विविध सापळ्यांचे शेतीमधील महत्त्व

डिजिटल बळीराजा-2    21-Nov-2019

 
 
किडींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी सापळा हे कमी खर्चाचे तंत्रज्ञान असून, विविध प्रकारचे सापळे प्रभावीपणे कमी खर्चात पर्यावरणाला कोणतीही बाधा न पोचविता कीड नियंत्रण कसे करता येईल याची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे.
 
भारत हा कृषिप्रधान देश आहे. परंतु शेतीमध्ये रासायनिक पदार्थांचा वाढता वापर त्याचबरोबर उत्पन्न खर्चात होत असलेली वाढ, पर्यावरणाचा होत असलेला र्‍हास, मधमाशांची घटत चालेली संख्या, परागीभवानाच्या कमतरतेमुळे कमी उत्पादन परिणामी शेतीमधून फारसा नफा मिळत नाही.
 
तसेच किडींमुळे शेतकर्‍यांचे बर्‍याच प्रमाणात नुकसान होते. किडीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी रासायनिक कीटकनाशकाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे किडीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होत आहे. तसेच शेतमालामध्ये कीटकनाशकाची अवशेष आढळून येत असल्याने निर्यातीवर बंदी येत आहे. तसेच मनुष्याच्या आरोग्याला धोका उद्भवत आहे. म्हणून रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करणे गरजेचे आहे.
 
तसेच किडींच्या बंदोबस्तासाठी कमी खर्चाची आणि प्रभावी असे एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा शेतीतून जास्त आर्थिक लाभ मिळवता येईल. पर्यावरणाचा व मानवी आरोग्याचा होणारा र्‍हास थांबविता येईल.
 
पिकांवरील किडींची प्रजनन क्षमता जास्त असते. बर्‍याच किडींचे एक प्रौढ हे 300 ते 400 अंडी देतात म्हणून ‘ना रहेगा बांस ना रहेगी बासुरी ’ या तत्त्वाप्रमाणे जर किडींचे प्रौढावस्थेतच प्रभावी व्यवस्थापन केले तर किडींचा संभाव्य धोका कमी करू शकतो.
किडींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी सापळा हे कमी खर्चाचे तंत्रज्ञान आहे. विविध प्रकारच्या सापळे प्रभावीपणे कमी खर्चात पर्यावरणाला कुठलीही बाधा न पोचवता कीड व्यवस्थापन करता येते.
 
1. कामगंध सापळा
2. प्रकाश सापळा
3. विष आमिष सापळा
4. पिवळा चिकट सापळा
 
कामगंध सापळा :
 
काही कीटक शरीरामधून विशिष्ट प्रकारचा गंध सोडतात. ज्यांच्यामुळे त्याच वर्गातील नर कीटक समागमासाठी मादी कीटकाकडे आकर्षित होतो. हा विशिष्ट प्रकारचा गंध बहुतांश कीटकामध्ये मादीच सोडतात. ज्यांच्यामुळे नर कीटक त्यांच्याकडे आकर्षित होतात, पण काही कीटकांमध्ये नर सुद्धा हा गंध सोडतात त्या कीटकांमध्ये मादी कीटक हा नर कीटकांकडे आकर्षित होतात. जसे कापूस बोंडावरील भुंगेर यांचे नर कीटक (ग्रँडल्युर) नावाचा गंध सोडतात. त्याच्यामुळे मादी कीटक नर कीटकांकडे आकर्षित होतात.
 
कामगंध सापळ्यामध्ये आपण कृत्रिम गंध वापरतो, ज्यांच्यामुळे नर कीटक त्या गंधाकडे आकर्षित होऊन सापळ्यामध्ये अडकतात. या कृत्रिम गंधामुळे फक्त एकाच प्रजातीतील नर आकर्षित होतात. एका विशिष्ट प्रकारच्या कृत्रिम गंधाकडे दुसर्‍या प्रजातीतील नर आकर्षित होत नाही. म्हणून प्रत्येक कीटकाच्या नियंत्रणासाठी वेगवेगळया कामगंध सापळ्यांचा उपयोग करावा लागतो. प्रत्येक प्रजातीसाठी वेगवेगळा व विशिष्ट गंध वापरावा लागतो.
 
