द्राक्षबागेत कलम करण्याचा महत्त्वाचा कालावधी

डिजिटल बळीराजा-2    03-Oct-2019

 
 
द्राक्षबागेत कलम करण्याकरिता विशेष बाबीचा विचार करून अंमलबजावणी करणे कसे गरजेचे आहे या संबंधीच्या माहितीचा ऊहापोह या लेखात केला आहे.
 
द्रक्षाबागेत सध्याच्या परिस्थितीत पावसाळी वातावरण असेल. त्याचवेळी जमिनीत मातीच्या कणांमध्ये पाणी बर्‍यापैकी साचलेले असते. त्याचबरोबर वाढत्या तापमानामुळे वातावरणात आर्द्रतासुद्धा बर्‍यापैकी वाढलेली दिसते. जुन्या द्राक्षबागेत ही परिस्थिती अडचणीची असते. तर नवीन बागेत पोषक वातावरण म्हणून कार्य करते. आपल्याकडे खुंट लागवड केलेल्या बागेतील व्यवस्थापन आता महत्त्वाचे असेल. या महिन्यात महत्त्वाची कार्यवाही म्हणजे कलम करण्याची गरज असेल. तेव्हा द्राक्षबागेत कलम करण्याकरिता खालील गोष्टींची विचार करून अंमलबजावणी करणे गरजचे आहे. 
 
 

 
 
खुंट रोपांची रोग नियंत्रण 
 
ज्या बागेमध्ये खुंटाची पाने जुनी झालेली आहे, अशा परिस्थितीत जर काही दिवसांपूर्वी सतत पाऊस सुरु झाल्यास पानांवर जर काही दिवसांपूर्वी सतत पाऊस सुरू झाला असल्यास पानांवर तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव पाहावयास मिळतो. या वेळी खुंटकाडीच्या पानांवर मागच्या बाजूस तांबूस रंगाचे पावडरचे आवरण दिसून 
 
येईल. जास्त प्रादुर्भाव असलेल्या बागेमध्ये या रोगाच्या जिवाणूंद्वारे पानांमधून रस शोषून घेतला जातो. त्यामुळे पान अशक्त होते. पानांच्या देठाशी गाडीसोबत असलेली मजबुतीसुद्धा यामुळे अशक्त होते व त्यानंतर पान गाळून पडते. ज्या खुंटाची पाने गळून पडतात. त्या ठिकाणी काडीमध्ये आवश्यक असलेला रस अपुरा पडतो. अशा प्रकारच्या अडचणीमुळे कलम यशस्वी होत नाही. बर्‍याचवेळा आपण दुसर्‍या दृष्टीने विचार करतो. कलम करण्याकरिताच खुंटकाडीची पाने काढावीच लागतात. त्यामुळे आता पानगळ झाली तरी काही नुकसान होणार नाही. अशी आपली समजूत असते. हे जरी खरे असले तरी बागेत पानांमधून उपलब्ध रस निघून गेल्यास खुंटकाडी अशक्त होईल. अशा परिस्थितीत कलम केल्यानंतर कलम जोड भरून निघण्यास अडचणी निर्माण होतील.
 
बागेत तांबेरा रोगाची लागण होताच बुरशीनाशकांची फवारणी घेणे गरजेचे असेल. या रोगावर नियंत्रण म्हणून कवच 1.5 ग्रॅम/लिटर पाण्याची फवारणी फायद्याची ठरते.
 
 

 
 
खुंटकाडीची तयारी :
 
कलम करतेवेळी बागेत खुंटकाडी खालीलप्रकारे असावी.
1. खुंटकाडीची जाडी ही 8-10 मिमी असावी. 
2. खुंटकाडी ही सरळ व सशक्त असावी. 
3. खुंटकाडी ही रोग आणि कीडमुक्त असावी. 
4. खुंटकाडी ही जोमदार वाढीची असावी. 
5. खुंटकाडी ही अर्धपरिपक्व असावी. 
6. खुंटकाडी रसरशीत असावी.
 
कलम करण्यापूर्वी बागेत खुंटरोपाच्या बर्‍याच फुटी निघालेल्या दिसून येतात. या फुटींमध्ये काही बारीक, जाड तसेच अर्ध परिपक्व किंवा कोवळ्या कांड्या असतील. 
 
कलम करतेवेळी आपण दोन काड्यांवर कलम करतो. बागेतील प्रत्येक कलम यशस्वी होण्याकरिता प्रत्येक खुंटाच्या दोन काड्यांवर कलम केले जाते. यावेळी कलम करताना काडीची निवड सोपी व्हावी म्हणून प्रत्येक खुंटरोपाच्या तीन काड्या (वर दिल्याप्रमाणे) राखाव्यात. 
 
