मधमाशीपालन व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    14-Dec-2019
 
Bee2_1  H x W:  
 
 
मधमाशीपालन व्यवस्थापन

मधमाशीपालन हा एक वैशिष्ट्यपूर्ण वन-कृषीआधारित उद्योग आहे. यात मधमाश्या त्यांच्या खाद्यासाठी (पुष्परस-पराग) फुलणार्‍या वनस्पतीवर अवलंबून असतात. त्यातच फुलांमध्ये पुष्परस स्रवणे आणि परागनिर्मिती होणे हे हवेतील आर्द्रता, जमिनीतील ओलावा, दिवसभराचे तापमान इ. गोष्टींवर अवलंबून असते. एकदा फुलोरा आणि हवामान यासंबंधी मधपाळास ज्ञान झाले की त्याला योग्य देखभालीचा आराखडा तयार करता येतो.
 
भारत हे एक उपखंड आहे. यामुळे आपल्याकडे हवामान व फुलोरा यात खूपच विविधता आहे. उष्ण कटिबंधाच्या प्रदेशापासून शीतकटिबंधातील प्रदेश भारतात आहेत. त्यामुळे फुलणार्‍या वनस्पती, त्याचा फुलण्याचा काळ यातही खूप फरक आढळतो. 
 

Bee_1  H x W: 0
 
 
मध उत्पादन आणि वसाहत-विभाजन हे मुख्य चार गोष्टींवर अवलंबून असते.योग्य आकाराच्या मधुपेट्या व इतर साहित्य उत्तम बारमाही फुलोरा मधमाश्यांची उत्तम वीण आणि मधमाश्यांच्या वसाहतीची योग्य देखभाल या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून सुसूत्रित कार्यक्रम आखला, तरच आपणाला हवे असलेले ध्येय साध्य करता येते. एकदा फुलोरा आणि हवामान यासंबंधी मधपाळास ज्ञान झाले की त्याला योग्य देखभालीचा आराखडा तयार करता येतो. महाराष्ट्रात डोंगराळ जंगले, जंगल शेती असा मिश्र विभाग व संपूर्ण शेती असे विभाग आहेत. मधमाश्या त्याच्या वसाहतीपासून जास्तीत जास्त एक किलोमीटर दूर जाऊ शकतात. त्यामुळे मधमाश्यांच्या वसाहतीचे देखभालीचे तंत्र दर 5 किलोमीटर नंतरदेखील बदलू शकते.
 
वसाहतीच्या देखभालीसाठी वर्षाचे एकूण चार विभाग स्थूल मानाने पाडता येतात.
 
1) पावसाळा (जून ते सप्टेंबर)
2) पावसाळ्यानंतरचा हंगाम (ऑक्टोबर आणि नोव्हेंबर) 
3) थंडीचा दुष्काळी काळ (डिसेंबर ते जानेवारी) आणि 
4) वसाहत वाढीचा व मध उत्पादनाचा मुख्य हंगाम (फेब्रुवारी ते मे) या चार हंगामात मधमाश्यांच्या वसाहतीची देखभाल करावयाची असते.
 
1) पावसाळी व्यवस्था : मेअखेर मध उत्पादनाचा हंगाम संपत आलेला असतो. पराग व मकरंद मिळण्याचे प्रमाण हळूहळू कमी होते. त्यामुळे अंडी देण्याचे काम राणी थांबविते व माश्यांचा जास्तीत जास्त मधाचा साठा करण्याकडे कल असतो. रिकाम्या पिलाण्याच्या चौकटीतदेखील माश्या मध साठविण्यास सुरवात करतात. मे महिन्याच्या अखेरीस सह्याद्रीच्या उंच डोंगरांतून ढगाचे व वार्‍याचे प्रमाण वाढू लागते. पुढे येणारे तीन महिने पावसाची संतत धार, कित्येक दिवस सूर्यदर्शन नाही अशी परिस्थिती असते. पीणपीठा नाही, पेटीच्या बाहेर जाण्याची सोय नाही. हवामान प्रतिकूल त्यात मेणकिडे, बुरशी व काही शत्रू या गोष्टींमुळे मधमाश्यांच्या वसाहती कमजोर होतात. म्हणून वसाहतीची निगा राखणे जरुरीचे असते. 
 
2) पावसाळ्यानंतरची देखभाल : सप्टेंबरअखेर पावसाळा जवळ जवळ संपलेला असतो. ऑक्टोबरमध्ये तुरळक वादळी वारे व पाऊस पडतो, पण बाकी हवामान खूपच स्वच्छ असते व ऊन पडू लागते. या सुमारास जंगलातील गवत-तणे, तेरडा, सोनकी, फुरडू, बरका व काही झुडपे, बांधावरील कारळा फुलू लागतात व मधमाश्या पराग गोळा करतात. मधमाश्यांच्या येण्या-जाण्यावरून पराग मकरंदाचे प्रमाण समजून येते.पावसाळा संपल्यानंतर स्वच्छ ऊन पडू लागल्यावर वसाहतीची तपासणी थोडी बारकाईने पण वसाहतीस फार त्रास न देता करावी. पेटीचा तळपाट चांगला स्वच्छ करून वसाहत पेटीखालून बघावी. नंतर तळपाटावर पुन्हा ठेवून छप्पर काढून चौकटीमधून बघावे. काळ्या पोकड्या काढून टाकाव्यात व चांगल्या पोकड्यामध्ये राणी अंडी घालत आहे का ते पाहावे. एखादा मेणपत्रा बसविलेली चौकट ठेवावी इतर चौकटीतून मधाचासाठी पुरेसा असल्याची खात्री करावी. नसल्यास साखरेचा पाक द्यावा. 
 