कामगंध सापळ्यामध्ये नर कीटक आकर्षित होऊन अडकला जातो. त्यामुळे त्या कीटकाचे मादी कीटकासोबत मिलन न झाल्यामुळे त्यांची संख्या आटोक्यात आणून पिकांचे नुकसान टाळता येते किंवा कमी करता येते, तसेच अडकलेले नर कीटक मारून टाकावे.
 
तसेच बर्‍याच वेळा शत्रू नर कीटक सापळ्यामध्ये अडकत नाही. तरी तो गंधामुळे गोंधळून जाऊन मिलन होऊ शकत नाही. त्यानेसुद्धा किडींची संख्या आटोक्यात राहते.
 
कामगंध सापळा हे किडींच्या नियंत्रणासाठी कमी खर्चाचे व प्रभावी असे शेतकर्‍यांसाठीचे तंत्रज्ञान आहे.
 
प्रकाश सापळा :
 
प्रकाश सापळा हा आजच्या काळात शेतकर्‍यासाठी वरदानच ठरलेला आहे. पिकांवरील किडींचे होणारे कीटकनाशकाविरुद्धची प्रतिकार शक्ती, दुय्यम किडींची मुख्य किडी म्हणून होत चाललेला बदल पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहे. पर्यावरणाचे प्रदूषण हे सगळे कीटकनाशकाच्या चुकीच्या व अतिवापरामुळे होत आहे. हे सगळे रोखण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे महत्त्वाचे साधन म्हणून प्रकाश सापळ्याचे किडींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आज शेतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.
 
प्रकाश सापळ्यामुळे बर्‍याच किडींचे कमी खर्चात एकत्रितपणे व्यवस्थापन करता येते. आता आधुनिक प्रकाश सापळ्यामध्ये मित्रकिडींची सुटका होण्यासाठी बारीक छिद्र ठेवले जातात. ते छिद्र बहुसंख्य मित्रकिडींच्या आकारमानाएवढे असते. त्यामुळे प्रकाश सापळ्याकडे आकर्षित होऊन अडकलेल्या मित्रकिडींची सुटका होते आणि शत्रुकिडी अडकून राहतात.
 
हुमणीसारखे खूप नुकसान करणार्‍या किडींचे प्रकाश सापळ्याने प्रभावी व्यवस्थापन करता येते. कारण या किडीच्या अळी जमिनीत राहतात. धान पिकवणार्‍या क्षेत्रामध्ये ही कीड धानाच्या व तिळाचे पिकांचे मोठ्या प्रमाणात घेतले जाते आणि या किडीमुळे या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या किडीचे प्रौढ हे मॉन्सूनच्या पहिल्या पावसानंतर जमिनीतून बाहेर पडून समागमासाठी कडुनिंबाच्या, बाबूळ, पळस यासारख्या झाडावर जात असतात. प्रकाशाकडे या किडीचे प्रौढ आकर्षित होत असल्यामुळे हुमणी अळीचा प्रादुर्भाव जास्त असणार्‍या क्षेत्रामध्ये प्रकाश सापळा हा निंबाच्या किंवा बाभळीच्या झाडाकाठी लावावा. त्यामुळे हुमणीचे प्रभावी नियंत्रण आपल्याला करता येते.
 
प्रकाश सापळ्यामध्ये अडकलेल्या किडींला रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावे व जमिनीत गाडून टाकावे.
 
