भाजीपाल्यावरील विषाणूजन्य रोग व उपाययोजना

डिजिटल बळीराजा-2    30-Oct-2019
 
भाजीपाल्यावर मोठया प्रमाणात विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो त्य्यामुळे शेतकर्‍याला फार मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे निरनिराळ्या पिकांवर येणार्‍या विषाणुजन्य रोगांची लक्षणे व उपाय याविषयी माहितीचा समावेश या लेखात केला आहे.
 
टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी, वेलवर्गीय भाजीपाला व कलिंगड यासारख्या पिकांवर मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे शेतकर्‍याला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. हे रोग अतिशय घातक असून त्यांचा वेळीच बंदोबस्त करणे व त्याचबरोबर निरनिराळ्या पिकांवर येणार्‍या विषाणूजन्य रोगांची लक्षणे व उपाय याविषयी माहिती असणे गरजेचे आहे.
 
भाजीपाला पिकावर मुख्यत: मोझॅक किंवा केवडा, हळद्या, पाने पिवळी होणे, पाने लहान होणे, चुरडामुरडा, शेंडेमर, पर्णगुच्छ यासारख्या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या विविध विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव पीकवाढीच्या कुठल्याही अवस्थेत कमी-अधिक प्रमाणात आढळतो. या रोगाची लागण सुरुवातीपासून झाल्यास पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन उत्पादनात घट येते. सदर रोगांची लक्षणे, त्याचा प्रसार व त्यावरील उपाय याबद्दल माहिती या लेखात देण्यात आली आहे.
 

 
 
मोझॅक किंवा केवडा
 
या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वांगी, मिरची, घेवडा, वाल व वेलवर्गीय भाजीपाला पिकांवर मोठ्या प्रमाणावर आढळतो. रोगाची प्रमुख लक्षणे पानांवर मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. काही दिवसांनी पाने पिवळी पडतात, पानांची अकाली गळही होते. काही वेळेस पानांवर सुरुवातीला फिकट हिरव्या व पिवळ्या रंगाचे चट्टे आढळतात. कालांतराने ते एकमेकांत मिसळून पाने हळूहळू पिवळी पडतात. नंतर येणारी पाने आकाराने लहान असतात आणि झाडांची वाढ पूर्णपणे खुंटते. फळधारणेचे प्रमाण कमी होते. फळधारणा झाली तरी फळे आकाराने लहान, वेडीवाकडी असतात. काही वेळेस पानांवर फिकट पिवळे ठिपके दिसतात. पुढे ते ठिपके आकाराने मोठे होऊन पिवळे चट्टे पानांवर दिसून येतात. रोगग्रस्त झाडांची अथवा वेलीची वाढ खुंटते. पाने लहान होतात व फळधारणाही कमी होते. काही वेळेस फक्त पानांच्या शिराच पिवळ्या पडतात व झाडांची वाढ कमी होते, तसेच खोडाच्या दोन पेर्‍यांमधील अंतर कमी होते. काही वेळेस रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीपासून झाल्यास फळांवरसुद्धा फिकट हिरव्या रंगाचे चट्टे आढळतात व फळे आकाराने लहान होतात.

 
 
हळद्या किंवा पाने लहान व पिवळी होणे 
 
या रोगाची लक्षणे मुख्यत: भेंडी, वाल, घेवडा, काकडी व काही वेलवर्गीय भाजीपाल्यावर दिसून येतात. प्रथम या रोगांची लक्षणे पानांवर आढळतात. रोगट झाडाच्या अथवा वेलीच्या पानांच्या शिरा पिवळ्या पडतात. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते. काहीवेळेस पानांवर गडद पिवळ्या रंगाचे चट्टे दिसतात व कालांतराने मोठे होऊन संपूर्ण पाने पिवळी होतात, तसेच खोडाच्या दोन पेर्‍यांमधील अंतर कमी होते. नवीन येणारी पाने आकाराने लहान आणि पिवळी असतात.


 
चुरडामुरडा किंवा पाने लहान होणे व पर्णगुच्छ
 
या रोगांची लागण मुख्यत्वेकरून मिरची, वांगी व टोमॅटो यासारख्या पिकांना होते. या रोगाचा प्रादुर्भाव पीकवाढीच्या कुठल्याही अवस्थेत दिसून येतो. या रोगाची प्रमुख लक्षणे म्हणजे पाने जाड व चुरगळल्यासारखी दिसतात. म्हणूनच या रोगाला चुरडामुरडा किंवा बोकड्या या नावाने ओळखले जाते. पानांचा आकारसुद्धा लहान होतो. तसेच झाडांची वाढ खुंटते. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानांचे आणि फांद्यांचे गुच्छ अथवा झुपके तयार होतात. फुले आणि फळधारणा खूप कमी होते. काहीवेळेस फुले व फळे गळण्याचे प्रमाण वाढते.
 
निरनिराळ्या भाजीपाला पिकांवर ही लक्षणे दिसून येतात. तो विषाणूजन्य रोग आहे असे समजावे. रोगाला कारणीभूत असलेले विषाणू ज्यावेळी शेतामध्ये पीक नसेल त्यावेळी ते शेताच्या बांधावरील तणांवर व काही वेळेस जमिनीत आपला जीवनक्रम व्यतित करतात. मुख्य पीक उपलब्ध झाल्यावर हे विषाणू पिकांवर हल्ला करतात व आपल्याला अचानकपणे विषाणूजन्य रोगांची लक्षणे दिसून येतात.
 
रोगाचा दुय्यम प्रसार मावा, पांढरी माशी, फुलकिडी व कोळी या किडींद्वारे तर होतोच, शिवाय रोगग्रस्त बियाणे अथवा कंद यांचा लागवडीसाठी वापर केल्यास या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. वरील किडी सर्वप्रथम रोगट झाडांवर उदरनिर्वाह करतात. नंतर त्याच किडी जेव्हा नवीन झाडांवर जातात, त्यावेळेस सुरुवातीला पानांच्या रसाबरोबर शोषला गेलेला विषाणू पुन्हा आपल्या सोंडेद्वारे नवीन पानांवर सोडतात व रोगाची नव्याने लागण होते. अशाप्रकारे ही कीड विषाणूवाहक असल्याने त्यांचा वेळीच बंदोबस्त करणे अत्यंत गरजेचे आहे. किडींची संख्या हवामानानुसार बदलत असते. त्यामुळे रोगाचा प्रसारसुद्धा कमी-जास्त प्रमाणात दिसून येतो.
 
रोगाची लक्षणे कोणती व रोगनियंत्रणासाठीची उपाययोजना
 
सर्वप्रथम रोग येऊ नये म्हणून रोगमुक्त बियाण्यांचा वापर करावा. तणनाशके वापरून शेतीच्या बांधावरील तणांचा समूळ नायनाट करावा. तसेच पारंपरिक मशागत पद्धतीत फेरफार करून किंवा सुधारित मशागत पद्धती शोधून रोगकिडींचे नियंत्रण करावे. त्याचबरोबर विभागवार पेरणीची एकच वेळ ठरवून पीक घ्यावे; अन्यथा एका विभागातील रोगाचे अथवा किडीचे नियंत्रण करणे अवघड जाते. दोन झाडांमधील व दोन ओळींतील अंतर योग्य ठेवून किडींची संख्या मर्यादित ठेवण्यास मदत होते व रोग कमी प्रमाणात आढळून येतो. रासायनिक खतांच्या मात्रा शिफारशीप्रमाणे दिल्यास व पाण्याचे नियोजन योग्यतर्‍हेने केल्यास रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही. पिकांची फेरपालट करणेसुद्धा काही वेळेस रोगनियंत्रण करण्यास फायदेशीर ठरते. त्याचबरोबर विषाणूवाहक किडींच्या बंदोबस्तासाठी वनस्पतिजन्य पदार्थांचा वापर केल्यास रोग आटोक्यात येऊ शकतो. काही वनस्पतींमध्ये विशिष्ट गुणधर्माचे रासायनिक घटक असून त्याच्या वासामुळे तसेच त्याच्या सेवनामुळे एकतर किडींची वाढ खुंटते व अनियमित होते किंवा किडींना पिकावर येण्यापासून परावृत्त करते. म्हणजेच विषाणूजन्य रोगाचा किडींद्वारे होणारा प्रसार हे पदार्थ वापरून टाळता येतो.
 
यासाठी कडूलिंब वापरून, लसूण, सदाफुली, तुळस यासारख्या वनस्पतिजन्य पदार्थ कीटकनाशक म्हणून वापरण्यास हरकत नाही. रोगनियंत्रण करणे अगदी शक्य न झाल्यास रोगाला कमी बळी पडणार्‍या जातीचा अथवा रोगप्रतिकारक जातींचा लागवडींसाठी उपयोग करणे आवश्यक आहे. जसे वालाची पुसा 2 व 3, घेवड्याची कोकणभूषण, परभणी क्रांती या जाती विषाणजन्य रोगाला कमी बळी पडतात, असे आढळून आले आहे, तसेच मिरचीच्या व्हीआर-2, पंत-सी व पंत सी-1 या जाती रोगाला कमी बळी पडतात, तर तांबेल 1 व 2, पंजाब लाल या रोगप्रतिकारक जाती आहेत. भेंडीच्या पंजाब-7, अर्का अनामिका, वर्षा उपहार या जाती रोगाला कमी बळी पडतात. म्हणून त्यांचा लागवडीसाठी उपयोग करणे गरजेचे आहे. रोगाच्या नियंत्रणाचा शेवटचा उपाय म्हणजे कीटकनाशकाचा योग्य तर्‍हेने वापर करणे होय. मावा अथवा अ‍ॅफीड या किडींच्या बंदोबस्तासाठी मोनाक्रोटोफॉस 2 मिलि. किंवा डायमेथोएट 1.5 मिलि. किंवा नुव्हाकॉन 1.5 मिलि. किंवा नुव्हाकॉन 1.5 मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने या कीटकनाशकांची फवारणी करावी. म्हणजे शेतात मोझॅक विषाणूजन्य रोगाचा प्रसार होणार नाही व त्यामुळे उत्पादनात होणारी घट टाळता येईल. पांढर्‍या माशीमुळे हळद्या रोगाचा प्रसार खूच मोठ्या प्रमाणात होतो.
 
या किडीच्या नियंत्रणासाठी प्रथम गादीवाफ्यावर कार्बोफ्युरॉन किंवा डायसल्फोटोन 1 कि. प्रतिहेक्टरी या प्रमाणात मिसळावे व नंतर पुनर्लागण करतेवेळी हे कीटकनाशक 1.5 कि. प्रतिहेक्टर या प्रमाणात जमिनीत मिसळावे. यानंतर शेतामध्ये कार्बोफ्युरॉन किंवा डायसल्फोटान 1 कि. प्रतिहेक्टरी या प्रमाणात मिसळावे व नंतर शेतामध्ये डायमेथोएट 0.05 टक्के किंवा मोनोक्रोटोफॉस 0.05 टक्के किंवा मेटासिसटॉक्स 0.2 टक्के या कीटकनाशकांची दोन ते तीन वेळेस 10 दिवसांच्या अंतराने फवारणी केल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. फुलकिडे कोळी यांचा प्रादुर्भाव कमी होतो. फुलकिडे, कोळी यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रोपवाटिकेत 10 टक्के दाणेदार फोरेट 20 ग्रॅम 1 चौमी. या आकाराच्या गादीवाफ्यात टाकावे. रोगाचा किडीमार्फत होणारा पुढील प्रसार रोखण्यासाठी पुनर्लागण केल्यानंतर 10 दिवसांनी दोन ते तीन वेळा दर हेक्टरी एन्डोसल्फान 35 ईसी 325 मिलि. किंवा फॉस्फामिडॉन 85 डब्ल्यूएससी 525 मिलि. 375 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेवटचा आणि रामबाण उपाय म्हणजे रोगट विषाणूजन्य झाडे उपटून, जाळून टाकावीत. म्हणजे रोगाचा पुढील प्रसार थांबण्यास मदत होईल.
 
अशाप्रकारे भाजीपाल्यावरील विषाणूजन्य रोगाचे निरनिराळ्या पद्धतींचा एकात्मिकरीत्या वापर करून वेळीच नियंत्रण केल्यास रोगामुळे होणारे आर्थिक नुकसान सहजपणे टाळता येईल. 
 
|