वाटाणा कडधान्य पिकावर येणार्या प्रमुख किडींची ओळख व रोगाची लक्षणे आणि त्याचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे यासंबंधीच्या माहितीचा समावेश या लेखात केला आहे.
वाटाणा कडधान्यवर्गीय पीक असून हे मुख्यत: रब्बी, तसेच खरीप हंगामात घेतले जाते. वाटाण्याचा उपयोग मानवाच्या आहारामध्ये होत होतो. तसेच जनावरांच्या खाद्यातसुद्धा या पिकाचा समावेश करतात. या पिकाच्या मुळावरील गाठीमध्ये जिवाणूंद्वारे हवेतील नत्र स्थिर केले जाते. त्यामुळे जमिनीच्या फेरपालटीसाठी व सुपीकतेसाठी हे पीक उपयुक्त ठरते.
प्रमुख किडी
शेंगा पोखरणारी अमेरिकन हिरवी अळी
या किडीचा पतंग पिवळसर तपकिरी रंगाचा असून दाट असतो. मादी पतंग 300 ते 400 पांढर्या रंगाची गोलाकार अंडी एक एकटी पानांवर, फुलांवर व शेंगेवर घालते. अळी हिरवट तपकिरी रंगाची 4 ते 5 सेंमी. लांब असून तिच्या शरीराच्या दोन्ही बाजूंस गर्द पट्टे असतात. विविध रंगछटा असणार्या अळ्यासुद्धा द़ृष्टीस पडतात. कोष तपकिरी रंगाचा असून जमिनीमध्ये, पानांवर, शेंगावर व पालापाचोळ्यामध्ये आढळतात.
अंड्यातून निघालेली अळी सर्वप्रथम कोवळी पाने फुलांना खरवटतात व पूर्ण वाढलेली अळी शेंगेला उपद्रव करून तिच्या शरीराचा अर्धा भाग शेंगेमध्ये ठेवून आतील दाण्यावर उपजीविका करते व उर्वरित शरीराचा भाग शेंगेबाहेर ठेवते.
शेंडे गुंडाळणारी अळी
या किडीचा पतंग छोट्या आकाराचा, फिकट तपकिरी रंगाचा असून त्यावर पांढर्या रेषा असतात. अळी हिरवट पांढर्या रंगाची असून डोके तपकिरी असते व तिच्या शरीराच्या वरील प्रत्येक अवयवांवर दोन काळे ठिपके असतात.
अळी कळ्या, फुलकळ्या व शेंगा यांना छिदे्र करते आणि तोंडातून सोडलेल्या लाळेने फुलांचा गुच्छ करते. अळीची विष्ठा शेंगेला केलेल्या छिद्राच्या बाहेर दिसते.
शेंगा पोखरणारी अळी
या किडीचा पतंग हिरवट रंगाचा असून धड नारिंगी रंगाचे असते, तर पुढील पंखावर पांढर्या रेषा असतात. अळी सुरवातीला हिरव्या रंगाची तर पूर्णावस्थेत गुलाबी रंगाची दिसते.
अंड्यातून निघालेली अळी कोवळ्या शेंगेला छिद्र करून आत शिरते व शेंगेमध्येच तिचा जीवनक्रम पूर्ण करते. परिपक्व झालेल्या शेंगेवर तपकिरी काळा ठिपका दिसतो. शेंगेला फोडले असता आतमध्ये अळी, कोष व अळीची विष्ठा दिसते.
खोड माशी
माशी काळ्या रंगाची असून तिचे डोके लाल असते. माशी झाडाच्या शेंड्यावर अंडी घालते. अंड्यातून निघालेली अळी शेंड्यात प्रवेश करून खोड पोखरत मुळापर्यंत जाते. त्यामुळे रोपे कोलमडतात व झाड वाळते. अतिसिंचन भागात या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.
पाने पोखरणारी अळी
माशी रंगहिन किंवा चकाकदार पिवळ्या रंगाची असते. अपाद अळी 03 मिमी. लांब पिवळ्या रंगाची असून डोळे काळे असतात. माशी
पर्णकोषात अंडी घालते. अंड्यातून निघालेली अळी पानातील हरितद्रव्ये नागमोडी रेषेत खात जाते. त्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. परिणामत: उत्पादनात घट येते.
