बटाटा पिकातील रोगांचे एकात्मिक रोग व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    07-Nov-2019
|
 
बटाटा पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी अधिक उत्पादन देणार्‍या रोगप्रतिकारक वाणाची निवड, रोगमुक्त बियाणांची निवड आणि रोगनियंत्रणासाठी योग्य काळजी इत्यादी बाबींकडे लक्ष देणे कसे महत्त्वाचे आहे यासंबंधीची माहिती या लेखात वाचावयास मिळेल.
 
बटाटा हे भाजीपाला पिकामध्ये अत्यंत महत्त्वाचे पीक असून आपल्या दररोजच्या आहारात प्रामुख्याने त्याचा सर्रास वापर केला जातो. या पिकात प्रामुख्याने लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, मर रोग, जिवाणूजन्य रोग आणि विषाणूजन्य रोग आढळून येतात. बटाटा पिकातील दोन्ही करपा, फ्युजॅरियम मर, स्लेरोशियम मर आणि विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण योग्यवेळी करणे आवश्यक आहे. या पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी, अधिक उत्पादन देणार्‍या रोगप्रतिकारक वाणांची निवड, वेळेवर लागवड, योग्य लागवड पद्धत, संतुलित रासायनिक खतांचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर, पाण्याचे योग्य नियोजन, जमिनीची निवड, रोगमुक्त बियाण्यांची निवड आणि रोग ओळखून रोगनियंत्रणासाठी काळजी योग्यवेळी घेतल्यास रोगाचे नियंत्रण वेळीच होते, इत्यादी बाबींकडे उत्पादनवाढीच्या दृष्टीने लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे आहे.
 
1 . करपा : बटाटा पिकामध्ये दोन प्रकारचा करपा आढळून येतो.
 
अ.उशिरा येणारा करपा : फायटोप्थोरा इनफेस्टन्स या बुरशीमुळे पानांवर पानथळ, फिकट तपकिरी ठिपके दिसून येतात. तापमान कमी, थंड वातावरणात रोगाचे प्रमाण जास्त वाढते आणि रोग पानावर पसरून, पाने तपकिरी-काळे होऊन करपून गळतात. ढगाळ हवामानात पानाच्या खालच्या बाजूस बुरशीची पांढरी वाढ झालेली दिसून येते. बटाट्यावरही रोग येऊन ते तपकिरी-जांभळट रंगाची होतात. त्यामुळे ते मलूल होऊन काढणीपूर्वीच कुजतात, रोगाची बुरशी रोगग्रस्त बटाटे (बियाणे) आणि जमिनीत सुप्तावस्थेत राहते. यानंतर पाऊस, वारा आणि पाण्याद्वारे या रोगाचा फैलाव होतो.
 
ब. लवकर येणारा करपा : अल्टरनेरिया सोलॅनी या बुरशीमुळे पानावर गोलाकार, तपकिरी-काळे रंगाचे, वलयांकित ठिपके दिसतात. रोगाचे प्रमाण जास्त असल्यास पाने करपून गळतात. बटाटे तपकिरी काळे पडून कुजतात. या रोगाचा प्रादुर्भाव झालेले बटाटे साठवणुकीत सडतात. रोगामुळे बटाट्याचे उत्पादन कमी येते. रोगकारक बुरशी रोगग्रस्त बटाट्यामध्ये जमिनीत सुप्तावस्थेत राहते. यानंतर हवा, पाणी आणि किड्यांमार्फत रोगाचा फैलाव होतो.
 
नियंत्रणाचे उपायः
 
1.पिकाची फेरपालट करावी, लवकर व उशिरा येणारा करपा टोमॅटो पिकात असतो म्हणून बटाटा पिकानंतर टोमॅटो किंवा टोमॅटोनंतर बटाटा पीक घेऊ नये.
2.लागवडीसाठी रोगमुक्त बेण्याचा वापर करावा.
3.पेरणीपूर्वी बियाणे 1 टक्का बोर्डोमिश्रण किंवा मेटालॅक्झिल एम झेड-72+कॅप्टन प्रत्येकी 30 ग्रॅम 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून त्यांच्या द्रावणात 5 मिनिटे बुडवून लागवड करावी.
4.रोगप्रतिकारक जातीचा उपयोग करावा. उदा, कुफरी ज्योती, कुफरी लवकर, कुफरी शिंदुरी, कुफरी सूर्या, कुफरी पुखराज.
5.पीक तणविरहित ठेवावे.
6.लवकर येणारा व उशिरा येणार्‍या करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेंब 30 ग्रॅम किंवा प्रोपीनेब 30 ग्रॅम, किंवा क्लोरोथॅलोनील 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड 30 ग्रॅम, 10 लिटर पाण्यात मिसळून रोगाची लक्षणे दिसताच या बुरशीनाशकाच्या आवश्यकतेनुसार 2-3 फवारण्या 10-15 दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून कराव्यात. उशिरा येणारा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मेटालॅक्झिल एमझेड-72, 25 ग्रॅम किंवा अ‍ॅक्रोबॅट एमझेड 30 ग्रॅम किंवा अ‍ॅझोक्झिट्रोबीन 10 मि. ली. 10 लिटर पाण्यात मिसळून या बुरशीनाशकाच्या 2-3 फवारण्या 10-75 दिवसाच्या अंतराने आलटून-पालटून कराव्यात.
 