प्रकाश सापळ्याचे फायदे :
 
1) किडींची संख्या कमी करते.
2) रायासानिक कीटकनाशकांचा वापर कमी होतो.
3) वेगवेगळ्या प्रकारच्या बहुतांश किडींचे एकत्रितपणे प्रभावी व्यवस्थापन करता येते.
4) पर्यावरणाचा समतोल राखला जातो.
5) पावसातसुद्धा प्रभावीपणे काम करते.
  
पिके त्यावरील किडींचे प्रकाश सापळ्यामुळे व्यवस्थापन
 
1) धान - खोडकिडा, पाने गुंडाळणारी, तुडतुडा, हुमणी.
2) कडधान्य शेंग पोखरणारी अळी, नाकतोडा, कटवर्म
3) मका खोडकिडा
4) सोयाबिन उंटअळी व लष्करी अळी
5) भाजीपाला फळ व शेंगा पोखरणारी अळी, डायमंड बॅक मॉथ,सेमीलुपर
6) ऊस पायरिला, हुमणी, तुडतुडा, खोड पोखरणारी अळी
7) भ्ाुईमूग केसाळ अळी, फुलकिडे
8) आंबा पतंग, मोल क्रिकेट
 
फळमाशी नियंत्रणासाठी कामगंध सापळा :
 
आज फळपिकावर फळमाशीचा प्र्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. फळमाशीमुळे जागतिक बाजारपेठेत भारतातील फळांची गुणवत्ता खालावत आहे. तसेच निर्यातीवर बंदीसुद्धा येत आहे. फळमाशीमुळे आंब्याच्या फळाच्या निर्यातीवर बर्‍याचदा मर्यादा आल्या आहेत. तसेच फळमाशी नियंत्रणासाठी फवारलेल्या रासायनिक कीटकनाशकांमुळे फळामध्ये कीटकनाशकाचे अवशेष किमान अवशेष मर्यादेच्यावर आढळून येत असल्यामुळे निर्यात तर होऊच शकत नाही व त्यांचे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत.
 
म्हणून रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी करून फळमाशीच्या नियंत्रणासाठी पूरक असा कामगंध सापळ्याचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.
 
कमी खर्चिक कामगंध सापळा :
 
1) 1 लीटर पाण्याच्या बाटलीला झाकणापासून खाली 3 इंच अंतरावर 1 इंच लहान असे 3 खिडक्या समान अंतरावर तयार करा.
2) सुईच्या साहाय्याने प्लॅस्टिकच्या झाकणाला मधोमध छोटेसे छिद्र पाडा.
3) 10 इंच लांबीची एक वायर घ्या. तिला मध्यमावर एक गाठ मारा, ती वायर झाकणाच्या छिद्रातून ओढून घ्या. बाटली अडकवण्यासाठी झाकणार्‍या खालील बाजूच्या वायरला हुकचा आकार द्या.
4) कॉटनच्या दोरीचा 1/2 इंच जाड 2 इंच लांब दोरीच्या टोकाला पातळ तारेने बांधून टाका.
5) ल्यूर तयार करा.
 
अ) मेथाईल युजीनॉल :
 
