द्राक्ष पिकातील महत्त्वाचे रोग व त्यांचे नियंत्रण

डिजिटल बळीराजा-2    11-Nov-2019

 
 
 
द्राक्ष या पिकावर प्रामुख्याने करपा, भुरी आणि केवडा या रोगांचा प्रादुर्भाव होत असून, रोगाची लक्षणे व उपाय यासंबंधी माहितीचा समावेश या लेखात केला आहे.
 
पावसाळ्यात द्राक्षवेलीवर अनेक प्रकारचे रोग येतात. यामध्ये प्रामुख्याने करपा, भुरी आणि केवडा हे प्रमुख रोग आहेत. वेलीची कोवळी पाने, शेंड्याचा भाग, लहान घड व लहान मणी यावर प्रामुख्याने हे रोग येतात.
 

 
 
करपा रोग : जून ते ऑक्टोबर याकाळात ओलसर, दमट हवामानात ग्लिओस्पोरियम अम्पेलीफॉगन या बुरशीमुळे हा रोग येतो. या रोगामुळे कोवळी फूट, फुलोरा तसेच फळावर काळसर, खोलगट चट्टे पडतात. पानांवर गोल, काळे ठिपके पडून पानांचा मध्यभाग भुरकट राखी रंगाचा होतो. पेशी सुकून पाने वेडीवाकडी होतात. 
 
उपाय : करपा रोगाचा बागेत उपद्रव होऊ नये, म्हणून प्रतिबंधक उपाययोजना करावी. या रोगाची एकदा लागण झाल्यानंतर त्यावरील उपाय फारसे फलदायी होत नाहीत. यासाठी बागेत स्वच्छता ठेवावी. पावसाळ्यापूर्वी वेलीवरील रोगट भाग काढून जाळून टाकावेत. एप्रिल छाटणीनंतर नवीन फुटीवर 5:5:50 तीव्रतेचे बोर्डो मिश्रण फवारावे. यानंतरच्या काळात वेगवेगळ्या ताम्रयुक्त बुरशीनाशकांची आवश्यकतेनुसार फवारणी करावी. 
 
 

 
 
भुरी रोग : ऑन्सिन्यूला निकेटर नावाच्या बुरशीपासून भुरी हा रोग होतो. हा रोग फळधारणेच्या काळात उष्ण व दमट हवामान असताना होतो. या रोगाची लागण झाल्यामुळे द्राक्षाचा फुलोरा जळून जातो. पांढर्‍या रंगाच्या बुरशीचा थर मण्यांवर येऊन मणी तडकतात व फुटतात. 
 
उपाय : वातावरण 60 ते 80% आर्द्रता आणि ढगाळ हवामान असल्यास 300 मेशा गंधकाची भुकटी धुराळवी. भुरी रोगाचे नियंत्रण करण्यासाठी गंधकाची फवारणीसुद्धा करावी. घडावरील भुरीच्या नियंत्रणासाठी कॅरोथेन 0.05 % द्रावणात घड बुडवावेत. 
 
 
 
 
केवडा रोग : हा रोग दमट हवामानात फ्लाझमोफोरा व्हीटीकोला नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार पाने व कोवळ्या फांद्यावंर झपाट्याने होतो. पानावर फिकट हिरव्या अथवा पिवळट रंगाचे तेलकट, पारदर्शक डाग दिसतात. यामुळे पानातील पेशी मरतात. पाने वाळून गळून पडतात. फुलोरा अथवा लहान फळांवर रोगाची लागण झाल्यास ती जळतात. या रोगाची बुरशी सुप्तावस्थेत बरेच दिवस टिकून राहते आणि योग्य हवामान मिळताच पुन्हा रोगाच्या स्वरूपात द्राक्षवेलीवर दिसून येते. 
 
उपाय : केवडा रोगाचा बागेत उपद्रव होऊ नये म्हणून प्रतिबंधक उपाययोजना करावी. यासाठी बागेत स्वच्छता ठेवावी. पावसाळ्यापूर्वी वेलीवरील रोगट भाग काढून जाळून टाकावेत. एप्रिल छाटणीनंतर नवीन फुटीवर 5:5:50 बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. पावसाळ्यात बोर्डो मिश्रणाच्या दोन तीन फवारण्या कराव्यात. ऑक्टोबर छाटणीनंतर 1:1:50 बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. दोन आठवड्यांनी पुन्हा 2:2:50 तीव्रतेचे बोर्डो मिश्रण फवारावे. नवीन वाढीची फूट 15 ते 20 सेंमी लांबीची झाल्यावर त्यावर 5:5:50 तीव्रतेचे बोर्डो मिश्रण फवारावे. यानंतरच्या काळात वेगवेगळ्या ताम्रयुक्त बुरशीनाशकाची आवश्यकतेनुसार फवारणी करावी. 
 
संपर्क 
1. प्रदीप साहेबराव गायकवाड, सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, समर्थ कृषी महाविद्यालय,
देऊळगावराजा. मो नं 9850897257
2. योगेश अनिल गावकर, पीएचडी स्कॉलर वनामकृवि, परभणी. मो. नं. 9028455204
3. संदीप भागीनाथ विधाते, सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग,
क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक. मो. नं. 9923973436