अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी एकात्मिक शेतीपद्धती मॉडेल

डिजिटल बळीराजा-2    13-Dec-2019
 

farming model_1 &nbs 
 
 
 
अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी एकात्मिक शेतीपद्धती मॉडेल
 
अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शेतीपद्धती मॉडेलची शिफारस कशी फायदेशीर ठरणार आहे. याबद्दलच्या माहितीचा या लेखात समावेश केला आहे. 
महाराष्ट्र राज्यात 73.42% शेतकरी अल्प (1 ते 2 हेक्टर) आणि अत्यल्प (1 हेक्टरपर्यंत) भूधारक असून शेतीपासून मिळणार्‍या उत्पादनावर कुटुंबांचा चरितार्थ चालविणे शेतकर्‍याना कठीण होत चालले आहे. वर्षानुवर्ष प्रचलित पिके घेतल्याने शेती करणे धोक्याचे ठरत आहे. अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस आणि वारंवार दुष्काळी परिस्थिती या समस्यांना सामोरे जाणे
 
शेतकर्‍याना कठीण होत असल्याने शेतकर्‍याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. त्यांच्या कुटुंबातील 5-6 लोकांची अन्नसुरक्षा, आरोग्य, शिक्षण या समस्या सोडवणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत एकात्मिक शेतीपद्धती मॉडेल उपयुक्त ठरत आहे. या मॉडेलमध्ये शेतकर्‍यांकडे असलेल्या क्षेत्राचा आणि साधनसामग्रीचा विचार करून पीकवार आराखडा तयार करावा लागतो. कुटुंबाला अन्नसुरक्षेसाठी आणि जमिनीच्या सुपीकतेसाठी उपयुक्त असे शेतीपद्धती मॉडेल तयार केले जाते. यामध्ये शेतीपूरक व्यवसायाची सांगड घातली जाते. प्रामुख्याने दुग्धव्यवसाय, शेळीपाला, कुक्कुटपालन, मस्त्यशेती, फळबाग, शेडोटशेती, फुलशेती त्याचप्रमाणे गांडुळखत प्रकल्प, रेशीमप्रकल्प यातून फायदेशीर आणि शेतीपूरक व्यवसाय निवडावा. पाणी देण्यासाठी शेततळ्याचा पर्याय उपयुक्त ठरत आहे. शेतकरी या भागात राहतो तेथील हवामान, ओलिताची सोय आणि शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठ याचा विचार करून शेती मॉडेल तयार करावे लागते. याच मॉडेलमधून रोजगारांच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. महिन्याकाठी निव्वळ 25 ते 30 हजार रुपये खात्रीशीर मिळाले पाहिजेत असे मॉडेल असावे. त्याचप्रमाणे कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी, सकस आणि संतुलित आहार याची हमी देता येईल.
 
अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी शिफारस केलेले एकात्मिक शेतीपद्धती मॉडेल: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे शेतीपद्धती मॉडेलचा सन 2010-11 पासून 2013-14 पर्यंत 4 वर्ष अभ्यास करण्यात आला. हे मॉडेल फायदेशीर ठरल्याने त्याची अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी सन 2015 मध्ये विद्यापीठाने शिफारस केली आहे. 1 हेक्टर बागायत जमिनीपैकी पीकपद्धतीकरिता 72 टक्के, फळबागेसाठी 20 टक्के, शेडनेटकरिता 3.6 टक्के आणि पशुपालनासाठी 4.4 टक्के याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.
 
शेतीपद्धतीमध्ये चार प्रकारे नियोजन केले. पहिल्या प्लॉटमध्ये 30 गुंठे क्षेत्रावर खरिपामध्ये सोयाबीन त्यानंतर रब्बी हंगामात गहू आणि उन्हाळ्यात भाजीपाला घेण्यात आला. दुसर्‍या प्लॉटमध्ये 20 गुंठे क्षेत्रात खरिपात धान्यासाठी संकरित मका, रब्बी हंगामात कांदा आणि उन्हाळ्यात मुगाचे नियोजन करण्यात आले.
तिसर्‍या प्लॉटमध्ये 10 गुंठे क्षेत्रात खरिपात बाजरी रब्बी हंगामात हरभरा आणि उन्हाळ्यात चवळी याप्रमाणे पिकांचे नियोजन केले. चौथ्या प्लॉटमध्ये 10 गुंठे क्षेत्रात दुभत्या जनावरांच्या चार्‍यासाठी लसूनघास आणि 2 गुंठे क्षेत्रात संकरित नेपिअर ही चारापिके घेण्यात आली. शेताच्या चारही बाजूंनी पहिली दोन वर्ष पपईची लागवड केली. ही सर्व पिके सुधारित तंत्राचा वापर करून घेण्यात आली. 
 