3) थंडीतील व्यवस्था (डिसेंबर-जानेवारी) : पावसाळ्यातील व्यवस्थेप्रमाणेच थंडीतील दुष्काळी काळात मधमाश्यांची व्यवस्था ठेवावी. वसाहतीत भरपूर मधाचा व परागाचा साठा असावा. मधाचा साठा अपुरा असल्यास साखरेचा पाक (70 टक्के साखर व 30 टक्के पाणी) वसाहतीस द्यावा. वसाहतीचे दारे अरुंद करावीत. हवेसाठी छपरामध्ये असलेली दोनच छिद्रे चालू ठेवावी. पेटीच्या दारातून गार वारा आत शिरू नये म्हणून पेटीचे दार हवेच्या उलट्या दिशेस ठेवावे. मध उत्पादन घेतले असलेल्या वसाहतीवरील मधाच्या कोठ्या उतरवून मधमाश्यांना पिलाब्याच्या कोठीत घट्ट झुपका करू द्यावा. पिलाण्याच्या कोठीवर आंतरआच्छादन ठेवून छप्पर बसवावे. वसाहतीची दुय्यम हंगामानंतर संपूर्ण तपासणी करून तपशीलवार नोंद ठेवावी. दुय्यम हंगामात जितक्या उशिरापर्यंत राणीचे अंडी घालण्याचे काम चालू राहील. तितक्या जास्त ताज्या माश्या हिवाळ्यात वसाहतीत राहतील. अशा ताज्या माश्यांचा भरपूर भरणा व भरपूर खाद्य असलेल्या वसाहती हिवाळ्यातील दुष्काळी परिस्थिती व थंड तापमान यांना यशस्वी तोंड देऊ शकतात. 
 
4) वसंत ऋतूतील थंडीनंतरची व्यवस्था (फेब्रुवारी ते मे) : मधपाळासाठी हा अनेक कामे करण्याचा व महत्त्वाचा असा हंगाम असतो. या काळात वसाहतीची वाढ व त्या पाठोपाठ मधाचा मुख्य हंगाम असतो. पावसाळ्यानंतरच्या मधाच्या दुय्यम हंगामात वसाहतीची कशी व्यवस्था केली आहे यावर या हंगामातील व्यवस्था अवलंबून असते. भागच्या दुय्यम हंगामात मध मिळण्यावर आणि वसाहती जोमदार राखण्यावर भर दिला असेल तर मुख्य हंगामात वसाहतीचे विभाजन व संख्या वाढविणे, जुन्या राण्या बदलून नवीन करून घेणे व नंतर मध उत्पादन घेणे या गोष्टी मधपाळाला कराव्या लागतात. दीर्घ मुदतीचा दुय्यम हंगाम असताना वसाहतीची व्यवस्था करावी. 
 

Bee_1  H x W: 0 
 
 
 
मधाच्या हंगामातील व्यवस्था : 
 
मधाच्या हंगामात वसाहतीवर मधुचौकट असलेली कोठी ठेवावी. काही मधुचौकटी केवळ मेणपत्रे बसविलेल्या व काही चौकटी घरे ओढलेल्या अशा घ्याव्यात. म्हणजे मधमाश्या मध साठविणे सुरू करतील व मेणपत्र्यांवर घरे ओढण्याचेही काम सुरू होते. मधुकोठीत एकूण इतक्या चौकटी मावतात त्यापेक्षा एक चौकट कमी ठेवावी. सर्व चौकटीत माशी व्यापापेक्षा थोडे जास्त अंतर ठेवावे. यामुळे मधुचौकटीतील पोकड्या थोड्या फुगीर होतात व मधमाश्यांनी पक्व मधावर चढविलेले मेणाचे पापुद्रे सुरीने काढावे व मधयंत्रातून मध काढणे सोईचे होते. मधमाश्यांनी आणलेल्या मकरंदात सुमारे साठ टक्के पाणी असते. मकरंदाचा मध बनविताना मधमाश्या पाण्याचे प्रमाण सुमारे वीस टक्क्यांपर्यंत आणतात. अशा तर्‍हेने पक्क झालेला मधाचे षटकोनी घरावर मेणाचे पातळ पापुद्रे चढवून मधमाशा मधुचौकटीतील पोकड्या सिलबंद करतात. हे पाण्याचे बाष्प वसाहतीबाहेर जाणे आवश्यक असते. यासाठी मधाच्या हंगामाला वसाहतीचे दार मोठे असावे. छपरांच्या चारही बसविलेल्या जाळ्यांची छिद्रे मोकळी आहेत याची खात्री करावी.