इथिल अल्कोहोल 60 मिली
मेथाईल युजीनॉल 40 मिली मॅलाथिऑन/डीडीव्हीपी 20 मिली
क्यू ल्यूर : इथिल अल्कोहोल -60 मिली.
क्यू ल्यूर -40 मिली.
(पी-अ‍ॅसिटोकसाथफेनाइल ब्युटॅनॉन) 20 मिली ़ मॅलाथिऑन/डीडीव्हीपी 20 मिली
6) दोरीचे 2 इंच आकाराचे तुकडे मेथाईल युजीनॉल किंवा क्यू ल्यूर द्रावणात 24 तास बुडवून ठेवा. साठवणुकीसाठी दोरीचा प्रत्येक तुकडा अ‍ॅल्युमिनिअमच्या कागदात गुंडाळून ठेवा.
7) ल्यूरचा वापर करताना एक तृतीयांश भागावरील अ‍ॅल्युमिनिअमचा कागद काढून त्या बाजूने बाटलीच्या झाकणाला केलेल्या हुकाला अडकवा व अ‍ॅल्युमिनीअमचा कागद काढून नंतर ते बाटलीत सोडा व झाकण बंद करा.
8) हा सापळा सावलीच्या ठिकाणी 3 ते 4 फूट जमिनीपासून उंचीवर वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा. मेथाईल युजीनॉलचा वापर मुख्यत: फळझाडासाठी होतो. जसे आंबा, पेरू, पपई, मोसंबी व सर्व फळझाडे.
क्यू ल्यूरचा वापर मुख्यतः वेलवर्गीय पिकांसाठी जसे टरबूज, काकडी, गिर्कीन, भोपळावर्गीय पिके, तोंडली, पडवळ, दोडका, दुधीभोपळा आणि इतर काकडीवर्गीय पिके व फळपिके
 
सापळ्यांचा वापर :
 
  • प्रतिएकर प्रक्षेत्रासाठी सापळ्याची संख्या ः 6 ते 10 सापळे 
  • वापराची वेळ फळधारणा झाल्यापासून काढणीपर्यंत
  • ल्यूर बदलण्याच्या कालावधी 30 ते 40 दिवस
  • प्रतिएकर प्रक्षेत्रासाठी एका हंगामात लागणार्‍या ल्यूरची संख्या 12 ते 20 किंवा 18 ते 30 (पीक परिस्थितीनुसार)
  • ल्यूर तयार करण्याचे द्रावण तयार करताना ते हवेशीर खोलीत तयार करावे. हातमोजे वापरावेत. वेगवेगळी उपकरणे वापरावीत. एका सापळ्यासाठी आवश्यक एका ल्यूरची किंमत रु. 35 /- आहे.
 
पिवळा चिकट सापळा :
 
रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी पिवळ्या चिकट सापळ्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिवळे चिकट सापळ्यांमुळे पांढरी माशी, तुडतुडा, मावा यासारखे रसशोषक किडी बर्‍याच प्रमाणात आटोक्यात आणता येतात. पंख असणार्‍या रसशोषक किडी पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात व त्या पिवळ्या बोर्डला लावलेल्या चिकट द्रवाला चिकटतात. अशाप्रकारे या रसशोषक किडींचे नियंत्रण केले जाते.
 
पिवळा चिकट सापळा बनविण्याची पद्धत :
 
बाजारात पिवळ्या कलरच्या फायबर फोम शिट उपलब्ध आहे. ते उपलब्ध नसल्यास आपण लाकडी किंवा फायबरचे शिट घेऊन त्याला पिवळा पेंट मारून तयार करू शकतो. ही शिट शक्यतो 30 ग 45 सेंमी 2 ची घ्यावी व चिकट द्रव्य म्हणून ग्रिस, मोटर ऑइल किंवा एरंडीचे तेल वापरावे. हे तेल शक्यतो 7 ते 14 दिवसांनी चिकटपणा टिकून राहण्यासाठी पुन्हा लावावे.
अशाप्रकारे हे 30 बोर्ड हेक्टरी लावावे. रसशोषक किडी या शक्यतो कोवळ्या भागावर जास्त आढळतात, म्हणून शेंड्याच्या कोवळ्या भागावर याचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. म्हणून हे बोर्ड शेंड्याच्या 15 सेंमीवर व 15 सेंमीखाली अशा उंचीला झाडाजवळ काठीला लटकवावे, जेणेकरून रसशोषक किडींच्या नियंत्रणाची कार्यक्षमता वाढेल.
 
अशाप्रकारे रसशोषक किडींचे आपल्याला पिवळ्या सापळ्याच्या माध्यमातून व्यवस्थापन करता येते.
 
 
श्री. धनंजय मोहोड, डॉ. उषा डोंगरवार,
श्री. सुनील साबळे