शेतकर्‍यांचे दुप्पट शेती उत्पादनवाढीसाठी मधमाश्यांचे योगदान महत्त्वाचे

डिजिटल बळीराजा-2    16-Nov-2019

 
 
नुकतेच केंद्र सरकारने अर्थसंकल्पात शेतीसाठीची तरतूद दुप्पट प्रमाणात केली असून, वर्ष 2022 पर्यंत शेतकर्‍यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याचे लक्ष्य ठेवल्याचे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदींनी केले आहे. 
 
भारताची लोकसंख्या आजमितीस 125 कोटी आहे. तसेच 2030 पर्यंत भारताची लोकसंख्या 140 ते 145 कोटी होईल, असा संख्याशास्त्र व कृषिशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता नियोजनकर्ते व कृषिशास्त्रज्ञ यांच्यापुढे पुढील तीन महत्त्वाची आव्हाने असतील. 
 
1. सर्वांसाठी पुरेसे आणि पौष्टिक अन्नधान्याचे उत्पादन. 
2. 25 ते 30 वयोगटातील तरुणांसाठी रोजगारनिर्मिती.
3. लोकसंख्यावाढ स्थिर ठेवणे. 
 
शेतीच्या उत्पादनाची वाढ ही मधमाश्यांवर फार अवलंबून आहे ही गोष्ट जगात आता सर्वत्र मान्य झाली आहे. मधमाश्या राष्ट्राची अन्नाची गरज भागविण्याला प्रत्यक्षपणे मधाच्यारूपाने व अप्रत्यक्षपणे आपल्या पिकांच्या फुलोर्‍यातील परांग सिंचनाने (पॉलिनेशन) फार महत्त्वाची मदत करतात. मधमाश्यांकडून पराग सिंचनाची जी कामगिरी होते ती उत्पन्न करीत असलेल्या मधाच्या दसपट किमतीची असते. 
 
जगात एकूण घेतल्या जाणार्‍या पिकांपैकी 70 टक्के पिके परागीभवनासाठी परागसिंन कीटकांवर अवलंबून आहेत. या परागसिंचन प्रक्रियेत मधमाश्यांचा सहभाग 75 ते 80 टक्के असतो. शेतीमध्ये घेतल्या जाणार्‍या फळपिके, फळभाज्या, भाज्यांची बियाणी, डाळी, तेलबियांमध्ये त्यांच्या बीजधारणेकरिता मधमाश्यांसारख्या परागसिंचक कीटकांची अत्यंत आवश्यकता असते. अशा पिकांच्या फुलोर्‍याच्यावेळी शेतात मधमाश्यांच्या पेट्या ठेवल्यास अशा पिकाचे हेक्टरी उत्पादन 20 ते 50 टक्क्यांनी वाढते. मधमाश्यांमुळे पिकांचे हेक्टरी उत्पादनात वाढ तर होतेच, त्याचबरोबर अशा पिकांच्या पौष्टिक मूल्यातही वाढ होते. 
 
मधमाश्यापालन व्यवसाय ही शेतीतील अशी निविष्ठा आहे की ज्यात रोजगारनिर्मिती, मधनिर्मिती आणि अनेक पिकांचे परागीभवन करून पिकांचे हेक्टरी उत्पादनात आणि पिकांच्या पौष्टिकतेत वाढ असे तिहेरी फायदे आहेत. यासाठी महाराष्ट्रात असलेल्या मधमाश्यांच्या वसाहतींचे संरक्षण करून, त्यांची संख्या वाढविणे, मधमाश्यांची उत्पादन क्षमता वाढविणे (मध आणि मेण) आणि सर्व मधमाश्यांच्या वसाहतींमा परागीभवनासाठी नियोजनबद्ध वापर करून शेतीपिकांचे हेक्टरी उत्पादन वाढविणे असा सर्वंकष कार्यक्रम आखून त्वरित कृती कार्यक्रम सुरु केल्यास येत्या पाच वर्षांत शेतकर्‍यांचे उत्पन्न नक्कीच दुप्पट होईल यात शंका नाही. 
सुनील मधुकर पोकरे