तक्ता 1.अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी एक हेक्टर क्षेत्राकरिता विकसित केलेल्या शेतीपद्धती मॉडेल क्षेत्र
 
(हे) क्षेत्र (टक्के) हंगाम
खरीप रब्बी हाळी
पिक पध्दती (72%)
0.30 30 सोयाबीन गहू भाजीपाला
0.20 20 मका कांदा मूग
0.10 10 बाजरी हरभरा चवळी
0.10 10 लसूण घास लसूण घास लसूण घास
0.02 2 संकरित नेपिअर
संकरित नेपिअर
संकरित नेपिअर
फलोत्पादन (20.0%)
0.20 20 आंबा फळबाग : 80 झाडे (5मी. 5मी.)
शेडनेट (3.6%)
0.036 3.6 शेडनेट : प्रथम आणि तृतीय वर्ष - टोमॅटो- काकडी
द्वितीय आणि चतुर्थ वर्ष - ढोबळी मिरची- काकडी 
पशुपालन (4.4%)
0.044 4.4 मुक्त गोठा पद्धत- 2 फुले त्रिवेणी संकरित गाई, गांडुळखत निर्मिती आणि कुक्कुटपालनासाठी रोड ईजलॅन्ड रेड 100 पक्षी पाच टप्प्यांत (500 पक्षी प्रतिवर्ष) 
 
टिप : फळबागेमध्ये आंबा फळ बागेऐवजी डाळिंब/पेरू/केळी ही पर्यायी फळझाडे घेता येतील. 
पिके निवडताना जमिनीची सुपीकता आणि फेरपालटीसाठी उपयुक्त असलेली पिके निवडली. खोल मुळे आणि उथळ मुळांची पिके फेरपालटीत घेतली. कडधान्याची पिके जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी पीकचक्रात उपयुक्त ठरली. या पीकचक्राने रोग आणि किडींची साखळी तोडणे शक्य झाले. फलोत्पदनासाठी 20 गुंठे शेतावर 5’5 मीटर अंतरावर केशर आंब्याची लागवड करण्यात आली. 3.6 गुंठे क्षेत्रावर 20’18 चौरस मिटर आकाराचे शेडनेटमधील शेती करण्यात आली. यामध्ये पहिल्या वर्षी टोमॅटो आणि त्यानंतर काकडीचे पीक घेण्यात आले. दुसर्‍या वर्षी ढोबळी मिरची आणि त्यानंतर काकडी अशा प्रकारे तिसर्‍या आणि चौथ्या वर्षात याच क्रमाने पिके घेण्यात आली. शेडनेटमध्ये 3 फुटांचे 12 बेड तयार करण्यात आले. बेडच्या वरच्या बाजूला 3 फूट आणि तळाच्या बाजूला 3.5 फूट याप्रमाणे बेड तयार करण्यात आले. 2 बेडमध्ये 1.5 फू ट रस्ता ठेवण्यात आला. प्रत्येक बेडवर 2 लाइन तयार करण्यात आले. बेडच्या दोन्ही बाजूला अर्धा फूट अंतर सोडून मधोमध 2 फुटांवर दोन ओळींमध्ये 50 सेमी. अंतर ठेवून 40 रोपांची एका ओळीत लागवड करण्यात आली. 
याप्रमाणे 12 बेड तयार करण्यात आले. प्रत्येक बेडवर 80 रापांप्रमाणे 960 रोपांची लागवड करण्यात आली. ठिबकच्या माध्यमातून खते आणि पाणी यांचे नियोजन केले. 
 
