प्लॅस्टिक बंदीचे दूरगामी परिणाम

डिजिटल बळीराजा-2    15-Nov-2019

 
महाराष्ट्र सरकारने प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी 23 जूनपासून सुरू केली. पण पाहिजे तसा प्रतिसाद आज मिळणार नाही, परंतु एक लोकहिताचा व पर्यावरण तारणारा हा निर्णय आहे. समाजातील लोकांची मानसिकता बदलण्यासाठी थोडा वेळ लागेल, परंतु प्लॅस्टिक बंदी पूर्णपणे झाली तर याचे लाभ देशातील व राज्यातील लोकांना पशुपक्षी, प्राणी यांना तर मिळणारच आहे,परंतु पर्यावरण निर्मळ व आरोग्यदायी राहणार आहे व सर्व सजीवांना नवसंजीवनी मिळणार यात तिळमात्र शंका नाही. खलील काही बाबींची टप्प्या-टप्प्याने अंमलबजावणी केल्यास संपूर्ण राज्य प्लॅस्टिकमुक्त होईल व शुद्ध मनप्रसन्न पर्यावरणात जगण्याचा लाभ सर्व सजीवांना घेता येईल.
 
प्लॅस्टिकच्या घातक परिणामांची जाणीवजागृती करा
 
प्लॅस्टिकच्या वस्तू व कॅरीबॅग्स, पॉलिथिन बॅग्स, थर्माकोल व इतर संबंधित वस्तूंमुळे पर्यावरण समतोल व पर्यावरणावर या वस्तूंचे कसे दुष्परिणाम होत आहेत याविषयी नागरिकांना विविध खात्यांमार्फत चर्चासत्र किंवा बैठका घेऊन समजावून सांगणे गरजेचे आहे. या वस्तू लवकर नाश होणार्‍या नाहीत, यांच्या विघटनासाठी कित्येक वर्षे लागतात. प्लॅस्टिकच्या वस्तू गटारात अडकल्या तर पावसाच्या गटारीतील पाण्याचा प्रकोप वाढतो. माणसांना आपला जीव गमवावा लागतो. घरात पाणी शिरून अस्वस्थता निर्माण होते, नदी किंवा ओढ्यात अडकून बसली तर पाण्याचा तुंबरा वाढतो व याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागतात, हे एकदा लोकांना कळले की, ते प्लॅस्टिक वस्तू वापरणे बंद करतील. प्लॅस्टिकच्या वस्तूंच्या वापराने विविध प्रकारचे आजार जडतात हेसुद्धा नागरिकांना कळूद्या.
 
जनावर व पशुपक्ष्यांवर वाईट परिणाम
 
नागरिक घरातील भाजीपाला, चपात्या किंवा शिळे अन्न या पिशव्यांत बंद करून फेकून देतात किंवा घंटागाडीत टाकतात. जिथे कुठे या वस्तू टाकल्या जातात तेथे गायी, म्हशी, कुत्रे, डुक्कर, विविध पक्षी उपजीविकेसाठी येतात व पिशवी ह वस्तू फस्त करतात. त्यांच्या पोटात जाणार्‍या या प्लॅस्टिकमुळे त्यांना जीव गमवावा लागतो.
 
मुलाबाळांनाही धोका
 
घरात विविध पदार्थ प्लॅस्टिक पिशवीमधून आणले जातात. चॉकलेट किंवा इतर पदार्थ चुकून मुलांच्या पोटात गेले तर त्यांच्या जिवावर बेतते.
 
जनजागृती फेर्‍या काढून प्लॅस्टिक बंदी दुष्परिणाम लोकांपर्यंत पोचवा
 
प्लॅस्टिकचे घातक परिणाम सर्वांना माहीत व्ह्यावेत यासाठी प्रत्येक गाव व शहरात जनजागृती फेर्‍या काढून प्लॅस्टिक कायमचे हद्दपार करा. दंड वसूल करून, शिक्षा करून त्यावर बंदी आणण्याला खूप कालावधी लागेल याचा विचार व्हावा.
 
प्लॅस्टिकनिर्मिती व वस्तू कारखाने बंद करा
 
प्लॅस्टिक निर्माण करणारे कारखाने जर बंद केले तर आपोआप प्लॅस्टिक वापर बंद होईल व प्लॅस्टिकमुक्त पर्यावरण बनेल, व्यापारी वर्गाला व छोट्या मोठ्या हातगाडीवाल्यांनाही प्लॅस्टिक वस्तू न वापरण्याच्या कडक सूचना दिल्या तर आम आदमी प्लॅस्टिक वापरणार नाही.
 
जुन्या काळातील खाकी कागदी पिशव्या वापरा
 
40-50 वर्षांपूर्वी दुकानदार खाकी कागदाच्या पिशव्यांचा वापर करावयाचे, तो पुन्हा वापर करण्याचा आदेश काढा, म्हणजे आपोआप प्लॅस्टिकच्या वस्तू वापरणे बंद होईल. दंड, निर्बंधामुळे गोरगरीब भरडला जाईल. शासनाने वरील बाबी विचारात घ्याव्या अशी अपेक्षा आहे.
 
धोंडिरामसिंह ध, राजपूत