेक वर्षे शहाळ्यांचा व्यवसाय करणारे श्री. सुनील चंद्रकांत शिवलकर आपले मत व्यक्त करताना सांगतात की, व्यवसाय चांगला असून पर्यटकांची संख्या वाढत असल्याने शहाळ्याचा तुटवडा भासत असून शहाळी वेळप्रसंगी कर्नाटकातून आणावी लागतात. दुसरा प्रश्न म्हणजे शहाळी काढणारे पाडेकरी उपलब्ध होत नाही. ते स्वत: झाडावर चढून शहाळी काढत असल्याने काही प्रमाणात व्यवसाय सांभाळता येत आहे, परंतु यासाठी पाडेकर्‍याची फारच गरज असल्याचे त्यानी पुढे नमुद केले आहे. तसेच काही वेळा ते शहाळी घाटमाथ्यावरूनदेखील आणतात.
 
2) काथ्या उद्योग :
 
कोकणातील पहिला काथ्या उद्योग वेंगुर्ला येथे श्रीमती प्रज्ञा परब आणि श्री. एम. के. गावडे यांच्या प्रेरणेतून ‘महिला काथ्या कामगार औद्योगिक को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.’ म्हणून सुरू झाला आहे. आता त्याच्या मार्गदर्शनाखाली मालवण आणि सावंतवाडी येथे असे कारखाने सुरू होणार आहेत. कच्च्या मालाचा तुटवडा भासत नसून कारखाना उत्तम प्रकारे चालू असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तर रत्नागिरी येथिल श्री. पटवर्धन यांनी सुरू केलेले काथ्या युनिट 12 वर्षे चालविले, परंतु कौटुंबिक कारणास्तव ते बंद केले आहे, परंतु अडचणी असल्या तरी हा उद्योग चांगला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रत्नागिरी, संगमेश्वर बचत गटांनीसुद्धा हा व्यवसाय सुरू केला आहे.
 
मा. ना. श्री. दीपकजी केसरकर, गृह राज्यमंत्री आणि पालकमंत्री सिंधुदुर्ग यांच्या प्रयत्नाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 12 प्रकल्प मंजूर झाले असून, त्यामधील सहा प्रकल्प सुरू होत आहेत. त्याचप्रमाणे नारळ प्रक्रिया उद्योगदेखील ते सुरू करणार असल्याची माहिती श्री. रामानंद शिरोडकर यांनी दिली.
 
सावंतवाडीतून श्री. नलावडे यानी काथ्या उद्योग 10 वर्षांपूर्वीच सुरू केला असून ते सुंभ, दोरी तयार करण्यात त्याचबरोबर सोडण भुसा (कोको पीट) याचाही उद्योग करतात. कच्चा माल ते गोव्यामधून आणतात. त्यांना पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातून चांगली मागणी असल्याचे ते सांगतात. त्याना 2016 मध्ये लघुउद्योग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मा. ना. दीपकजी केसरकर या व्यवसायावर लक्ष ठेऊन असून, येणार्‍या अडचणी सोडवत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
 
Coconut Powder_1 &nb 
 
 
3) नारळ खोबरे पदार्थ निर्मिती :
 
श्री. अरुण म्हसकर आणि त्यांच्या मित्रांनी कुडाळमध्ये नारळ खोबर्‍यावर प्रक्रिया करण्याचा उद्योग सुरू केला असून, पहिली चार वर्षे अडचणी आल्या, परंतु आता उद्योग सुरळीत चालू असून दररोज 3 टन नारळाची गरज आहे. सुरवातीला सर्वच नारळ कर्नाटकमधून येत होते. आता काही प्रमाणात कोंकणात नारळ उपलब्ध होत आहेत. तसेच त्यांचे डेसिकेटेड खोबरे, नारळ दूध, नारळ दूध पावडर यांना इराण व इतर देशांत मागणी असली तरी भारतातसुद्धा प्रचंड मागणी असल्याचे त्यानी नमूद केले.
 
Coconut1_1  H x 
 
रत्नागिरीमधील संगमेश्वर येथील श्री. सुनील घडशी यांच्या मातोश्रींनी खोबर्‍याचे मोदक ज्यामध्ये विविध फळांचे रस वापरण्याचे तंत्र विकसित केले असून, त्याच्या या मोदकाना मुंबई/पुणे तसेच स्थानिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचबरोबर ते व्हिनेगर (शिरका) व्हर्जिन कोकोनट ऑइल याचेदेखील उत्पादन घेत आहेत. आईच्यानंतर श्री. सुनील घडशी हा सर्व व्यवसाय दिवसेंदिवस वाढवत आहेत.
 
रत्नागिरीचे दुसरे एक उद्योजक श्री. नझीम पडवेकर हे व्हर्जिन खोबरेल तेल निर्माण करत असून त्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे तंत्रज्ञानाची माहिती करून घेतली आहे. त्याचबरोबर हे तेल हे अनेक आजारांवर उपाय म्हणून वापरता येत असल्याने त्याचा प्रसार ते करत आहेत.
 
वेंगुर्ला (आडेली) येथील श्री. अश्विन खतखते आणि श्री. अभिजीत महाजन हे डेसिकेटल खोबरे पावडर आणि फ्लेक्स, व्हर्जिन खोबरेल तेल तयार करून त्याच उत्तम प्रकारे मार्केटिंग करत आहेत. तसेच अल्प प्रमाणात कोंकणातून (राजापूर ते सावंतवाडी) कच्चा माल (नारळ) उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर हा व्यवसाय उत्तम असल्याचे त्यांच मत आहे. भविष्यात करवंटीपासून कोळसा हा उद्योग सुरू करण्याचा विचार ते करत आहेत.
 
4) नारळाच्या शोभेच्या वस्तू :
 
काही कलाकार मंडळी या व्यवसायात उतरल्या असून भाट्ये (रत्नागिरी) येथील श्री. पिलणकर यांच्या नारळात कोरलेला गणपतीला आज भारताबरोबर परदेशातही मागणी आहे. त्यांच्या या कलेचा सन्मान होऊन त्यांना 2011 मध्ये नारळ विकास मंडळाने उत्कृष्ट शिल्पकार हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. कलेच्या माध्यमातूनदेखील अर्थकारण होऊ शकते हे त्यानी सिद्ध केले आहे. अशाच प्रकारचे अनेक कलाकार आपली कला जोपासत आहेत.
 
5) काथ्याच्या शोभेच्या वस्तू :
 
रत्नागिरी (परवटणे) येथील श्रीमती साळसकर यानी काथ्या मंडळ (क्वायर बोर्ड) यांच्याकडून काथ्यापासून विविध वस्तूंच्या निर्मितीचे प्रशिक्षण घेतले आहे. त्याचबरोबर त्या वस्तू तयार करतात तसेच इतर महिलानांही मार्गदर्शन करत आहेत.
 
6) नीर्‍यापासून साखर प्रकल्प :
 
स्वराज एंटरप्रायझेसचे श्री. तुषार आग्रे यांनी नीर्‍यापासून साखर तयार करण्याच्या प्रकल्पासंबंधी जनजागृती सुरू केली आहे. बागायतदारांचा सहभाग उपलब्ध झाल्यास हा प्रकल्प ते राबविणार आहेत.
 
कोंकणातदेखील काही प्रमाणात नारळावर आधारित उद्योग सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यात आणखी भर पडून या कोंकणात नारळ उत्पादनास चांगला भाव मिळावा हीच सदिच्छा.
 
वरील लेखात उपलब्ध प्रकल्पांची माहिती दिली आहे, असे अनेक छोटे उद्योग असतील असे वाटते.
 
 
डॉ. दिलीप नागवेकर.
माजी कृषिविद्यावेत्ता, प्रा. ना. स. के. भाट्ये.
श्री. राजाभाऊ लिमये.
माजी उपाध्यक्ष, नारळ विकास मंडळ, कोची, केरळ