दूधपालनसाठी मुक्त गोठा पद्धतीने फुले त्रिवेणी जातीच्या 2 संकरित गाई पाळण्यात आल्या. याच्या जोडीला गांडुळखत प्रकल्पाचे चार कंपोस्ट युनिट तयार केले. कुक्कुटपालनात 2.5 महिन्याकरिता 100 रोड ईजलँड रोड या जातीच्या कोंबड्या ठेवल्या. याप्रमाणे वर्षभरात 500 कोेंबड्या विक्री करण्यात आल्या. शेतकर्‍यांच्या कुटुंबात पाच माणसे विचारात घेऊन आराखडा तयार करण्यात आला. मॉडेलमध्ये पिके घेण्यापूर्वी मातीची तपासणी करण्यात आली. त्यामधील गुणधर्मांचा अभ्यास करण्यात आला. चार वर्षांच्या अभ्यासानंतर या मॉडेलचा आर्थिकद़ृष्ट्या अभ्यास करण्यात आला.
 
शेतीपद्धती मॉडेलपासून झालेला आर्थिक फायदा: वर्षाकाठी या मॉडेलमधून रु.3,60,651/- एवढा निव्वळ फायदा झाला. पीकपद्धतीपासून रु. 1,32,305, पशुपालनापासून रु. 1,21,716/-, आंबा फळझाडांपासून रु. 21,538/- आणि शेडनेटपासून 85,092/- निव्वळ फायदा झाला. यामध्ये पीकपद्धतीपासून 37%, पशुपालनापासून 34%,, फळझाडांपासून 6%, आणि शेडनेटपासून 23 %, याप्रमाणे फायदा झाला. या मॉडेलपासून 511 दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला.
 
तक्ता 2. शेतीपद्धती मॉडेलपासून झालेला आर्थिक फायदा (4 वर्षार्ंची सरासरी)
 
मॉडेलचे घटक क्षेत्राची टक्केवारी निव्वळ उत्पादन (रु) उत्पादनाची
टक्केवारी नफा-तोटा 
प्रमाण रोजगाराचे
दिवस
पीकपद्धती 72 1,32,305 37 3.34 115
पशुपालन 4.4 1,21,716 34 1.80 216
फलोत्पादन
20 21,538 6 7.22 60
शेडनेट
3.6 85,092 23 2.70 120
एकूण 3,60,651 100 2.37 511
 
टिप : फळबागेमध्ये आंबाफळ बागेऐवजी डाळिंब/पेरू/केळी ही पर्यायी फळझाडे घेता येतील.
कुटुंबासाठी वर्षभरात उपलब्ध झालेले अन्नधान्य : या मॉडेलच्या माध्यमातून 2518 किलो अन्नधान्य, 625 किलो कडधान्न्य, 908 किलो तेलबिया, 623 किलो फळांचे उत्पादन, 5800 लिटर दूध, 875 किलो मटन, 20.78 टन कांदा आणि भाजीपाला उपलब्ध झाला. कुटुंबाची गरज पूर्ण करून 1453 किलो अन्नधान्य, 483 किलो कडधान्न्य, 815 किलो तेलबिया, 481 किलो फळे, 5007 लिटर दूध, 835 किलो मटन, 2 टन वाळलेला चारा आणि 20.14 टन कांदा आणि भाजीपाला विकणे शक्य झाले. त्याचप्रमाणे पिकांचे टाकाऊ अवशेष आणि गांडुळखतापासून 7820 रु.ची खते पिकांसाठी उपलब्ध झाली. या मॉडेलच्या माध्यामातून 17 टन हिरवा चारा व 6 टन वाळलेला चारा जनावरांना उपलब्ध झाला. दोन गायींपासून 5802 लिटर दूध आणि 10.5 टन शेण मिळाले.
 