कलम करतेवेळी सर्वात महत्त्वाचे म्हणजे कांडी रसरशीत असावी, परंतु काही परिस्थितीमध्ये ही काडी मिळवणे शक्य होत नाही. तेव्हा कलम सुरू करण्याच्या 4-5 दिवसांपूर्वी बागेत पाणी द्यावे. यामुळे काडीमध्ये रस तयार होण्यास मदत होईल. 
 
नवीन बागेत कलम करतेवेळी सायन काडीची निवड महत्त्वाची असते. सायन काडी वापरणे म्हणजेच नवीन द्राक्ष जातीची निवड करून बाग उभारणे होय. द्राक्षलागवडीचा उद्देश यावेळी महत्त्वाचा ठरतो. आपल्या बागेतून आपण कशा प्रकारचे उत्पादन घेणार आहोत, या गोष्टीचा विचार आधी करावा. त्यानुसार द्राक्षजातीची निवड करता येईल. विशेष म्हणजे ज्या भागात द्राक्षबाग लागवड घेत आहे त्या भागात कोणत्या प्रकारच्या द्राक्षाची ग्राहकांची पसंती आहे. इ. गोष्टींचा विचार केल्यास फायद्याचे होते. उद्देशानुसार किंवा द्राक्षाच्या प्रकारानुसार द्राक्ष जातीची निवड खालीलप्रमाणे आहे.
 
हिरव्या द्राक्ष जाती :
 
गोल व ऑबलाँग- थॉमसन सीडलेस, तास ए गणेश, क्लोन-2-, मांजरी नवीन, मांजरी कशमिश 
लांब मणी- सोनाका, माणिक चमन, सुपर सोनाका, आरके, एसएस इ. 
रंगीन द्राक्षजाती 
 
गोल व ऑबलाँग - शरद सीडलेस, नानासाहेब पर्पल, मांजरी मेडिका, रेड ग्लोबल, फँटासी सीडलेस इ. 
लांब मणी- क्रिश्ना सीडलेस, सरिता सीडलेस, ज्योती सीडलेस इ. 
 
सायन खालीलप्रमाणे असावी-
 
1) सायन काडी ही सशक्त व रोगयुक्त वेलीवरील असावी. 
2) सायन काडी ही ठिसूळ व गोल असावी. 
3) सायन काडी ही पूर्ण परिपक्व असावी. 
4) सायन काडी कापल्यानंतर त्यामधील असलेला पिथ हा पूर्ण तपकिरी असावा. 
 
 

 
 
कलम करणे 
 
द्राक्षबागेत कलम करण्याचा कालावधी म्हणजे ज्या वेळी बागेत खालील प्रकारची परिस्थिती उपलब्ध आहे तो कालावधी होय. 
 
1) बागेत तापमान 30-35 सेल्सियस असावे.
2) बागेत आर्द्रता 80% पेक्षा जास्त असावी. 
 
द्राक्षबागेत कलम यशस्वी होत्यास खालील गोष्टी महत्त्वाच्या असतात. 
 
1 ) बागेतील तापमान व आर्द्रता (वर दिल्याप्रमाणे) 
2) खुंटकाडी रसरशीत असावी. 
3) सायन काडी पूर्ण परिपक्व असावी.
4) कलम करताना व्यक्तीने कुशलपूर्वक कलम करावे.
 
कलम करतेवेळी बागेत निवडलेली सायन काडी ही बाविस्टीनच्या द्रावणात 2-3 तास बुडवून ठेवावी. साधारण 3-4 ग्रॅम बाविस्टीन/लिटर पाणी याप्रमाणे वापरावे. यामुळे सायन काडीवरील असलेल्या रोगांचा नायनाट करणे शक्य होईल. कलम करतेवेळी सायन काडीस पाचार अशाप्रकारे घ्यावी. जेणेकरून काडीच्या दोन्ही बाजूचे पिथ उघडे पडेल. खुंटकाडीमध्ये सायनकाडी घट्ट बसेल अशा प्रकारची हलकी ते मध्यम खाचा पाडून सायन काडीस दाब दिल्यास कॅल्स लवकर तयार होतात.
 
कलम यशस्वी होण्याकरिता महत्त्वाचे म्हणजे कलम जोड तितक्या लवकर मजबूत होणे गरजेचे असते. खुंटकाडी ही रसरशीत व अर्ध परिपक्व असावी. काही वेळा बागेत ही परिस्थिती उपलब्ध नसते अशावेळी बागेत कलम करतेवेळी काडीचा पाचर केलेला भाग 6 बीए 15-20 पीपीएमच्या द्रावणावर बुडवून घ्यावा. यामध्ये उपलब्ध असलेले सायटोकायनिन हे कॅल्स तयार होऊन कलम जोड मजबूत होण्यास मदत करते. 
 
 डॉ. आर. जी. सोमकुंवर