कोबीवर्गीय भाज्यांचे कीडी आणि रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    19-Nov-2019

 
 
कोबीवर्गीय भाज्याचे कीडी आणि रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे यासंबंधीची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे. 
 
 
महत्त्वाच्या कीडी आणि त्याचे नियंत्रण
 
1. रस शोषणार्‍या कीडी व पाने खाणार्‍या अळ्या
 
1. कोबीवर्गीय पिकावरील मावा ही कीड पानांच्या बेचक्यात पानाखाली, फुलकोबीच्या गड्ड्याच्या आतील बाजूस लपून बसते आणि कोवळ्या पानांतून अन्नरस शोषून घेते.
2. किडींनी पानातील अन्नरस शोषून घेतल्यामुळे पाने पिवळी पडतात किंवा आकसल्यासारखी रोगट दिसतात.
3. रोपांची वाढ खुंटते.
4. काही पाने खाणार्‍या अळ्या पानाच्या बाजूस राहून पानांचा पृष्ठभाग खरडून खातात, त्यामुळे पानावर असंख्य छिद्रे पडून पानचाळणीप्रमाणे दिसतात.
5. पाने खाणार्‍या काही अळ्या कोवळ्या पानाच्या कडेपासून पाने खाण्यास सुरुवात करून संपूर्ण रोपावरील पाने खातात.
 
उपाय :
 
कोबीवरील मावा आणि पाने खाणार्‍या अळ्या यांच्या नियंत्रणासाठी दहा लि. पाण्यात 5 मिली. इमीडॅक्लोप्रीड किवा 10 मिली डायमेथोएट किंवा 20 मिली क्विनाल्फास मिसळून द्रावण तयार करावे. यामध्ये 30 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड मिसळावे. या द्रावणाची फवारणी गादीवाफ्यावरील रोपांवर पेरणीपासून 2 व 4 आठवड्यांच्या अंतराने करावी. या द्रावणाची फवारणी शेतातील पिकावर आवश्यकतेनुसार पुन्हा 4 आठवड्यांच्या अंतराने करावी.
 
2. गड्डा पोखरणारी अळी
 
1. कोबीवरील गड्डा पोखरणार्‍या अळ्या तांबूस करड्या रंगाच्या असतात.
2. या अळ्या पानामागे लपून बसतात आणि पाने खातात. 
3. या अळ्या गड्डे पोखरून आत शिरतात आणि आतील भागावर उपजीविका करतात, त्यामुळे गड्ड्याची प्रत खराब होते.
 
उपाय :
 
कोबोवर्गीय पिकावरील गड्डा पोखरणार्‍या अळ्यांच्या नियंत्रणासाठी 10 लि. पाण्यात 10 मिली. क्विनाल्फास मिसळून लागवडीनंतर 10 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 फवारण्या कराव्यात.
बंगलोर येथे भारतीय बागवानी अनुसंसाधन संस्थेने पानकोबीवरील किडीच्या नियंत्रणासाठी कमी खर्चाचा व सोप्या उपायाची शिफारस केली. या उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी कोबीच्या प्रत्येक 25 ओळीनंतर दोन ओळी मोहरी पिकाच्या पेरतात.
यापैकी पहिली ओळ पानकोबीची शेतात रोपलावणी करण्याच्या 15 दिवसांआधी पेरवी आणि त्यानंतर दुसरी मोहरीची ओळ रोपांच्या लागवडीनंतर 25 दिवसांनी पेरावी. मोहरीच्या झाडावर चौकोनी ठिपक्याचे पतंग पानावर जाळी करणार्‍या अळ्या व मावा या कीडी आकर्षित होतात आणि मोहरीच्या पानावरच राहतात. त्यामुळे कोबी पिकाचे किडीपासून संरक्षण होते.
या किडीच्या नियंत्रणासाठी मोहरीच्या झाडावर पेरणीपासून 15 दिवसांनी फवारणीस सुरुवात करून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 10 मिली. डायक्लोरोव्हायस दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 
महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण
 
1. रोपे कोलमडणे :
 
1. हा रोग जमिनीत वाढणार्‍या बुरशींपासून होतो.
2. या रोगाची लागण प्रामुख्याने उष्ण आणि दमट वातावरणात पाण्याचा योग्य निचरा न होणार्‍या जमिनीत होते.
3. बुरशीची लागण झालेली रोपे निस्तेज पिवळसर दिसतात.
4. रोपाचे जमिनीलगतचे खोड कुजून रोपे कोलमडतात.
 
उपाय :
 
1. या रोपाची लागण पावसाळी हंगामात जास्तीत जास्त होते. म्हणून पावसाळी हंगामात रोपे नेहमी उत्तम निचरा होण्यास जमिनीत गादीवाफ्यावर तयार करावीत.
2. पेरणीपूर्वी 13 गॅ्रम कॅप्टन किंवा फायटेलोंन 10 लि. पाण्यात मिसळून हे द्रावण गादीवाफ्यावर शिंपडावे.
3. बीजप्रक्रिया 2 ग्रॅम कॅप्टन या प्रमाणात करावी.
 
2. काळी कुज
 
1. हा बुरशीजन्य रोग पावसाळी हंगामात जास्तीत जास्त आढळतो.
2. या रोगाचा प्रसार बियाण्यांत वाढणार्‍या बुरशीपासून होतो. त्यामुळे रोपाच्या वाढीच्या सुरुवातीस रोगाचा प्रादुर्भाव होतो.
3. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या रोपांची सर्व मुळे खालून वरच्या भागाकडे कुजत जाऊन रोपे सुकून कोलमडतात. 
4. रोपाचे खोड उभे कापल्यास आतील भाग काळा झालेला दिसतो.
 
उपाय :
 
1. या रोगाचा प्रसार बियाण्यांमार्फत होत असल्याने लागवडीपूर्वी बियाणांचे निर्जंतुकीकरण करावे.
2. 1 ग्रॅम मक्युरिक क्लोराडि 1 लि. पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात पानकोबी किंवा फुलकोबीची बियाणे 30 मिनिटे बुडवून नंतर सावलीत सुकवावे आणि पेरणीसाठी वापरावे.
3. सहनशील जात वापरावी.
 
3. केवडा
 
1. हा बुरशीजन्य रोग कोबीवर्गीय पिकांवर सर्च भागात आढळून येतो. ज्या जमिनीचा सामू 7 पेक्षा कमी आहे अशा जमिनीत या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो.
 
उपाय :
 
या रोगाच्या नियंत्रणासाठी जमिनीत चुना टाकून जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक वाढवावा. रोपांच्या लागवडीपूर्वी रोपे 1 ग्रॅम मक्युरिक क्लोराइड दीड लि. पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बुडवून नंतर रोपांची लागवड करावी.
 
4. घाण्यारोग किंवा काळी कुज
 
1. कोबीवर्गीय पिकांची लागवड असलेल्या जगातील सर्व भागात हा रोग आढळून येतो. 
2. हा रोग जिवाणूंमुळे होतो.
3. उष्ण आणि दमट हवामानात या रोगाचा प्रसार अतिशय झपाट्याने होतो. 
4. या रोगामुळे पाने पिवळी पडतात. 
5. पिवळेपणा हा पानाच्या कडेपासून सुरू होतो आणि मध्यभागापर्यंत वाढत जाऊन शेवटी इंग्रजी व्ही आकाराचा डाग तयार होतो. 
6 . हा डाग पानाच्या मुख्य शिरेपर्यंत पसरत जाऊन लागलेला भाग कुजून वाळून जातो. 
7. रोगट भागातील पानाच्या शिरा काळ्या पडतात. असा भाग मोडून पाहिल्यास त्यातून काळसर द्रव निघतो. आणि त्याला दुर्गंधी येते म्हणून याला घाण्यारोग असे म्हणतात. 
8. अशी रोगट रोपे गड्डा न धरताच सुकून जातात.
9. रोगाची लागण उशिरा झाल्यास रोग गड्ड्यापर्यंत पसरतो. त्यामुळे कोबी फ्लॉवरचे गड्डे पूर्ण सडून जातात.
 