तक्ता 3. कुटुंबासाठी वर्षभरात उपलब्ध झालेले अन्नधान्य (4 वर्षांची सरासरी)
 
शेती उत्पादन (किलो)
कुटुंबाची गरज (किलो) 
मॉडेलमधील उत्पादन
(किलो) कुटुंबाची गरज पूर्ण करून जादा विक्रीसाठी उत्पादन (किलो)
अन्नधान्य 1065 2518 1453
कडधान्य 142 625 483
तेलपिके 93 908 853
भाजीपाला -कांदा 639 20781 20142
फळ उत्पादन 142 623 481
दूध(लि.) 795 5802 5007
मटन 40 875 835
हिरवा चारा 17000 17209 209
वाळलेला चारा 3900 6023 2123
 
तक्ता 4. गांडुळखत, कोंबडीखत आणि पिकांचे अवशेष यातून उपलब्ध झालेली सेंद्रिय खत 
 
सेंद्रिय खते
वजन (किलो) नत्र
स्फुरद पालाश किंमत
टाकाऊ भुसा 2123 11.46 1.27 21.65 1016
कोंबडखत 1415 18.25 5.09 23.20 1569
गांडुळखत 5559 62.26 27.23 31.13 4801
मूत्र 1838 15.07 0.18 6.43 434
एकूण 107.04 33.77 82.41 7820
 
जमिनीच्या पोतावर झालेला परिणाम: मॉडेल सुरू करण्यापूर्वी आणि चार वर्षांनंतर जमिनीच्या गुणधर्माची तपासणी करण्यात आली होती. त्यावरून असे दिसून येते की सेंद्रिय कर्ब वाढलेला आहे. नत्र, स्फुरद, पालाश यांचे प्रमाण बाजरी- हरभरा- चवळी या पीकपद्धतीनंतर जमिनीत जादा उपलब्ध असल्याचे दिसून आले. तसेच सोयाबीन-गहू-भाजीपाला आणि मका-कांदा-मूग या पीकपद्धतीमुळे आणि आंबा बागेत स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण जादा आढळले. लोह मँगेनिज, जस्त आणि तांबे या सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण सर्व पीकपद्धतीमुळे वाढल्याचे दिसून आले. सूक्ष्म जिवाणूंचा अभ्यास केला असता त्यांचे प्रमाणसुद्धा जमिनीमध्ये जादा आढळले. एकंदरीतच या मॉडेलमुळे जमिनीचा पोत निश्चित सुधारल्याचे दिसून आले.
 
तक्ता-5. जमिनीतील सुरुवातीचे आणि चार वर्षांनंतरचे अन्नद्रव्यांचे प्रमाण
 
अन्नद्रव्य
सुरुवातीचे 
प्रमाण
चार वर्षांनंतरचे अन्नद्रव्यांचे प्रमाण
सोयाबीन-गहू-भाजीपाला मका-कांदा-मूग बाजरी- हरभरा- चवळी फळबाग
सेंद्रिय कर्ब% 0.50 0.57 0.55 0.55 0.54
नत्र(किलो/हे.) 213 185 194 213 185
स्फुरद(किलो/हे.) 11.9 12.44 14.87 15.15 13.80
पालाश (किलो/हे.) 314 336 336 381 381
लोह (मि.ग्रॅम/किलो) 2.46 3.12 2.38 2.15 4.67
मँगेनिज (मि.ग्रॅम/किलो) 2.28 4.33 4.20 4.75 1.36
जस्त (मि.ग्रॅम/किलो) 0.73 1.30 1.26 2.08 0.61
तांबे (मि.ग्रॅम/किलो) 1.47 2.18 2.17 2.78 1.13
जिवाणू 7.3’106 26.13’106 27.35’106 30.12’106 22.15’106
बुरशी 6.8’104 11.37’104 13.23’104 15.30’104 10.38’104
अ‍ॅक्टिनो मायसिट 3.5’104 5.84’104 6.39’104 7.16’104 4.88’104
 
शिफारस : एक हेक्टर बागायती क्षेत्रातील अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी पीकपद्धतीकरिता 72 टक्के, फळबागेसाठी 20 टक्के, शेडनेटकरिता 3.6 टक्के आणि पशुपालनासाठी 4.4 टक्के याप्रमाणे घटकनिहाय शेतीपद्धती प्रारूप (मॉडेल) वापरण्याची शिफारस करण्यात येत आहे.
 
 
डॉ. भरत रासकर
कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक