करा चाराटंचाईवर मात

डिजिटल बळीराजा-2    16-Dec-2019
 
Chara_1  H x W:
  
 
उपलब्ध क्षेत्रावर चारा लागवड, उपलब्ध चार्‍याचा काटकसरीने वापर, चार्‍याचा साठा व पर्यायी चार्‍याचे नियोजन कसे करावे इ. संबंधीची माहिती या लेखात सादर केली आहे. 

Fodder_1  H x W
 
भविष्यातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध क्षेत्रावर चारा लागवड, चार्‍याचा काटकसरीने वापर, चार्‍याचा साठा, हायड्रोपोनिक्स चारा आणि चाराप्रक्रिया इ. पर्याय उपलब्ध आहेत. असा चारा टंचाईकाळात पुरविल्यास निश्चितच दूध उत्पादन टिकून जनावरांच्या पोषणतत्त्वांची गरज पूर्ण करता येईल.
 
1. उपलब्ध क्षेत्रावर चारा लागवड :
 
किमान 3-4 महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असेल तर डीएचएन-6, धारवाड नेपियर, सीओ-4, कडवळ या चारापिकांची लागवड करावी. मुरघास स्वरूपात साठवून ठेवावा किंवा 50 टक्के फुलोर्‍यात आलेला चारा कापून सावलीत वाळवून त्याचा साठा करावा. या चार्‍याची पौष्टिकता हिरव्या चार्‍याच्या जवळपासच असते.
 
Animals_1  H x  
 
2. उपलब्ध चार्‍याचा काटकसरीने वापर :
 
काटकसरीने वापर म्हणजे जनावराचे कुपोषण करून चारा साठवणे नव्हे, तर सध्याची जनावराची शारीरिक गरज पूर्ण होईल एवढाच चारा जनावरांना देणे. जनावरांचे अतिपोषण टाळावे. विनाकारण नियमित चारा टाकून वाया न घालवता जनावराच्या दूध उत्पादन व शरीरपोषणासाठी लागणार्‍या पोषणतत्त्वांची गरज पूर्ण होईल एवढाच चारा त्यांना द्यावा. उर्वरित चारा साठा करावा, जो भविष्यात उपयोगात येईल. चारानियोजनासाठी आहारतज्ज्ञांशी संपर्क करून त्यांच्या सल्ल्यानुसार जनावरांना आहार द्यावा. चारा वाया जाऊ नये म्हणून चार्‍यावर प्रक्रिया करून, चाराकुट्टी करूनच जनावरांना द्यावा, जेणेकरून चार्‍याची बचत होऊन भविष्यात संगोपनासाठी त्याचा वापर करता येईल. उत्पादक नसलेली किंवा भविष्यातही उत्पादक न होणारी जनावरे न सांभाळता त्यांच्यावर चारा वाया न घालवता उत्पादनक्षम जनावरांचेच संगोपन करावे.
 
Grass_1  H x W:
 
 
3. चार्‍याचा साठा :
 
उपलब्ध सर्व प्रकारची गुळी (सोयाबीन/गहू/भात/तूर), कडबा, वाळलेले गवत, वाळलेले पाचट, वाळलेले उसाचे वाढे याचा सुयोग्य साठा करावा. ज्या ज्या ठिकाणाहून शेतातील दुय्यम पदार्थ आणून साठा करता येईल तेथून आणून साठा करावा. उपलब्ध चार्‍याचे ब्लॉक बनवावेत. चार्‍याचा साठा कोरड्या ठिकाणी उंचावर करावा, जेणेकरून चारा ओलसर होऊन बुरशी तयार होणार नाही व असा चारा वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी.
 
4. हायड्रोपोनिक्स चारा :
 
कमी पाणी व मातीविना चारा उत्पादनासाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे चारा उत्पादन करावे. यामध्ये कमी पाण्यात जास्त चारा उत्पादन करणे शक्य होते. हायड्रोपोनिक्सद्वारे उत्पादित चार्‍यात प्रथिनांचे प्रमाण मुबलक असते. दहा-बारा दिवसांत 1 किलो बियांपासून 10 किलो चारा मिळतो. कमी जागेत जास्त चारा उत्पादन होते.
 
Dried Grass_1  
 
5. पर्यायी चार्‍याचे नियोजन :
 
उपलब्ध चारा संपल्यानंतर बगॅस, मळी, युरिया, गुळी/भुसकट, कमी प्रतीचा चारा साठा करून त्यावर योग्य ती प्रक्रिया करून त्याचा जनावरांच्या आहारात वापर केल्यास चाराटंचाईवर मात करून जनावरांचे व्यवस्थित संगोपन करता येते.
 
अ) चार्‍याची चव वाढवून चारा खाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रक्रिया :
 
एक किलो मीठ 10 लिटर पाण्यात विरघळून 100 किलो वाळल्या चार्‍यावर फवारावे आणि 2 ते 3 तासांनी जनावरांना खाण्यास द्यावे.
 
