संत्रावर्गीय पिकांवरील प्रमुख किडींची ओळख व व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    28-Nov-2019


किडींच्या प्रादुर्भावामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून ते नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्यवेळी योग्य त्या कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पन्न वाढविण्यास मदत होईल.
 
महाराष्ट्रातील नागपूर संत्रा हा जगप्रसिद्ध आहे. मुख्यत्वेकरून विदर्भात संत्र्याची लागवड केली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांनासुद्धा संत्र्याची लागवड करण्यास वाव आहे. संत्र्याचे दुसरे नाव म्हणजे नारंगी. संत्र्यामध्ये जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. संत्र्यामध्ये विशेषतः व्हिटॅमिन ‘सीचे प्रमाण जास्त असते. संत्रा पिकाचे उत्पन घेत असताना काही नैसर्गिक घटक उत्पनवाढीस अपायकारक असतात. त्यापैकी एक घटक म्हणजे किडींचा प्रदुर्भाव हा आहे. किडींच्या प्रादुर्भावामुळे संत्रापिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते, हे नुकसान नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्यवेळी योग्य त्या कीडनियंत्रण पद्धतीचा अवलंब केल्यास कीड व्यवस्थापनास मदत होईल. निसर्गाला समजून घेऊन वेळोवेळी शेतनिरीक्षण करून व त्यानुसार कीड नियंत्रणाचे विविध उपाय योजले, तर अनावश्यक फवारण्या व त्यावरील खर्चात बचत होते.
संत्रा पिकावर येणार्‍या प्रमुख किडी 
 
1) पाने पोखरणारी अळी : 
 
ही लिंबूर्गीय पिकावरील रोपवाटिकेतील प्रमुख कीड असून या किडीची अळी अंड्यातून बाहेर निघताच पानांच्या खालच्या पापुद्य्रातून आंत शिरते. त्यामुळे तेथे नागमोडी चमकदार वलये दिसून येतात. ही वलये त्यात असलेल्या हवेमुळे पांढुरकी दिसतात. अळी कोवळ्या पानाला पोखरून हरितद्रव्य खात-खात पुढे नागमोडी वळणाने सरकते. त्यामुळे पाने चुरगळलेली दिसतात व पानावर पांढरे पट्टे पडतात. कोवळ्या नवीन पालवीवर प्रादुर्भाव झाल्यास झाडांची वाढ खुंटते. किडीचा प्रकोप लहान झाडांच्या कोवळ्या फांद्यावरील ’शेंडेमर’ रोगाला कारणीभूत ठरतो. 
 
जीवनक्रम : वातावरणाच्या स्थितीनुसार ही कीड आपले जीवनक्रम 20 ते 60 दिवसांत पूर्ण करते आणि वर्षभरात एकापाठोपाठ 9 ते 13 पिढ्या पूर्ण करते. चंदेरी पांढर्‍या रंगाचे अगदी लहान पतंग पहाटेला बाहेर निघून कोवळ्या पानावर अंडी घालतात. ही कीड वर्षभर कार्यक्षम असते, परंतु तीव्र प्रादुर्भाव जुलै-ऑक्टोबर आणि नंतर फेब्रुवारी-मार्च महिन्यात आढळत्ते. 
 
एकात्मिक व्यवस्थापन
 
 • एकदा अंड्यातून बाहेर पडलेली अळी पानात शिरली की किडीचा बंदोबस्त किंवा व्यवस्थापन करणे कठीण जाते, त्याकरिता एकीकृत व्यवस्थानाचा आधीच आवलंब करणे आवश्यक ठरतो.
 • रोपवाटिकेत किंवा लहान झाडांवर कीडीचा प्रकोप गंभीर झाल्यास कीडग्रस्त पाने तोडून त्यांना नष्ट करावे. त्यानंतर फवारणी करावी. मात्र हे पावसाळ्यातच करावे. 
 • निंबोळी 5 अर्कची किंवा निम तेल 100 मिली प्रति 10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
 • रोपवाटिकेत किंवा झाडांवर कीडीचा प्रकोप दिसून येताच फोरेट दाणेदार 10 टक्के 15 किलो प्रतिहेक्टर किंवा कार्बोफुरोन 3 टक्के 50 किलो प्रतिहेक्टरी जमिनीत झाडाच्या मुळाशी टाकावे.
 • या किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेल्यास इमीडाक्लोप्रीड 17.8 टक्के प्रवाही - 2.5 मिली या कीटकनाशकाची फवारणी प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी.
2) पाने खाणारी अळी : 
 