मावा
प्रौढ व डिंभ हिरव्या पिवळ्या रंगाचे असून त्यांच्या शरीराच्या मागील बाजूवर दोन ट्यूब असतात. पिले व प्रौढ पानांतील, फुलदांड्यातील व शेंगेतील रस शोषण करतात. त्यामुळे पाने, दांड्या व शेंगा आकसल्या जातात. परिणामत: पिकाची वाढ खुंटते व उत्पादनात घट येते. ही कीड शरीरातून गोड चिकट पदार्थ बाहेर सोडते. त्यामुळे पिकावर काळ्या मुंग्या आढळतात.
तुडतुडे
तुडतुडे फिकट हिरव्या रंगाचे असून पाचरीच्या आकाराचे असतात. त्याच्या शरीरावर दोन काळे ठिपके असतात. तुडतुडे पानांवर तिरके चालताना आढळतात. पिले व प्रौढ पानातील रस शोषण करतात. त्यामुळे पानाच्या कडा आकसल्या जाऊन पाने पिवळी पडतात. झाडाची वाढ खुंटते.
पांढरी माशी
या माशा छोट्या पांढर्या रंगाच्या असून पंखावर मेणाची पावडर असते. डिंभ व कोष काळ्या रंगाचे व गोलाकार असतात. पिले व प्रौढ पानांतील रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडून वाळतात. या किडीमुळे पिकांवर विषाणूजन्य रोगांचा प्रसार होतो.
फुलकिडे
फुलकिडा छोट्या आकाराचा 1 मिमी. लांब असून त्याला पिसारी पंख असतात आणि तो पांढरा किंवा पिवळसर रंगाचा दिसतो.
फुलकिडे पानांच्या आतील बाजूस खरवडत असल्यामुळे पानांतील हरितद्रव्ये नाहीसे होते व पानाच्या वरील बाजूवर पांढरट चट्टे दिसतात. त्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. परिणामत: उत्पादनात घट येते.
कोळी
अतिसूक्ष्म दिसणारी ही कीड तपकिरी काळ्या रंगाची 1 मिमी. लांब असून तिला आठ पाय असतात. कोळी सुरवातीला झाडाच्या खालील पानांतील रस शोषण करतात व त्याच्या शरीरातून सोडलेल्या जाळीमुळे पाने एकमेकांत गुंततात. प्रादुर्भाव झालेल्या झाडाची पाने सुरवातीला तपकिरी पिवळी पडतात व नंतर वाळून गळतात.
सुत्रकृमी
उघड्या डोळ्याने न दिसणार्या सजीवाला सूक्ष्मदर्शी यंत्राद्वारे पाहिले असता गांडुळासारखा लांब दिसतो. सुत्रकृमी पिकाच्या मुळावर उपद्रव करून मुळाला असंख्य गाठी निर्माण करतात. त्यामुळे जमिनीतून पिकाला होणारा अन्नपुरवठा मंदावतो. परिणामत: पिकाची वाढ खुंटली जाते व उत्पन्नात घट येते.
फुलांवरील भ्ाुंगेरा
भ्ाुंगेरा काळ्या रंगाचा असून त्यावर नारंंगी पिवळ्या मोठ्या आकाराचे ठिपके असतात. अळी पांढर्या रंगाची असते. भुंगेरे कळ्या व फुलकळ्यावर उपजीविका करतात. त्यामुळे फुलगळ होऊन शेंगधारणा कमी होते.
शेंगेवरील ढेकूण
तपकिरी काळ्या रंगाचा चपटा ढेकूण शेंगेच्या दाण्यातील रस शोषण करतात. त्यामुळे शेंगेतील दाणे भरत नाहीत. परिणामत: कोवळ्या शेंगा खाली पडलेल्या आढळतात.
बु्रचिड भ्ाुंगेरा
हा भ्ाुंगेरा छोट्या आकाराचा काळ्या किंवा तपकिरी रंगाचा असून शरीरावर पांढरे वेडेवाकडे पट्टे असतात. भ्ाुंगेरे शेंगेवर अंडी देतात. अंड्यांतून निघालेली अळी शेंगावर उपजीविका करते. तर भ्ाुंगेरे फुलांना उपद्रव करतात. ही कीड साठवणुकीतील वाटाण्यालासुद्धा मोठ्या प्रमाणात उपद्रव करीत असते.
प्रमुख रोग
मर रोग
या रोगाच्या प्रादुर्भावामुळे कोवळे रोपे कोलमडतात व मलूल झालेली दिसतात. झाडाची पाने पिवळी पडून पानगळ झालेली दिसतात. रोगग्रस्त झाडे सहज उपटून येतात. मोेठ्या झाडांना लागण झाली तर शेंगा भरत नाहीत. झाडाचे खोड मुळापासून सरळ रेषेत कापले असता मध्यभागी काळी भ्ाुकटी आढळते.
भ्ाुरी रोग
या रोगामुळे पानावर व शेंगेवर छोटे छोटे पांढरट ठिपके दिसतात. नंतर लहान ठिपक्याचं रूपांतर मोठ्या ठिपक्यात होते व त्यानंतर संपूर्ण झाड भ्ाुरी रोगग्रस्त दिसते. त्यामुळे शेंगा भरत नाहीत व उत्पादनात घट येते.
ष् तांबेरा रोग
अतिआर्द्रतेमध्ये रोगाची लागण होते. सुरुवातील पानांवर छोटे तपकिरी ठिपके दिसतात व नंतर हे ठिपके मोठे होऊन एकमेकांत मिसळतात व तपकिरी नारंगी रंगाचे दिसतात. त्यामुळे पाने त्वरित कोरडी पडून वाळतात.
मुळकुजव्या रोग
या रोगाचा प्रादुर्भाव अतिसिंचनाच्या ठिकाणी आढळून येतो. रोपे वाळलेली दिसतात. रोपे जमिनीपासून उपटून बघितली तर मुळे कुजलेली दिसतात. कधीकधी झाडालासुद्धा मुळे दिसत नाही.
केवडा रोग
या रोगाची लागण पानांच्या खालील बाजूवर होते. या रोगामुळे पानाच्या खालील बाजूवर पांढरे छोटे छोटे ठिपके दिसतात व वरील बाजूवर पिवळे चट्टे आढळतात.
एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन
1. शेताची खोल नांगरट करावी.
2. शिफारशीनुसारच पिकाची पेरणी खरीप हंगामात जुलैमध्ये, तर रब्बी हंगामात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये करावी.
3. प्रतिएकर 40 किलो बियाणे वापरावे.
4. अरकेल, फुले प्रिया, बोनव्हिला वाणाचाच वापर करावा.
5. ज्वारीचे 200 ग्रॅम बियाणे पेरणीवेळी बियाण्यांत मिसळावेत.
6. 30 ग 15 सेंमी अंतरावर लागवड करावी.
7. बीजप्रक्रियेकरिता 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा कार्बेन्डेझिम 3 ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यांस चोळावे.
8. 25:60:60 प्रतिहेक्टरी रासायनिक खतमात्रा द्यावी.
9. मोठ्या अळ्या हाताने गोळा करून नष्ट कराव्यात.
10. पीक 20 दिवसांचे झाल्यानंतर दर 10 दिवसांनी 5: निंबोळी
अर्काची फवारणी करावी.
11. शेतात ज्वारीचे ताटे नसल्यास 5 पक्षीथांबे हेक्टरी उभारावेत.
12. हिरव्या अळीच्या सर्वेक्षणासाठी 5 कामगंध सापळे प्रतिहेक्टरी
लावावेत.
13. अळ्यांच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस परोपजिवी
कीटक 1.5 लाख प्रतिहेक्टरी 8 दिवसांच्या अंतराने शेतात
सोडावेत.
14. शेतात मित्रकिडी/नैसर्गिक शत्रूंचे संवर्धन करावे.
15. पाने पोखरणारी अळी व इतर अळ्यांचा प्रादुर्भाव दिसू लागताच बीटी जिवाणू पावडर 1.5 किलो किंवा निंबोळी तेल 1000 मिली 500 लिटर पाण्यात घेऊन प्रतिहेक्टरी फवारणी करावी.
16. हिरव्या अळीच्या व्यवस्थापनासाठी एचएएनपीव्ही विषाणू 500 एलई अधिक टिपॉल 1 टक्के मिसळून फवारणी करावी.
17. रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी व्हर्टिसिलीएम लेकॅनी 5 ग्रॅम/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
18. मर व मुळकुजव्या रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन जमिनीत मुळाभोवती ओतावे.
19. भ्ाुरी तसेच तांबेरा रोगाच्या व्यवस्थापनासाठी गंधक पावडर 0.25: ची फवारणी करावी.
20. सुत्रकृमीच्या व्यवस्थापनासाठी 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे मुळाभोवती टाकावे.
21. कोळीच्या व्यवस्थापनासाठी गंधक पावडर 0.25: या कोळीनाशकाची फवारणी करावी.
डॉ. संतोष वानखेडे, कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ,
डॉ. प्रकाश सानप, कृषिविद्यावेत्ता,
डॉ. सुनील घवाळे, संशोधन अधिकारी