2 . सुकी कुज किंवा खोक्या रोग
 
मॅक्रोफोमिना फॉसिओलिना या बुरशीमुळे हा रोग होतो. रोगाचा प्रसार जमिनीतून होत असला तरी रोगाची लागण झाल्यास साठवणीतील बटाटे सडतात. या रोगामुळे डोळ्यांभोवती काळे डाग पडतात, हे डाग पूर्ण बटाट्यावर वाढून आतील बटाटादेखील काळपट पडतो. या काळात जास्त पाऊस झाल्यास असे बटाटे मलूल होऊन सडतात. कोरड्या हवामानात बटाट्याचा गाभा सडून ते सुकतात आणि त्यामुळे पोकळ होतात. या पोकळ भागात बुरशीचे काळ्या रंगाचे असंख्य बिजाणू असतात. जमिनीचे तापमान 32 अंश सें. पेक्षा जास्त असल्यास या बुरशीची वाढ जलद गतीने होऊन रोगाचे प्रमाण वाढते. रोगग्रस्त बियाण्यांमार्फत 
रोगाचा प्रसार होतो.
 
उपाय :
 
1.रोगमुक्त बियाण्यांचा लागवडीसाठी उपयोग करावा.
2.सेंद्रिय खताचा भरपूर वापर करावा.
3.लवकर येणार्‍या जातीची लागवड करावी.
4.तापमान वाढण्यापूर्वी बटाट्याची काढणी करावी.
5.पाणी देऊन जमिनीचे तापमान 32 अंश सें. पेक्षा कमी राहील याची काळजी घ्यावी.
6.बियाण्यांचा बटाटा साठवणीपूर्वी बेनलेट किंवा कार्बेन्डाझिमच्या (20 ग्रॅम/10 ली. पाणी) द्रावणात 10 ते 15 मिनिटे बुडवून बीजप्रक्रिया करावी.
 
3. मर रोग
 
फ्युजॅरियम सोलॅनी आणि फ्युजॅरियम ऑक्झीस्पोरम या बुरशीमुळे हा रोग होतो. रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाड पिवळसर दिसून पाने करपतात आणि शेवटी झाड मरते. खोड आणि आतील भाग तपकिरी रंगाचा दिसतो. बटाटे तपकिरी मलूल होतात. जिरायतीपेक्षा बागायती भागात या बुरशीची वाढ झपाट्याने होऊन झाडे मरतात. हा जमिनीतून होणारा रोग असून पाणी आणि मातीमार्फत पसरतो.
 
स्लेरोशियम रोल्फसाय या बुरशीमुळे झाडाच्या बुध्याजवळ मोहरीसारख्या भुरकट गाठी दिसतात. रोगग्रस्त मोठी झाडे निस्तेज पिवळी दिसतात आणि झाड बुध्याजवळ सडून मरते.
 
उपाय :
 
1.पिकाची फेरपालट करावी, ज्या जमिनीत मर रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो तेथे बटाट्याचे पीक घेऊ नये.
2.रोगमुक्त बियाणे लागवडीसाठी वापरावे.
3.जमीन उत्तम निचरा होणारी असावी.
4.लागवडीपूर्वी शेतात हिरवळीचे पीक घ्यावे किंवा कंपोस्ट खताचा भरपूर उपयोग करावा.
5.लागवडीपूर्वी बटाटे कॅप्टन 30 ग्रॅम+कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लि. पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बुडवून लागवड करावी.
6.लागवडीच्या वेळी 5 ते 6 किलो ट्रायकोडर्मा पावडर शेणखतात मिसळून जमिनीत मिसळावी.
4. जीवाणूजन्य रोग
 
अ. बांगडी रोग (रिंग रॉट)
 
क्लेव्हीबॅक्टर मिचीगॅनेन्सीस या अणूजिवापासून होणारा हा रोग आहे. या रोगाची लागण झालेली 
झाडे पिवळी, निस्तेज दिसतात. तसेच झाडाची वाढ थांबते आणि पाने करपतात. रोगट बटाटे कापल्यास 
आत बांगडीच्या आकाराचा तपकिरी रोगट वर्तुळाकार भाग दिसतो. रोगट बटाट्याचे डोळे काळपट पडतात. 
रोगग्रस्त बियाण्यांमुळे रोगाचा प्रादुर्भाव होतो. तसेच जमिनीतून, पाण्यामार्फत रोग पसरतो. या रोगाचे 
नियंत्रण करणे अतिशय कठीण असल्यामुळे रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी.
 