या अळ्यापासून लिंबूवर्गीय झाडांच्या रोपवाटिकेत जास्त प्रमाणात नुकसान होते व काही प्रभागात बगीच्यातसुद्धा नुकसान होत असते. नवीन कोवळ्या पानांवर या अळ्या उपजीविका करतात. अळी साधारणपणे पानांच्या कडेच्या बाजूने खाण्यास सुरुवात करून पानांच्या मध्यशिरेपर्यंत पाने कुरतुडून खाते. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पानेविरहित होऊन फळ उत्पनावर विपरीत परिणाम होतो. या किडीचा प्रादुर्भाव विशेषतः एप्रिल-मे आणि ऑगस्ट-ऑक्टोबर या कालावधीत जास्त प्रमाणात आढळतो.
 
जीवनक्रम : या किडीची अंडी नवतीच्या कोवळ्या पानांच्या टोकावर घातलेली दिसून येतात. गर्द कथ्थ्या, काळ्या रंगाच्या लहान अळ्यांचे रूपांतर 13 ते 16 दिवसांत हिरव्या रंगाच्या मोठ्या अळ्यात होते. या मोठ्या अळ्यांना इंग्रजी ’वाय’ (ध) अक्षराच्या आकाराचे एक अवयव असते, त्याला ’आस्मेटेरीयम’ असे म्हणतात, जे बाह्य इजा होताक्षणी तोंडा जवळून बाहेर निघते व त्यातून अळी उग्र वर्प बाहेर सोडते. शत्रूपासून रक्षणासाठी ही प्रतिक्रिया असते. अळ्या झाडावर कोषावस्थेत जातात. 
 
एकात्मिक व्यवस्थापन
 
 • या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच रोपवाटिकेतील किंवा नवीन लागवड केलेल्या बगीच्यातील कलमांवर असलेल्या अळ्या व कोष वेचून नष्ट कराव्यात.
 • बावची वनस्पती या किडीची पर्यायी खाद्य असल्यामुळे शेतातील बावची वनस्पतीचा नाश करावा.
 • डाईपेल (बेसीलस थुरीन्जीएन्सीस बर्ल) 0.05% तीव्रतेची फवारणी केल्याने किडीचा चांगला बंदोबस्त होतो. 
 • ट्रायकोग्रामा ईवानसेन्स आणि टेलीनॉमस स्पेसीज या परोपजीवी कीटकांचा उपयोग जैविक कीड नियंत्रणसाठी करता येईल. 
 • या किडीच्या अळीला पिवळी गांधील माशी व प्रेयिंग मान्तीड हे परभक्षक किडी खातात. त्यामुळे या नैसर्गिक किडींचे संवर्धन करावे.
 • निंबोळी 5 अर्कची किंवा निम तेल 100 मिली प्रति 10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 • या किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेल्यास क्विनॉलफोस 20 टक्के ईसी-20 मिली या कीटकनाशकाची फवारणी 10 लिटर पाण्यात मिसळून करावी.
3) सिट्रस सायला :
 
ही कीड आकाराने लहान असून फिकट करड्या रंगाची असते, तर पिले गोलाकार चपट्या आकाराचे असून नारंगी पिवळसर रंगाचे असते. सायला व त्यांची पिले कोवळी पाने, फांद्या, कळ्या आदी भागातील रसाचे शोषण करतात. सायलाच्या बाल्यावस्था व प्रौढ समूहात राहून झाडाच्या कोवळ्या फांद्या, पाने आणि कळ्यातील रस शोषून घेतात. परिणामत: नवीन कळ्या आणि फळांची अत्याधिक प्रमाणात गळ होते आणि फांद्यासुद्धा वाळतात. पिले मधासारखा चिकट गोड पांढरा पदार्थ स्त्रावित करतात, ज्यावर काळी बुरशी झपाट्याने वाढते. शिवाय सायला झाडामध्ये विषारी द्रव्यसुद्धा सोडतो जो फांदीमरसाठी कारणीभूत ठरतो. अधिक महत्त्वाचे म्हणजे, सायला कीड फायटोप्लाझमा सारख्या जिवाणूमुळे होणार्‍या ’ग्रीनिंग’ नावाच्या अत्यंत हानिकारक रोगाच्या प्रसाराचे माध्यम आहे. त्यामुळे लहान कळ्या तसेच फळे गळून पडतात आणि परिणामी उत्पनात घट येते. या किडीचा प्रादुर्भाव जानेवारी ते मार्च महिन्यात विशेष आढळून येतो. 
 
जीवनक्रम : 
 
 • सायला कीडीसाठी आंबिया आणि मृग बहाराचा काळ अनुकूल असतो. ते अर्धवट खुल्या पानाच्या गुंडाळीमध्ये किंवा कळ्यांमध्ये अंडी घालतात. अंड्यापासून प्रौढावस्थेपर्यंत उन्हाळ्यात 15 दिवस तर हिवाळ्यात 45 दिवसांचा कालावधी लागतो. याप्रकारे एका वर्षात सायलाच्या लागोपाठ 9 ते 10 पिढ्या पूर्ण होतात.
 • हिवाळ्यात व उन्हाळ्यात सुप्तावस्थेत असणारी ही कीड सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकते. 
 
एकात्मिक नियंत्रण : 
 
1) आंबिया (मार्च-एप्रिल) आणि मृग (जून-जुलै) बहाराच्या कालावधीत सायला अत्यंत नुकसानदायक असल्यामुळे या वेळी कीडीचे नियंत्रण करणे आवश्यक असते. 
2) निंबोळी 5 अर्कची किंवा निम तेल 100 मिली प्रति 10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
3) या किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेल्यास कीटकनाशकाची फवारणी 10 लिटर पाण्यात मिसळून करावी.
 • इमीडाक्लोप्रीड 17.8 टक्के प्रवाही - 1 मिली/10 ली.
 • थायमेथाक्झाम 25 टक्के प्रवाही-1 ग्रम/10 ली. 
4 ) काळी माशी :
 
या किडीचा प्रदुर्भाव संत्रापिकावर फार मोठ्या प्रमाणात होतो. काळीमाशी आकाराने लहान असून पंख काळसर आणि पोटाचा भाग लाल रंगाचा असतो. किडीचे पिले व प्रौढ पानाच्या खालच्या भागावर व इतर कोवळ्या भागातील रसशोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी होतात व पाने वेडीवाकडी कोकाडल्यासारखी होऊन गळून पडतात. याचा फळधारणेवर विपरीत परिणाम होतो. रसशोषण करताना त्यांच्या शरीरातून साखरेच्या पाकासारखा, चिकट गोड पदार्थ बाहेर पडून पानावर पसरतो. त्यामुळे पानांवर व फळावर काळी बुरशीचा प्रदुर्भाव होतो व झाडे काळी दिसू लागतात. यालाच स्थानिक भाषेत कोळशी असे म्हणतात. त्यामुळे झाडाच्या कर्बग्रहण क्रियेत अडथळा येतो व झाडाला फुले व फळे कमी लागतात 
 
जीवनक्रम : मादी नवीन पानांच्या खालच्या बाजूला तीन वलयात अंडी घालते. प्रत्येक वलयांमध्ये 7 ते 27 अंडी असतात. मार्च-एप्रिल आणि जून-जुलै महिन्यात अंडी उबवण्याकरिता 2 ते 4 आठवड्यांचा कालावधी लागत असून नोव्हेंबर-डिसेंबरमधील कमी तापमानामुळे एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागतो. पिल्लावस्था 6 ते 10 आठवड्यांचा कालावधी घेते, तर कोषावस्थेचा कालावधी साधारणत: आठ आठवडेइतका असून प्रौड माशा 2-10 दिवस जगतात.
 
5) पांढरी माशी :
 
पांढर्‍या माशीची पिले व प्रौढ पानाच्या खालच्या भागावर व इतर कोवळ्या भागातील रसशोषण करतात. त्यामुळे पाने वेडीवाकडी होऊन सुकल्यासारखी निस्तेज दिसू लागतात. याचा फळधारणेवर विपरीत परिणाम होतो. रसशोषण करताना त्यांच्या शरीरातून साखरेच्या पाकासारखा, चिकट गोड पदार्थ बाहेर पडून पानावर पसरतो. त्यामुळे पानांवर व फळावर काळी बुरशीचा प्रदुर्भाव होतो. अशा फळांना बाजारात योग्य भाव मिळत नाही.
 
एकात्मिक व्यवस्थापन 
 
 • झाडांना पाणी व नत्रखताचा उपयोग प्रमाणापेक्षा जास्त करू नये.
 • दोन झाडांतील अंतर शिफारशीपेक्षा कमी ठेवू नये. 
 • माँलाडा या परोपजिवी कीटकांचा उपयोग जैविक कीड नियंत्रणसाठी करता येईल, माँलाडा या परोपजिवी किटकाचे 200 अंडी असलेले कार्ड प्रत्येक झाडावर टाचावे. अंड्यातून निघालेल्या माँलाडा किडीची अळी अळीला खाऊन या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यास उपयोग होतो.
 • काळ्या माशीचे प्रौढ कोषातून बाहेर निघण्याच्या अवस्थेत बगीच्यात अधूनमधून पिवळ्या रंगाचे पत्र्याच्या पृष्ठभागावर एरंडी तेल अथवा ग्रीस लावलेले पिवळे सापळे उभारावेत.
 • लेडीबर्डबीटल व क्रायसोपा यांच्या अळ्या व प्रौढ हे काळी माशीचे अंडी व पिले यांना खातात त्यामुळे या नैसर्गिक किडींचे संवर्धन करावे.
 • निंबोळी 5 अर्कची किंवा निम तेल 100 मिली प्रति 10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 • या किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेल्यास अथवा प्रथम पिल्लेवस्था म्हणजेच 50% टक्के अंडी उबल्यानंतर पर्यायी खालील एका कीटकनाशकाची फवारणी 10 लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर दुसरी फवारणी 15 दिवसांनी करावी.
 • ऑक्सिडीमिटोन मिथाईल 25 ईसी-10 मिली 
 • इमीडाक्लोप्रीड 17.8 टक्के प्रवाही- 2 मिली 
 
6) फळातील रस शोषणारे पतंग :
 
संत्र्याचे फळे पक्व होण्याच्या वेळेस या किडीचे प्रौढ पतंग सायंकाळी बाहेर पडतात आणि पिकलेल्या फळाच्या सालीला छिद्र पडून आतील रस शोषण करतात. या छिद्रातून बुरशी व इतर जिवाणूंचा आंत प्रवेश होऊन फळांची सडण सुरू होते व फळे पिकण्यापूर्वीच गळतात. 
 
जीवनक्रम : मादी पतंग गुळवेल, वासनवेल, चांदवेल यासारख्या जंगली झाडांवर 200 ते 300 अंडी घालते. अंड्यातून 3 ते 4 दिवसांत सुरवंट बाहेर येतो. झाडांची पाने खाऊन 13 ते 17 दिवसांत सुरवंट आपल्या पाच अवस्था पूर्ण करतो आणि जमिनीत 12 ते 18 दिवसांकरिता कोषावस्थेत जातो. अशाप्रकारे 30 ते 40 दिवसांत या पतंगाची एक पिढी तयार होते
 
एकात्मिक व्यवस्थापन : 
 
1) या किडीचा उपद्रव कमी करण्याकरिता संत्राच्या झाडाखालील गळलेल्या फळांना एकत्र करून मातीत दाबून नष्ट करावे.
2 )संत्राबागेच्या भोवती असलेल्या गुळवेल, वासनवेल व चांदवेल यासारख्या ताणाचा नाश करावा.
3) पतंगांना आकर्षिक करून मारण्यासाठी 20 ग्रॅम मॅलॅथिआन दोन लि. पाण्यात 200 ग्रॅम गूळ किंवा फळांचे रस मिसळून विषारी आमिष तयार करावे आणि रुंद तोंडाच्या बाटल्या भरून 25 ते 30 झाडांसाठी दोन याप्रमाणे बाटल्या ठेवाव्यात. 
4 )पतंगे पकडण्याकरिता रात्रीच्यावेळी दिव्याच्या सापळ्याचा उपयोग करावा. 
5) सायंकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत बगीच्यात धूर करावा. 
6) या कीटकांचा प्रसार थांबवण्यासाठी बगीचा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. 
 
6) फळमाशी :
 
ही माशी भुरकट तपकिरी रंगाची असून पाठीवर पिवळ्या रंगाच्या खुणा असतात. या किडीची मादी माशी अंडनलिकाच्या साह्याने फळाच्या सालीखाली 2-15 अंडी पुंजक्यात घालते. अळीचा रंग फिकट पांढरा असतो व अळीला पाय नसतात, अंडी उबल्यानंतर अळीअवस्था फळात शिरून आतील गाभा खाते. या किडीचा प्रादुर्भाव जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जास्त असतो. छिंद्रातून बुरशी आणि जिवाणूंचा फळांत शिरकाव होतो. त्यामुळे फळ सडू लागतात व फळगळ सुरू होते.
जीवनक्रम : मादी परिपक्व फळाच्या सालीमध्ये 2 ते 15 अंडी घालते. एक मादी एक महिन्याच्या कालावधीत 200 पर्यंत अंडी घालते जी उन्हाळ्यात 2 ते 3 दिवसांत बाल्यावस्था पूर्ण होते व नंतर जमिनीत 3 ते 7 इंच खोलीवर ती कोषावस्थेत जाते. वातावरणानुसार 6 ते 14 दिवसांत कोषातून प्रौढ बाहेर येतो. 
 
नियंत्रण : 
 
 • बागा स्वच्छ ठेवाव्यात व प्रादुर्भावग्रस्त खाली पडलेली फळे नष्ट करावीत.
 • फळे झाडावर असताना मिथाईल युजेनाँल वापरण्यात आलेली प्रलोभन सापळे बागेत बसवावी. सापळ्यात आकर्षिक होऊन फळमाशी कीटकनाशकाच्या द्रावणात पडून मारतील. 
7) संत्रा खोडाची साल खाणारी अळी :
 
या किडीची अळी संत्र्याच्या फांदीच्या बेचकीमध्ये खोडावर छिद्र करून आत शिरते आणि आतील भाग खाते. कीडग्रस्त फांदीवर व खोडावर अळीच्या विष्ठेची आणि सालीच्या भुग्याची तयार झालेली जाळी आढळून येते. प्रादुर्भाव अधिक झाल्यास कीडग्रस्त फांद्या वळतात. त्यामुळे उत्पादनात व झाडाच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होतो. प्रामुख्याने जुन्या व दुर्लक्षित बागेत या किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. 
 
जीवनक्रम : मादी पतंग मे व जून महिन्यात 15 ते 25च्या गटात झाडांच्या सालीवर अंडी घालते आणि 8 ते 11 दिवसांत अंडी उबतात. लहान अळी सुरुवातीला सप्टेंबरपर्यंत सालीखाली राहून उपजीविका करते. नंतर दोन फांद्यांच्या सांध्यात छिद्र करते. अशी अवस्था एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत राहते. याच छिद्रात अळी कोषावस्थेत जाते. कोषावस्था 21 ते 41 दिवसांची असते. एका वर्षात किडीची एक पिढी पूर्ण होते. 
 
एकात्मिक व्यवस्थापन : 
 
 • कीडग्रस्त फांदीवरील अळीच्या विष्ठेची जाळी काडून साल व अळीचे छिद्र मोकळे करावे.
 • अणकुचीदार तार छिद्रात खुपसून 4-5 वेळा खालीवर करावा त्यामुळे आतील अळी मरेल. 
 • त्यानंतर मोनोक्रोटोफोस 36 टक्के प्रवाही-14 मिली. 10 लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण किंवा पेट्रोल किंवा केरीसीन पिचकारीच्या साह्याने छिद्रात सोडून छिद्र ओल्या मातीने बंद करावे. ही उपाययोजना वर्षातून 2 ते 3 वेळा करावी.
 
9) कोळी :
 
ही कीड पानांच्या खालील बाजूस जमावाने आढळते व पानांतील रस शोषून घेते. त्यामुळे पाने पिवळी पडतात व किडीचे अस्तित्व समजते. कधीकधी झाडावरील पिकणार्‍या फळांच्या पृष्टभागावर ही कीड आढळते. त्यामुळे फळाची साल खडबडीत व अनैसर्गिक तपकिरी रंगाची दिसते. 
 
व्यवस्थापन: संत्र्यावरील लाल कोळी किडीच्या व्यवस्थापनासाठी डायकोफोल 18.5 टक्के प्रवाही 27 मिली कीटनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी फळ विकसित होण्याच्या अवस्थेत तर दुसरी फवारणी एक महिन्याने करावी.
 
10) सूत्रकृमी :
 
सुत्रकृमीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मुळांच्या टोकाद्वारे होतो. सुत्रकृमी मुळांच्या पेशींमधून रस शोषून घेतात. त्यामुळे पेशी मरतात, तसेच मुळांवर जखमा होतात. 
 
सुत्रकृमीच्या प्रादुर्भावामुळे पिकांना मुळाकडून पाणी व अन्नद्रव्यांचा होणारा पुरवठा यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मुळांची व पर्यायाने पिकांची वाढ खुंटते आणि पाने पिवळी पडतात. जमिनीमध्ये पाण्याचा अंश पुरेसा असतानादेखील पीक सुकतात किंवा सुकल्यासारखे दिसते. सुत्रकृमींमुळे आढळून येणारी लक्षणे हे अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे भासणार्‍या लक्षणांसारखीच असतात. त्यामुळे बहुतेक वेळा सुत्रकृमींची लक्षणे ही सहजासहजी लक्षात येत नाहीत. 
 
व्यवस्थापन: संत्र्यावरील सुत्रकृमी किडीच्या नियंत्रणासाठी कार्बोफ्युरोन 3 टक्के 12 किलो प्रतिहेक्टरी जमिनीत झाडाच्या मुळाशी टाकावे.
 
डॉ. समीर लांडे (विभागप्रमुख) 
प्रा. किरण बुधवत (सहाय्यक प्राध्यापक) 
श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती