कीटकनाशके वापरताना घ्यावयाची काळजी

डिजिटल बळीराजा-2    23-Oct-2019
 

शेतकर्‍यांनी कीटकनाशकांची खरेदी, साठवण, फवारणीसाठी द्रावण तयार करणे, उपकरणाची निवड, कीटकनाशकांची फवारणी व फवारणीनंतर इत्यादी विषयी कशी काळजी घ्यावी, हे या लेखात वाचावयास मिळणार आहे,
 
खरीप हंगाम 2017 मध्ये कीटकनाशकांची हाताळणी करताना विदर्भातील यवतमाळ व राज्यातील इतर जिल्ह्यांतील शेतमजूर/शेतकर्‍यांची कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे जीवित हानी झाली होती. कीटकनाशक अधिनियम कायदा 1968 व कीटकनाशके नियम, 1971 मधील तरतुदींनुसार देशामध्ये कीटकनाशकांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, विक्री व वापर इ. गोष्टींवर कायद्याचे नियंत्रण आहे. भारतात केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (उशपीींरश्र खपीशलींळलळवशी इेरीव ठशसळीीींरींळेप उेााळीींंशश) फरिदाबाद या देशपातळीवरील सर्वोच्च यंत्रणेद्वारे नोंदणी झालेल्याच कीटकनाशकांची विक्री करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. आजतागायत एकूण 270 कीडनाशकांची नोंदणी या संस्थेकडे झालेली आहे. या सर्वोच्च यंत्रणेद्वारे प्रत्येक कीटकनाशकांच्या वापरासंबंधी शिफारशीदेखील निश्चित केलेल्या आहेत, परंतु मागील काही वर्षांपासून शेतकर्‍यांना झालेल्या विषबाधेमागे कीटकनाशके फवारणी करताना झालेली निष्काळजी हे प्रमुख कारण निदर्शनास आले आहे. म्हणून कीटकनाशकांची खरेदी, वाहतूक व फवारणी करतेवेळी शेतकर्‍यांनी खालीलप्रमाणे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
शेतकर्‍यांनी कीटकनाशके खरेदी करताना आणि वापरताना घ्यावयाची काळजी :
 
खरेदी करताना :
 
हे करा हे करू नका
 
 • कायदेशीर परवाना असणार्‍या नोंदणीकृत कीटकनाशक डीलरकडूनच कीटकनाशके खरेदी करा.
 • रस्त्याच्या कडेला/पदपथावरील बसणार्‍या किंवा कायदेशीर परवाना नसणार्‍या व्यक्तीकडून कीटकनाशके खरेदी करू नका.
 • दिलेल्या भागात वापरण्यासाठी एक वेळ पुरेल एवढेच कीटकनाशक खरेदी करा. संपूर्ण हंगामासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशक खरेदी करू नका.
 
कीटकनाशकांच्या पॅकवर/डब्यांवर मान्यतेची लेबेल्स नीट पाहून घ्या. आवरणावरील बँच नं., नोंदणी क्रमांक, उत्पादनाची तारीख/अंतिम मुदत इत्यादी बाबी तपासा. मान्यतेची लेबेल्स नसलेली कीटकनाशके खरेदी करू नका. डब्यांत व्यवस्थित पॅक केलेलीच कीटकनाशके खरेदी करा. अंतिम मुदत संपलेली कीटकनाशके कधीही खरेदी करू नका. ज्या डब्यांतून/पॅकमधून गळती होत असेल, डब्याचे/पॅकचे आवरण सैल असेल किंवा सीलबंद नसेल तर अशी कीटकनाशके खरेदी करू नका.
 
साठवणी वेळी :
 
हे करा हे करू नका
 
 • कीटकनाशके घराच्या आवारापासून दूर साठवा. कीटकनाशके घराच्या परिसरात साठवू नका.
 • कीटकनाशके त्यांच्या मूळच्या डब्यातच साठवून ठेवा कीटकनाशके त्यांच्या मूळच्या डब्यांखेरीज इतरत्र साठवून ठेवू नका. 
 • कीटकनाशके आणि तणनाशके वेगवेगळी साठवून ठेवा. कीटकनाशके आणि तणनाशके एकत्र साठवून ठेवू नका. जिथे कीटकनाशके साठवली असतील तिथे धोक्याचा इशारा निर्देश लावून ठेवा. लहान मुलांना साठवणीच्या खोलीत जाऊ देऊ नका. 
 • कीटकनाशके लहान मुले आणि इतर पाळीव प्राणी यांच्यापासून दूर ठेववीत व साठवणीची जागा थेट ऊन आणि पावसापासून सुरक्षित असावी.
 • कीटकनाशके थेट ऊन किंवा पावसात ठेवू नका
 
वापरताना :
 
हे करा हे करू नका
 
परिवहनाच्या दरम्यान कीटकनाशके वेगळी ठेवा. मोठ्या प्रमाणात असणारी कीटकनाशके अत्यंत सांभाळून वापरण्याच्या जागी न्यावीत. कीटकनाशके आणि खाद्यपदार्थ कधीही एकत्र ठेवू नका/ने आण करू नका. मोठ्या प्रमाणात असणारी कीटकनाशके कधीही डोक्यावरून, खांद्यावरून किंवा पाठीवरून वाहून नेऊ नका.
 
फवारणीसाठी द्रावण तयार करताना :
 
हे करा हे करू नका
 
 • फवारणीसाठी नेहमी स्वच्छ पाणी वापरा. गढूळ किंवा घाण पाणी वापरू नका. 
 • संरक्षक कपडे वापरा. उदा. हातमोजे, चेहर्‍याचा मास्क, टोपी, एप्रोन, पूर्ण विजार,ई. जेणेकरून पूर्ण शरीर झाकले जाईल. संरक्षक कपडे वापरल्याशिवाय कधीही फवारणी द्रावण तयार करू नका.
 • नाक, डोळे, कान, हात यांना कीटकनाशकांचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या. शरीराच्या कोणत्याही भागावर कीटकनाशकाचा स्पर्श होऊ देऊ नका.
 • कीटकनाशकाच्या डब्यावर लिहिलेले निर्देश वापरण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचा. निर्देश न वाचता कधीही कीटकनाशक वापरू नका.
 • फवारणीसाठी गरजेपुरतेच द्रावण तयार करा. तयार केलेले द्रावण 24 तासांनंतर कधीही वापरू नका.
 • पूडस्वरूपात असणारी कीटकनाशके ही अशीच वापरावीत. पूड कधीही पाण्यात मिसळू नका.
 • फवारणीची टाकी भरताना कीटकनाशक आजूबाजूला सांडणार नाही याची दक्षता घ्या. फवारणीच्या टाकीचा कधीही वास घेऊ नका.
 
शिफारस केलेल्या प्रमाणातच कीटकनाशके वापरा.
 
जास्त प्रमाणात कीटकनाशके वापरू नका, त्यामुळे पिकांना आणि पर्यावरणाला धोका निर्माण होतो. तुमच्या जिवाला धोका निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नका. कीटकनाशकांचे काम पूर्ण होईपर्यंत काहीही खाऊ पिऊ नका, तसेच धूम्रपान करू नका.
 
उपकरणांची निवड करताना :
 
हे करा हे करू नका
 
 • फवारणीसाठी योग्य प्रकारची साधने निवडा. गळणारी किंवा दोष असणारी साधने वापरू नका.
 • योग्य आकाराचाच नोझल वापरा. दोष असणार्‍या/मान्यता नसणार्‍या कंपनीचा नोझल वापरू नका. चोंदलेली नोझल्स तोंडाने साफ करू नका. त्याऐवजी फवारणी यंत्राबरोबर असणारे टूथब्रश वापरा.
 • कीटकनाशके आणि तणनाशकांसाठी वेगवेगळी फवारणी यंत्रे वापरा. कधीही कीटकनाशके आणि तणनाशकांसाठी एकच फवारणी यंत्र वापरू नका.
कीटकनाशकांची फवारणी करताना :
 
हे करा हे करू नका
 
 • शिफारसीप्रमाणे कीटकनाशकाचे प्रमाण आणि द्रावण वापरा. कधीही सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त आणि उच्च तीव्रता असलेले कीटकनाशक वापरू नका.
 • शांत आणि थंड दिवशी फवारणी करा. उष्ण आणि भरपूर वारा असलेया दिवशी फवारणी करू नका.
 • साधारणतः व्यवस्थित उजेड असलेल्या दिवशी फवारणी करा. पावसाच्या अगदी आधी किंवा लगेचच नंतर फवारणी करू नका
 • प्रत्येक फवारणीसाठी आवश्यक ते फवारणी यंत्र वापरा. इमल्सिफायेबल कॉन्से्नट्रेड द्रावने बॅटरीवर चालणार्‍या णङत फवारणी यंत्रामध्ये वापरू नका.
 • फवारणी वार्‍याच्या दिशेने करावी. वार्‍याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नका. 
 • फवारणी झाल्यानंतर उपकरणे आणि बादल्या स्वच्छ पाणी आणि साबण वापरून धुवावीत. कीटकनाशके मिसळण्यासाठी वापरलेले डबे, बादल्या व्यवस्थित धुतल्यानंतरही कधीही घरगुती वापरासाठी घेऊ नयेत. 
 • फवारणी झाल्यानंतर लगेचच कोणाही पाळीव प्राण्याला/व्यक्तीला शेतात जाऊ देऊ नये. संरक्षक कपडे घातल्याशिवाय नुकतीच फवारणी केलेल्या शेतात कधीही जाऊ नये.

फवारणीनंतर :
 
हे करा हे करू नका
 
 • राहिलेल्या द्रावणाची सुरक्षित ठिकाणी (उदा. पडीक/निर्मनुष्य क्षेत्र) विल्हेवाट लावा. राहिलेले द्रावण पाण्याच्या स्रोतांमध्ये किंवा त्यांच्या जवळ फेकून देऊ नका.
 • वापरलेले/रिकामे डबे दगड/काठीच्या साह्याने चेपा आणि त्यांना दूर निर्मनुष्य ठिकाणी, आजूबाजूला पाण्याचा स्रोत नसलेल्या ठिकाणी खोल मातीमध्ये पुरून टाका. वापरलेले/रिकामे डबे इतर वस्तू साठवण्यासाठी वापरात आणू नका.
 • खाण्यापिण्यापूर्वी/धूम्रपान करण्यापूर्वी हातपाय व तोंड पाणी व साबणाने स्वच्छा धुवा. अंघोळ न करता किंवा कपडे न धुता काहीही खाऊपिऊ/धूम्रपान करू नका.
 • विषबाधा झाल्याची लक्षणे दिसू लागल्यास प्रथोमोपचार करा आणि रुग्णाला त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जा. डॉक्टरांना रिकामा डबादेखील दाखवा. विषबाधा झाल्याची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांकडे जाणे टाळू नका. कारण त्यामुळे रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.
कीटकनाशक विष तीव्रता चिन्हे 
 
कायद्याप्रमाणे काटकनाशकाच्या बाटल्या, डबे, पाकिटे, पिशव्या आणि पुड्यांवरील माहितीदर्शक लेबलवर विविध रंगांचे त्रिकोण असतात ते कीटकनाशकाचा विषारीपणा दर्शवतात. 
 
कीटकनाशके विष तीव्रता निर्देशक चिन्हे
 
तपशील 
 
 त्रिकोणाचे रंग   लाल   पिवळा  निळा   हिरवा
 विष तीव्रता  अतितीव्र विषारी   तीव्र विषारी   मध्यम विषारी   कमी विषारी
 LD 50 मूल्य (मिग्रॅ/किलो)  50  50-500 501-5000   5000
 
सूचना लहान मुलांपासून दूर ठेवा लहान मुलांपासून दूर ठेवा लहान मुलांपासून दूर ठेवा -
 
कायद्यानुसार कीटकनाशकाच्या डब्यावरील पँकिंग लेबलवर काय असावे हे ठरविण्यात आले आहे. त्यावर निर्मात्याचे नाव, कीटकनाशकाचे नाव, पंजीकरण क्रमांक, विषारी घटकाचे प्रमाण, वजन, बॅच क्रमांक, वापरण्याची शेवटची तारीख, विषबाधा झाल्यानंतर करावयाचे उपचाराची माहिती ई. चा समावेश असावा. याशिवाय कीटकनाशकाचा विषक्तता दर्शविण्यासाठी प्रत्येक लेबलवर चौकट काढून विषारी तत्त्वाच्या क्रियानुसार खालीलप्रमाणे लिहिणे बंधनकारक आहे. 
 
1. अतितीव्र विषारी कीटकनाशके : लेबलवरील चौकटीच्या वरच्या त्रिकोणात हाडे आणि कवटीची निशाणी खालील त्रिकोणाचा रंग गर्द लाल आणि त्यावर झजखडजछ हे लिहिलेले असावे. शिवाय अशा कीटकनाशकाच्या लेबलवर मुलाच्या जवळ ठेवू नका, विषबाधा झाल्यास डॉक्टरांना त्वरित बोलवा अशा सूचना असाव्यात.
2. तीव्र विषारी : चौकटीच्या वरच्या त्रिकोणात विष हा शब्द तर खालील त्रिकोणाचा रंग पिवळा असावा. सोबतच कीटकनाशक मुलाच्या आवाक्याबाहेर ठेवावे अशा सूचना असाव्यात.
3. मध्यम विषारी : चौकटीच्या वरच्या त्रिकोणात धोका हा शब्द, तर खालच्या त्रिकोणाचा रंग गर्द निळा असावा. यावरही मुलाच्या आवाक्याबाहेर ठेवावे अशा सूचना असाव्यात.
4. कमी विषारी : चौकटीच्या वरच्या त्रिकोणात सावधान हा इशारा, तर चौकटीचा खालचा भाग गर्द हिरवा असावा.
किडीचा प्रसार इतरत्र होऊ नये म्हणून, कीटकनाशकाची माहिती त्याची विषाक्तता याची जाणीव वापरणार्‍यास होण्यासाठी कायद्याने अशी माहिती कीटकनाशकाच्या लेबलवर उद्धृत करण्यात येते.
 
डॉ. विजय भामरे, श्री. विलास खराडे
श्री. राहुल सांगळे
 
|