कपाशीवरील लाल्या विकृतीचे करा नियंत्रण

डिजिटल बळीराजा-2    14-Nov-2019

 
 
ही विकृती मराठवाडा, विदर्भ व खानदेश येथील कपाशीचे प्राबल्य असलेल्या सर्वच भागांमध्ये आढळून येत आहे. ही शरीरक्रियात्मक विकृती असून, प्रामुख्याने अन्नद्रव्यांच्या कमरतेमुळे किंवा रसशोषक किडींच्या प्रादुर्भावामुळे वाढते. यात कपाशीच्या पानांच्या कडा प्रथम लाल होऊन हळूहळू संपूर्ण पान लालसर/तांबूस रंगाचे दिसतात. पुढे लाल झालेली पाने वाळतात व गळून पडतात. परिणामी झाडांची वाढ खुंटते. बोंडे लाल पडून अकाली परिपक्व होऊन अपूर्ण उमलतात. 
 
विकृतीची कारणे :
 
* अन्नद्रव्यांची विशेतष: (मॅग्नेशियम, नायट्रोजन व बोरॉन) कमतरतेमुळे पाने लाल होण्याची समस्या दिसून येते. 
* जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता खालील कारणांमुळे राहू शकते. 
1. जमिनीत पाणी साचून राहून पिकाला अन्नद्रव्ये उपलब्ध न होणे. 
2. खतेयोग्य वेळी व विभागून न देणे. 
3. मॅग्नेशियम या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता.
4. याशिवाय रसशोषक किडीच्या (विशेषतः तुडतुडे व फुलकिडे) प्रादुर्भावामुळेसुद्धा कपाशीचे पाने लाल होतात. 
 
प्रतिबंधात्मक उपाय : 
 
1. जमिनीतील पाण्याचा योग्य निचरा करावा. 
2. पीक 55 ते 60 दिवसांचे असताना मॅग्नेशियम सल्फेट 40 ग्रॅम प्रति 50 लिटर पाण्यात मिसळून 2 ते 3 फवारण्या किंवा 2 टक्के प्रमाणात डीएपी खताच्या 2 ते 3 फवारण्या कराव्यात. 
3. मातीपरीक्षणानुसार शिफारशीत खतांची मात्रा द्यावी. 
4. रसशोषक किडींचा बंदोबस्त करावा.
 
प्रा. शिवशंकर पोले, श्री. आकाश डाके व
श्री. नारायण इंगळे