उपाय :
 
1. या रोगाचे जिवाणू बियाण्यांमार्फत पसरतात. म्हणून रोगमुक्त बियाणे निवडावे किंवा बियाणे रोगमुक्त करण्यासाठी 1 ग्राम मक्युरिक क्लोराइड एक लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात 30 मिनिटे बुडवून ठेवावे आणि नंतर सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावे. 
2. रोप शेतात लावल्यानंतर 5 ग्रॅम पौशामायसिन 10 ली. पाण्यात मिसळून लागवडीनंतर 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे. 
3. त्याचप्रमाणे लागवडीसाठी रोगप्रतिकारक जाती निवडाव्यात. 
प्रतिकारक प्रजाती- सिलेक्शन-12 पंतशुभ्र 
(मल्टिपल डिसीज रेझिस्टंट) बहुरोग प्रतिकारक- सिलेक्शन 1-6-1-4 ही जात घाण्या, करपा, केवडा इत्यादी रोगांना प्रतिकारक आहे. 
4. रोग आणि कीड आटोक्यात ठेवण्यासाठी पिकांची फेरपालट हीसुद्धा अत्यंत महत्त्वाची बाब आहे. 
5. सतत एकाच जमिनीत कोबीवर्गीय भाज्यांचे पीक घेणे टाळावे. 
6. रोगग्रस्त भागांवर पिवळसर किंवा जांभळट रंगाचे डाग दिसतात.
7. पानाच्या खालच्या भागावर त्या ठिकाणी भुरकट केवड्या बुरशीची वाढ झालेली दिसते. 
8. गड्ड्याची काढणी लांबल्यास गड्ड्यावर काळपट चट्टे दिसतात आणि गड्डे सडू लागतात.
9. पावसाळी हवामानात हा रोग जास्त पसरतो.
 
उपाय :
 
1. 1% बोर्डोमिश्रण फवारावे किंवा 10 लि. पाण्यात 26 ग्रॅम या प्रमाणात डायथेन एम-45 हे औषध मिसळून 10 दिवसांच्या अंतराने 2 फवारण्या कराव्यात. प्रतिकारक प्रजाती-स्नोबॉल, एमजीएस 2-3, सिलेक्शन 1-6-1-4, सिलेक्शन 8, 12 सीई.
 
5. करपा :
 
1. या बुरशीजन्य रोगाचा प्रसार बियाण्यांत वाढणार्‍या बुरशीपासून होतो. 
2. पाने, देठ आणि खोडावर वर्तुळाकार किंवा लंबगोल काळसर रंगाचे डाग दिसू लागतात. 
3. डाग एकमेकांत मिसळून लागण झालेला सर्व भाग कारपल्यासारखा काळपट रंगाचा दिसतो. 
4. कोबी आणि फुलकोबीच्या तयार गड्ड्यांवर तसेच बियाणे तयार होण्याच्या काळात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. 
5. अशा रोगात झाडापासून तयार झालेल्या बियाणांतून रोगाचा प्रसार होतो.
 
 
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी पिकावर 1 % बोर्डोमिश्रण फवारावे किंवा 10 लि. पाण्यात 26 ग्रॅम डायथेन एम 45 हे औषध मिसळून फवारणी करावी.
 
6.भुरी
 
1. कोबीवर्गीय पिकावर भुरी हा बुरशीजन्य रोग आहे. ़
2. पानाच्या वरच्या बाजूला पांढरे ठिपके दिसतात. 
3. काही काळाने संपूर्ण पानांवर करड्या रंगाची बुरशी वाढलेली दिवटे.
 
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाची लागण दिसून येताच 10 लि. पाण्यात 37 ग्रॅम पाण्यात विरघळणारा गंधक (80 %) या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
 
7.मूळकुजव्या
 
या बुरशीजन्य रोगामुळे झाडाच्या मुळांवर अनियमित गाठी तयार होतात. झाडाची पाने पिवळी पडतात आणि सुकतात.
 
उपाय : एका जमिनीत तीन वर्षांतून एकदाच कोबीवर्गीय पीक घेऊन नंतर इतर पिकाची फेरपालट होईल असे नियोजन करावे. 
 
 
प्रा. सय्यद सुरैयानाज इसहाक