ब. जीवाणूजन्य मर रोग/तपकिरी सड
 
सुडोमानस (बर्कहोल्डरिया) सोलॅनासियारम या अणूजिवापासून होणारा हा रोग आहे. यामुळे 
झाडाची उंची खुंटते, पाने तांबूस-तपकिरी होऊन खोडावर तपकिरी चट्टेे पडतात. रोगाचे प्रमाण वाढल्यास 
पाने पिवळी पडून झाड मरते. रोगग्रस्त फांदी किंवा बटाटा कापून परीक्षण केल्यास क्रिमसारखा पांढरा द्रव 
बाहेर येतो. पाण्याने भरलेल्या काचेच्या ग्लासमध्ये रोगग्रस्त भाग बुडवून त्याचे परीक्षण केल्यास पांढर्‍या 
धुराप्रमाणे द्रव पाण्यात धुराप्रमाणे द्रव पाण्यात येताना दिसतो. खोड कापून पहिल्यास आतील भाग तपकिरी-काळपट दिसतो, बटाट्याचे डोळे काळे पडतात आणि ते मलूल होऊन सडतात. रोगग्रस्त बेणे तसेच जमिनीतून रोगाचा प्रथम प्रादुर्भाव होतो आणि पाणी, बटाटे कापण्याची हत्यारे, आंतरमशागतीमुळे दुय्यम प्रसार होतो.
 
उपाय :
 
1.लागवडीसाठी रोगमुक्त प्रमाणित बियाणे वापरावे.
2.रोग जमिनीद्वारे पसरतो त्यामुळे पिकाची फेरपालट करावी. बटाटा पिकानंतर टोमॅटो, वांगी ही पिके 2 ते 3 वर्षे घेऊ नयेत.
3.लागवडीच्यावेळी बटाटे कापण्याचा चाकू कॉपर ऑक्झिक्लोराडि (0.3 टक्के) किंवा मर्क्युरी क्लोराइड (0.1 टक्के) या द्रावणात अधूनमधून बुडवून घ्यावा.
4.बटाटे 200 पीपीएम स्टे्रप्टोमायसीन द्रावणात 1 तास बुडवून लागवड करावी.
5 . विषाणूजन्य रोग
 
किटकांद्वारे पसरणारे विषाणूजन्य रोगामध्ये पाने गुंडाळणारा (लीफरोल व्हायरस) या रोगामुळे पाने आत वळून आकसतात, ती पिवळसर पडून वाढ खुंटते. या रोगाचा प्रसार मावा आणि तुडतुडे या किडीद्वारे होतो. बटाट्यावरील वाय विषाणू (पोटॅटोव्हायरस वाय) या रोगामुळे पाने आकसलेली, रंगहीन दिसतात, वाढ खुंटते, फांदी करपल्यासारखी दिसते. या रोगाचा प्रसार मावा किडीद्वारे होतो. पर्पल टॉप रोल व्हायरस या रोगामुळे पाने आकसतात. पानांचा खालचा भाग जांभळट गुलाबी दिसतो. या रोगाचा प्रसार तुडतुडे या किडीमार्फत होतो. रोगट भागाच्या स्पर्शाने पसरणारे विषाणूजन्य रोगामध्ये बटाट्यावरील एक्स विषाणू आणि पीव्हीएस या विषाणूंमुळे पानात फिकट हिरवट उाग पडून शिरा पिवळसर दिसतात. या रोगांच्या नियंत्रणासाठी रोग प्रसार करणार्‍या किडीचे वेळीच नियंत्रण करावे, पीक तणविरहित ठेवावे, रोगाची लक्षणे दिसताच रोगट झाडे उपटून नष्ट करावे. 
 
 
 
 लवकर येणारा करपा
 
 
 उशिरा येणारा करपा
 
 
 स्क्लेरोशियम बुरशीमुळे होणारा मर रोग
 
 
 
 फ्युजॅरियम बुरशीमुळे होणारा मर रोग
 
 
 बांगडी रोग (रिंग रॉट)
 
डॉ. बबनराव इल्हे
कवकशास्त्रज्ञ,