गुलाबी बोंड अळीचे करा एकात्मिक व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    12-Nov-2019

 
 
 
भारताच्या काही भागांत सध्या बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. ही कीड कपाशीच्या बियांवर उपजीविका करते, ज्यामुळे कापसाची गुणवत्ता खराब होऊन आर्थिक नुकसान होते. तसेच ही कीड बोंडामध्ये लपून राहत असल्यामुळे वरून सहजासहजी प्रादुर्भाव झालेला दिसून येत नाही. बहुतांश भागात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे दुसर्‍या वेचणीदरम्यान बोंडे उमलण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. या किडीचा प्रादुर्भाव साधारणतः कापूस हंगामाच्या मध्यापासून (लागवडीनंतर 90 दिवसांपासून पुढे) सुरू होतो व शेवटपर्यंत वाढत जातो, परंतु अलीकडील 2-3 वर्षांपासून मध्य व दक्षिण भारतातील कापूसपट्ट्यात ही कीड 45-60 दिवसांच्या बीटी कपाशीच्या पिकावर प्रादुर्भाव करताना आढळून आली आहे. प्रादुर्भावाची तीव्रता स्थानपरत्वे कमी अधिक झालेली पाहावयास मिळते. 2017च्या कापूस हंगामात महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश ही प्रमुख कापूस उत्पादक राज्ये गुलाबी बोंड अळीच्या सावटाखाली होती. या राज्यांमध्ये 8-92 % पर्यंत प्रादुर्भाव दिसून आला ज्यामुळे 10-30 % पर्यंत उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. वर्षभर कापूस पिकाची उपलब्धता असल्याने या किडीच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. आवश्यक त्या उपाययोजनांचा वेळेत अवलंब न केल्यास येत्या 2018 च्या हंगामातही या किडीच्या कपाशीवर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येणार्‍या हंगामातील हा संभाव्य धोका डोळ्यासमोर ठेवून नागपूरस्थित भा. कृ. अनु. प.- केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी एक खास रणनीती तयार केलेली आहे, जी लोकसहभागातून सामूहिक पातळीवर राबविण्याचे आवाहन करीत आहोत.
 

 
 
 
* कापूस पिकाचा हंगाम डिसेंबर- जानेवारीदरम्यानच संपुष्टात आणावा 
*पूर्वहंगामी (एप्रिल-मे) कपाशीची लागवड टाळावी
*अर्धवट उमललेली प्रादुर्भावग्रस्त बोंडे व पिकाचे अवशेष त्वरित नष्ट करावेत. 
*बीटी बियाणांसोबत गैरबीटीचे बियाणे दिले असल्यास त्याची आश्रय पीक म्हणून लागवड करावी 
* गुलाबी बोंड अळीने प्रादुर्भावग्रस्त कापसाची गोदामामध्ये साठवण करू नये.
* संकरित बीटी/सरळ वाणांचे बियाणे नेहमी अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावे व दुकानदाराकडून पक्के बिल घ्यावे
* शिफारस केलेल्या कमी कालावधीत पक्व होणार्‍या बीटी कापूस अथवा सरळ वाणांची वेळेतच म्हणजे जून महिन्यात पेरणी करावी 
* गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित करण्यासाठी पिकांची फेरपालट करावी 
* पतंगाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पेरणीच्या 45 दिवसांनंतर हेक्टरी 5 याप्रमाणे कामगंध सापळे लावावेत 
* कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाचे निदान करण्यासाठी पात्या व फुले लागण्याच्या अवस्थेत वेळोवेळी निरीक्षण करावे.
* बोंडे लागण्याच्या अवस्थेत एक एकर क्षेत्रातून वेगवेगळ्या झाडांची 20 बोंडे तोडून ती फोडून पाहावीत 
* खाली गळून पडलेली प्रादुर्भावग्रस्त पात्या, फुले व बोंडे गोळा करून त्वरित नष्ट करावीत. लागवडीच्या 60 दिवसांनंतर निंबोळी अर्क 5 % + नीम तेल 5 मिली प्रतिलिटर याप्रमाणे एक फवारणी करावी 
* ज्या ठिकाणी उपलब्धता असेल तिथे ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या गुलाबी बोंड अळीच्या अंड्यावर उपजीविका करणारा परोपजीवी मित्रकीटक 60000 प्रतिएकर याप्रमाणे एका आठवड्याच्या अंतराने कपाशीच्या फुलोरा अवस्थेत तीनदा प्रसारण केल्यास चांगले नियंत्रण मिळते
* मान्यता असलेल्या व शिफारस केलेल्या कीटकनाशकांचीच फवारणी टाळावी 
* कीटकनाशकांचा मिश्रणाचा काटेकोरपणे वापर टाळावा 
* पिकाचा कालावधी वाढवणारी कीटकनाशके जसे की मोनोक्रोटोफोस, असिफेट, इमीडाक्लाप्रिंड, थायोमेथोकसाम आणि असिटामीप्रिड इ.चा वापर सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये टाळावा 
*पांढर्‍या माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नोव्हेंबरपूर्वी कुठल्याही प्रकारच्या सिंथेटिक पायरेथ्रोइड, असिफेट, फिप्रोनील इ. कीटकनाशकांचा वापर करू नये 
* आर्थिक नुकसान पातळी (8 पतंग प्रतिकामगंध सापळा प्रतिदिन सतत तीन दिवस किंवा 1 अळी प्रति 10 फुले किंवा 1 अळी प्रति 10 हिरवी बोडे) ओलांडल्यास खालील तक्त्यात दिलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा गरजेनुसार वापर करावा 
* स्वच्छ व निरोगी कापसाचीही स्वतंत्र वेचणी करून विक्री अथवा योग्य साठवणूक करावी तसेच कीडग्रस्त कापूस त्वरित नष्ट करावा 
* सूतगिरणी/जिनिंग मिलमध्ये साठवलेल्या कीडग्रस्त कापसात सुस्थावस्थेत असलेल्या अळ्यांपासून निघणार्‍या पतंगांना पकडण्यासाठी त्या परिसरात कामगंध अथवा प्रकाश सापळे लावावेत व जमा झालेले पतंग नष्ट करावेत.
 
 
तक्ता - गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी शिफारस केलेली किताक्नाशके  
 
 महिना   कीटकनाशके   मात्रा प्रति 10 लिटर पाणी
 सप्टेंबर   क्विनोल्फोस   25% 
   थायोडीकार्ब   75%
   थझ   20 मिली 20 ग्रम
 ऑक्टोबर   क्लोर्पयारीफोस   20%
   थायोडीकार्ब   75%
   थझ   20 मिली 20 ग्रम
 नोव्हेंबर   फेनवलरेट   20 %
   सायपरमेथ्रीन   10%
 पावर स्प्रेसाठी कीटकनाशकाची मात्रा तिप्पट घ्यावी.