10 ते 15 लिटर मळी 100 किलो वाळला चारा/गुळी यावर फवारावी व 12 ते 24 तास ठेवून खाण्यास द्यावे.
 
10 लिटर पाण्यात 1 किलो मीठ व 1 किलो गूळ मिसळून 100 किलो वाळला चारा/ गुळीवर फवारून 12 ते 24 तास झाकून ठेवून जनावरांना खाण्यास द्यावे.
 
ब) चार्‍याची चव, खाण्याचे प्रमाण, पचनीयता, पोषणमूल्ये वाढवण्यासाठी प्रक्रिया :
 
एक किलो युरिया 100 लिटर पाण्यात मिसळून 100 किलो निकृष्ट चार्‍यावर/गुळीवर फवारावे. 2 ते 3 तासांनंतर चारा खाऊ घालावा.
 
मळी 10 किलो किंवा 5 किलो गूळ, 1 किलो मीठ, 1 किलो क्षार मिश्रण, 2 ते 4 किलो युरिया, 40 ते 50 लिटर पाण्यात मिसळून द्रावण बनवावे. द्रावण 100 किलो गुळी/निकृष्ट चार्‍यावर सर्वसमान फवारावे व असा चारा 21 दिवस हवाबंद झाकून ठेवावा व 21 दिवसांनंतर जनावरांना खाण्यास द्यावा.
 
क) दररोज युरिया-मळीची प्रक्रिया करून चारा वापरण्यासाठी :
 
दोन लिटर पाण्यात 2 किलो युरिया मिसळावा. या द्रावणामध्ये 10 किलो मळी मिसळावी. या द्रावणामध्ये 1 किलो मीठ व 1 किलो क्षार मिश्रण मिसळून मातीपासून बनविलेल्या भांड्यात ठेवावे.
 
प्रक्रिया पद्धत :
 
वरील 750 ग्रॅम द्रावण घेऊन 750 मिलि. पाण्यात मिसळून द्रावण बनवून 5-10 किलो कुट्टीवर फवारावे. फवारल्यानंतर चारा वर-खाली करावा व राहिलेले द्रावण परत फवारावे. या प्रक्रियेत पहिले 15 दिवस केवळ 500 ग्रॅम (वरील बनविलेले) द्रावण घ्यावे. नंतर हळूहळू प्रमाण वाढवून 750 ग्रॅमपर्यंत घ्यावे. एका दिवसात 750 ग्रॅमपेक्षा जास्त द्रावण फवारलेला चारा (5-10 किलो चार्‍यावर) जनावरास खाण्यास देऊ नये.
 
ड) बगॅसवर युरिया-मळी प्रक्रिया :
 
1) थोडे पाणी घेऊन त्यात 1 किलो युरिया मिसळावा. युरियाचे द्रावण 100 किलो मळीमध्ये मिसळावे. 100 किलो बगॅस प्लॅस्टिक, फरशी/काँक्रीटवर पसरावे व वरील निम्मे द्रावण यावर सर्व ठिकाणी फवारावे. नंतर बगॅस खाली-वर करून परत उर्वरित निम्मे द्रावण बगॅसवर फवारावे. अर्धा ते 1 तास थांबून ते जनावरांना खाण्यास द्यावे.
 
2) युरिया-मळी-बगॅस खाद्य 2 ते 3 किलो प्रतिजनावरांस कडब्यासोबत द्यावे.
 
3) 10 लिटर पाण्यात 1 किलो मीठ, 2 किलो युरिया मिसळावा. या द्रावणात 10 ते 15 किलो मळी मिसळावी. बगॅसचा जमिनीवर 10-
 
4) 15 इंचाचा थर करावा. या बगॅसवर अधूनमधून क्षार व जीवनसत्त्व मिश्रण थोडे-थोडे टाकावे. खालची बाजू वर करून उर्वरित द्रावण फवारावे. या प्रक्रियेत बगॅस एकूण 80-85 किलो घ्यावे. हे प्रक्रिया केलेले बगॅस 3-4 किलो मोठ्या जनावरास द्यावे.
 
5) युरिया प्रक्रिया केलेले खाद्य खाऊ घालताना घ्यावयाची काळजी :-
 
6) युरिया प्रक्रिया केलेला चारा, बगॅस सहा महिने वयाच्या आतील जनावरांना खाऊ घालू नये.
 
7) चारा खायला देतेवेळी/दिल्यानंतर जनावरांची तहान वाढते, तेव्हा मुबलक पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे.
 
8) युरियाचे प्रमाण ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त वाढवू नये.
 
9) चार्‍यावर प्रक्रिया पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी.
 
 
 
डॉ. कल्याणी सरप, विषयतज्ज्ञ (पशुसंवर्धन),
डॉ. सुरेश नेमाडे, कार्यक्रम समन्वयक
कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